Monday, March 5, 2012
व्यवसायात यशस्वी भरारी व्यवसायात यशस्वी भरारी
वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील बोर धरण रस्त्यावर वसलेल्या हिंगणी या गावात असलेल्या ४० ते ४५ गटांपैकी माविम अंतर्गत ५ गटांची स्थापना झालेली आहे. त्यापैकीच एक उन्नती स्वयंसहायता गट. १५ मे २०१० रोजी स्थापन झालेल्या या गटातील एक सदस्य ज्योत्स्ना उरकुडे ह्या गटामध्ये येण्यापूर्वी फक्त चूल आणि मुल इतपतच मर्यादित होत्या. परंतु बचत गटात सामिल झाल्यानंतर मात्र त्यांच्या आयुष्यात मोठा बदल झाला.
उन्नती बचत गटाच्या स्थापनेपासून त्या गटाच्या सक्रीय सभासद आहेत. गटाच्या नियमित सभेला उपस्थित राहणे, प्रशिक्षणामध्ये सहभागी होणे, यामुळे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झालाय. उद्योजकता जाणीवजागृती प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या मनात उद्योग-व्यवसाय करण्याची इच्छा निर्माण झाली. गटातून ४००० रूपयांचे कर्ज घेऊन साडी, रेडिमेड कपड्याच्या व्यवसायाला त्यांनी सुरुवात केली. व्यवसायाच्या उत्पन्नातून गटाच्या कर्जाची परतफेड झाली. त्यानंतर माविम सहयोगीनीच्या मार्गदर्शनाने २० हजार रूपयांचे कर्ज घेऊन त्यांनी व्यवसायामध्ये वाढ केली. व्यवसायाच्या माध्यमातून एका वर्षामध्ये या कर्जाचीही परतफेड झाली. ज्योत्स्ना यांची प्रगती व कर्ज परफेडीची प्रामाणिकता पाहून बँक ऑफ इंडियाच्या हिंगणी शाखेने त्यांचा सत्कार केला. व्यवसायात वाढ करण्याकरिता ज्योत्स्ना यांनी बँकेकडे ५० हजार रूपयांच्या कर्जाची मागणी केली. बँकेने त्यांना कर्ज मंजूर केले. या माध्यमातून व्यवसायाला भरभराट आली असून, व्यवसायातून त्यांना चांगला नफा मिळू लागला आहे.
ज्योत्स्नाच्या या आदर्श कार्यामुळे गावात झालेल्या गाव विकास समितीमध्ये त्यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली. गाव विकास समितीच्या माध्यमातून त्यांनी सर्व गटातील महिलांच्या सहभागाने गावामध्ये वृक्षारोपण, एच.आय.व्ही. एड्स जाणीवजागृती मार्गदर्शन कार्यक्रम, रॅली, महिलांची आरोग्य तपासणी, सावित्रीबाई फुले जयंती इत्यादी महत्वपूर्ण कार्यक्रम घेतले आहेत.
ज्योत्स्ना उरकुडे यांची बचत गटात येण्यापुर्वीची परिस्थिती आणि हिंमत आणि प्रामाणिकपणाने व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी घेतलेली भरारी हे इतरांसाठीही निश्चितच प्रेरणा देणारे आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment