रत्नागिरी जिल्ह्यात कृषी विभागामार्फत शेतीशाळेचा उपक्रम प्रभाविपणे राबविण्यात येत आहे. शेतीशाळेत दिल्या जाणाऱ्या माहितीमुळे शेतकऱ्यांना आधुनिक कृषीतंत्राचा अवलंब करून चांगले पीक घेणे शक्य झाले आहे. महिलांनादेखील घरगुती स्वरुपाच्या भाजीपाल्याच्या शेतीत याचा उपयोग होतो आहे. गुहागर तालुक्यातील कोतळूक गावातील महिलांनी एकत्रित येऊन बचतगटाच्या माध्यमातून अशीच यशस्वी शेती करून दाखविली आहे.
कोतळूक गावातील ग्रामस्थांनी लोकसहभागातून अनेक चांगली कामे केली आहेत. सरपंच सुरेश गोरीवले यांनी चांगल्या उपक्रमांसाठी गरजेच्या ठिकाणी ग्रामपंचायतीतर्फे सहकार्य केले आहे. त्यामुळे गावात विकासाचे चांगले वातावरण तयार झाले आहे. अशा वातावरणामुळे ग्रामस्थांनी कुटुंबातील महिलांनादेखील बचत गट चालविण्यासाठी प्रोत्साहीत केले. त्याचाच परिणाम म्हणून गावात ही चळवळ चांगली रुजली. या कार्याची पावती नुकतीच जिल्हा स्तरावर सद्गुरु बचतगटाला मिळालेल्या द्वितीय पुरस्काराच्या रुपाने गावाला मिळाली.
सुनिल भेकरे आणि चंद्रकांत गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली गटाने शेतीच्या कामात लक्ष घालण्यास सुरुवात केली. पारंपरिक पद्धतीने भाजी उत्पादन करणाऱ्या महिलांना शेतीशाळेतून मिळालेली माहिती देण्याचे काम या दोघांनी केले. त्याचा लाभ या गटाला झाला. गादी वाफा पद्धतीचा उपयोग केल्याने उत्पन्न वाढल्याचे गटाच्या सदस्या नम्रता भेकरे सांगतात. कृषी विभागाने या गटाला बियाणे उपलब्ध करून दिले. यावर्षी गटाला एकूण खर्च १५ हजार रुपये आला असून उत्पन्न ६० हजारावर जाईल, अशी माहिती गटाच्या सदस्यांनी दिली.
गटाला ५ लाखाचे कर्ज मंजूर झाले आहे. त्यातून पॉवर ट्रिलरही घेण्यात आला असून शेती क्षेत्रात सातत्याने वाढ करण्याचे प्रयत्न या महिला करीत आहेत. गावाच्या बसथांब्याजवळ या गटाने स्टॉल उभारला असून त्याच ठिकाणी भाजीची विक्री करण्यात येते. या गटाचे वेगळेपण म्हणजे मिळणारा पैसा एका डब्यात गोळा केला जातो. तो बैठकीपर्यंत मोजला जात नाही. स्टॉल सांभाळणाऱ्या महिलेला दिवसाला ६० रुपये अतिरिक्त देण्यात येतात. उत्पादनाचे नवे तंत्र आणि विक्रीचे योग्य व्यवस्थापन केल्याने या गटाने भाजीपाला व्यवसायात चांगली प्रगती केली आहे. त्याचेच फलीत म्हणून गटाला यावर्षीचा द्वितीय क्रमांकाचा जिल्हा स्तरावरील राजमाता जिजाऊ पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार निश्चितपणे त्यांचे मनोबल उंचावणारा आणि गावकऱ्यांना समाधान देणारा असाच आहे.
No comments:
Post a Comment