Thursday, March 1, 2012

कारंजा येथे साकारले जातेय निसर्ग पर्यटन केंद्र

जैव विविधतेचे संरक्षण आणि संवर्धनाच्या दृष्टीने राष्ट्रीय उद्याने व अभयारणे यांना विशेष महत्व आहे. परिसरातील जैव विविधता, वनस्पती व वन्य प्राण्याच्या अधिवासाचे सुयोग्य संतुलन राखण्यासाठी तसेच लोकांची निर्सगाबद्दल जागरुकता, जिव्हाळा वाढीस लागावा या दृष्टीने वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहराला लागून असलेल्या २५० एकर पडिक वनक्षेत्रात वनविभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने निसर्ग पर्यटन योजना कार्यान्वित होत आहे. 

या ठिकाणी लहान मुलांना खेळण्याकरिता एक प्रशस्त बालोद्यान निर्माण करण्यात येत आहे. निसर्ग परिसर परिचय केंद्रामार्फत विविध वन्य जीवांची छायाचित्रे संपूर्ण माहितीसह भिंतीवर लावण्यात येणार आहे. वनसंवर्धना विषयीचे विविध प्रकारचे पुस्तकी साहित्यही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. वन्यजीवांविषयी अद्ययावत माहिती सुविधा येथे उपलब्ध राहील. परिसरात उभारण्यात येणाऱ्या नक्षत्र वनात राशी परत्वे झाडांची लागवड करण्यात येणार आहे.

वन्यजीव काही कारणास्तव जखमी झाल्यास त्यांच्यावर वनजीव प्रेमींच्या सहकार्याने पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत उपचार केले जातील. ग्रामस्थांना तसेच वन कर्मचाऱ्यांना वन विषयक सविस्तर माहिती देण्याकरिता वनप्रशिक्षण केंद्राची निर्मिती करण्यात येत आहे. परिसरात असलेल्या रामगड्डा तलावाचे रुपांतर शिवकालीन पाणी साठवण तलावामध्ये करण्यात येईल. त्याठिकाणी स्थानिक तसेच स्थलांतरीत पक्षी येण्याच्या दृष्टीने त्याचा विकास करण्यात येईल.

निसर्गचरकसंहितेमध्ये दिलेल्या वनौषधींची लागवडही या परिसरात करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक प्रजातीसमोर त्यासंबंधीच्या माहितीचे सविस्तर विवरण फलक लावली जातील. नागरिकांना तसेच पर्यटकांना वनक्षेत्रामध्ये निसर्गाचा आनंद घेण्याकरिता निसर्ग वाटेची निर्मिती करण्यात येईल आणि आजूबाजूने विविध प्रजातींची बांबूची झाडे लावण्यात येतील. 

विविध वन्यजीव तसेच वनस्पती व वनआधारीत उद्योगांची माहिती वनसंग्रहालयामध्ये सर्वांकरिता उपलब्ध असणार आहे. ग्रामस्थांना तसेच पर्यटकांना विश्रांतीकरिता निसर्ग निर्मित सावलीयुक्त बैठकीची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. कारंजामधील प्रसिद्ध ऋषी तलावाच्या खोलीकरणामधून निघालेली काळ्या मातीची वाहतूक करुन त्याचा उपयोग खडकाळ भागामध्ये सदाहरीत उंच झाडांचे रोपण करण्याकरिता करण्यात येईल. 

यवतमाळ दारव्हा रोडलगत असलेल्या हद्दीवर भिंत व उर्वरीत भागावर तारकुंपण करण्यात येणार आहे. भिंतीच्या आतील भागात वेगवेगळ्या प्रजातीचे बांबू लावण्यात येतील.

मुख्य प्रवेश द्वार हे ६ मीटर रुंदीचे व ५.५ मीटर उंचीचे प्रस्तावित करण्यात आले आहे. प्रवेशद्वारापासून आतील मुख्य रस्ता हा ६ मीटर रुंदीचा तसेच त्याच्या दुतर्फा बांबू व इतर शोभिवंत झाडे लावण्यात येतील. विविध प्रजातीच्या फुलपाखरांच्या संरक्षण व संवर्धनाकरिता विशिष्ट प्रजातीच्या झाडांची लागवड करण्यात येईल. दुर्मिळ होत असलेल्या वन्यप्राण्यांचे पुतळे उद्यानात रस्त्याच्या दुतर्फा ठेवण्यात येणार आहेत, जेणे करुन युवा पिढीला त्याची माहिती होईल.

स्थानिकांबरोबरच पर्यटकांची निर्सगाबद्दल जागरुकता तसेच जिव्हाळा वाढीस लागावा, यासाठी या निसर्ग पर्यटन केंद्राचा निश्चितच उपयोग होईल.

No comments:

Post a Comment