Tuesday, March 20, 2012
‘मोबाईल मॅथ’ चा अभिनव उपक्रम
विद्यार्थ्यांच्या मनात असलेली गणिताची भिती दूर करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील एका शिक्षकाने स्वखर्चाने गावातील भिंतीवर गणिताची मूलभूत सूत्रे व सुलभ गणिते लिहिण्याचा अनोखा ‘मोबाईल मॅथ’चा उपक्रम राबविला आहे.
शाळेत गणित हा विषय तसा विद्यार्थ्यांची डोकेदुखी वाढविणारा. अनेक विद्यार्थी गणितात नापास होतात. विद्यार्थ्यांच्या मनातील गणिताची ही भीती घालविण्यासाठी तसेच या विषयाचा दर्जा वाढावा, याकरिता शेगाव तालुक्यातील तरोडा कसबा येथील राजेश कोगदे यांनी ही अभिनव संकल्पना राबविली आहे.
कोगदे यांच्या संकल्पनेतून १५०० लोकसंख्या असलेल्या या गावातील प्रत्येक गल्लीबोळातील भिंतीवर गणिते रंगविण्यात आलेली आहेत. शाळा सुटल्यापासून ते शाळेत जाईपर्यंत विद्यार्थ्यांची सहज नजर पडेल, अशा ठिकाणी ही गणिते रंगविली आहेत. विद्यार्थी कुठेही गेला, खेळत असला तरी त्याच्या दृष्टीस ही सूत्रे पडतात. ही सूत्रे नेहमीच डोळ्यासमोर दिसत असल्याने आपसूकच त्याचे पाठांतर होते. त्याच्या मनातील गणिताविषयीचा न्यूनगंड कमी होतो. सूत्र पाठ झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी गोडी निर्माण होते. यामुळे गावात शैक्षणिक वातावरण तयार होण्यासही मदत होत आहे.
विद्यार्थ्यांसाठी आता गावही झाली माझी शाळा आणि गावातील भिंत बनली फळा, असा नवा शब्दकोष तयार झालेला आहे. आपल्याच पाल्यांच्या फायद्याची ही सूत्रे असल्यामुळे पालकही याची खूप काळजी घेतानाचे चित्र गावात दिसत आहे.
राजेश कोगदे यांनी संख्यावाचन व लेखनाचे नवीन प्रयोग केले आहेत. यासाठी शिक्षण विभागाने अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. आता तरोड्यातील या नव्या मोबाईल मॅथचा प्रयोग राज्यभरात राबविला जावा, अशी कोगदे यांची इच्छा आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment