Wednesday, March 14, 2012

कहाणी कर्तृत्वाची


रत्नागिरी जिल्ह्याची सफर म्हटल्यावर इथले समुद्रकिनारे, गणपतीपुळे, मार्लेश्वर अशी जिल्ह्याची ओळख समोर येते. त्यात गेले काही वर्षे आणखी एका गोष्टीची भर पडली आहे, ती म्हणजे संगमेश्वरी मोदक. मुंबई-गोवा महामार्गावरून जाणाऱ्या पर्यटकांना परतीच्या प्रवासात संगमेश्वरी मोदकांच्या रुपाने आपल्या कोकण सफरीचा गोडवा आवर्जून सोबत न्यावासा वाटतो. त्यासाठी पर्यटकांची वाहने संगमेश्वरच्या अलिकडे 'गणेश कृपा' फलक पाहिल्यावर थांबतात. काऊंटरवर चेहऱ्यावर स्मित असलेल्या रंजनाताई त्यांचे स्वागत करतात आणि पटापट वेगवेगळ्या रंगाचे आणि चवीचे मोदक पॅकेटमध्ये भरले जातात. गेल्या काही वर्षापासून दररोज असेच चित्र या विक्री केंद्रावर दिसते. श्रीगणेशाच्या नावाने हे वैभव उभे करताना कौतुकास्पद अशी ओळख निर्माण करण्याचे सर्व श्रेय रंजना गडशी या ६० वर्षाच्या महिलेला जाते.

रंजनाताईंचे मूळ गाव संगमेश्वर तालुक्यातील आंगवली. वडील पोलीस सेवेत होते. ताईंच्या कामातील शिस्त पाहिल्यावर त्यांच्यावर वडिलांचा असलेला प्रभाव दिसून येतो. सातवीपर्यंत त्यांनी शिक्षण घेतले. शिक्षणासाठी काही काळ कुडाळ येथे राहावे लागले. शिक्षक असलेल्या रघुनाथ गडशी यांच्याशी विवाह झाल्यावर त्या संगमेश्वर येथे आल्या. पतीचा पगार कुटुंबासाठी पुरेसा नसल्याने रंजनाताईंनी आरोग्य रक्षक म्हणून ५० रुपये महिन्याच्या मानधनावर नोकरी केली. प्रशिक्षणानंतर २०० रुपये मानधन मिळू लागले. घर चालविताना नोकरी करणे कठीण होते, शिवाय मानधनही पुरेसे नव्हते. तरी कुटुंबाची गरज म्हणून त्यांनी ते काम केले. पुढे ही योजना बंद झाल्यावर पुन्हा एकदा आर्थिक चणचण सुरू झाली. त्यामुळे अखेरचा पर्याय म्हणून त्यांनी महामार्गाला लागूनच असलेल्या घरासमोरच्या झाडाखाली चहाचा व्यवसाय सुरू केला.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम नुकतेच सुरू झाले होते. दिवसभर वाहनांमुळे रस्त्यावरून माती उडायची आणि दिवसाकाठी पाच-सहा रुपयाची विक्री होत असे. रात्री बाहेर ठेवलेला बाकडा परत आत घ्यायचा, असे दिवस जात होते. मात्र रंजनाताईंनी जिद्द सोडली नाही. आपले गोड बोलणे आणि चांगली सेवा यामुळे मार्गावरून जाणारे ट्रक ड्रायव्हर, पर्यटक आवर्जून चहासाठी येथे थांबू लागले. व्यवसाय वाढता झाल्यावर महामार्गापासून थोड्या अंतरावर लहान टपरीत त्याचे रुपांतर झाले आणि सोबतीला मिसळ तयार होऊ लागली. कोकणी माणसाची गणेशावर अपार श्रद्धा असते. त्यामुळे टपरीचे नामकरण 'गणेश कृपा' असे झाले. कालांतराने जेवणाची सोयही करण्यात आली. रंजनाताईंचा दिवस सकाळी सहापासून सुरू होऊन रात्री उशिरा संपत असे. आपल्या अपार मेहनतीच्या बळावर त्यांनी व्यवसायाला चांगला आकार दिला आणि टपरीचे रुपांतर हॉटेलमध्ये झाले. काही काळ एमटीडीसीच्या निवास-न्याहरी योजने अंतर्गत त्यांनी केंद्रही चालविले.

संगमेश्वरी मोदकाची सुरूवात पाच-सहा वर्षापूर्वीची. गणेशोत्सवाच्या वेळी घरात तांदळाचे मोदक केले जात असत. केवळ पुरणाचा मोदक करण्याचा प्रयोग रंजनाताईंनी केला आणि तो यशस्वी झाला. हेच मोदक त्यांनी विक्रीसाठी ठेवल्यावर ग्राहकांचा चांगला प्रतिसादही मिळाला. पुढे अशा मोदकांना मागणी येऊ लागली. मोदकांच्या रुपात आणि चवीत बदल करण्यात आला. आंबा, सीताफळ, किवी, स्ट्रॉबेरी, चॉकलेट अशा विविध चवीत हे मोदक विक्रीस उपलब्ध करून दिल्यावर मागणी वाढतच गेली.

आज प्रत्येक दिवशी एक हजारावर नारळांचे मोदक तयार केले जातात. महामार्गावरून जाणारे बरेच पर्यटक इथे फराळासाठी आणि खरेदीसाठी थांबतातच. स्थानिक व्यावसायिकांकडून आंबा, कोकम, आवळा आदींपासून बनविलेले पदार्थही येथे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. मोदकासाठी लागणारे नारळ स्थानिक बागायतदारांकडून खरेदी केले जातात. मोदक तयार करण्याच्या प्रक्रियेमुळे दहा मुली आणि चार गड्यांना त्यामुळे रोजगार मिळाला आहे. पर्यटनाचा हंगाम आणि आंगणेवाडीसारख्या मोठ्या जत्रा असताना दिवसाला ७० ते ८० हजाराचे मोदक विकले जातात. एरवी दररोज पाच ते दहा हजारांची विक्री होते. दोन वर्षापासून अमेरिका, सिंगापूर तसेच राज्याबाहेरही मोदक जात आहेत. मुंबईत दररोज मागणीप्रमाणे मोदक पुरविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रंजनाताईंनी दोन मुलांना चांगले शिक्षण देऊन याच व्यवसायात जोडले आहे. मोठ्या सुनिलने शाळा सांभाळताना कष्टाच्या कामात मदत केल्याचे त्या आईच्या मायेने भारावून जात सांगतात. लहान संजयने आईस्क्रीम पार्लरचा व्यवसाय शेजारीच थाटला आहे. या सर्व यशामागे रंजनाताईंचे अविश्रांत परिश्रम आणि धैर्य आहे. पतीच्या निधनानंतरही त्यांनी आत्मविश्वासाने आणि धैर्याने आपला व्यवसाय पुढे नेला आहे. संगमेश्वरी मोदकाच्या यशाची ही कहाणी रंजनाताईंच्या कर्तृत्वाची आहे. प्रतिकूलतेवर प्रयत्नांनी मात करणाऱ्या सह्याद्रीच्या रांगेतील कणखर कोकणी कन्येची आहे.


  • डॉ.किरण मोघे

  • No comments:

    Post a Comment