Thursday, March 22, 2012

पालच्या शिवारात .. झेंडू फुलला

गुढी पाडवा हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण. आजपासून हिंदू नववर्षाला सुरूवात होते. सर्वत्र गुढ्या-तोरणे उभारून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. या गुढी पाडव्यासह वर्षभरातील सर्वच सण, उत्सव आणि शुभकार्यात फुलांमध्ये सर्वाधिक महत्त्व असते ते झेंडूला. काळ कितीही झपाट्याने बदलत असला तरीही झेंडूच्या फुलांना आजही तितकाच मान आहे. परंपरा आणि नविनता यांचे नाते अधोरेखित करण्याचे महामंगल काम झेंडूमुळेच साकारले जात आहे.

अशा या झेंडूफुलाच्या उत्पादनात सातारा जिल्हा राज्यातील एक आघाडीचा जिल्हा म्हणून ओळखला जातोय. भगव्या आणि पिवळ्या झेंडू फुलांच्या टवटवीत आणि दर्जेदार उत्पादनासाठी येथील शेतकऱ्यांनी स्वयंसशोधनाद्वारे क्रांती घडविली आहे. म्हणूनच आज सातारा जिल्ह्यातील झेंडूफुलांना पुण्या-मुंबईच्या बाजारपेठांत मोठी मागणी लाभली आहे.

सातारा जिल्ह्याने सर्वच क्षेत्रात खऱ्या अर्थाने क्रांती घडविली आहे. शेती क्षेत्रात तर येथील बहाद्दर शेतकऱ्यांनी जिद्द आणि कष्टातून आपली नवी ओळख निर्माण केली आहे. आपापल्या परीने शेती विकासाचे नानाविध प्रयोग राबवून शास्त्रशुद्ध शेतीचा नवा विचार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विकसित केला आहे. परंपरागत शेती पिकाबरोबरच फुलशेतीतही येथील शेतकऱ्यांनी एक पाऊल पुढेच टाकले आहे. विशेष म्हणजे झेंडू फुलांच्या शेतीला राज्यस्तरावर लौकिक मिळवून देण्याचे काम येथील शेतकऱ्यांनी केले आहे. हरितगृहाच्या सर्वाधिक उभारणीमुळे हरितगृहाचा जिल्हा म्हणून सारा महाराष्ट्र सातारा जिल्ह्याला ओळखतो. याचाच एक भाग म्हणून झेंडू फूल शेतीमध्येही सातारा, कराड, पाटण, कोरेगाव तसेच माण-खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी कष्ट आणि जिद्दीद्वारे क्रांती घडविली आहे. आजमितीस जिल्ह्यात झेंडूफुलांची सुमारे २० कोटींची वार्षिक उलाढाल होत आहे. पुण्या-मुंबईतील लोकांची झेंडूची भूक भागविण्याचे काम खऱ्या अर्थाने सातारा जिल्ह्यातील शेतकरी करीत आहेत.

सातारा जिल्ह्यात जवळपास बाराशे हेक्टर क्षेत्रावर झेंडूचे उत्पादन होत आहे. यामध्ये पश्चिम भागातील शेतकरी आघाडीवर आहेत. झेंडू फुलशेतीची शास्त्रशुद्ध पद्धतीने लागवड करुन कराड तालुक्यातील पाल येथील शेतकरी जयवंत पाटील यांनी झेंडू फुलाच्या उत्पादनात घडविलेली क्रांती अन्य शेतकऱ्यांना निश्चितच मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे. जयवंत पाटील हे पाल आणि परिसरातील एक प्रगतशील शेतकरी म्हणून सर्वांना परिचित आहेत. त्यांनी गेली १५ वर्षे सातत्यपूर्वक झेंडूचे पीक घेतले आहे. झेंडूच्या दर्जेदार उत्पादनात त्यांचा हात धरणे तसे कठीणच. टवटवीत, आकर्षक आणि दर्जेदार झेंडू उत्पादनात त्यांनी निम्मी हयात घालविली. ग्राहकांना उत्तमोत्तम झेंडू देण्याचा त्यांनी नेहमीच प्रयत्न केला आहे. त्यांना आदर्श मानून आता अल्पकालावधीत नगदी पैसा देणाऱ्या या झेंडू फूल शेतीकडे अनेक तरुण शेतकरी आकर्षित झाले आहेत.

