उन्हाळ्यात गावकऱ्यांकडे धान्य नसल्यामुळे ते सावकाराकडून धान्य घेत आणि धान्य आल्यावर सावकाराला मोठ्या प्रमाणावर धान्य व्याजाच्या स्वरुपात परत करीत असत. या बाबींवर बचतगटांच्या सभासदांमध्ये विचार विनिमय करण्यात आला. या समस्येवर काय उपाययोजना करता येतील याविषयी चर्चा झाली. विविध पर्यायांचा विचार केल्यानंतर गटांनी एकत्र येऊन धान्यकोष तयार करावा, या उपायावर सर्वांचे एकमत झाले. त्यानुसार गटातील महिलांनी एकत्र येऊन धान्यकोष सुरु केले आहे.
याविषयी सीएमआरसी कार्यालयामार्फत त्यांना सहयोगीनीकडून वेळोवेळी माहिती देण्यात आली. कुपोषण कमी करण्यासाठी काय उपाय करण्यात येतील यावरही नेहमी चर्चा होत असे. त्यांनी सुरुवातीला एकत्र येऊन आपल्या भागात पिकणारा मक्का जमा करण्याचे ठरविले आणि प्रत्यक्षात धान्यकोषाला सुरुवात केली. जमलेले धान्य एका महिलेच्या घरी ठेवण्यात आले.
धान्यकोष सुरू झाल्यानंतर सर्वांनी मिळून त्याचे नियम तयार करुन घेतले. त्यामध्ये धान्य जमा करताना स्वच्छ केलेले व निवडलेले धान्य सभासदांनी द्यावे. गरजेच्या वेळी गरजू सभासदांना हे धान्य द्यावे. धान्य परत देताना जितके धान्य घेतले त्याच्या मोबदल्यात धान्यच द्यावे, जेणेकरुन जास्तीचे धान्य जमा होऊन इतर गरजू सभासदांना वाटप करणे शक्य होईल. असे ठरविण्यात आले.
बचत गटांनी सुरू केलेल्या या कार्यामुळे लहान स्वरुपात का होईना गरजू कुटुंबाची गरज आज पूर्ण होत आहे. भविष्यात मोठ्या प्रमाणावर धान्यकोष तयार करुन संपूर्ण गावाचे कुपोषण व उपासमार कशी कमी होईल, यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प गावविकास समितीने केला आहे.
No comments:
Post a Comment