Friday, March 16, 2012

जीवन दर्शन

महाराष्ट्राच्या भवितव्याची ही मोठीच मोठी, लांबच लांब सफर आहे. या सफरीतील आम्ही प्रवासी आहोत. ही सफर तुम्हा आम्हाला पुरी करावयाची आहे. ही सफर आज मला माझ्या डोळ्यासमोर दिसते आहे. विजेच्या प्रकाशाने लकलकल्यासारखी दिसते आहे ती लांबची सफर आहे. पण ती पुरी केली पाहिजे. कारण त्यात जनतेचे हित आहे.... हे विचार आहेत महाराष्ट्र विकासाचे स्वप्न पाहणारे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे.

संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेत मोलाची भूमिका बजावून, राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी धोरणे राबविणारे राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आपण साजरे करीत आहोत. १३ मार्च २०१२ ते १२ मार्च २०१३ या काळात हे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यात येणार आहे.
समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांतील यशवंतरावांच्या कार्याचा मोठा आवाका लक्षात घेता, जन्मशताब्दी वर्षातील कार्यक्रमांचे स्वरूप केवळ उत्सवी राहता कामा नये. यानिमित्त होणारे कार्यक्रम जनतेच्या स्मृतीत राहतील, असे विधायक उपक्रम हाती घेण्याचे शासनाने ठरविले आहे. या उपक्रमांपैकी एक म्हणजेच महाराष्ट्र विधानमंडळ व पुराभिलेख संचालनालय तर्फे आयोजित चित्रमय प्रदर्शन जीवनदर्शन.

या जीवनदर्शन प्रदर्शनाच्या निमित्ताने आचारापासून विचारांपर्यंत आणि राजकारणापासून समाजकारणापर्यंत सर्वच बाबतींत सर्वसमावेशक धोरण अवलंबिणा-या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचं दर्शन घडविले आहे. मनोरा आमदार निवास येथे हे प्रदर्शन भरविण्यात आलं आहे. या प्रदर्शनाला भेट दिली अन जाणीव झाली या अनोख्या ठेव्याची.

देवराष्ट्रे गावातील जन्मस्थळाच्या छायाचित्रापासून सुरु झालेला त्यांचा हा जीवन प्रवास त्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या गौरवास्पद कामगिरीची, बजावलेल्या लक्षवेधी भूमिकांची माहिती सांगत होता. दुर्मिळ छायाचित्रातून व्यक्त होणारे यशवंतराव पाहण्याचा सुवर्णयोगच होता.

महाविद्यालयीन युवक असलेल्या यशवंतरावांपासून स्वातंत्र्यसेनानी यशवंतराव, साहित्यिक यशवंतराव, द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव, महाराष्ट्र राज्य स्थापनेचा मंगल कलश आणणारे यशवंतराव, संरक्षण मंत्री यशवंतराव, अर्थमंत्री यशवंतराव, उप पंतप्रधान यशवंतराव या छायाचित्रातून व्यक्त होतात. यशवंतरावांच्या कार्यकर्तृत्वावर छापून आलेल्या लेखातून त्यांचे हे कर्तृत्व अधिक स्पष्ट होत जाते. कुटुंबात रमणाऱ्या यशवंतरावांपासून देश- परदेशातील मान्यवरांसोबतच्या भेटीतून यशवंतराव चव्हाणांचे सर्वस्पर्शी व्यक्तिमत्त्व या छायाचित्रातून उभे राहीले.

प्रदर्शनस्थळी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या आयुष्यातील प्रमुख प्रसंग, राजकीय तसेच सामाजिक वाटचालीतील ठळक घटना, राजकारण, समाजकारण, साहित्य, संस्कृती, कला, उद्योग अशा विविध क्षेत्रातील त्यांचे योगदान आणि वैशिष्ट्ये यावर ठळक प्रकाश टाकणारा माहितीपटही दाखविण्यात येत होता. त्याचाही लाभ घेतला.

माजी लोकसभा सदस्य श्रीनिवास पाटील, वेणुताई चव्हाण ट्रस्ट- कऱ्हाड, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान- मुंबई, पुराभिलेख विभाग तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या सहकार्यातून या प्रदर्शनाची निर्मिती करण्यात आली आहे. द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, संरक्षण मंत्री, उपपंतप्रधानपद अशा विविध पदांवर आपल्या कार्यकर्तृत्वाचा अलौकिक ठसा उमटविणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाणांचे हे प्रेरणादायी चित्रप्रदर्शन राज्यात सर्व विभागात आयोजित करण्यात येणार आहे.

हिमालयावर येता घाला
सह्यगिरी हा धावून गेला
मराठमोळ्या पराक्रमाने
दिला दिलासा इतिहासाला...


असे गौरवाने का नेहमीच म्हटले जाते याची जाणीव हे प्रदर्शन पाहतांना होत होती. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आनंदयात्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचे स्मरण सर्वांना नेहमीच राहणार आहे याची साक्ष खालील काव्यपंक्ती देतात.

या मातीच्या कणाकणातुन
तुझ्या स्फुर्तीची फुलतील सुमने
जोवर भाषा असे मराठी
यशवंताची घुमतील कवने.


हे प्रदर्शन २५ मार्च २०१२ पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत सर्वांसाठी खुले आहे. चला तर भेट देवु या अन इतिहासाचे साक्षीदार होवु या.



  • मनीषा पिंगळे

  • No comments:

    Post a Comment