बचतगटाच्या माध्यमातून महिला एकत्र आल्या. दरमहा केलेल्या बचतीतून एकमेकींची आर्थिक गरज भागवू लागल्या. हे पाहून इतर महिलांनांही प्रेरणा मिळाली. याविषयी बोलताना माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय गायकवाड म्हणाले, एके काळी महिला मंदिरासमोरुन जायला घाबरत. पण आज त्याच महिला सामाजिक उपक्रमात उत्साहानं सहभागी होत आहेत. प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्यदिन, ग्रामसभेस उपस्थित राहून गावाच्या विकासात योगदान देत आहेत.
माविमच्या वतीनं एकूण ७ बचतगट स्थापन झाले. ७ सप्टेंबर, २००७ ला रमाई गाव विकास समितीची स्थापना झाली. गावात महिलांचं अस्तित्व दाखविण्यासाठी सर्वप्रथम गाव समितीच्या फलकाचं अनावरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. याच कार्यक्रमात अमोल भास्कर पंडित या अनाथ विद्यार्थ्याच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी महिलांनी स्वीकारली. त्याला शैक्षणिक साहित्य, वही, पेन व पुस्तकं देण्यात आली. 'गावसमितीच्या रुपानं मला आई मिळाली', या शब्दांत त्यानं व्यक्त केलेली भावना अनेकांचे डोळे पाणावून गेली.
याच गावातील यमुनाबाई सूर्यवंशी या महिलेनं आपल्या पतीच्या उपचारांसाठी राहतं घर गहाण टाकलं होतं. पतीच्या निधनानंतर तिनं हिवाळा व उन्हाळा दुसऱ्यांच्या अंगणात काढला. परंतु पावसाळ्यात राहण्याचा प्रश्न उद्भवला. तिनं आपली व्यथा गाव समितीसमोर मांडली. वेळ आणि अडचण लक्षात घेऊन महिलांनी ४० हजार रुपयांची मदत करुन तिची निवाऱ्याची समस्या सोडवली. गावातील महिलांच्या छोट्या-मोठ्या अडचणी सोडविण्यासाठी बचतगटाची चळवळ साह्यभूत ठरु लागली.
महिला असल्या तरी त्यांची कौटुंबिक जबाबदारीतून सुटका नव्हती. घरचं सांभाळून त्या गावाच्या विकासात योगदान देत होत्या. या महिलांना पाणी आणण्यासाठी दररोज अर्धा किलोमीटर जा-ये करावी लागायची. डोक्यावर पाण्याचे हंडे वाहून आणण्यात शारीरिक कष्ट तर होत होतेच पण मान आणि पाठदुखीमुळंही महिला हैराण होत. दूरवरुन पाणी आणण्यासाठी वेळही वाया जायचा. पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा निर्धार महिलांनी केला पण मार्ग सापडत नव्हता. त्याच वेळी माविमकडून महिलांचे काबाडकष्ट कमी करण्यासाठी गरजू व समस्या असलेल्या गावातील गाव समितीद्वारे प्रस्ताव मागविण्यात आले.
आवश्यक बाबींची पूर्तता केल्यावर माविम जिल्हा कार्यालयानं सायाळा चा प्रस्ताव मंजूर केला. त्यानुसार १२ हजार रुपये अनुदान व इतर निधी लोकसहभागातून जमा करणं आवश्यक होतं. ग्रामपंचायतीसमोर याबाबत प्रस्ताव मांडण्यात आला. ग्रामपंचायतीनं जागा दिली पण आर्थिक जबाबदारी स्वीकारली नाही. निधी उभा करण्याचं मोठ्ठं आव्हान महिलांसमोर होतं. महिला जिद्दीनं पुढं आल्या. प्रत्येक महिला बचतगटाकडून १ हजार रुपये व लोकसहभागातून ८ हजार रुपये असे एकूण २७ हजार ५०० जमा करुन हातपंपावर मोटर बसवून पाण्याची टाकी उभारली. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती व लोकांचा विरोध असताना महिलांनी हा प्रकल्प पूर्णत्वास नेला. या हातपंपावरील विद्युत मोटारीची देखभाल दुरुस्ती व पाणी वितरणाची जबाबदारी ग्रामपंचायतीवर सोपविण्यात आली आहे.
महिलांच्या पुढाकारानं पाण्याचा प्रश्न सुटला व त्यांना स्वत:कडं, कुटुंबाकडं अन् गावाच्या विकासाकडं लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध होऊ शकला. आज गावाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढला आहे, हे महिला शक्तीचं आणि बचतगटांच्या माध्यमातून त्या एकत्रित आल्याचं द्योतकच म्हणावं लागेल.
No comments:
Post a Comment