Thursday, March 8, 2012

सामाजिक जीवनात महिलांचे महत्वपूर्ण योगदान

दरवर्षी ८ मार्च या महिला दिनाची सर्वत्र चर्चा असते. ही केवळ चर्चाच नसते तर या दिनाच्या निमित्ताने महिलांमध्ये जनजागृतीसाठी विविध चर्चासत्र, परिसंवाद, व्याख्यानमाला, मेळावे यासारखे विविध कार्यक्रम राजकीय,सामाजिक शासकीय-निमशासकीय, सहकारी, स्वयंसेवी व खाजगी संस्थाच्या पातळीवर पार पाडली जातात.




या कार्यक्रमातून महिलांच्या विविध कलागुणांचा गौरव होऊन त्यांना आगळेवेगळे व्यासपीठ मिळवून देण्याबरोबरच त्यांचे कर्तृत्व सिध्दतेची ओळख होते.यामुळेच सामाजिक जीवनात महिलांचे महत्वपूर्ण योगदान म्हटल्यास वावगे ठरणार नाही.



शासनाने महिलांना राजकीय,सामाजिक तसेच शासकीय-निमशासकीय सहकारी, खाजगी, स्वयंसेवी संस्थेत आरक्षणाची संधी प्राप्त करुन दिल्याने त्यांना विविध विभागात नोकरी व व्यवसायाची संधी फायदा होत आहे.यामुळे आज सर्व क्षेत्रात महिलांचे कर्तृत्व सिध्द झालेले पहावयास मिळते.भारतीय संस्कृतीत तर महिलांना अनन्य असे स्थान देवी-देवतांच्या रुपात मिळालेले आहे. पृथ्वीला देखील आपण वसुंधरा मानून तिला स्त्रीत्वाची उपमा दिलेली आहे.



आजच्या तंत्रज्ञान युगातील औद्योगिक क्रांतीतही महिलांचा सिंहाचा वाटा आहे. शैक्षणिक क्षेत्रातही आज महिला पुरुषाच्या पुढे आगेकूच करीत आहेत. ग्रामीण भागातील महिलांचा विचार केल्यास कुटुंब व्यवस्थेत घरातील बालगोपाळांच्या संगोपनासह स्वयंपाक, धुणीभांडी, सर्व प्रकारची दैनंदिन घरकामे, पुरुषांना त्यांच्या शेती व अन्य व्यवसायात साथ देणे यात महिलांचा अग्रक्रम आहे.



महिलांनी आपल्या कर्तृत्वावर अनेक क्षेत्रात आघाडी मिळविली आहे. बचतगटाच्या माध्यमातून तर महिलांनी ग्रामीण व शहरी विकासाच्या विविध क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. त्यामुळे आजची स्त्री ही चूल आणि मूल या पुरातन म्हणीनुसार तेवढयापुरतीच मर्यादित न राहता ती आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रात आघाडीवर राहून पुरुषापेक्षा काकणभर सरसच ठरत आहे. त्यामुळे आजची महिला ही केवळ महिला राहिली नसून ती सक्षम अशी सबला स्त्री बनली आहे.



स्त्रियांतील सहनशिलता मोठी असल्याने ती कधी झाशीची राणी तर कधी दुर्गादेवीची भूमिका बजावत आहे. आजची स्त्री कुठल्याही क्षेत्रात कमकुवत पहावयास मिळत नाही. पुरातन संज्ञेप्रमाणे स्त्री अबला राहिली नसून कौटुंबिक व सामाजिक अत्याचाराविरुध्दही आवाज उठवून आपल्या स्त्रीत्वाचा आदर निर्माण करत आहे.



स्त्री शिक्षणाची दारे क्रांतीज्योति सावित्रीबाईंनी स्त्रीयांना खुली करुन दिल्यानेच आजची स्त्री ख-या अर्थाने शैक्षणिक क्रांतीत आघाडीवर आहे. राष्ट्रपती पदावरही आज प्रतिभाताई पाटील या स्त्रीत्वाने आपली सिध्दता पटवून दिली आहे.. संसदेच्या सभागृहातही सभापती म्हणून आज स्त्रीने आपले स्थान काबीज केले. माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी, सुवर्ण कन्या पी.टी.उषा, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, आशा भोसले,उषा मंगेशकर आदींनी विविध क्षेत्रात भरारी मारली आहे. त्यामुळे आजची स्त्री सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे.



भारतीय राज्य घटनेने स्त्रियांना विविध संविधानिक अधिकार दिलेले आहे. मानवी हक्क संरक्षण कायदा १९९३, हिंदू विवाह कायदा १९५५, हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा १८५६, मुस्लीम विवाह कायदा, मुस्लीम स्त्री घटस्फोट हक्क संरक्षण कायदा १९८६, विवाहित स्त्रियांचा संपत्तीचा कायदा १९५९, वैद्यकीय गर्भपात कायदा १९२९, हुंडा प्रतिपबंधक कायदा १९६१, बालविवाह निर्बंध कायदा १९२९, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा २००५, सती प्रथा प्रतिबंध कायदा १९८७, गर्भलिंग चाचणी प्रतिबंध कायदा १९९४, महाराष्ट्र देवदासी प्रथा प्रतिबंध व निर्मूलन कायदा २००५, दलित आणि मागासवर्गीय स्त्रियांसाठी नागरी अधिकारांच्या संरक्षणासंबंधीचा कायदा १९५५, अनुसुचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा १९८९ आदी कायद्यानुसार स्त्रियांना संरक्षण लाभल्याने स्त्रियांना आज समाजात वावरताना आपले हक्क अबाधित राखता येत आहेत. त्यामुळे आजची स्त्री सर्वच बाबतीत सबला बनून स्वत:च्या, कुटुंबाच्या,समाजाच्या आणि देशाच्या विकासात अग्रेसर आणि सक्षम बनली आहे.



महिलांना शैक्षणिक क्षेत्रात, नोकरीच्या क्षेत्रात आणि व्यवसायात समान संधी आणि स्वातंत्र्य देण्यात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. आज महिलांचा सामाजिक, राजकीय व आर्थिक क्षेत्रातील प्रगती व दर्जा उंचावण्यासाठी व त्यांना सक्षम बनविण्यासाठी राज्य शासनाने राज्य महिला आयोगाची स्थापना १९९३ केली आहे.



तसेच राज्यातील अल्पसंख्याकांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी भारतीय संविधानाव्दारे अल्पसंख्याकांकरता विहित करण्यात आलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र शासनाने स्थापन केलेल्या राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने राज्य अल्पसंख्याक आयोगाची स्थापना क रुन यात स्वतंत्र महिला कक्षही स्थापन केला आहे.



अशा या महिला दिनानिमित्त्त महिला शक्तीच्या प्रगतीस मानाचा मुजरा.





एस.के.बावस्कर

No comments:

Post a Comment