Saturday, March 31, 2012

पाणी अडवा पाणी जिरवा

नंदुरबार हा राज्यातील आदिवासी बहूल जिल्ह्यांपैकी एक. या जिल्ह्यामध्ये लोक प्रामुख्याने दऱ्याखोऱ्यात राहतात. जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण मध्यम असून देखील येथे उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाण्याची समस्या निर्माण होते. या समस्येवर मात करण्यासाठी धडगाव तालुक्याच्या बोरवण गावातील बिजलाराणी बचत गटातील महिलांनी पाण्याचे नियोजन केले असून त्याद्वारे उदरनिर्वाहाचा नवा मार्ग शोधला आहे.

पावसाळ्यात पडलेले बरेचसे पाणी वाहून जात असल्याने धडगाव तालुका परिसरात उन्हाळ्यात पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो. यामुळे येथे प्रामुख्याने पावसाळ्यापुरतीच शेती केली जाते. इतर वेळी केवळ शेतीचाच नाही तर रोजगाराचाही प्रश्न लोकांसमोर उभा राहतो. पावसाळ्यातील पाणी वाहून गेल्याने ज्या ठिकाणी नदी नाले आहेत त्या ठिकाणी सुद्धा इतर दिवसात पाणी राहत नाही. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असे. दिवसभर काबाडकष्ट करायचे, शेतीचेही काम करायचे आणि त्यानंतर दूरवरून पाणी आणायचे यामध्ये महिलांचे हाल होत असत.

धडगाव परिसरातील या परिस्थितीतून गुरांचीही सुटका नव्हती. त्यांना प्यायला पाणी नसल्यामुळे बहुतेक लोक उन्हाळा आला की गुरे विकून टाकत असत. अशा परिस्थितीमुळे शारीरिक त्रासाबरोबरच मानसिक त्रासही सोसावा लागे. याचा परिणाम दैनंदिन आणि कौटुंबिक जीवनावरही होणे साहजिक होते. अशातच बोरवण गावात बचतगटांची स्थापना झाली आणि महिला एकत्र आल्याने सर्वांनी मिळून या समस्येवर मात करण्यासाठी विचार सुरू झाला.

पाण्याचा प्रश्न हा इतर समस्यांच्या तुलनेत तसा महत्वाचाच. त्यामुळे त्यावर तातडीने उपाय शोधणे आवश्यक होते. हा सर्वांचाच प्रश्न असल्याने तो सोडविण्यासाठी एकमत व्हायला वेळ लागला नाही. बिजलाराणी बचत गटातील महिलांनी बँकेला पाणी व्यवस्थापन व रोजगाराचे महत्व पटवून देऊन बँकेकडून कर्ज मिळविले. त्या कर्जातून त्यांनी सर्वांना सोयीचे होईल अशा ठिकाणी बोअरवेल खोदला. तसेच बोअरवेल मधील पाणी एका ठिकाणी संकलित करुन शेतांमध्ये सोडले. बोअरवेल मुळे पिण्याच्या पाण्याचा आणि संकलित होत असलेल्या पाण्यामुळे शेतीचा प्रश्न सुटण्यास मदत झाली. या पाण्यावर त्यांनी शेतात भाजीपाला लाऊन गावातच रोजगारही निर्माण केला आहे. या कामी गावकऱ्यांनी देखील त्यांना मोलाचे सहकार्य केले. पाण्याचा हा प्रश्न सोडविताना या महिलांनी पाण्याचे जतन किती महत्त्वाचे आहे, हेच जणू जगाला दाखवून दिले आहे.

महिला बचतगटांची चळवळ राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात उभी राहिल्याने आणि त्या माध्यमातून महिला एकत्र आल्याने अनेक विधायक बाबी घडू लागल्या आहेत. त्याचेच एक उत्तम उदाहरण म्हणून बोरवणच्या गटाने सोडवलेल्या पाणी प्रश्नाकडे पाहता येईल. यातून त्यांनी पाण्याचे महत्त्व देखील अधोरेखित केले असून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेशही दिला आहे.


  • मेघ:श्याम महाले

  • No comments:

    Post a Comment