निरागस आदिवासी माणसं. जंगलावर प्रेम करणारी जमात. तळहाताच्या फोडाला जपावं, असं वनसंपदेला जपून ठेवलेली ही माणसं. निसर्गाने भरभरुन दिलेलं... ७८ टक्के वनक्षेत्र... बारमाही वाहणाऱ्या नद्या... एकदा आपण याच, असं आग्रहाचं निमंत्रण गडचिरोलीच्या पत्रकारांनी दिलं. निमित्त होते, राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी पालकत्व स्वीकारलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकारांसमवेतच्या संवादाचं ! सकाळची साडेअकराची वेळ. पत्रकार भवनातील सभागृह पुण्यातील पत्रकारांनी भरलं होतं. गडचिरोलीचे २० ते २५ पत्रकार बरोबर वेळेवर आले. आबांच्या आगमनाची प्रतिक्षा होती. तेही वेळेवर आले. नेमका काय संवाद होणार? कसं होणार? याची उत्सुकता होती. पत्रकार संघटनेचे पदाधिकारी उमेश धोंगडे, विठ्ठल जाधव, प्रकाश भोईटे, प्रसाद कुलकर्णी यांनी सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमामागील पार्श्वभूमी सांगितली.
सुरुवातीला प्रातिनिधीक स्वरुपात गडचिरोलीचे पत्रकार सुरेश पद्मशाली व महेश तिवारी यांनी मनोगत व्यक्त केले. गडचिरोली महाराष्ट्राच्या एका टोकावर आहे. विकासापासून दूर. प्रचंड वनसंपदा असताना मात्र नक्षलवादी जिल्हा म्हणून गडचिरोलीची ओळख आहे. नक्षलवाद्यांची ओळख आम्ही नाकारत नाही परंतु तेथील जनजीवन, तिथलीं माणसं, आपण येऊन एकदा न्याहाळावं, असं आर्जव करतानाच तेथील समस्यांवरही त्यांनी प्रकाश पाडला.
गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी नक्षलवाद केवळ बंदुकीने संपत नाही. त्याला विकासाची जोड द्यावी लागेल, अशी भूमिका मांडत असतानाच पश्चिम महाराष्ट्रातील जनजीवन व विकास तेथील पत्रकारांना पाहता यावा, या हेतूने अभ्यास दौरा आयोजित केला. गडचिरोलीच्या विकासासाठी काय करता येईल, हा या मागचा हेतू त्यांनी स्पष्ट केला. पायाभूत सुविधा, उत्तम आरोग्य सेवा, गुळगुळीत रस्ते आणि रोजगार या बाबींचा त्यांनी परामर्ष घेतला. पूर्वीचा गडचिरोली जिल्हा आणि आताचा जिल्हा यात फरक जाणवतोय. आबांनी पालकत्व स्विकारल्यापासून नवी उमेद निर्माण झाली आहे. गेल्या अडीच वर्षात गडचिरोली बदलतोय. . . अशी प्रांजळ कबुली पत्रकारांनी आपल्या मनोगतात दिली.
नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात माणसे मारली गेली, त्यांचे कुटुंब उध्दवस्त झाले. त्या कुटुंबास मदतीचा हात आर.आर. आबांनी दिला. या कुटुंबातील जवळपास ५० मुला-मुलींना पुणे येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत दाखल केले. दोन वर्षात या मुलांमध्ये झालेला बदल या निमित्ताने पाहायला मिळाला. गडचिरोलीच्या पत्रकारांसमवेत त्या शाळेवर गेलो. या विद्यार्थ्यांचे सहजपणे झालेले इंग्रजीमधील भाषणं... विविध कलागुणांचे सादरीकरण... खरोखरच अचंबित करणारे होते. घोडेस्वार, हॉकी, क्रिकेट, धनुर्विद्या आदी सर्वच खेळांमध्ये पारंगत झालेली मुले पाहायला मिळाली.
फुलगाव येथे निसर्गरम्य ठिकाणी असलेली ही शाळा. प्रशस्त मैदान... स्वच्छता... तेथील हिरवळ, फुलझाडं, वसतिगृह, व्यायामशाळा अतिशय सुंदर व अप्रतिमचं होतं. उंच टेकडीवर असलेली ही शाळा. श्री. दीपक पायगुडे यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे विद्येचं मंदिर गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील आदिवासी मुलांना खुले केले. व्यासपीठ मिळवून दिले. गुणवत्ता असते परंतु संधी मिळाली पाहिजे .केवळ भौतिक नव्हे तर सांस्कृतिक, सामाजिक विकास देखील तेवढाच महत्वाचा असतो.
पुण्यासारख्या सांस्कृतिक व विद्येच्या माहेरघरात आम्हाला शिकायला मिळते. विविध उपक्रमात भाग घेता येतो. येथील जनजीवन व माणसे जवळून पाहता येतात. मिळालेल्या संधीचं आम्ही निश्चित सोनं करु, असा विश्वास या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
शासन आणि जनता ही रथाची दोन चाकं आहेत. एकमेकांमध्ये संवाद होणं हेही तेवढंच महत्वाचं आहे. पुण्यासारख्या ठिकाणी शिक्षण घेणारी ही मुलं भविष्यात आपल्या जिल्ह्याच्या विकासात निश्चित योगदान देतील. गडचिरोली जिल्ह्याची नक्षलवादी म्हणून असलेली ओळख निश्चित पुसून काढतील, ही अपेक्षा घेऊन आम्ही परतीच्या वाटेने निघालो.
No comments:
Post a Comment