संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण साहेबांविषयी आपल्या सर्वांच्या मनात अपार श्रद्धा, प्रेम आणि आदर आहे. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी दाखविलेली दूरदृष्टी आणि घेतलेले अचूक निर्णय यातूनच आजचा प्रगतीशील महाराष्ट्र घडला आहे. राष्ट्रीय पातळीवरही चव्हाण साहेबांनी आपलं कर्तृत्व वेळोवेळी सिद्ध केलं. केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी केलेलं कार्य आणि देशवासियांच्या मनात स्वत:विषयी निर्माण केलेला विश्वास या बळावरच देशाचं उपपंतप्रधानपदही त्यांच्याकडे चालून आलं. चव्हाण साहेबांच्या रुपानं देशाला सक्षम उपपंतप्रधान लाभला तसंच मराठी माणूस उपपंतप्रधान झालेला पाहण्याचं भाग्य आपल्याला अनुभवता आलं, अशा या युगपुरुषाबद्दल आपले विचार व्यक्त केले आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी.
यशवंतराव चव्हाण साहेबांनी जातीभेदविरहीत, सुसंस्कृत आणि संपन्न महाराष्ट्राचं स्वप्न पाहिलं होतं. आपलं राज्य केवळ देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात प्रगतीशील राज्य बनले पाहिजे हा त्यांचा ध्यास होता. ४० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय राज्याच्या प्रगतीला गती आणि सर्वसामान्य माणसाला बळ देणारा होता. राज्यातील जनतेचं कल्याण हेच एकमेव ध्येय उराशी बाळगून त्यांनी अविरत कार्य केलं.
भविष्यातील महाराष्ट्र कसा असावा याबाबत चव्हाण साहेबांची मते अत्यंत स्पष्ट होती. राज्याच्या कृषी, शैक्षणिक, आर्थिक, औद्योगिक, सांस्कृतिक विकासाला त्यांनी योग्य दिशा दिली. समाजकारण आणि राजकारणात चव्हाण साहेबांचं कार्य आपल्याला ठळकपणे दिसत असलं तरी साहित्य, कला, क्रीडा, संस्कृती अशा अन्य क्षेत्रातही त्यांचं मोठं योगदान आहे. आपल्या सर्वांच्या मनात असलेलं त्यांचं स्थान लक्षात घेऊन १३ मार्च २०१२ ते १२ मार्च २०१३ हे त्यांचं जन्मशताब्दी वर्ष विविध उपक्रमांनी आणि लोकसहभागातून साजरं करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानिमित्तानं चव्हाण साहेबांचं कार्य आणि विचार सर्वांसमोर विशेषत: तरुण पिढीसमोर यावेत आणि चिरंतन रहावेत, असा आपला प्रयत्न आहे. त्यासाठी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात त्यांच्या नावाने अध्यासन केंद्र सुरु करण्यात येत आहे.
चव्हाण साहेबांचं संपूर्ण जीवन प्रेरणादायी आहे. सांगली जिल्ह्यातल्या देवराष्ट्रे गावी एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेले चव्हाण साहेब बालपणापासूनचं प्रखर देशभक्त होते. राष्ट्रवाद हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य अंग होता. देवराष्ट्रे गावातंच प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी ते कराड इथं आले. तिथल्या टिळक हायस्कूलमध्ये शिकत असताना शाळेच्या आवारातच तिरंगा फडकवण्याचं महान कार्य त्यांनी केलं आणि त्याबद्दल पुण्याच्या येरवडा तुरुंगात १८ महिन्यांचा तुरुंगवासही भोगला. मॉट्रिकपर्यंतचं शिक्षण कराड इथं पूर्ण केल्यानंतर पुण्यातल्या विधी महाविद्यालयातून त्यांनी वकिलीची पदवी मिळविली आणि १९४२ मध्ये कराडमध्ये वकिली सुरु केली.
राष्ट्प्रेमानं ओतप्रोत भरलेलं मन मात्र त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं. १९४२ च्या स्वातंत्र्य आंदोलनात त्यांनी उडी घेतली आणि जिल्ह्यात आघाडीवर राहून आंदोलनाचं नेतृत्व केलं. त्याबद्दल त्यांना दोन वर्षांचा तुरुंगवास झाला. त्यावेळी त्यांचं लग्न होऊन अवघे दोन महिने झाले होते. दोन महिन्यांपूर्वी लग्न होऊन घरी आलेल्या त्यांच्या पत्नी वेणूताईंनाही या आंदोलनात अटक झाली आणि त्यांनीही तुरुंगवास भोगला.
