Saturday, March 3, 2012

खुणविती सागरकिनारे

रत्नागिरी जिल्ह्याला १६७ किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. शुभ्र वाळूचे समुद्रकिनारे पर्यटकांसाठी मोठे आकर्षण आहे. विशेषत: गुहागरपासून जयगडखाडीमार्गे रत्नागिरीकडे येताना समुद्र किनाऱ्यावर मनसोक्त मजा लुटता येते. निसर्गाचे सुंदर रुप या प्रवासात पाहायला मिळते.

गुहागर हे निसर्ग सौंदर्याचे आगार आहे. समुद्रकिनाऱ्याचे सुरुबन, नारळ-पोफळीची दाटीवाटी उभ्या असलेल्या बागा, वड-पिंपळाचे विस्तारलेले वृक्ष अशी समृद्धी या परिसराला लाभली आहे. इथल्या विस्तारलेल्या समुद्रकिनाऱ्यावरची भटकंती आनंददायी असते. समुद्रस्नानाची मजा लुटतानाच किनाऱ्यावरील नारळीच्या बागेत निवांत क्षण घालविण्याचा अनुभव काही वेगळाच असतो.

गुहागरहून मोडका आगरमार्गे गेल्यास २० किलोमीटर अंतरावर वेळणेश्वरचा समुद्र किनारा आहे. या ठिकाणी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे निवाससुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नारळाच्या बागांनी सजलेल्या समुद्रकिनाऱ्यावरून चालताना पांढऱ्या शुभ्र वाळूचा मऊशार स्पर्श सुखावणारा असतो. किनाऱ्यावरील वेळणेश्वराचे मंदिर तेवढेच सुंदर आहे. किनाऱ्यावर कोकणी सरबतांची चव घेत प्रवासातील थकवा घालविता येतो. एमटीडीसीच्या पर्यटन केंद्रातून सकाळच्या वेळी समुद्राचे मोहक दृश्य न्याहाळता येते.

वेळणेश्वरपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या हेदवी गावाजवळ असलेल्या बामणघळ येथील समुद्र किनाऱ्यावर निसर्गाचा अद्भुत आविष्कार पाहायला मिळतो. एका बाजूला दाट सुरुबन आणि दुसऱ्या बाजूला काळ्या कातळांनी वेढलेल्या या किनाऱ्यावर खडकांवर आदळणाऱ्या लाटांचा खेळ जवळून न्याहाळता येतो. भरतीच्या वेळी मात्र किनाऱ्यापासून दूर उभे राहूनच हा आनंद घेणे योग्य ठरते. किनाऱ्यावर उमामहेश्वराचे मंदिर आहे. मंदिर ओलांडून मागच्या बाजूस खडकांवरून काही अंतर चालल्यावर एका ठिकाणी दहा ते पंधरा फूट उंचीची अरुंद नाळ दिसते. भरतीच्या वेळी याच फटीतून समुद्राच्या लाटा उंच उसळतात आणि त्यांचा उंच जलस्तंभ तयार होतो. यावेळी उडणाऱ्या तुषारांचे सुर्यप्रकाशातील सौंदर्य नजरेचे पारणे फेडते. हे दृश्य कॅमेऱ्यात कैद करण्याचा मोह आवरत नाही.

बामणघळ परिसरातील नरवण गावातील निसर्गरम्य परिसरात असलेल्या सुंदर मंदिरांनाही भेट देता येते. हेदवी येथील पेशवेकालीन मंदिरात श्रीगणेशाचे दर्शन घेतल्यावर तवसाळमार्गे जयगडला जाण्यासाठी खाडीतून फेरीबोटीची व्यवस्था आहे. याच मार्गावर हेदवीपासून ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या रोहिला गावातील खाडीवर असलेल्या पुलाचा परिसर अत्यंत रम्य आहे. काही क्षण गाडीतून उतरून परिसराचे सौंदर्य कॅमेऱ्यात कैद करण्याचा मोह पर्यटकांना आवरत नाही. खाडीच्याच कडेने तवसाळ येथे पोहचल्यावर वाहनासह फेरीबोटीतून सफर करता येते. या फेरीत काही वेळा डोक्यावरून जाणाऱ्या सीगल पक्षांचे थव्याचे निळ्याशार आकाशाच्या पार्श्वभूमीवर दिसणारे सौंदर्य डोळ्यात साठविण्याचा आनंद लुटता येतो. समुद्रसफरीचे असे क्षण हृदयाच्या कप्प्यात साठवून ठेवण्यासारखे असतात.

पलिकडच्या जयगड किनाऱ्यावर कऱ्हाटेश्वर मंदिराच्या परिसरात खडकावर आदळणाऱ्या लाटांचा खेळ सुरू असतो तर दीपस्तंभावरून दिसणारे अथांग समुद्राचे रूप तेवढेच मोहक असते. हे सौंदर्य डोळ्यात साठविल्यावर या सफरीचा समारोप तेवढाच रोमांचकारी आणि अद्भुत असतो. गणपतीपुळे येथे सूर्यास्ताच्या वेळी लाटांवर पसरलेल्या तांबड्या किरणांचे सौंदर्य आणि दूर क्षितिजावर समुद्रामागे कलेकलेने अदृष्य होणारा सूर्य पाहताना मनात रोमांच दाटतात. पुन्हा अशीच सफर घडावी अशी इच्छा मनात ठेऊनच पर्यटक रत्नागिरीकडे वळतात ते पुढच्या प्रवासात समुद्राचे कोणते रुप पाहायला मिळेल या उत्सुकतेने. 


  • डॉ.किरण मोघे
  • No comments:

    Post a Comment