Monday, March 19, 2012

दुष्काळी माढा झाला बागायतदार

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माढा तालुक्याची ओळख आता सर्वाधिक ऊस उत्पादन करणारा तालुका अशी झाली आहे. उजनी धरण हे माढा तालुक्यात असले तरी त्याचा लाभ माढ्याच्या शेतीसाठी होत नव्हता. परंतु शासनाच्या उपसा सिंचन योजनेमुळे या भागाचे चित्रच बदलून गेले आहे.

आज या तालुक्यात तीन साखर कारखान्यांना पुरून बाहेरच्या अनेक कारखान्यांना ऊस पाठवावा लागत आहे. एवढे मुबलक ऊस उत्पादन होत आहे. अनेक वर्ष पडीक राहिलेली जमीन आणि कष्ट करायची मानसिकता या जोडीला पाण्याची उपलब्धता झाल्याने येथील शेतीचे चित्रच पालटून गेले आहे.

माढा तालुक्यातील नगोर्ली गावातील गोवर्धन कुंडलिक महाडीक या शेतकऱ्याने एकरी ११९ टन ५०० किलो ऊस उत्पादन घेतले आहे. माढ्याच्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे सभासद असणाऱ्या महाडीक यांची नगोर्ली येथे सात एकर शेती आहे. त्यात साडेचार एकर ऊसाचे क्षेत्र आहे. सव्वादोन एकर खोडवा, सव्वाएकर निडवा आणि एक एकर सुरु ऊसाचा त्यात समावेश आहे. या एक एकर क्षेत्रातील ८६०३२ जातीचा त्यांचा ऊस नुकताच तुटून कारखान्यास गेला आहे. एक एकर ऊसाला त्यांना सुमारे ३२,५०० रुपये खर्च आला आहे आणि त्यातून ११९.५० टन उसाचे उत्पादन निघाले आहे.

माढा तालुक्याची दुष्काळी तालुका अशी ओळख होती. परंतु शासनाने या तालुक्यात पाण्याची सोय व्हावी म्हणून उजनी धरणाच्या पाण्यातून उपसा सिंचन योजना राबविली. याद्वारे तालुक्यातील निम्म्यापेक्षा जास्त जमीन पाण्याखाली आली असल्याचे महाडीक म्हणाले. त्यामुळे माढा तालुका आता बागायतदारांचा तालुका म्हणून ओळखला जातोय, असेही त्यांनी अभिमानाने सांगितले.

विठ्ठलराव शिंदे कारखान्यास आपला ऊस गेला असून कारखान्याने दिलेल्या १८५० रुपयांच्या पहिल्या हप्त्‍यानुसार या उसासाठी पहिल्या हप्त्‍यातच दोन लाख २१ हजार ४५ रुपये मिळाले आहेत. तुटलेला हा ऊस ४८ ते ४६ कांड्यांपर्यंत एकसारखा वाढलेला होता. यंदा पाऊसकाळ बरा झाला असता तर हे उत्पादन अजून वाढायला मदत झाली असती, असे महाडीक यांनी सांगितले.

उत्तम शेती व्यवस्थापन असणाऱ्या महाडीक यांच्या तीन एकर शेतीतून गेल्यावर्षी २७० टन ऊस निघाला होता. त्या तीन एकरातील खोडवा पीकही उत्तम आहे. एका उसाचे वजन सुमारे साडेतीन ते चार किलो भरत आहे. त्यामुळे खोडव्‍याचेसुद्धा विक्रमी उत्पादन निघेल, असे कारखान्याचे शेती विभागाचे अधिकारी सांगत आहेत.

याच तालुक्यातील परिते येथील ब्रम्हदेश शिवदास लामकाने यांनीदेखील ऊसशेतीमध्ये आपली ठळक ओळख निर्माण केली आहे. त्यांच्याकडे १० एकर ऊस आहे. एक एकर रानातील त्यांचा २६५ जातीचा ऊस नुकताच तुटून गेला असून त्यातून त्यांना एकरी ११७.९३ टनाचा उतार मिळाला आहे. निमगाव (टे) येथील राहुल हनुमंत शिंदे यांनी एक एकर रानातून २६५ जातीच्या ऊसाचे एकरी १०५ टन उत्पादन घेतले आहे. गेल्या काही वर्षात माढा तालुक्यातील शेतकरी मोठ्या जिद्दीने एकरी उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करीत असून त्यास यश मिळत असल्याचेच त्यातून स्पष्ट होत आहे.


  • रुपाली गोरे

  • No comments:

    Post a Comment