देशासाठी काहीही आणि कोणताही त्याग करण्याची चव्हाण साहेबांची अगदी लहानपणापासून तयारी होती. याचा प्रत्यय १९६२ च्या चीन आक्रमणाच्या वेळी आला. तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरुंनी मोठय़ा विश्वासाने त्यांना दिल्लीला बोलावून घेतले आणि त्यावेळची अत्यंत महत्वाची संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली. चव्हाण साहेबांनीही ते आव्हान समर्थपणे पेलले. आपल्या नेतृत्वानं भारतीय अधिकार्यांमध्ये विश्वास निर्माण केला. लष्कराचं मनोधैर्य वाढवलं. पंडीत नेहरुंच्या बोलवण्यावरुन चव्हाण साहेब ज्यावेळी दिल्लीला गेले त्यावेळी `हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला` अशा शब्दात जाणकारांनी त्यांचा गौरव केला होता. यशवंतरावांचा तो गौरव म्हणजे महाराष्ट्राच्या प्रत्येक सुपुत्राचा गौरव होता, असं मला वाटतं.
चव्हाण साहेबांनी देशातील संरक्षणक्षेत्राच्या आधुनिकीकरणाचा पाया घातला आणि शस्त्रसज्जतेच्या दिशेने वेगवान सुरुवात करुन दिली. त्यांच्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम १९७१ च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात आपल्याला पहायला मिळाले. केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्मंत्री, विरोधी पक्षनेते तसंच केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्ष अशा अनेक महत्वाच्या पदांवर काम करताना चव्हाण साहेबांनी आपले कर्तृत्व वेळोवेळी सिद्ध केले आहे. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा अमीट ठसा उमटवला. देशाचे उपपंतप्रधान हे अत्यंत महत्वाचं पद केवळ कर्तृत्वाच्या जोरावर त्यांना मिळालं आणि त्यांनीही त्या पदाचा सन्मान वाढवला.
चव्हाण साहेबांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू सांगता येतील. ते थोर विचारवंत होते. साहित्यिक होते. मुत्सद्दी नेते होते. विरोधकांचा मान राखणारे संयमी राजकारणी होते. त्यांच्या राजकारणाला वैचािरक अधिष्ठान होते. जनतेच्या सुखदु:खाशी समरस झालेले, जनमताची नाडी अचूक ओळखणारे ते लोकनेते होते. त्यांच्या व्यक्तिमत्वात सर्वांना भावणारा सुसंस्कृतपणा होता. सर्वात महत्वाचं म्हणजे राजकीय क्षेत्राला त्यांनी वेगळी उंची प्राप्त करुन दिली. त्याबळावर राज्यातीलच नव्हे तर देशातील जनतेचा विश्वास त्यांनी संपादन केला होता.
राज्यात पायाभूत प्रकल्प आणि भौतिक सुविधांची निर्मिती करत असताना इथल्या समाजकारण आणि राजकारणाला सुयोग्य दिशा देण्याचं महत्वाचं काम चव्हाण साहेबांनी केलं. सर्वांना बरोबर घेऊन बेरजेचे राजकारण करण्यावर त्यांनी भर दिला. सर्वसमावेशक, समतोल आणि जातीभेदविरहीत राजकारणातूनच महाराष्ट्राचं भलं होऊ शकतं, हे त्यांनी जाणलं होतं. तसे संस्कार त्यांनी इथल्या राजकीय क्षेत्रावर केले. त्याचे परिणाम आज आपल्याला दिसत आहेत.
महाराष्ट्रातील राजकीय पक्षांमध्ये आणि नेत्यांमध्ये वैचारिक मतभिन्नता असली तरी वैयक्तिक कटुता किंवा वैर कधीच दिसलं नाही. विरोधी पक्षातील नेत्यांशी वैयक्तिक मैत्री असणं आणि राज्याच्या विकासासाठी या सर्वांनी एकत्र येणं, असं सकारात्मक वातावरण केवळ महाराष्ट्रातंच दिसू शकतं. ही सारी चव्हाण साहेबांच्या संस्कारांची आणि विचारांची देणगी आहे.
समाजकारण आणि राजकारणात कार्यरत असलेल्या माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांसाठी चव्हाण साहेबांचं जीवनकार्य आणि विचार मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहेत. त्यांनाच आदर्श मानून आज आमची वाटचाल सुरु आहे. चव्हाण साहेबांनी दिलेला राजकारणाचा हाच वारसा पुढे नेण्याचं काम आम्ही सर्वच जण आपापल्या परीनं करीत आहोत.
संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती ही आपल्यासाठी सर्वाधिक अभिमानाची गोष्ट आहे. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन हा आपला गौरवशाली इतिहास आहे. या आंदोलनात सहभागी झालेल्या कोट्यवधी जनतेचा त्याग आणि १०५ हुतात्म्यांचे बलिदान यामुळेच संयुक्त महाराष्ट्र आकाराला येऊ शकला. संयुक्त महाराष्ट्रासाठी जनजागृती करण्यात आंदोलन समितीने महत्वाची भूमिका बजावली. त्याचवेळी महाराष्ट्राच्या निर्मितीचा निर्णय घेण्यासाठी केंद्रांचं मन वळविण्यात चव्हाण साहेबांची भूमिका प्रमुख होती. त्या संपूर्ण आंदोलन काळात त्यांची भूमिका अत्यंत दूरदर्शीपणाची होती. राष्ट्रीय एकता कायम रहावी तसंच महाराष्ट्रानं मुख्य राजकीय प्रवाहापासून दूर जाऊ नये, असा त्यांचा प्रयत्न होता. मात्र त्याच वेळी, महाराष्ट्रातील जनतेची संयुक्त महाराष्ट्राची आग्रही मागणी केंद्र शासनाकडे ठामपणे मांडण्याचं काम चव्हाण साहेबांनीच केलं. केंद्र शासनाने हा अनुकुल निर्णय घ्यावा यासाठी पंडीत नेहरुंचे मन वळविण्यात ते यशस्वी ठरले आणि त्यांच्या प्रयत्नांमुळेच संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती होऊ शकली. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणण्याचं भाग्य त्यामुळेच त्यांना लाभलं, हे आपल्याला कधीही विसरता येणार नाही.
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचं ध्येय पूर्ण केल्यानंतर प्रगतीशील महाराष्ट्र घडविण्यावर त्यांनी लक्ष केंद्रीत केलं. मुंबई, कोकण, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ अशा भौगोलिक आणि सांस्कृतिक विविधता असलेल्या राज्याला एका सुत्रात बांधण्याचं आणि राज्यातल्या जनतेत भावनात्मक एकजूट निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला. महाराष्ट्रातल्या ७० टक्के जनतेचं जीवन शेतीवर अवलंबून आहे हे लक्षात घेऊन त्यांनी कृषी औद्योगिक समाजसेवेची कल्पना मांडली आणि कृषी उद्योगांना प्रोत्साहन दिलं.
महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी सहकार चळवळ ग्रामीण भागात रुजवण्यावर त्यांनी भर दिला. गावागावांमध्ये सहकारी संस्था स्थापन झाल्या पाहिजेत असा त्यांचा आग्रह होता. सहकारी बँका, सहकारी साखर कारखानदारी सुरु करण्यासाठी त्यांनी मदत केली. सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागात विकासाची गंगा नेली. औद्योगिक वसाहती स्थापन करण्याची संकल्पना प्रत्यक्षात आणून उद्योगांसाठी राज्यात पोषक वातावरण निर्माण केले. ग्रामीण भागातच मोठय़ा प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल यासाठी प्रयत्न केले, यामुळे साहजिकच ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाला गती मिळाली.
लोकशाही व्यवस्थेत सामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानत असलो तरी प्रत्यक्ष निर्णयप्रक्रियेत आणि प्रशासकीय व्यवस्थेत त्याचा सहभाग नगण्य असतो हे लक्षात घेऊन जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत अशी त्रिस्तरीय पंचायत राजव्यवस्था स्थापन करण्याचा महत्वाचा निर्णय चव्हाण साहेबांनी घेतला. यामुळे सत्तेचे विकेंद्रीकरण तर झालेच शिवाय ग्रामीण भागातील नेतृत्वाला संधी मिळाली. स्थानिक पातळीवरील प्रश्नांची जाण असलेले लोकप्रतिनिधी स्थानिक स्वराज संस्थांवर निवडून येऊ लागल्याने स्थानिक प्रश्न स्थानिक पातळीवरच मांडले आणि सोडविले जाऊ लागले. ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासासाठी याचा फार मोठा उपयोग झाला.
जिल्हा परिषदेत विकसित झालेलं नेतृत्वच पुढे जाऊन विधान मंडळ आणि संसदेत काम करु लागले. याचा फायदा राज्याच्या विकासप्रक्रियेला गती मिळण्यात झाला. स्थानिक पातळीवर काम केलेलं अनुभवी नेतृत्व विधीमंडळ आणि संसदेत निवडून येऊ लागल्यानं जनतेच्या प्रश्नांची त्यांना अचूक जाण होती. त्यामुळे अधिकार्यांवर विसंबून राहण्याची गरज उरली नाही. त्यामुळे निर्णयप्रक्रिया अधिक लोकाभिमुख, अचूक आणि जलद झाली. चव्हाण साहेबांनी दाखविलेल्या दूरदृष्टीमुळेच हे शक्य होऊ शकलं.