कराड, पाटण, सातारा, कोरेगाव या प्रमुख तालुक्यांबरोबरच काही प्रमाणात माण-खटाव भागातही झेंडूचे उत्पादन घेतले जाते. जिल्ह्यात बाराशे हेक्टरच्या आसपास झेंडूची लागवड होत आहे. प्रति हेक्टरी १२ टन झेंडूचे उत्पादन घेण्याची क्रांती येथील बहाद्दर शेतकऱ्यांनी केली आहे. यामुळे सातारच्या झेंडूने पुणे-मुंबईच्या बाजारपेठेत स्वत:ची एक आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे. जिल्ह्यात झेंडूच्या फुलांची २० कोटींची वार्षिक उलाढाल होत असून झेंडू उत्पादनातील फलश्रुतीमुळे झेंडूफुलांचे उत्पादन घेण्यात दिवसेंदिवस शेतकऱ्यांमध्ये चढाओढ निर्माण झाली आहे. अल्पक्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यापासून मोठे क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांनाही झेंडू फुलशेती लाभदायी ठरत असल्याचे मत जयवंत पाटील यांनी व्यक्त केले. झेंडू शेती ही अन्य पिकांच्या तुलनेत कमी पाण्यामध्ये होत असून कष्टही तितकेच कमी लागतात. झेंडूच्या उत्पादनामुळे जमिनीची सुपिकता वाढण्यासही मदत होते. याबरोबरच कलर निर्मितीसाठीही झेंडू फुलांचा वापर करण्यात काही कंपन्या पुढे सरसावल्या आहेत. झेंडू पिकाची कीड, भुरी आणि करपा या रोगापासून योग्य काळजी घेतल्यास हे पीक शेतकऱ्यांना लाभदायी ठरत आहे.

पाल येथे झेंडूच्या शेतीद्वारे लाभ मिळविणारे उदाहरण म्हणून जयवंत पाटलांनी ओळख निर्माण केली आहे. त्यांची वडिलोपार्जित २५ एकर जिरायत शेती होती. तारळी नदीच्या पाण्यामुळे मात्र गेल्या काही वर्षापासून बागायती शेती निर्माण करण्यास जयवंत पाटलांना यश आले. ऊस, आले, पपई, काकडी, हळद अशा शेती पिकांबरोबरच जयवंत पाटलांनी तीन एकर क्षेत्रात झेंडूच्या फुलांचे उत्पादन घेतले. गेल्या पंधरा वर्षांपासून झेंडूच्या फुलशेतीत जयवंत पाटील राबत आहेत. आपले वडील कै.बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी फूलशेतीत लक्ष घातले. वडिलांच्या निधनानंतरही त्यांनी वडिलांनी घालून दिलेल्या वाटेनेच चालायचा यशस्वी प्रयत्न केला आहे. झेंडूच्या उत्तमोत्तम जातीची रोपे मिळवून झेंडूची शेती लाभदायी बनविण्यात जयवंत पाटील यांना यश लाभले आहे.

जयवंत पाटील यांनी तीन एकर शेतीमध्ये भगव्या तसेच पिवळ्या रंगाच्या आकर्षक अशा ‘लाल कलकत्ता’ जातीच्या झेंडू फुलांच्या १५ हजार रोपांची लागवड केली. ४५ दिवसानंतर त्यांनी झेंडूचा पहिला तोड घेतला. आतापर्यत अवघ्या तीन महिन्यात त्यांनी ७ तोड घेतले असून एकंदरीत १२ ते १५ तोड घेण्याची क्रांती त्यांनी घडविली आहे. जयवंत पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांनी कष्ट आणि जिद्दीने झेंडूशेती विकसित केली. ही शेती कशी लाभदायी होईल यासाठी त्यांनी अनेक जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी करुन ज्ञान आत्मसात केले. झेंडू फूल शेतीबरोबरच जयवंत पाटील यांनी आपल्या शेतीमध्ये स्वत: संशोधन करुन आले, हळद, पपई अशा अनेक पिकांच्या अधिक उत्पादनाची क्रांती घडविली आहे. झेंडू फुलांच्या उत्पादनाविषयी बोलतांना ते म्हणाले, लग्न, वास्तुशांती, विविध सण, उत्सव अशा वेळी आता मोठ्या प्रमाणात झेंडूची मागणी होत आहे. त्यामुळे झेंडू फुलशेतीला शाश्वत शेती म्हटल्यास वावगे ठरणार नाही. नगदी पैसे देणारी ही शेती आता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विस्तारत आहे.

झेंडू फुलांना १२ महिने २४ तास मागणी आहे. उत्तम, दर्जेदार, टवटवीत आणि टीकाऊ झेंडूच्या उत्पादनाला आता पुण्या-मुंबईच्या बाजारपेठेत मोठी मागणी आहे. ३ एकरात झेंडू उत्पादनातून वार्षिक उत्पादन ७ ते ८ लाखाच्या घरात जाते. मात्र यासाठी मजुरी व अन्य शेतीखर्च मिळून २ लाखापर्यंत खर्च येतो. म्हणजे याद्वारे आर्थिक उत्पन्नाचा मोठा स्त्रोत निर्माण होत असल्याचे मतही जयवंत पाटील यांनी व्यक्त केले. पुणे, मुंबईच्या बाजारपेठेत सातारा जिल्ह्यातील झेंडू फुलांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कमी खर्चात, कमी पाण्यात, अल्प काळात पण शाश्‍वत उत्पन्न देणाऱ्या भगव्या आणि पिवळ्या रंगाच्या झेंडूची शेती करण्याकडे जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्यांचा ओढा यामुळेच वाढला आहे.


  • एस.आर.माने

  • No comments:

    Post a Comment