गुढीपाडव्याला म्हणजेच चैत्र शुध्द प्रतिपदेला पहाटे ओवा, हिंग, मिरी आणि साखर किंवा गूळ-कडुलिंबाच्या पानाबरोबर खाण्याची प्रथा आहे. कडुलिंबाचे सेवन केल्यानंतरच पूजा-अर्चा करुन गुढी उभारावी असे पुराणशास्त्रात सांगितले आहे. वर्षप्रतिपदेच्या दिवशी विघ्नहर्त्या गणपतीचे स्मरण करावे, असेही म्हटले आहे. त्यानंतर वडिलधाऱ्या मंडळीना गुरुजनांना नमस्कार करुन फल श्रवण करावे, असेही सांगितले आहे.
साडेतीन मुहुर्तापैकी एक दिवस
महाराष्ट्रीय जनतेच्या दृष्टीने हा महत्वाचा दिवस आहे. या दिवसापासून रामाचे नवरात्र सुरु होते. हा दिवस साडेतीन मुहुर्तापैकी एक मानला जातो. चैत्र शुध्द पक्षाच्या प्रथम दिवशी प्रभू रामचंद्र सपत्नीक आपल्या सर्व दलासमवेत अयोध्येला चौदा वर्षाचा वनवास संपवून परत आले होते. प्रभू रामचंद्र आपल्या घरी परत आल्यामुळे आनंदित झालेल्या नगरजनांनी आपल्या आनंदाच्या प्रित्यर्थ गुढ्या उभारुन आनंदोत्सव व्यक्त केला, अशी आख्यायिका आहे.
आयुर्वेदातील महत्व
सकाळी मुखमार्जनानंतर कडुलिंबाची कोवळी पाने हिंग, चिंच, ओवा यासमवेत घ्यावीत हा प्रघात आहे. कडुलिंब हा औषधी आहे. या कडुलिंबाच्या रसासोबत आंबट, तुरट, तिखट यांचे सेवन आयुर्वेदात महत्वाचे मानले जाते.
वर्षाच्या सुरुवातीला मागच्या सगळ्या कडू गोष्टी गिळून मनातील नव्या गोडव्यासह नवीन वर्ष सुरु करावे, हा या मागचा हेतू आहे. एकीकडे गुढी उभारुन आपण त्याला साखरेची माळ लावायची याचा अर्थ आपल्या सुखाची मागणी करायची, कडुलिंब खायचा, याचा अर्थ जे काही दु:ख आहे, त्याचीही चव चाखायला विसरायचे नाही. हा मंत्र आयुष्यभर जपला तर संपूर्ण जीवन सुखी होईल, असा संदेश या सणातून दिला जातो.
माझं दु:ख माझ दु:ख तळघरात कोंडलं`.
हा या सणांचा अन्वयार्थ बहिणाबाईंनी आपल्याला नेमक्या शब्दात सांगितला आहे.
रक्तदोषहारक कडुलिंब
कडुलिंब या झाडाचा प्रत्येक भाग कोणता ना कोणत्या तरी आजारावर गुणकारी आहे. कडुलिंबाच्या असाधारण औषधी गुणधर्मामुळे अनेक शारिरीक आजार नाहीसे होतात. कडुलिंबाच्या सेवनाने शरीरातील कफ, उष्णता कमी होते. उत्तम अग्नी प्रदीपक आणि पाचक असणारा कडुलिंब ताप, विषमज्वर, दाह, जखम आदी रोगांवर गुणकारी तर आहेच पण रक्तदोषहारक आणि कृमीनाशक म्हणून तो ओळखला जातो.
आयुर्वेदातील एक प्रमुख घटक म्हणून कडुलिंबाचा वापर केला जातो. हा किटकनाशक, जंतुनाशक तसेच हवा शुद्धीकरणासाठी त्याचा उपयोग केला जातो. त्याच्या कडुनिंबाच्या काड्याचा वापर दात घासण्यासाठीही केला जातो. कडुलिंबापासून तयार केलेल्या तेलाने मालीश केल्यास गंभीर चर्मरोग नाहीसे होतात, असे आयुर्वेदात म्हटले आहे.
गुढीच्या टोकाला आंब्याची पाने आणि कडुलिंबाचे सेवन हे गुढीपाडव्याचे वैशिष्ट्य. आंबा आणि कडुलिंबाच्या पानात ईश्वरी तत्व खेचून घेण्याची क्षमता सांगितली गेली असतील तरी या मागील उद्देश नीट समजावून घेण्याची गरज आहे.
No comments:
Post a Comment