चव्हाण साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीत सर्वसामान्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. `कसेल त्याची जमीन` या तत्वावर नवा कुळकायदा लागू केला. शेतजमीनींच्या कमाल धारणेवर मर्यादा आणण्याचा कायदा करुन त्यांनी जमीन सुधारणेच्या दिशेने क्रांतीकारी पाऊल उचललं. या निर्णयांचा गरीब शेतकरी वर्गाला मोठय़ा प्रमाणावर फायदा झाला. राज्याची पंचवार्षिक योजना सुरु केली. कोयना आणि उजनी या दोन महत्वकांक्षी प्रकल्पांची उभारणी केवळ त्यांच्यामुळेच होऊ शकली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठांची निर्मिती केली. कृषी विद्यापीठांची स्थापना केली.
मराठी साहित्य संस्कृती महामंडळ आणि विश्वकोश मंडळाची स्थापना केली. मराठी ही राजभाषा करण्याचे तत्व स्विकारले. शासकीय कामकाजात मराठीचा वापर वाढविण्यासाठी उपाययोजना केली. कलाक्षेत्राला प्रोत्साहन दिले. नाट्यकलेला उत्तेजन देण्यासाठी योजना आखल्या. चित्रपटांना मदत करण्यासाठी करमणूक कर आकारण्याच्या पद्धतीत सुधारणा केली. लोककला आणि लोककलावंतांच्या कल्याणाकडे जातीनं लक्ष पुरवलं. वयोवृद्ध कलावंतांना आर्थिक साह्य मिळण्याची व्यवस्था केली. मागासवर्गीय समाजातील घटकांनी बौद्ध धर्म स्विकारल्याने त्यांना पूर्वी मिळणार्या सवलती बंद झाल्या होत्या, त्या सवलती चव्हाण साहेबांनी पुन्हा सुरु केल्या. ग्रामीण भागात असलेली जातीनिहाय समाजरचना नष्ट करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. समता, बंधुता, स्वतंत्रतेवर आधारित मानवतेच्या मुल्यांवर आधारित व्यवस्था रुजविण्याचा प्रयत्न केला.
महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय आणि विकासाची संधी मिळवून दिली. महाराष्ट्र राज्य हे खर्या अर्थानं लोककल्याणकारी राज्य असेल याची पूर्ण काळजी त्यांनी घेतली. पुरोगामी आणि आधुनिक महाराष्ट्राची अशी जडणघडण होत असतानाच राज्यावर आणि देशावर आलेल्या प्रत्येक संकटाचा धैर्याने सामना केला आणि आलेलं प्रत्येक संकट यशस्वीपणे परतवून लावलं.
१९६१ मध्ये पुण्यातील पानशेत आणि खडकवासला धरण फुटून झालेल्या जलप्रकोपाच्यावेळी पुणेकरांच्या मदतीसाठी ते तातडीने धावून आले होते. त्या संकटकाळात मदतकार्याचं आव्हान कठीण होतं. ते पेलताना त्यांच्या नेतृत्वाचे आणि कुशल प्रशासकाचे अनेक पैलू लोकांना अनुभवायला मिळाले.
चव्हाण साहेबांचं व्यक्तिमत्वं उत्तुंग आणि कर्तृत्व महान आहे. त्यांच्या संपूर्ण यशात आणि जडणघडणीत आई विठाबाई आणि पत्नी वेणुताई या दोघींचा वाटा सर्वाधिक असल्याचं जाणवतं. वेणुताईंनी प्रत्येक सुख:दुखाच्या प्रसंगात त्यांना खंबीर साथ दिली. संरक्षणमंत्री म्हणून केंद्रात जाण्यासारखे अनेक महत्वाचे निर्णय केवळ वेणुताईंच्या आग्रहामुळेच ते घेऊ शकले. वेणुताईंशिवाय चव्हाणसाहेब हा विचार करणंच अशक्य आहे. चव्हाण साहेबांच्या जीवनावरील वेणुताईंच्या प्रभावामुळेच ताईंच्या निधनाच्या धक्क्यातून सावरणं त्यांना अशक्य झालं.
चव्हाण साहेबांच्या संपूर्ण जीवनकार्यावर नजर टाकली तर ते युगपुरुष असल्याची खात्री पटते. त्यांनी महाराष्ट्राला अनेक गौरवाचे आणि अभिमानाचे क्षण प्राप्त करुन दिले. त्यांच्यासारखा महापुरुष या भूमीत जन्माला आला हे आपलं भाग्य आहे. महाराष्ट्राला जगातील सर्वात प्रगत राज्य बनविणं हे चव्हाण साहेबांचं स्वप्न होतं, ते स्वप्न पूर्ण करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य असून तीच यशवंतरावांना खरी आदरांजली ठरणार आहे.
No comments:
Post a Comment