Sunday, March 18, 2012

महाराष्ट्र धर्माचे प्रणेते : यशवंतराव चव्हाण

यशवंतरावांना 'माणसे' ओळखण्याची कला साधली होती व कुणाचे ऐकावे व कुणाचे ऐकू नये, याची जाणही होती. ते राजकारणात होते, त्यापेक्षा राष्ट्रकारणात व समाजकारणात अधिक होते. आचार्य विनोबा म्हणत त्याप्रमाणे हल्लीच्या राजकारणाला डिबेटिंग क्लबचे स्वरूप येऊ लागले आहे. आधीच आपल्यात हिंदू, मुसलमान इत्यादी धर्मभेद, त्यातही हिंदूंत पुन्हा स्पृश्यास्पृश्य, ब्राह्मण-ब्राह्मणेतर हे वाद आहेतच. राजकीय पक्षभेद व गटभेद आहेतच. त्यात नसत्या भेदांची भर घालण्यापेक्षा काही विधायक तत्त्वावंर भर देणे आवश्यक आहे. 'महाराष्ट्र धर्म' हा प्रथमदर्शनी वामनासारखा दिसला तर वस्तुत: तो दोन्ही पावलांतच विराट विश्व व्यापून टाकणाऱ्या त्रिविक्रमासारखा आहे. त्या त्रिविक्रमाचे एक पाऊल महाराष्ट्रीय, दुसरे राष्ट्रीय आणि तिसरे आंतरराष्ट्रीय म्हणजे वैश्विक आहे.' आणि हाच महाराष्ट्र धर्म यशवंतरावांना मान्य होता.

मा. श्री. यशवंतरावजी चव्हाण यांनी मी जवळून ओळखत होतो. त्याहूनही दुरून अधिक ओळखत होतो. त्यांचे घनिष्ठ संबंध होते असे मी म्हणणार नाही. परंतु घनिष्ठता नसली की माणसाची पारख अधिक नि:पक्षपणे करता येते, असे मी मानतो. मी कॉलेज जीवनात विद्यार्थी काँग्रेसचा सक्रिय कार्यकर्ता होतो. त्यानंतर १९४८ साली एक विचार पुढे आला की विद्यार्थी चळवळ ही पक्षनिरपेक्ष असावी. म्हणून १९४८ साली बंगलोर येथे झालेल्या अखिल भारतीय काँग्रेसच्या सभेत तसा निर्णय घेण्यात आला व व त्यानंतर नॅशनल युनियन ऑफ स्टुडंट्स ही विद्यार्थ्यांची पक्षनिरोप संस्था अस्तित्वात आली. ह्यात संस्थेतही मी पदाधिकार होतो. त्यानंतर मी मजूर चळवळीत जवळपास दहा वर्षे म्हणजे १९६५ पर्यंत सक्रिय होतो. नागपूरच्या राष्ट्रीय मिल मजूर संघाचा अध्यक्षही होतो. त्यांनतर भाषावार प्रांतरचना या तत्त्वावर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरु झाली. विदर्भाची वेगळी संस्कृती आहे असे मी म्हणणार नाही. पण विदर्भाचा वेगळा स्वभाव मात्र आहे. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्रात सामील होण्याची विदर्भाची मानसिकता नव्हती व त्यास विरोध होता. अर्थात त्यातही राजकारणाचा व नेतृत्वाचा भाग अधिक होता. महाराष्ट्रात सामील झालो तर आपली अस्मिता संपेल, नागपूरला 'उपराजधानी' म्हणजे 'उपपत्नी' चे स्थान मिळेल, असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. एका ज्येष्ठ वैदर्भीय नेत्याच्या मते, ''स्वातंत्र्य आंदोलन व महात्मा गांधींनी चालविलेल्या सर्व चळवळीत विदर्भाचे आगळेवेगळे स्थान होते. तो देशभक्तांना प्रदेश होता. इंग्रजांची चाकरी करणाऱ्यांचा प्रदेश नव्हता.''

पुण्यातच शिक्षण झालेले एक ज्येष्ठ साहित्यिक म्हणाले होते की, ''पुण्याच्या चहुबाजूंनी गगनचुंबी भिंत बांधली, तर बाकीचा सारा महाराष्ट्र एकच आहे.'' त्यामुळे स्वतंत्र विदर्भाची चळवळ मूळ धरीत होती. मीही त्यात सामील होतो. आम्हाला वेगळा विदर्भ न मिळाला तरी चालणार होते, पण आंदोलन हवे होते. कारण ज्याला 'न्युसन्स व्हॅल्यू' म्हणजे उपद्रवी मूल्य नसते. त्यांना काही किंमतच नसते अशी धारणा होती. राज्यकर्त्यांना फक्त बंदुकीच्या गोळ्यांचेच आवाज ऐकू येतात असा सार्वत्रिक समज होता. प्रादेशिक अगर विभागीय अस्मिता राष्ट्रीयत्वाच्या भावनात्मक ऐक्याच्या दृष्टीने 'नॉन कंडक्टर' व बाधक आहे, हे कळत होते. पण अविश्वास मूळ धरून होता. १९४७ मध्ये अकोला करार व १९५३ मध्ये नागपूर करार असे दोन करार झाले. त्यानंतरही अविश्वास कायम होता. परंतु विधानसभेत यशवंतराव चव्हाणांनी आश्वासन दिले की, ''नागपूर करार हा पवित्र करार आहे आणि नागपूर करारात आहे त्यापेक्षाही अधिक विदर्भाच्या वाट्याला येईल.'' या आश्वासनानंतर वातावरण बदलले व विदर्भ संयुक्त महाराष्ट्रात सामील झाला. विदर्भाच्या लोकांचा लेख कराराच्या कागदापेक्षा चव्हाणांच्या आश्वासनावर अधिक विश्वास होता. करारात ठरले की, लोकसंख्येच्या प्रमाणात निरनिराळ्या घटकांवर करावयाच्या खर्चाचे नियमित वाटप करण्यात येईल. नोकरभरतीच्या वेळी संबंधित घटकांना लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्त्व दिले जाईल. नागपूर महाराष्ट्राची दुसरी राजधानी राहील व अनेक सरकारी दफ्तरे नागपूरला हलविली जातील. ही आश्वासने पाळली जात नाहीत व अनेक बाबतीत अनुशेष वाढतो आहे, अशी जी तक्रार विदर्भातील मंडळी करीत आहेत, ती यशवंतराव असते तर उद्भवली नसती, अशी माझी खात्री आहे. कारण शब्द पाळण्याची दानत व क्षमता दोन्हीही त्यांच्याजवळ होती. यामुळे वैदर्भीय लोकांना त्यांची अनुपस्थिती आज प्रकर्षाने जाणवत आहे. कारण ती उणीव अजूनही भरून निघालेली नाही. आता फक्त निर्जीव औपचारिकताच उरली आहे.

