राजमाता जिजाऊ अभियानाचे महासंचालक नंदकुमार यांनी कुपोषणमुक्त मेळघाटचा संकल्प केला आहे. मेळघाटातील कुपोषण, त्यावर करावयाच्या उपाययोजना तसेच बालकांच्या आरोग्याचीही काळजी घेऊन ० ते ६ वर्षे वयोगटातील बालक हा कायम कुपोषणाबाहेर राहील यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी यांचा विशेष कार्यगट तयार करण्यात आला. प्रत्येक गावातील कुपोषणाची स्थिती आणि करावयाच्या जनजागृती व प्रत्यक्ष कृतीबाबत प्रत्यक्ष आराखडा करुन त्याची प्रभावी अंमलबजावणी केली गेली. यासाठी मेळघाटातील बहुतांश गावाला त्यांनी भेट देऊन कुपोषणमुक्त मेळघाटची संकल्पना साकारण्यासाठी विशेष कार्यक्रमाची आखणी केली.
जिल्ह्यातील कुपोषणमुक्त ग्राम अभियानांतर्गत कुपोषणमुक्तीसाठी सुरू असलेल्या विविध उपाययोजनांची प्रत्यक्ष माहिती तत्कालिन मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांनी मेळघाटातील अतिदुर्गम गावांना भेट देऊन घेतली होती. कुपोषणमुक्त मेळघाट करण्यासाठी विशेष कार्यक्रम तयार करण्याच्या सूचना या भेटीत त्यांनी दिल्या होत्या. त्या अनुषंगाने शंभर दिवसांचा विशेष कालबद्ध कार्यक्रम तयार करुन त्या दृष्टीनेच कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण दिले आहे. या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळेच धारणी व चिखलदरा तालुक्यातील ४२७ अंगणवाड्यांपैकी १५२ अंगणवाड्यांमध्ये सॅम व मॅम या श्रेणीतील संपूर्ण कुपोषण हद्दपार झाले आहे. यामध्ये धारणी तालुक्यातील ५३ अंगणवाड्यांचा तर चिखलदरा तालुक्यातील ९९ अंगणवाडी केंद्राचा समावेश आहे.
अमरावती जिल्ह्यातील ० ते ६ वयोगटातील कुपोषणामधेही मोठ्या प्रमाणात घट झाली असून जिल्ह्यातील ६५ गावे कुपोषणमुक्त झाली आहेत. तसेच कुपोषणमुक्त अंगणवाड्यांमध्ये ५८ अंगणवाडी केंद्र तर २८ मिनी अंगणवाडी केंद्र अशा कुपोषणमुक्त अंगणवाड्यांचा समावेश आहे. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत कुपोषणमुक्त अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाला. तीव्र व मध्यम कुपोषित गावांच्या संख्येतही घट झाली असून यामध्ये धारणी तालुक्यातील ३३ तर चिखलदरा तालुक्यातील ९१ गावांचा समावेश आहे. गैर आदिवासी क्षेत्रातील ७६३ गावांमध्येही तीव्र व मध्यम कुपोषित बालकांच्या संख्येमध्ये घट झाली आहे.
बालकांमधील असलेल्या कुपोषणाच्या कारणांचा शोध घेतानाच ग्रामीण भागातील तसेच अतिदुर्गम आदिवासी भागातील रुढी, परंपरा, अंधश्रद्धा तसेच कमी वयात होणारे लग्न व दोन अपत्यांमधील कमी अंतर, आरोग्याबाबत प्रचंड दुर्लक्ष यामुळे बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण आढळून आले आहे. या संपूर्ण कारणांचा विशेष अभ्यास करुन कुपोषण मुक्तीसाठी लोकजागृती करताना बालकांच्या आहाराविषयी पालकांमध्ये असलेले अज्ञान हे कुपोषणामागील प्रमुख कारण असल्याचे दिसून आले आहे. कुपोषण दूर करण्याकरिता मातांच्या प्रशिक्षणावरच विशेष भर देण्यात आला असून त्यांना बालकांचे संगोपन व आहारविषयक शास्त्रशुद्ध माहिती देण्यासाठी विशेष चमू प्रशिक्षित करण्यात आला. हा चमू प्रत्येक घरी जाऊन बालकांच्या आहार पद्धतीविषयी माहिती देऊन आपल्या बालकांना दोन ते तीन वेळा आहार न देता तीन ते आठ वेळा आहार देणे व दररोज घरी शिजविण्यात येणारे अन्न अधिक जीवनसत्वयुक्त व अधिक उष्मांकयुक्त करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यासाठी विशेष दशपदीही तयार करण्यात आली.
दशपदी प्रभावी
आपल्या बालकाची काळजी घेताना तो हुशार व्हावा व शिकून मोठा व्हावा यासाठी ० ते ६ वर्षे वयोगटाच्या बालकांच्या संगोपनाबद्दल दशपदीचा प्रभावी वापर करण्याबाबत प्रत्येक गावातील महिलांमध्ये जागृती निर्माण करण्यात आली.
दशपदी म्हणजे कुपोषणमुक्त बाळ ही संकल्पना साकारताना आईने घ्यावयाच्या काळजीमध्ये बाळाच्या जन्मानंतर एक तासाच्या आत मातेने दूध पाजणे, जन्माच्या सहा महिन्यापर्यंत फक्त आईचेच दूध पाजणे यावर भर दिला जातो. सहा महिने झाल्यानंतर आईच्या दुधासोबत पूरक आहार सुरू करण्यावर प्रशिक्षणामध्ये विशेष भर देण्यात आला.
पोषण आहारामध्ये सर्व मुख्य व सूक्ष्म तत्वे उपलब्ध असणारे पोषण आहार दररोज तीन ते आठवेळा देणे. रक्तातील लोहाचे प्रमाण वाढविण्यासाठी गोळी किंवा स्प्रिंकलर देणे, मुलाची वयाची नऊ वर्ष पूर्ण झाल्यानंतर दर सहा महिन्यांनी जीवनसत्व अ देणे, आयोडीनयुक्त मिठाचे नियमित सेवन करणे, मातांना व बाळाला लसीकरण आणि घरातील वातावरण स्वच्छ ठेवून बाळाच्या विष्ठेची योग्य विल्हेवाट लावणे, बाळाला उकळलेले पाणी पाजणे यावर विशेष भर देण्यात आला. यासाठी गाव पातळीवर माता बैठका, किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन व प्रभातफेरी, मशाल फेरी तसेच ग्रामसभा घेण्यात आल्यामुळेच जिल्ह्यातील ६५ गावे कुपोषणमुक्त झाली आहेत.
जिल्ह्यात तीव्र व अतितीव्र श्रेणीतील एकही बालक नसलेली ८८७ गावे असून कुपोषणमुक्त ८६ अंगणवाड्या तसेच सॅम व मॅम श्रेणीतील मुले नसलेल्या १ हजार ४१८ अंगणवाड्या आहेत. जिल्ह्यातील कुपोषित बालकांचे प्रमाण कमी होऊन सर्वसाधारण बालकांच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ झाली आहे. मेळघाटसारख्या अतिदुर्गम व आदिवासी भागात सुद्धा सर्वसाधारण श्रेणीतील बालकांची टक्केवारी ६८ पर्यंत वाढविण्यासाठी राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त ग्राम अभियान यशस्वी ठरले आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी आनंद जगताप, उपमुख्य कार्यपालन अधिकारी व महिला व बालकल्याण अधिकारी बी.जी.सोमवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका यांचे निश्चितच महत्वपूर्ण योगदान राहिले आहे. कुपोषणमुक्तीचा संकल्प याच गतीने सुरु ठेवण्याचा निश्चय हा संपूर्ण कुपोषणमुक्तीकडे नेणारा ठरणार आहे.
No comments:
Post a Comment