गुढीपाडवा म्हणजे संस्कृतीचा सोहळा. प्रत्येक प्रांतनिहाय या गुढी उभारण्याच्या पध्दती वेगवेगळया आहेत. सातारा जिल्हयात ही बावधन यात्रेची एक वेगळी परंपरा आहे. होळीपासून सुरू होणारा हा यात्रोत्सव गुढीपाडवाच्या दिवशी संपतो. एकात्मता व पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडविणा-या या यात्रोत्सवाचा एक साक्षीदार होण ही एक पर्वणीच आहे.
नवस फेडण्याची बावधन यात्रेतील परंपरा पेशवेकालीन असून एकात्मतेचे प्रतिक असलेली ही यात्रा रंगपंचमीच्या दिवशी बगाडाच्या स्वरुपात वैशिष्ट्यपूर्णरित्या साजरी होत असते. या यात्रेनिमित्त नोकरी- व्यवसायासाठी गावातून बाहेर असलेली शेकडो कुटुंब गावात येऊन एकात्मता व पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवितात.
या भैरवनाथाची नवसाला पावणारा म्हणून ख्याती असल्याचे जुनेजाणते सांगतात. नवसाची परतफेड करण्यासाठी पंचक्रोशीतील सर्व लोक होळी पौर्णिमेच्यादिवशी मंदिरात जमतात. रात्री बारा वाजता विधीपूर्वक पूजा करुन नवस केलेल्या व्यक्तींच्या नावाने देवापुढे कौल लावला जातो. उजवा कौल मिळाल्याचे ठराविक संकेत मिळाल्यावर त्या व्यक्तीस 'बगाड्या'चा मान मिळतो. यावर्षी ४२ वर्षीय रविंद्र सोपान कदम यांना हा मान मिळाला. रविंद्र कदम यांनी २२ वर्षापूर्वी आपल्या बहिणीस संततीप्राप्ती व्हावी म्हणून नवस केला होता. नवस केल्यावर पहिल्याच वर्षी त्यांच्या बहिणीस मूल झाले. यावर्षी बगाड्याचा मान मिळावा म्हणून ४७ नवसकर्ते बसले होते. त्यापैकी रविंद्र कदम यांच्या बाजून कौल लागल्याने त्यांना बगाड्याचा मान मिळाला.
बगाड म्हणजे पूर्णत: लोखंडविरहीत असा लाकडी रथ असतो. त्याला दगडी चाके असतात. या रथाचे साहित्य म्हणजे लाकडी कणा, २ घडीव दगडी चाके, दांड्या, बैल जुपण्यासाठी जू असते. मध्यभागी आडवे मोठे चौकोनी खाचे असलेले लाकूड, त्यावर उभा खांब, बाहुली, शिड आदी संपूर्ण गाड्याची बांधणी झाल्यावर मध्यभागी वाघाचे आडवे लाकूड बसवतात. त्या लाकडास मध्यभागी गोल खाच केलेली असते. त्या खाचेमध्ये सुमारे २० फूट उंचीचा खांब उभा करुन त्याच्या वरच्या बाजूस शिड गोलाकार फिरण्यासाठी बाहुली बसवली जाते. त्यावर आडवे ५० ते ५५ फूट लांबीचे दोरखंडाचे गुंफलेले कळकाचे शिड बसवले जाते. बगाड्याला टांगण्यासाठी शिडाच्या पुढच्या टोकास झुल्यासारखी व्यवस्था केलेली असते. शिडावर तेल घालण्यासाठी एक व्यक्ती बसवलेली असते. शिड फिरते राहण्यासाठी, शिडाचे घर्षण कमी व्हावे व ते गोल फिरावे म्हणून खांबाच्या मध्यभागी दोन्ही बाजूस दोरखंडाच्या पिळकावण्या गुंफलेल्या असतात. त्यावर मानकरी म्हणून रामदास पिसाळ व विवेक भोसले उभे असतात. ते बगाडाचे मार्गदर्शक म्हणून संबोधले जातात.