मी राष्ट्रीय मिल मजूर संघाचा अध्यक्ष असतानाच माझ्या कारकीर्दीत मजूर संघाच्या मालकीची आलिशान इमारत 'कामगार भवन' या नावाने बांधण्यात आली. हे भवन संपूर्णत: कामगारांच्याच पैशाने बांधण्यात आले. यासाठी मालक व इतर दाते पैसे द्यायला तयार होते, परंतु ते स्वीकारण्यास आम्ही नकार दिला. या अशा कामगारांच्या श्रमाच्या रामकमाईने बांधलेल्या भवनाचे उद्घाटन मा. यशवंतरावजींच्या हस्ते झाले. त्यावेळी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. औद्योगिक कलहाला किंवा विवादाला मालक-मजूर या दोनच बाजू असतात, असे आम्ही कधीच मानले नाही. या संघर्षाला तिसरी बाजू असते, ती म्हणजे उपभोक्ता ग्राहकाची! जिला आम्ही 'सुप्त सरस्वती' म्हणत असू. संप बंद, लॉकआऊट यांचे परिणाम त्यांनाच भोगावे लागतात. नफा झाला तर मजुरांना बोनस व पगारवाढ मिळते. शेअर होल्डर्सना वाढीत डिव्हिडंट मिळतो. पण यात ग्राहकाला काहीही मिळत नाही. मजूर चळवळ ही मालकांविरुद्धचीच चळवळ न राहता. शोषकाविरूद्ध शोषित असे त्यांचे स्वरूप राहावे व ती समाजपरिवर्तनाची चळवळ, असावी अशी आमची भूमिका हाती. त्याचे फार चांगले विश्लेषण यशवंतरावांनी त्यांच्या भाषणात केले होते. महात्मा गांधी म्हणत असत की, मालक त्याच्या संपत्तीचा जसा विश्वस्त आहे, तसेच मजूर त्याच्या श्रमशक्तीचे विश्वस्त आहेत, समाजाच्या उपयोगी पडण्यासाठी. ही भूमिका भांडवलशाहीविरुद्ध बंद करून आर्थिक समता प्रस्थापित करू इच्छिणाऱ्या व समाजवादी समाजरचना प्रस्थापित व्हावी असे मानणाऱ्या यशवंतरावांचीही होती. शासनही विश्वस्त आहे, 'मालक' नाही. अंतिमत: खरे मालक आहेत 'लोक' अर्थात जनता. राजकीय पदे उपभोगाची साधने नाहीत. सत्ताधिकारी हा सत्ताकांक्षी नसावा, तर विश्वस्त भावनेने जगणारा असावा हे भारतीय संविधानास अभिप्रेत असलेले तत्त्व आहे. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत (प्रीऍ़म्बल) स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, 'सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय प्राप्त करून देण्याचा भारतीय लोकांचा संकल्प आहे.' या तत्त्वावर यशवंतरावांचा दृढ विश्वास होता व ते तसे वागत होते.

