ऊस पिकासाठी विदर्भ वगळता सामान्यत: पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, काही अंशी खानदेश भाग येतो हे माहीत आहे. पण अलिकडे पूर्व विदर्भातील गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील कास्तकारांची मानसिकता देखील बदलत असून तेथेही ऊस पिकाचा पेरा घेण्याकडे कल दिसून येत आहे.
पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली हे जिल्हे विशेषत: धानासाठी प्रसिद्ध आहेत. धानपिकाची खाचरे ह्या भागात आपल्याला विपुल प्रमाणात आढळतात. सिंचनाच्या मर्यादित सुविधेमुळे हिरव्यागार पिकाचे पट्टे कमी प्रमाणात पाहायला मिळायचे. पण धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या ह्या जिल्ह्यात धान पिकाला लागवड खर्च जास्त आणि तुलनेत उत्पादन कमी अशी परिस्थिती निर्माण होऊ लागल्याने कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या धान उत्पादक कास्तकारांनी पारंपरिक धान पिकाऐवजी ‘नगदी पिकाची लागवड करा’ या शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देणे सुरु केले आहे.
या भागातील शेतकऱ्यांनी ऊस उत्पादनाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. त्याला कारणही असे घडले की, भंडारा जिल्ह्यात लाखांदूर येथे नॅचरल ग्रोव्हर प्रायव्हेट लिमिटेड आणि भंडारा जिल्ह्यातच देव्हाडा येथे पूर्ती उद्योग समूहाचा वैनगंगा सहकारी साखर कारखाना सुरु झाला. धान उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस उत्पादित केला तर या दोन्ही साखर कारखान्यांनी तो खरेदी करण्याची तयारी दाखविली. त्यामुळे गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील धान उत्पादक कास्तकारांनी आपल्या धान पेऱ्याच्या क्षेत्रात किंचित कपात करत ऊस उत्पादनासाठी उसाचे बेणे लावले. उसाचा पेरा केला आणि आजमितीस ७०० हेक्टर पेक्षा जास्त शेतजमिनीवर उसाची लागवड करण्यात आली आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यात ईटियाडोह धरणाच्या कालव्यामुळे सिंचनाची सोय उपलब्ध असल्यामुळे जानेवारी अखेरपर्यंत वैनगंगा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने शेतकऱ्यांनी अर्जुनी मोरगाव गटात ७५ हेक्टर क्षेत्रात, महागाव गटात १०२ हेक्टर, तर नवेगावबांध गटात १८८ हेक्टर अशी मिळून एकूण ३६५ हेक्टर शेतजमिनीत उसाचा पेरा घेतला आहे. याशिवाय नॅचरल ग्रोव्हर प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्याच्या वतीने अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव गटात ९६ हेक्टरवर, अर्जुनी मोरगाव गटात ९१ हेक्टरवर तर सडक अर्जुनी गटात ७५ हेक्टरवर असे मिळून एकूण २६२ हेक्टरमध्ये उसाची लागवड करण्यात आली आहे.
ऊस पिकाच्या पेऱ्यामुळे अर्जुनी मोरगाव भागातील धान उत्पादकांच्या हाती यावर्षी नगदी हाती पैसा येणार आहे. त्यातून त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकू लागला आहे. या जिल्ह्यात पूर्वी तुरळक प्रमाणात उसाचा पेरा घेऊन, गुऱ्हाळ चालवून गुळ तयार करण्याची कुटीरोद्योगाची कामे चालू होतीच, पण साखर कारखान्यांना ऊस देऊन नगदी रक्कम हाती येण्याचा मणिकांचन योग आता ह्या भागातील धान उत्पादकांच्या हाती आला आहे. ही खरोखरच त्यांच्या आयुष्यात आनंदाची बाब बनून आली आहे.
No comments:
Post a Comment