गाड्यावर सुमारे २० लोक बसतील एवढी जागा व गाड्यास एकावेळी ८ बैल जुंपता येतील अशी व्यवस्था असते. बगाडाला बैल जुंपणे ही नाथांची सेवा असल्याचे बावधनकर मानतात. त्यामुळे शेतकरी बगाडाआधी दोन महिन्यांपासून आपल्या बैलांची विशेष निगा राखून, त्यांना खुराक देऊन तयार करीत असतात. पंचमीच्या आदल्या दिवशी सायंकाळपर्यंत मंदिरासमोर बगाड जोडले जाते.
पहिल्या दिवशी म्हणजे फाल्गुन वद्य चतुर्थीस दुपारपासूनच भाविक लोक भैरवनाथाला हार, नैवेद्य ते इच्छेप्रमाणे अर्पण करावयाच्या भेटवस्तू घेऊन वाजतगाजत मंदिरात येतात. याच दिवशी भैरवनाथाचा विवाहसोहळा पार पडतो. भैरवनाथ व ज्योतीबा यांची पालखीतून मिरवणूक रात्री सुरू होते. सर्व लोक गुलालाची उधळण करीत एकमेकांना भेटतात. पहाटे बगाडाचा उत्सव व्यवस्थित पार पाडण्यासाठी ग्रामस्थांची बैठक होते. नंतर छबिना जनीआईच्या मंदिरासमोर गेल्यावर त्याची सांगता होते.
छबिना संपल्यावर मंदिरापासून बगाड हलवतात. गावच्या पूर्वेस ५ कि. मी. अंतरावर कृष्णातीरावरील श्री क्षेत्र सोनेश्वर येथे बगाड सकाळी पोहोचते. या वर्षी सकाळी ७ वाजता बगाड सोनेश्वर येथे पोहोचले. या ठिकाणी बगाड्या रविंद्र कदम यास कृष्णा नदीत विधीवत स्नान घालण्यात आले. त्यानंतर शिडाला सजवून तोरणे बांधून देवदेवतांची विधीवत पूजा करण्यात आली. बगाड्याला पारंपरिक पद्धतीचा पोषाख घालून वाजतगाजत बगाडास झुल्यावर बांधून टांगण्यात आले. यावेळी भाविकांनी नोटांची व नारळाची तोरणे, झेंडे, नवसाचे गोंडे बगाडास बांधले.
सकाळी साडेदहा वाजता बगाडाचा गाडा ओढण्यास सुरुवात झाली आणि भाविकांनी 'काशिनाथाचं चांगभलं' या गजराला सुरुवात केली. ठिकठिकाणी विसावा घेऊन बगाडाचे बैल बदलण्यात आले. बगाडाच्या मागे वाघजाई देवी, भैरवनाथ आणि ज्योतिबाच्या पालख्याही होत्या. त्यांचेही भाविक दर्शन घेत होते. गाडा गावाच्या दिशेने जात असताना ठिकठिकाणी शिडाच्या पाच फेऱ्या घालण्यात आल्या. बगाडाच्या मिरवणूकीप्रसंगी युवा ग्रामस्थ मंडळ, बावधन व सकल संप्रदाय मंडळ, बावधन यांनी सर्व भाविकांसाठी मोफत अल्पोपहाराची व्यवस्था तर मुंबईच्या जनता सहाय्यक मंडळाने पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. बावधन प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक तैनात करण्यात आले होते.
सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बगाड बावधन गावात पोहोचले. यावेळी वाद्यांचा मोठा गजर करण्यात आला. बगाड यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी बगाड गाड्याच्या पुढे आणि मागे ट्रॅक्टर ट्रॉलीवरुन ग्रामस्थ मंडळ व यात्रा कमिटी पदाधिकारी ध्वनीक्षेपकावरुन बगडाबाबत सूचना देत होते. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडत बगाड उत्साहात पार पडले जाते.
हा रथ तसाच देवळाच्या आवारात ठेवला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी या रथाचे भाग वेगवेगळे करून ते विहिरीत टाकले जातात. अर्थातच रथविर्सजन केले जाते.
बगाडाच्या निमित्ताने बावधन गावकऱ्यांनी जोपासलेली कित्येक वर्षांची परंपरा आजही जोपासली जात असून एकीचं दर्शन घडवून समाजात एकात्मता व बंधुभावाची जोपासना करुन गावाच्या विकासाचं सूत्र नव्या रुपात जोपासण्याचं ऐतिहासिक काम बावधनकरांच्या हातून घडत आहे हेही तितकेच महत्त्वाचे !
सचिन गाढवे