Wednesday, March 14, 2012

सुसंस्कारित मराठी नेता

यशवंतरावांनी राजकारणात प्रवेश केला तो विशिष्ट संस्कार घेऊन, त्यांनी व्यासंगाने आपल्या मनाची मशागत केली. मॅट्रिक होण्यापूर्वी स्वातंत्र्य चळवळीने व सामाजिक जीवनाने ते आकर्षित झाले होते. म्हणून जतीनदासांनी उपोषण करून मृत्यू कवटाळला तेव्हा दु:खी होऊन ज्यांनी त्या वेळी उत्स्फूर्तपणे उपवास केला त्यात यशवंतराव होते. मॅट्रिकला असतानाच कराडात हरिजनांसाठी रात्रीची शाळा सुरु करण्यात पुढाकार घेणाऱ्या यशवंतरावांना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना उद्घाटनासाठी आमंत्रण देण्याचे सुचले. पुढे अनेक दशकांनंतर त्यांनी पुणे विद्यापीठात विठ्ठल रामजींवर मार्मिक भाषणही केले ते त्यांच्या वाचनाची फलश्रुती म्हणून, कारावासात मार्क्सवाद, इतिहास याबरोबरच टागोर आणि कालिदास यांच्या वाङ्मयाचे वाचन झाले. या कामी ह.रा. महाजनी, आचार्य भागवत, रावसाहेब पटवर्धन इत्यादींचे साहाय्य त्यांना मिळाले होते. महात्मा गांधींच्या नेतृत्वाने प्रभावित झालेल्या यशवंतरावांच्या मनावर वास्तविक वडील बंधूंचे सत्यशोधक समाजाच्या राजकारणाचे व सामाजिक विचारांचे परिणाम व्हावयाचे. पण ते त्यापासून दूर राहून राष्ट्रीय चळवळीत सामील झाले. तेथेही गांधींचा प्रभाव मान्य करूनसुद्धा त्यांच्यावर मार्क्सवादी विचारांचा पगडा बसला. तुरुंगातून बाहेर पडल्यावर ते जवळपास कम्युनिस्ट पक्षात जाणार होते! आणि तसे नसते तर रॉयिस्ट पंथ त्यांनी स्वीकारला असता, पण राष्ट्रीय चळवळीला अग्रकम असून ती महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच करू शकते ही यशवंतरावांची पक्की समजूत होती. आधुनिक, सामाजिक, राजकीय व आर्थिक विचारांचा मागोवा घेतल्यामुळे गांधीवादी कर्मकांडात यशवंतराव सापडले नाहीत आणि स्वातंत्र्यवीर सावरकांच्या क्रांतिकार्याचे महत्त्व त्यांना कमी वाटले नाही. म्हणून रत्नागिरीला जाऊन त्यांनी सावकरांची भेट घेतली. पक्षाच्या व पंथाच्या भिंती स्वत:भोवती उभ्या न केल्याने पुढे सत्तेवर असताना व नसताना यशवंतराव अनेकविध पक्षांच्या, मतपंथाच्या लोकांत सहजपणे मिसळत. कारावासात असताना जशी वाचन व चर्चा याद्वारे यशवंतरावांनी आपल्या मनाची मशागत केली होती त्याचप्रमाणे महाविद्यालयातल्याप्रमाणेच अखेरपर्यंत त्यांचे ग्रंथप्रेम कमी झाले नाही. म्हणून मराठी व इंग्रजी पुस्तके ते आवडीने घेत व चोखंदळपणे वाचीत. परदेशात जात तेव्हाही पुस्तकाच्या दुकानात वेळ घालवून खरेदी केल्याशिवाय ते परत येत नसत.

