पश्चिम महाराष्ट्रात ज्या दुग्ध व्यवसायाने समृध्दी आली त्याच व्यवसायाने आता बुलडाणा जिल्हयाच्या धाड परिसरात गती घेतली आहे. करडी, मासरुळ, ढालसांवगी या सिंचन प्रकल्पांच्या प्रभावाखालील गावामध्ये होणारे दुग्ध उत्पादन शेतकऱ्यांच्या आर्थिक समृध्दीला चालना देत असून म्हसला बु. येथील कष्टकऱ्यांची यशोगाथा जिल्हयाच्या दुग्ध क्रांतीत भर टाकणारी आहे.
महाराष्ट्रातील ८३.१ टक्के एवढे शेती क्षेत्र केवळ मान्सूनवर अवलंबून आहे. पावसाच्या बेभरवशामुळे विदर्भातील शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. जे अल्पभूधारक किंवा भूमीहीन आहेत त्याच्या कौटुंबिक विकासाला वाव नाही. अशा परिस्थीतीत धाड परिसरात डॉ. राजेंद्र गोडे यांच्या सुप्रभात डेअरीने आणि सुरेश देवकर यांच्या धामणा दुधामुळे योग्य दर मिळणारे मार्केट निर्माण केले आहे. प्रत्येक हप्तात १० हजारापेक्षा अधिक मोबदला उचलणारे अनेक शेतकरी ३० हजारापेक्षा अधिक मासिक उत्पन्न घेत आहेत.
सावंगी, रुईखेड मायंबा, म्हसला, बोदेगांव, वरुड या गावातील बहुतेक शेतकरी सुप्रभात डेअरीच्या संकलन केंद्रावर तर धामणगाव, डोबरुळ, मासरुळ, मराठवाडयातील काही गावातून येणारे दूध धामणा दूध केंद्रावर जमा होते. श्रमाला योग्य बदला मिळू लागल्याने म्हसला बु. येथील शेकडो लिटर दुधाचे उत्पादन घेणारे शेतकरी दुग्ध व्यवसायाचे अर्थशास्त्र सांगत आहेत.
म्हसला बु. च्या भागाजी भोंडे, आनंदा भोंडे, नारायण भोंडे, गजानन भोंडे, भिमराव भोडे, विक्रम भोंडे, विजय भोंडे, रामेश्वर पाटील या शेतकऱ्यांच्या चर्चेतून मुऱ्हा जातीच्या एका म्हशीपासून सरासरी २० लिटर दूध उत्पादन होते. महिन्याकाठी एकूण ६०० लीटर दूध एका म्हशीपासून मिळते. सरासरी ३० रुपये प्रतिलिटर भाव मिळाला तरी महिन्याला १८ हजार रुपयांचे उत्पन्न होते. ६ हजार रुपये खर्च वजा केल्यास १२ हजार रुपये निव्वळ नफा एका म्हशीमागे शिल्लक रहातो. क्षमतेप्रमाणे तीन-चार म्हशी बाळगणारे अनेक दूध उत्पादक म्हसला बु. येथे असून प्रौढ शेतकऱ्यांचा उत्साह हा तरुणांना लाजवणारा आहे.
भागाजी भोंडे व आनंदा भोंडे वयाची साठी पार असणारे शेतकरी कडाक्याच्या थंडीतही रोज पहाटे ५ वाजता दूध काढणी, खाद्य व्यवस्थापन, स्वच्छता व रोग व्यवस्थापन पंचविशीतल्या तरुणांच्या उत्साहाने करतात.
No comments:
Post a Comment