यवतमाळ मधील दारव्हा तालुक्यातील दहा किलोमिटर अंतरावर बिजोरा पोड आहे. गावात ३० घरे असून २८० इतकी लोकसंख्या आहे. पूर्णत: पारधी समाज असलेल्या या पोडावर फारसा विकास झालेला नाही. मात्र गावातील नागरिकांमध्ये प्रचंड जागरुकता आहे. हातावर पोट असणाऱ्या येथील गावकऱ्यांना मात्र दारव्हा येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या अभिनव उपक्रमाने ऊर्जा मिळाली आहे.
श्री. शेख यांनी शाळांच्या भेटीदरम्यान या पोडावर भेट दिली. त्यांनी केलेल्या प्रबोधनामुळे गावकरी चांगलेच हुरळून गेले. अनेक गावकऱ्यांमध्ये उत्साह संचारला. हाच उत्साह व्दिगुणित करण्यासाठी येथे घर तेथे झाड ही अभिनव संकल्पना यशस्वी करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि या कार्यक्रमाचे उद्घाटनही पार पडले. पाहता-पाहता ग्रामस्थांसह मुला-मुलींचे व परिसरातील शाळा व्यवस्थापन समित्यांचे सहकार्य लाभले.
डोंगराच्या कुशीत वसलेल्या या गावात नव्यानेच वस्तीशाळेचे रूपांतर नवीन शाळेत झाले आहे. नवीन इमारत तयार झाल्याने विद्यार्थीही शाळेत येऊ लागले आहेत. शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र वनवे, निमशिक्षक यू. डब्ल्यू. राठोड या शिक्षक मुलांना पहिली ते चौथीपर्यंत शिकवतात. शाळेची झालेली नवीन इमारत, सोबतच सर्वशिक्षा अभियानातून शाळेत निर्माण झालेले शैक्षणिक वातावरण, या जोडीला शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या भेटीमुळे गुणवत्तेचा दर्जाही सुधारला आहे.
गटशिक्षणाधिकाऱ्यांनी येथे भेटीदरम्यान शाळेतील शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे प्रबोधन केले. शाळेसह गावात स्वच्छता उपक्रम राबविणे, घर तेथे झाड ही संकल्पना यशस्वी करणे, यावर भर दिला. आज अनेक घरांसमोर झाडे लावण्याचा उपक्रम सुरु झाला आहे. शिक्षण विस्तार अधिकारी अतिकुर रहेमान, ग्रामपंचायत सदस्य शांताबाई पवार, मुख्याध्यापक नरेंद्र वनवे, यू.के.राठोड यांच्यासह गावातील विलास राठोड, विलायती चव्हाण, उमेश चव्हाण, केंद्रप्रमुख पुष्पा भगत, प्रभु चव्हाण, नरेंद्र चव्हाण, चंद्रशेखर पवार, रामभाऊ सोळंके, कान्हु पवार, मांडवाबाई पवार, कविता पवार आदींची या उपक्रमासाठी महत्वाचे योगदान लाभत आहे.
उपक्रमानिमित्त गटशिक्षणाधिकारी शेख म्हणाले, गावात संपूर्ण अनुसूचित जमातीचे लोक आहेत. शिक्षणाप्रती त्यांचा उत्साह पाहता मी या गावासाठी निवासी शाळेचा प्रस्ताव सरकारकडे पाठविणार आहे. याच सोबत शासनाच्या प्राथमिक शिक्षणासंबंधीच्या काही योजना असतील तर त्याची पूर्णपणे या गावात अंमलबजावणी अपेक्षित आहे
No comments:
Post a Comment