तुमच्यामागे राहो जनता नित्य पुरोगामी,
समर्थ होवो महाराष्ट्र हा, भारत-भू-त्राता...
या ओळी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या महाराष्ट्रविषयक दृष्टीकोनाच्या प्रतीक आहेत.
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण या नामोच्चाराने देखील मराठी माणसाची छाती फुगावी आणि माथा उन्नत व्हावा अशा या साहेबांचे २०१२ -१३ हे जन्मशताब्दी वर्ष. यानिमित्ताने शासनाने वेगवेगळया कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. खरंतरं लहानपणापासून माझ्या घरामध्ये सातत्याने यशवंतराव चव्हाण यांचे विचार, त्यांची शिकवण यांची प्रेरणा होती. ही प्रेरणा सामर्थ्य होते. या प्रेरणेची परंपरा आम्हाला जणू वारसा म्हणून मिळाली आहे. या परंपरेचे पाईक होण्याचा प्रयत्न सुरूच आहे. त्यात भर घालणारी एखादी संधी मिळते तेव्हा होणारा आनंद हा अवर्णनीय असतो. असा हा आनंदाचा क्षण आज अनुभवयाला मिळाला.
साहेबांचे हे जन्मशताब्दी वर्ष. या वर्षानिमित्त शासनाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. या सोहळयाचा प्रारंभ राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अरबी समुद्राच्या साक्षीने आयोजित करण्यात आला होता. हे निमित्त होतेच. गेल्या काही दिवसांपासून या उद्घाटन सोहळ्याची जय्यत तयारी सुरू होती. तेव्हापासूनच या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे ठरविले होते. ही संधी आयतीच मिळाली.
नेहमीच पर्यटक आणि मुंबईकरांच्या गर्दीने गजबजलेल्या गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या वेळेपूर्वी अर्धा तास आधीच कार्यक्रमस्थळी पोहोचले. या स्थळाची धीर-गंभीरता या कार्यक्रमाला पूरक अशीच होती. रम्य संध्याकाळ आणि ‘गेट वे’ वर उभारलेला हिमालय, सह्याद्रीचा कडा आणि लाल किल्ला हे सारे साक्ष देत होते युगपुरुषाच्या कर्तृत्वाची. नेहमीच आपल्या लाटांच्या आवाजाने परिसरात जिवंतपणा राखणारा समुद्रही आज साहेबांना मानाचा मुजरा करण्यासाठी शांत झाला होता. हिमालयाच्या मदतीला सहयाद्री धावला असे वर्णन नेहमी साहेबांच्या बाबतीत करण्यात येते. याची साक्ष देणारा देखावा उभारण्यात आला होता. राष्ट्रगीताने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. साहेबांच्या मुशीत घडलेल्या व्यक्ती या व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते.
महाराष्ट्राचे दीपस्तंभ, आधुनिक महाराष्ट्राचे प्रणेते यांच्या कार्याविषयी आपले अनुभव कथन करताना त्याच्या कार्याची महती सांगताना शब्दही जणू अपुरे आहेत याची जाणीव या सोहळ्याच्या निमित्तानं वारंवार होत होती. या कार्यक्रमास राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील उपस्थित होत्या.
ज्या व्यक्तीने आपल्याला राजकीय व्यासपीठाची ओळख करुन दिली त्या व्यक्तीच्या जन्मशताब्दी वर्षाचे प्रमुख पाहुणे पद भूषविणे हे किती अभिमानास्पद आहे याची प्रचिती प्रतिभाताईंचया रुपाने येत होती. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख, ऊर्जा मंत्री सुशीलकुमार शिंदे या सर्वांनीच साहेबांच्या कार्याची ओळख आपल्या भाषणातून उपस्थितांना करुन दिली. आपल्या एकूणच जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा आहे हे सांगताना या सर्व वक्त्यांचा ऊर अभिमानाने भरुन येत होता. साहेबांनी दिलेली शिकवण आणि त्यांचे संस्कार यांचा आपण आपल्या एकूणच सामाजिक व राजकीय वाटचालीत अंगिकार केल्याचेही त्यांनी प्रांजळपणे कबूल केले. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनीही साहेबांची दूरदृष्टी, त्यांचे मानवतावादी मूल्य यांची शिकवण यांचे आपल्या जीवनातील महत्त्व विषद केले.
या सोहळ्याच्या औपचारिक उद्घाटनानंतर मी यशवंत या महानाट्याचा प्रयोग यावेळी सादर करण्यात आला. सुमारे ६०० कलावंत व तंत्रज्ञांचा सहभाग असलेल्या या महानाट्यातून यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मापासून ते संरक्षणमंत्रीपदापर्यंतचा जीवनप्रवास दाखविण्यात आला. या महानाट्याचे लेखन, दिग्दर्शन, संगीत अशोक हांडे यांचे होते. यशवंतराव चव्हाण यांच्या `कृष्णाकाठ`, `ऋणानुबंध,` `सह्याद्रीचे वारे,` `युगांतर` या साहित्यकृती तसेच त्यांची अन्य लेखकांनी लिहिलेली चरित्रे यावर आधारित काही महत्वाच्या प्रसंगांचं नाट्यरुपांतर करण्यात आले. त्याला नृत्य, संगीत आणि गायनाची जोड देऊन मनोरंजनात्मक बनविण्यात आले होते. दीड तासांच्या या महानाट्यातून यशवंतराव चव्हाण यांचा जीवनपट उलगडून दाखविण्यात आला. चित्रमय असा हा जीवनपट उपस्थितांना प्रेरणादायी व स्फूर्ती देणारा असाच होता.
यशवंत सह्याद्रीचा आसमंत हिमालयाचा असं वर्णन असलेल्या साहेबांच्या कार्यकर्तृत्वाची साक्ष पटली. साहेबांनी संस्काराची जी शिदोरी दिली आहे, ती पुढील प्रवासात सर्वांनाच मार्गदर्शक ठरेल, हे निश्चित. पण त्याचबरोबर त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र अस्तित्वात आणणे हीच खरी त्यांना आदरांजली असेल.
No comments:
Post a Comment