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळी अशी भीती व्यक्त करण्यात आली होती की, ते 'मराठी' राज्य न होता 'मराठा' राज्य होईल. कारण भाषावर प्रांतरचनेनंतर सर्वच भाषिक-राज्यांत 'रुलिंग रेस' उदयास आली. भाषा हे केवळ निवेदनाचे साधन नसून तो सांस्कृतिक एकांक असतो. आपल्या संस्कृतीचा व जीवनाचा मुक्त आविष्कार करण्याची संधी सामान्य माणसाला त्यामुळे मिळेल व भाषिक सहयोगात्मक व भावनात्मक ऐक्य निर्माण होईल, अशी रास्त अपेक्षा होती. विदर्भातील 'हिंदी-मराठी' वाद संपून एकसंध मराठी प्रदेश सामार्थ्याने उभा राहील, असे वाटत होते. परंतु सर्वांसाठी समान असलेला 'शत्रू' गेला की आपसांत शत्रुत्व निर्माण होत असते, तसे झाले. जातिवाद वा उपजातिवाद फोफावला व एकजनता वृत्ती निर्माण होऊ शकली नाही. विदर्भाचे जे पुढारी मुंबईला आले ते मुंबईवासीच झाले ते स्वगृही परतलेच नाहीत. आज मुंबई व इतर महानगरांतील मराठी भाषक सुविद्य व संपन्न लोकांच्या घरी मराठी ही मातृभाषाच राहिलेली नाही. मराठी भाषा ही भाषांतराची भाषा झाली. महाराष्ट्राच्या शासनातही इंग्रजीचाच वरचष्मा आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र हा घोष होता. त्याऐवजी संयुक्त महाराष्ट्रासह विशाल मुंबई राज्य 'प्रस्थापित झाले. महाराष्ट्राच्या एका शिक्षणमंत्र्याने खेड्यापाड्यांतील प्राथमिक शाळेतही प्रथम वर्गापासून इंग्रजी शिकविण्याचा फतवा काढला. त्यामुळे माय किंवा आई-बाबा ऐवजी मम्मी-डॅडी किंवा पप्पा यांचे प्रस्थ वाढले. मराठी भाषा दुय्यम भाषा झाली व 'मायमराठी'ची प्रतिष्ठा संपुष्टात येत आहे. यशवंतराव असते तर असे झाले नसते. मराठी मातीशी इमान राखणारा तो जाणता शासनकर्ता होता. लोकांच्या आकांक्षा जाणणारा व त्यांना सोबत घेऊन जाणारा तो खरा नेता होता. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बिरादरीतला. आता तर नावही वाहून जात आहे. अशा वेळी मराठीपणा व मराठी अस्मिता नसलेला 'मराठी प्रदेश' कसा अस्तित्वात राहू शकतो, हाच खरा प्रश्न आहे. आजवर ज्यांनी विचार दिला त्यांनीच जगाला अगर प्रदेशाला आकार दिला. प्रत्येक क्रांतीच्या मुळाशी विचार देणारे विचारवंत ऋषी किंवा शासनकर्ते होते त्यांची वैचारिक मूलतत्त्वे होती. हाच यशवंतरावांचा वसा होता. संयुक्त हृदय असल्याखेरीज काहीही संयुक्त राहू शकत नाही. असे मन व भावना जोडणारे आंदोलनच संपले. उरला महाराष्ट्रातील उपप्रादेशिकवाद व जाती-उपजातिवाद लोकांच्या भावनांसोबत जगणारे, त्यांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्वच उरले नाही. त्यामुळे भावनात्मक ऐक्य निर्माण होऊ शकले नाही. उलट प्रादेशिक वितुष्टच वाढत आहे. कारण आता यशवंतरावांची वृत्तीच उरली नाही. आजवर महाराष्ट्राचे जे थोर नेते मानले गेलेत ते 'भारतीय नेते' ही होते. 'महाराष्ट्र' या शब्दात 'महा' व राष्ट्र हे जे दोन सांकेतिक शब्द आहेत, ते इतर प्रांतांच्या नावातही नाहीत. ते शब्दच औपचारिक होत आहेत.

यशवंतराव संरक्षण मंत्री म्हणून केंद्रात गेले, तरी सुद्धा नागपुरात विधानसभेच्या सत्राच्या वेळी ते नागपूरला येऊन विदर्भाचे प्रश्न व लोकांच्या भावना समजावून घेत असत. हे सत्र सुरु होण्यापूर्वी फक्त राजकीयच नव्हे, तर आमच्यासारख्या सामाजिक क्षेत्रातील लोकांशी ते मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चर्चा करीत असत आणि तीही अगदी वैयक्तिक व स्वतंत्रपणे. वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना, ते व यशवंतराव यांच्यासोबत मी स्वत: अशा चर्चेला उपस्थित राहत असे. निर्वैर, नि:पक्ष व निर्भयपणे प्रश्न मांडू शकणाऱ्या लोकांची त्यावेळी आगळीवेगळी प्रतिष्ठा होती. वृत्ती प्रश्न समजावून घेण्याची व ते सोडविण्याची असे आणि या खुल्लमखुल्ला व मोकळ्या चर्चेतून जनतेच्या भावना जाणून घेतल्या जात असत.
सामाजिक व वैचारिक विचार करू शकणाऱ्या व्यक्तींचे मूल्य यशवंतरावांना कळत असे. मला माहित आहे की माझे वडील आचार्य दादा धर्माधिकारी यांनी थोर क्रांतिकारक श्री. खानखोजे यांच्या हलाखीच्या परिस्थितीबद्दल यशवंतरावांना, ते मुख्यमंत्री असताना पत्र लिहिले होते व उलटटपाली श्री. खानखोजे यांच्याकरीता मदतीचा हात पुढे करण्यात आला होता. अशा गोष्टी लालफितीत अडकत नसत. कारण यशवंतरावांना 'माणसे' ओळखण्याची कला साधली होती व कुणाचे ऐकावे व कुणाचे ऐकू नये याची जाणही होती. ते राजकारणात होते, त्यापेक्षा राष्ट्रकारणात व समाजकारणात अधिक होते.

