गुहागरपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या कवी माधव काटदरे यांच्या गावात त्यांच्याच प्रसिद्ध 'हिरवे तळकोकण' या कवितेत वर्णन केल्याप्रमाणे
शिलोच्चयांतुनी झुरुझुरू जेथे गंगाजळ पाझरे
असे निसर्गाचे विविध रंग न्याहाळता येतात. कै.धर्मा पवार, कै.पांडुरंग फटकरे या गावातील भूमीपुत्रांनी गावाचे नाव देशपातळीवर पोहोचविले. समृद्धी आणि सामाजिकतेची परंपरा जपताना गावाने शासनाच्या विविध योजनांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात नेहमीच पुढाकार घेतला. १९९३-९४ या वर्षी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत तालुका स्तरावर द्वितीय पुरस्कार प्राप्त केल्यावर ग्रामस्थांनी गावाच्या विकासासाठी एकजूटीचे वातावरण आजही कायम ठेवले आहे. त्यानंतरच्या काळात अनेक पुरस्कारांची जणू श्रृंखलाच या गावाने निर्माण केली आहे.
सरपंच शिवराम अंबेकर, उपसरपंच सिताराम ठोंबरे, ग्रामविकास अधिकारी बी.बी.पाटील या त्रिमुर्तीने गावात विविध उपक्रम राबविण्यात पुढाकार घेतला. शासकीय कर्मचारी, नागरिक, विविध मंडळे, विविध समित्यांचे सदस्य यांच्यातील सुसंवाद हे गावाच्या यशाचे खरे गमक आहे. या सर्वातील एकवाक्यता गावात गेल्यावर चटकन लक्षात येते. गावातील युवकांनी एकत्रित येऊन व्यसनमुक्ती कार्यक्रम, ग्रामस्वच्छता अभियान, वनराई बंधाऱ्याची निर्मिती आदी उपक्रम यशस्वीपणे राबविले. एवढेच नव्हे तर गावातील शैक्षणिक सुविधांच्या बाबतीतही ग्रामस्थ जागरूक आहेत. गावाने सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेतून ३० मुली दत्तक घेतल्या आहेत. गावात गुटखा आणि प्लास्टीकवर पुर्णत: बंदी आहे. आरोग्याच्या बाबतीतही विशेष जागरूकता दाखवून गाव कुपोषणमुक्त ठेवण्यात ग्रामपंचायतीला यश आले आहे.
शासनाची कोणतीही मदत न घेता लोकसहभागातून गावात ४ वाड्यांसाठी स्वतंत्र नळपाणी योजना सुरु करण्यात आली आहे. विकासासाठी आपसात कोणतेही मतभेद असू नये म्हणून गावाने गेली २५ वर्षे ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध केल्या आहेत. रक्तदान, नेत्रदान अशा सामाजिक उपक्रमाच्या बाबतीतही ग्रामस्थांच्या जाणिवांचे दर्शन त्यांच्याशी संवाद साधल्यावर घडते. गावाने पर्यावरण समृद्ध ग्राम योजनेचे उद्दीष्ट पूर्ण करताना पर्यावरण विकासरत्न पुरस्कार प्राप्त केला. शोषखड्डा आणि कचऱ्यापासून खत निर्मितीचे प्रयत्न घरोघरी होताना दिसतात. गावकऱ्यांची पर्यावरणाविषयीची आस्थादेखील गावात फेरफटका मारल्यावर लक्षात येते. आदर्श गोठा स्पर्धा, स्वच्छ जनावर स्पर्धा अशा अभिनव उपक्रमांचे आयेाजन ग्रामपंचायतीतर्फे करण्यात येते.
ग्रामसभा गावाच्या प्रगतीसाठी महत्वपूर्ण असल्याने तिच्या आयोजनाबाबत सरपंचासह सर्व ग्रामस्थ विशेष जागरूक आहेत. ग्रामपंचायतीच्या परिसरातही ग्रामसभेचे महत्व वर्णन करणारी घोषवाक्ये लिहिलेली आढळतात. 'ग्रामसभेचा पसरवू प्रकाश, गावाचा साधू विकास' हे वाक्य गावाने खरे करून दाखविले आहे. म्हणून गावाला राष्ट्रीय गौरव ग्रामसभा जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार आणि यशवंत पंचायतराज अभियानाचा जिल्हास्तरावर प्रथम तर विभागीय स्तरावर चौथा पुरस्कार मिळाला आहे. स्वच्छतेचा नावलौकीक कायम राखत गावाने आतापर्यंत त्यासाठी अनेक पुरस्कार मिळविले आहेत. तंटामुक्त गाव अशी ख्याती प्राप्त करतांना गावात शांतता आणि समृद्धीचे वातावरण कायम ठेवल्याने राज्यस्तरावर गावाचे नाव पोहोचले आहे.
गावात जलसंधारणाचे महत्वही घरोघरी पोहोचले आहे. २० वनराई बंधाऱ्याच्या माध्यमातून शेतीला पाणी देणे, गावात महिला सक्षमीकरणासाठी बचत गट चळवळीला बळ देणे आदी महत्वाचे कार्य ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने करण्यात येत आहेत. त्यामुळे १७ बचत गटाच्या अंतर्गत अनेक महिलांना रोजगार प्राप्त झाला आहे. १० हेक्टर क्षेत्रावर बचत गटांच्या माध्यमातून भाजीपाला उत्पादन केले जात आहे. शिवाय महिलांना प्रक्रीया उद्योगाचे प्रशिक्षण देऊन गावातच रोजगार निर्माण करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. गावाला देशपातळीवर बहुमान मिळवून देण्याचा प्रयत्न सर्व ग्रामस्थ एकजूटीने करीत आहेत. संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगितेत वर्णन केल्याप्रमाणे
अखंड चालविती कामाचे सोहळे, ग्रामसेवेसाठी ll
सर्वांगीण असावी ग्रामरचना, मनोरंजनासहित पुरवाव्यात भावना l
जेणेकरून ग्रामवासीयांना, आठवण ना ये शहराचा ll
असेच कार्य गावाने करून दाखविले आहे. चळवळीचे सामर्थ्य आणि एकतेतील शक्तीचे महत्व इतरांना पटवून देत गावाने विकासात घेतलेली आघाडी कौतुकास्पद आहे.
No comments:
Post a Comment