महिलांच्या विशेषत: ग्रामीण भागातील महिलांच्या उन्नतीसाठी मागील काही वर्षात बचत गट प्रभावी माध्यम ठरू लागले आहे. या बचत गटाच्या माध्यमातून रोषमाळच्या महिलांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले गेले. त्यातून महिलांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला. सरीता बचत गट असे नाव असलेल्या या गटातील श्रीमती आशा पंडीत पावरा यांनी गावाची गरज ओळखून गावात पिठाची गिरणी सुरु केली.
रोषमाळ हे गांव आदिवासी असल्यामुळे येथील महिला मोठ्या प्रमाणावर काबाडकष्ट करतात. रोज लागणारे पीठ त्या घरीच दळतात. यामध्ये त्यांना बरीच मेहनत करावी लागते आणि वेळही बराच लागतो. कोणी पाहुणे आले तर २-३ कि.मी. पायी जाऊन दुसऱ्या गावातून धान्य दळून आणावे लागत होते. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता गिरणी सुरु करण्याचा विचार आशाताईच्या मनात आला. त्यासाठी त्यांनी बँकेत प्रस्ताव सादर केला. बँकेने लगेचच त्या प्रस्तावाला मंजूरी दिली आणि बचतगटाच्या या कामास सुरूवात झाली.
कष्ट कमी होत असल्याने गावातील महिला धान्य हाताने दळण्याऐवजी आता या गिरणीवरच दळू लागल्या आहेत. बचत गटालाही या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळू लागले आहे. बचत गटातील महिला देखील यामुळे समाधानी आहेत. धान्य दळल्यामुळे महिलांना पाठीचे आजार मोठ्या प्रमाणावर होत असत. आशाताईंनी पिठाची गिरणी सुरु करुन आमचे काम हलके केले आहे. पिठाची गिरणी आमच्या गावात आल्यामुळे आमचे कष्ट कमी झाले आहेत. रोज काम करुन आरामही मिळतो आहे, अशा प्रतिक्रिया आता गावातील महिला देऊ लागल्या आहेत.
पिठाच्या गिरणीच्या व्यवसायामुळे मिळालेला आत्मविश्वास गटातील महिलांना उपयोगी ठरला आहे. सरीता महिला बचत गटातील महिलांनी आता एक पाऊल पुढे टाकून बँकेकडून आणखी कर्ज मिळविले आहे. त्यातून त्यांनी दुग्ध व्यवसाय सुरु केला आहे. काही महिलांनी परसबागेत भाजीपाला लावून रोजगार निर्माण केला आहे. आपल्या कामाद्वारे या महिलांनी गावातील इतर महिलांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे.
No comments:
Post a Comment