व्यावसायिक पतंगपटूंची सोलापूरला फार मोठी पार्श्वभूमी नाही. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे सोलापूर मध्ये आयोजन करण्यात आले होते. या भव्य महोत्सवाची विक्रमी नोंद झाल्याने सोलापूरचे नाव जागतिक पातळीवर झळकले आहे. आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवासाठी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् आणि वर्ल्ड रेकॉर्डस् इंडियाच्या अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यासाठी नोंदी घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सकाळी ११ पासूनच पाहणीस सुरुवात केली होती. पतंग बनवा व उडवा कार्यशाळेत एक हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पतंगपटूंनी फ्रेंड गणेशा, छत्री, नाग, टायगर, बेटी बचाव, जहाज, वाघ आदी विविध प्रकारातील पतंग उडवून सोलापूरकरांचे मनोरंजन केले. रविवार असल्याने सोलापूरकरांनी यासाठी मोठी गर्दी केली होती.
विविध रंगाच्या, विविध आकारांच्या पतंगांबरोबर भारतातील विविध प्रांतांच्या खाद्य पदार्थाचा आस्वादही सोलापूरकरांनी घेतला. महाराष्ट्रातील विविध पदार्थांबरोबर गुजराती, पंजाबी, दाक्षिणात्य पदार्थही विक्रीस उपलब्ध होते. लहान मुलांसाठी जत्रेचेही आयोजन करण्यात आले होते.
एरव्ही पतंग महोत्सव म्हणजे गुजरात, मुंबई किंबहुना भारतातील जी महानगरे आहेत, तिथे होणाऱ्या या महोत्सवाची जी संकल्पना सामन्यांमध्ये रुढ झाली होती, तिला फाटा देत या अनोख्या महोत्सवाचे आयोजन सोलापुरात करण्यात आले होते.
या महोत्सवाचे शानदार उद्घाटन झाल्यानंतर तेथे उपस्थित राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पतंगपटूंनी तयार केलेले चित्रविचित्र आकारांचे व नमुन्यांचे पतंग आकाशात उडाले तेव्हा फक्त बालगोपाळच नव्हे तर उपस्थित प्रत्येक नागरिक या अनोख्या आविष्कारामुळे हरखून गेल्याचे चित्र दिसले. बालगणेश पतंग, मधमाशीच्या आकाराचे पतंग, तसेच सापासारखे लांबलचक शेपटाच्या पतंगांबरोबरच एकाच पतंगाला जोडून एक पतंग असे असंख्य पतंग जोडून आकाशात पतंगांची पंगत लयबद्ध तालीत उडवण्याचा अनोखा प्रयोगही यशस्वी करण्यात आला. पतंगपटूंना येथील वातावरणाची साथ मिळाल्याने त्यांचा जोश आणि उत्साह उत्तरोत्तर वाढला गेला...!
आंतरराष्ट्रीय पतंगपटूंसह या महोत्सवात ४० राज्यांतून आलेल्या पतंगपटूंमुळे सोलापूरचे नाव सातासमुद्रापलीकडे गेले असून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार असल्याचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.जगदीश पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले. पतंग महोत्सवात आलेल्या आंतरराष्ट्रीय पतंगपटूंमुळे व इतर खेळाडूंमुळे पर्यटनालाही चालना मिळणार आहे. सोलापूर परिसरातील पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट आणि सोलापूर शहरात असणारा भुईकोट किल्ला, सिद्धेश्वर मंदिर व तलाव यांसह विविध ऐतिहासिक ठिकाणांना परदेशातील लोकांमुळे मोठी प्रसिद्धी मिळणार आहे. त्यामुळे अनेकजण भेट देण्यासाठी येथे येऊ शकतील. यामुळे सोलापूरसारख्या ठिकाणी अनेक उद्योग, व्यवसाय वाढीस लागून आर्थिक विकास होण्यास मदत होईल. लोकांना रोजगार मिळेल व क्रयशक्ती वाढण्यासही मदत होईल.
केंद्र सरकारला पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर व अक्कलकोट या शहराचा पायाभूत विकास करण्यासाठी प्राथमिक स्वरूपाचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पर्यटन सर्किट मंडळ निर्माण करण्यात येणार असल्याचे डॉ.पाटील यांनी सांगितले. पर्यटन विकासाला चालना देणारे कार्यक्रम करण्यासाठी विविध संस्था व मंडळे पुढाकार घेत असतील, तर त्यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पूर्ण मदत करणार आहे. यामुळे असे इव्हेन्ट निर्माण करण्याची गरज आहे.
No comments:
Post a Comment