तरुणपणी कराडहून कोल्हापूरला जाऊन पिटात बसून त्यांनी नाटके पाहिली. म्हैसूरकर महाराज, भागवतबुवा, बाबा आळतेकर यांची संगीत भजने व औंधच्या दाजी गुरवाचा पखवाज ऐकण्यात अनेक रात्री घालविल्या. गडकऱ्यांच्या नाटकातले संवाद त्यांनी पाठ केले होते आणि ''राजसंन्यास'' हे तर त्यांचे आवडते नाटक होते. रशियाला गेल्यावर मॉस्कोपासून काही अंतरावर असलेल्या टॉलस्टॉय यांच्या यस्नापलाना या निवासस्थानाला भेट देण्यास यशवंतराव विसरले नव्हते. तेथील शांतता व घनदाट वृक्षराजी पाहिल्यावर सोन्याच्या पिंपळाखाली ज्ञानदेवांची ज्ञानसाधनेस बसावे असे ते ठिकाण असल्याची यशवंतरावांची भावना झाली. रॉय जेकिन्स हे एक काळ ब्रिटिश मजूर पक्षाच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. आता ते सोशल डेमोक्रॅटिक पक्षात आहेत. जेकिन्स हे चांगले लेखक? त्यांनी स्क्विथ यांचे सुंदर चरित्र लिहिले आहे. ते यशवंतरावांनी वाचले होते व लंडनला गेल्यावर त्यांनी जेन्किन्स यांची मुद्दाम भेट घेतली. स्वत:च्या मनाची मशागत त्यांनी अशी केली होती. यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होते त्याचप्रमाणे स्वाभाविक आवडही होती. यामुळे त्यांचे लेखन व भाषण मोजके व अनेकदा मार्मिक असे.

स्वातंत्र्याबरोबर यशवंतरावांचा प्रवास दीर्घकाळ सत्ताधारी या नात्याने झाला. पूर्वीच्या मुंबई राज्यात पार्लमेंटरी सेक्रेटरी या पदापासून ते दिल्लीत निरनिराळ्या खात्याचे मंत्री झाले. द्विभाषिकाचे मुख्यमंत्रिपद, दिल्लीत संरक्षण व नंतर गृहमंत्रिपद ही पदे यशवंतरावांना मिळाली तेव्हा अगोदर त्या स्थानांवर असलेल्या व्यक्तींनी निर्माण केलेल्या परिस्थितीची पार्श्वभूमी मिळाली होती. त्यामुळे यशवंतरावांची कारकीर्द अधिकच उजळून निघाली. ते द्विभाषिकांचे मुख्यमंत्री झाले. तत्पूर्वी मोरारजीभाईंच्या एकांगी भूमिकेने लोकांची मने दुखावली होती. यशवंतरावांनी बंदुकीच्या जोरावर द्विभाषिक न राबविण्याचे ठरविले. त्यानंतरही ते चालणे शक्य नाही हे दाखवून त्यांनी संयुक्त महाराष्ट्राची मागणी मांडली. ती मान्य झाली. समितीच्या चळवळीचा रेटा, लोकमताचा दणका यांना यशवंतरावांच्या कारभाराची जोड मिळून महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा मराठी मनाला नव्या आशेची पालवी फुटली. यामुळेच कुसुमाग्रजांसारख्या कवीने घोषणा केली -

