Thursday, March 29, 2012

स्टॉबेरीची जादू

स्ट्रॉबेरी म्हटली की पूर्वी महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरीच प्रसिध्द होती परंतु कालांतराने नंदुरबार जिल्हयातील तोरणमाळ येथेही स्ट्रॉबेरीचे उत्पादन होऊ लागले. आता नाशिक जिल्हयातील सुरगाणा व कळवण तालुक्यातील आदिवासी शेतकरी बांधवांनीही स्ट्रॉबेरी उत्पादनाच्या क्षेत्रात आपला चांगला जम बसवलाअसून त्यामध्यमातून त्यांना चांगले उत्पन्नही मिळू लागले आहे. पावसाच्या लहरीपणामुळे सतत चिंताग्रस्त असणा-या या शेतक-यांच्या जीवनात आनंदाचे क्षण अनुभवायला मिळत आहेत.

सुरगाणा तालुक्यातील बोरगांव घाटमाथा परिसरातील धोंडाबे , मोरपाडा, शिंदे , पोहावी, बोरगाव, हिरडपाडा, चिखली, घागबारी, उंबरपाडा व कळवण तालुक्यातील सुकापुर, खिराड, पळसदर, लिंगामे, आमदार, बापखेडा, वीरशेत, वडपाडा परिसरातील डोंगर द-यामध्ये राहणारा आदिवासी शेतकरी पारंपारिक शेती बरोबरच शास्त्रशुध्द पध्दतीने स्ट्रॉबेरी पिक घेऊ लागला आहे.

गेल्या पाच-सहा वर्षापासून स्ट्रॉबेरी शतीचा प्रयोग यशस्वीरीतीने केला जात आहे. या परिसरातील स्ट्रॉबेरी हे नगदी पिक आहे. कमी जागेत जास्त उत्पन्न तसेच स्ट्रॉबेरीला दरवर्षी प्रतिकिलो १०० ते ३०० रुपये किलो भाव मिळत असल्याने या परिसरातील आदिवासी शेतकरी या शेतीकडे वळाला आहे. एक किंवा दोन किलोचे खोके भरुन गुजरात राज्यात सुरत, अहमदाबाद, भरुच येथ बोरगांव येथून पाठविल्या जातात काही शेतकरी नाशिक सापुतारा रस्त्यावर पाल ठोकून टोपल्यामध्ये स्टॉबेरी भरुन विक्री करतात. त्यामुळे शेतक-यांना दोन पैसे मिळू लागले आहेत.

सुरगाणा तालुक्यातील धोडांबे येथील श्रीराम गायकवाड या आदिवासी शेतक-याने आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की महाबळेश्वर येथून चार हजार स्ट्रॉबेरीची रोपे आणून लावले. सट्रॉबरी चार महिन्यात पीक देते. त्यामुळे स्टट्राबेरी पासून दरवर्षी तीन ते चार लाख रुपये निव्वळ नफा मिळतो.

कळवण तालुक्यातील सुकापूर येथील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी महिला हिराबाई नामदेव दळवी यांनी स्ट्रॉबेरी उत्पादना संबंधी माहिती देतांना सांगितले की, चार ते पाच महिने पिकाची निगा राखावी लागते. दर पंधरा दिवसांनी शेणखत आणि रासायनिक खते पिकांना दयावी लागतात. तसेच नेहमी औषधे फवारणी करावी लागते.. या पिकाच्या उत्पादनातून ब-यापैकी उत्पादन मिळत आहे.

कळवण तालुक्यातील सुकापुर येथील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी तुकाराम भोये यांनी माहिती देतांना सांगीतले की, पोळा सणाच्या दरम्यान महाबळेश्वर येथून स्ट्रॉबेरीची रोपे आणून लागवड करतो, आणलेली सर्वच रोपे कामी येत नाही. एका रोपाला साधारणत: १० ते १५ फळे येतात.इतर पिकांपेक्षा या पिकाची जास्त निगराणी राखावी लागते. या पिकाच्या उत्पादनातून बरापैकी नफा मिळतो. या पिकापासून जेली व अन्य उत्पादन करणारे प्रक्रिया उदयोग येथे सुरु झाल्यास या पिकापासून चांगला फायदा मिळेल असेही त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले. अशा आशादायक परिस्थितीमुळे आदिवासी शेतकरी स्ट्रॉबेरी शेतीकडे वळाला असून आदिवासी भागात रोजगारांची संधी निर्माण झाली आहे.


  • देवेंद्र पाटील

  • No comments:

    Post a Comment