आचार्य विनोबा म्हणत त्याप्रमाणे हल्लीच्या राजकारणाला डिबेटिंग क्लबचे स्वरूप येऊ लागले आहे. कधीच आपल्यात हिंदू, मुसलमान इत्यादी धर्मभेद, त्यातही हिंदूंत पुन्हा स्पृश्यास्पृश्य, ब्राह्मण-ब्राह्मणेतर हे वाद आहेतच. राजकीय पक्षभेद व गटभेद आहेतच. त्यात नसत्या भेदांची भर घालण्यापेक्षा काही विधायक तत्त्वांवर भर देणे आवश्यक आहे. 'महाराष्ट्र धर्म' हा प्रथमदर्शनी वामनासारखा दिसला तरी वस्तुत: तो दोन्ही पावलांतच विराट विश्व व्यापून टाकणाऱ्या त्रिविक्रमासारखा आहे. त्या त्रिविक्रमाचे एक पाऊल महाराष्ट्रीय, दुसरे राष्ट्रीय आणि तिसरे आंतरराष्ट्रीय म्हणजे वैश्विक आहे. आणि हाच महाराष्ट्र धर्म यशवंतरावांना मान्य होता.

यशवंतरावांची यशस्वी वाटचाल आपण सर्वांनीच पाहिली आहे. त्यांचे जीवन 'मैदानी' होते पण नंतरच्या काळात त्यांना जे अपमानित करण्यात आले, ती वेदना आमच्यासारख्या त्यांच्या चाहत्यांसाठी फार दु:खद होती. त्यावेळी आपण त्यांच्या फार जवळ आहोत असे म्हणणारे त्यांचे तथाकथित 'स्नेही' कुठे गेले होते, हे कधीही न सुटणारे कोडेच आहे. ते त्यांचे मित्र नव्हतेच, तर ते त्यांच्या पदांचे मित्र होते. हायकमांडकडे दृष्टी ठेवून राजकारण करणारे ते राजकारणी होते. त्यामुळे वेणूताई गेल्यानंतर स्वजनांच्या गर्दीतही ते एकटेच होते. त्यांना घर होते, पण त्यात 'घरपण' उरले नव्हते. उरली होती फक्त दरबारी कारस्थाने. अमीर, उमराव व नेतृत्व यांना सामान्य माणसापासून सतत वेगळे करण्याचा डाव होता. दरबारी कारस्थाने बुद्धीच्या आवाक्याबाहेरची असतात. त्यात स्नेह व कौटुंबिक भावना यांना स्थान नसते. मग गगनचुंबी इमारती उभ्या राहतात, पण मने व माणसे ठेंगणीच राहतात. रस्ते रूंद होतात, पण मने अरूंदच राहतात. वैभवाकांक्षा वाढते पण अद्वैत, समन्वय, राजकारणनिरपेक्ष स्नेहभाव संपुष्टात येतो.