नव्या जीवनाचा नाद
मला ऐकू येत आहे
लक्ष शून्यातून
काही श्रेय आकारत आहे


महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर यशवंतरावांनी ग्रामीण व शहर या दोन्ही समाजांच्या मनाची पकड घेतली. सहकारी साखर कारखान्याचा प्रयोग पूर्वीच सुरु झाला होता, पण तो एकुलता एक होता. यशवंतरावांनी सरकारी धोरण म्हणून अशा साखर कारखान्यांची योजना आखली व ती पार पाडण्यासाठी सरकारी यंत्रणेचे पाठबळ उभे केले. नंतर या क्षेत्रात काही अपप्रवृत्ती निर्माण झाल्या खऱ्या पण तसा विचार केला तर त्या अनेक क्षेत्रांत झाल्या व होऊ शकतात. तथापि सहकारी साखर कारखानदारीने राज्याच्या काही ग्रामीण भागात मोठा उत्पादक व्यवसाय सुरु झाला. नवे रचनात्मक कार्य झाले. नवे कार्यकर्ते व पुढारी तयार झाले आणि ते काही कोटींचा व्यवहार करू लागले. सहकारी बँका, उपसासिंचन इत्यादींची वाढ हीसुद्धा रचनात्मक होती. यातून शिक्षणाच्या प्रसारास वाव मिळाला. शाळा व महाविद्यालये यांची संख्यावाढ झाली. ज्या भागात व समाजात शिक्षणाचा वारा लागणे शक्य नव्हते तेथे तो पोहोचला. हे एक सामाजिक परिवर्तन होते, त्यास चालना देण्याचे कार्य यशवंतरावांच्या धोरणामुळे झाले. जिल्हा परिषदांमुळे विकेन्द्रीकरण झाले. तीही गरज होती. मराठवाडा व शिवाजी या दोन विद्यापीठांच्या स्थापनेच्या मागे यशवंतरावांची प्रेरणा होती. या सर्वांचा गुणात्मक दर्जा वाढावयास हवा हे मान्य असले तरी प्रारंभ होणे अत्यावश्यक होते. हे फार मोठे महत्त्वाचे काम यशवंतरावांमुळे
झाले.साहित्य-संस्कृती मंडळाची स्थापना, येथे साहित्य व संस्कृतीला वाव मिळावा, नव्या शास्त्रीय विचारांचा प्रसार व्हावा, यासाठी झाली. यशवंतराव मुख्यमंत्री असताना सर्व खात्यांचे सचिव मुख्यमंत्र्यांचे बोलावणे येताच यथायोग्य माहिती पुरविण्यासाठी तत्पर असत. त्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर ठराविक अंतराने भेटी होत.

यशवंतरावांनी तात्यासाहेब केळकरांच्या संबंधात जे सुंदर भाषण केले होते त्यातील केळकरांच्या मध्यममार्गी धोरणाबद्दलचे विवेचन काही प्रमाणात यशवंतरावांनाही लागू होते. काही प्रमाणात म्हणण्याचे कारण असे की, तात्यासाहेब कधी सत्तास्थानावर होते पण सत्तेच्या राजकारणात त्यांच्या वृत्तीचा कल मध्यममार्गी होता. यशवंतराव तात्यासाहेबांबद्दल लिहितात, ''दुसऱ्यांच्या म्हणण्यातील तथ्य मे मान्य करीतत ते एकांतिक विचाराचे नव्हते, व्यवहारी व मध्यममार्गी होते केळकरांची मध्यममार्गावर जी श्रद्धा होती त्यामागे एक तर त्यांचे त्याला अनुकूल असे सौम्य व बुद्धिवादी व्यक्तिमत्त्व होते आणि दुसरे, अनुभवी व्यवहारवाद होता, केळकरांनी मध्यमक्रमासंबंधी जे विवेचन केले आहे त्यात म्हटले होते की, मध्यमक्रम, म्हणजे निखालस वाईटाशी समेट किंवा तडजोड असा नाही, तर जे सामान्यत: चांगले म्हणून समजले जाते त्याचीच मर्यादा शोधून तारतम्याने जे युक्त वाटेल, त्याचे आचरण म्हणजे मध्यमक्रम होय ''सदगुणाच्या आचारणातही तारतम्याने सुचविणारे मर्यादादर्शन'' असे त्याचे शास्त्रीय वर्णन केळकरांनी केले आहे. ''भावना जेव्हा उद्दीपित होतात तेव्हा अशा वृत्तीच्या लोकांची उपेक्षा होते, तशीच ती केळकरांची झाली.'' असे यशवंतरावांनी समर्पक रीतीने सांगितले.

शेवटी मनाने व शरीराने यशवंतराव खचले होते. प्रथम डोंगरे, नंतर किसन वीर आणि अखेरीस वेणूताई यांच्या निधनाने, त्यांच्या मनावरील जखम अधिकाधिक खोल होत गेली. आपल्या सार्वजनिक जीवनात इतके सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व असलेला नेता सहजासहजी भेटणार नाही.

  • गोविंद तळवळकर

  • No comments:

    Post a Comment