पुण्याच्या दैनिक प्रभातने त्याच्या कुठल्याशा जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळचे यशवंतरावांचे वर्तमानपत्रांच्या दायित्वाबद्दलचे चिंतन माझ्या आजही स्मरणात आहे. मी त्यावेळी न्यायमूर्ती होतो, तर यशवंतराव कुठल्याही पदावर नव्हते. ते सर्वार्थाने भारताचे स्वतंत्र नागरिक होते. समारंभ संपल्यानंतर पुण्यातील एका हॉटेलच्या गच्चीवर भोजनप्रसंगी आम्ही सोबत होतो. आमच्यात निवांतपणे खूप हृदयस्पर्शी संवाद झाला. मी वकील असताना यशवंतरावांच्या निवडणूक संदर्भात जी केस हरलेल्या उमेदवाराने केली होती, त्यावेळी इतर दोघा ज्येष्ठ वकिलांसोबत मी त्यांचा वकील होतो. न्यायमूर्ती झाल्यावर गाठीभेटी थांबल्या होत्या. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा दिला गेला. अगदी जिव्हाळ्याच्या प्रश्नावर हृदयस्पर्शी बोलणे झाले. त्यावेळी यशवंतरावांचे अस्वस्थ करणारे एकाकीपण प्रकर्षाने जाणवले. भोजनानंतर यशवंतराव लिफ्टमधून खाली गेले. मोटारपर्यंत पोचले. परंतु त्यानंतर आपण काहीतरी विसरलो असे त्यांना वाटले व पुन्हा गच्चीवर आले. माझ्याशी हस्तांदोलन करीत स्नेहभावाने म्हणाले, ''तुमचा व न्यायमूर्तीचा निरोप घ्यायला विसरलो होतो म्हणून पुन:श्च वर आलो.'' न्यायालयीन पदावर असलेल्या व्यक्तीची व पर्यायाने न्यायालयाची प्रतिष्ठा जोपासणारे असे सज्जनशील व्यक्तिमत्त्व फार विरळचं. यशवंतरावांच्या राजकारणाला व व्यक्तित्त्वाला सुसंस्कृतपणाची झालर लागलेली होती.

त्यांचे जीवनदर्शन एका वैचारिक भूमिकेवर आधारलेले होते. ते सदैव गर्दीतच जगले, परंतु त्यांची जीवाभावाची सोबतीण गेल्यानंतर ते राजकारणात कुठल्याही पदावर नव्हते. म्हणून त्यांचे एकाकीपण दूर करण्यास त्यांच्या समवयस्कापैकी कुणीच त्यांची सोबत केली नाही. त्यांच्या मरणानंतर स्मारके उभी राहिलीत. त्यांचे नाव चलनी नाणे झाले. त्यांचेही राजकारण व अर्थकारण झाले. संगमावर सुरेख समाधी उभी राहिली. पण शेवटच्या दिवसात ते एकटेच होते, ही आमच्यासारख्यांची व्यथा आजही कायम आहे. म्हणूनच निग्रो कवयित्री फ्रान्सेस एलन बॅटकिन्स हिच्या कवितेची आठवण येते. त्या गीताचा भावार्थ असा आहे,

खिळून राहतील बघणाऱ्यांच्या नजरा,
सारे स्तंभित होतील,
अशी गर्वोन्नत अन्
भव्य स्मारके नकोत माझी मरणानंतर,
एकच इच्छा, एकच तळमळ,
हृदयी आता दाटुन येते
कुशीत यावे मरण भूमीच्या,
गुलाम कोणी नसतिल तेथे !
यापरते दुसरे मागणे नाही.


सर्व प्रकारच्या म्हणजे राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक, गुलामगिरीपासून मुक्त असा महाराष्ट्र, भारत व समाज यशवंतरावांना अभिप्रेत होता. ते स्वप्न पूर्ण करण्याची शक्ती महाराष्ट्रात नसेल, तर कमीत कमी ते पायदळी तुडवले जाणार नाही याची शाश्वती तरी आपण देऊ शकू का? तसा संकल्प करण्याची शक्ती यशवंतरावजी यांचे चरित्र व चारित्र्य तेसच 'जीवन दर्शन' यातून आपणा सर्वांना लाभो हीच परमेश्वरचरणी धर्माधिकाऱ्याची प्रार्थना आहे.
'शेषम् स्नेहेन पूरयेत/'
(शोध माणसांचा या पुस्तकातून साभार)


  • पद्मभूषण न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी

  • No comments:

    Post a Comment