Thursday, March 22, 2012

मांगल्य आणि विजयाचे प्रतिक म्हणजे गुढी पाडवा


हिंदू धर्मातील एक वर्ष सरते म्हणजे एक शालिवाहन शक संपून दुसरे सुरु होते याच दिवसाला चैत्र शुध्द प्रतिपदा अर्थात ''गुढीपाडवा'' असे म्हणतात. हाच 'गुढीपाडवा' म्हणजे मांगल्य आणि विजयाचे प्रतिक असतो असे म्हटले जाते.

हिंदू धर्मात साडेतीन मुहुर्त सांगितले आहेत. या साडेतीन मुहुर्तापैकी पहिला मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. असाच एक पाडवा असतो तो कार्तिक वद्य प्रतिप्रदेला. परंतु या दिवशी हिंदुस्थानात गुढया उभारत नाहीत. गुढी उभारण्याची परंपरा आपल्या देशात तशी प्राचीन काळापासून म्हणजे रामायणापासून आहे. प्रभू रामचंद्रानी रावणासारख्या अघोरी शक्तीवर विजय मिळवून आपल्या राज्याच्या राजधानीत म्हणजे अयोध्येत सीतेसह प्रवेश केला आणि त्याचा झालेला आनंद सर्वसामान्य जनतेपासून ते राजेरजवाडयांनी आपल्या घरांवर गुढ्या उभारुन साजरा केला.

आता ही गुढी म्हणजे काय ? ब्रह्मध्वज एका उंच बाबूला रेशमी कापड किंवा साडी, कडूनिंब, फुलांचा हार आणि साखरेची माळ बांधून त्यावर तांब्याचा कलश ठेवून तो पाटावर ठेवून उभा केला जातो तिला गुढी असे म्हणतात आणि ती विजयाचे प्रतिक मानली जाते. सायंकाळी तिची विधीवत पूजा करुन उतरविली जाते आणि घरातील लहान मुले त्या साखरेच्या माळेच्या पात्यांसाठी अगदी तुटून पडताना दिसतात. पण ज्या कडूनिंब आणि गुळाचा नैवद्य गुढीला दाखवतात व तो खाल्याने आपल्या शरीरातील उष्णता आणि इतर अनावश्यक पदार्थ बाहेर जाऊन रोग प्रतिबंधक शक्ती निर्माण होण्यास मदत होते.

येत्या शुक्रवारी शालिवाहन शके १९३३ संपून नंदननाम संवत्सराचा म्हणजे १९३४ चा प्रारंभ होत आहे. याच दिवशी युगाब्द ५११४ ची ही सुरुवात होत आहे. दरवर्षी चैत्रशुध्द प्रतिपदेला विश्वनिर्मितीचा वाढदिवसही साजरा केला जातो. प्रत्येक धर्मातील वर्षाचा प्रारंभ होतो. त्याचप्रमाणे हिंदू धर्माच्या वर्षाचा प्रारंभ गुढी पाडव्याला होत असतो. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करण्याची प्रथा या दिवशी आहे. वाईट प्रथांचा त्याग करुन चांगल्या प्रथांची सुरुवात करण्याचा संकल्प या दिवशी केला जातो. या दिवशी पंचागाची पूजा करतात. यंदाचे नंदननाम संवत्सरात एका अधिक मासासह १३ महिने आले आहेत. या नवीन वर्षात १८ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०१२ दरम्यान अधिकमास आहे.

या ऐतिहासिक दिवसाचा महत्वाचा संदर्भ आज आपण विसरलो आहोत. गुढीपाडव्याला आपण ब्रह्मध्वज उभा करुन गुढी उभारुन ही सुंदर सृष्टी निर्माण केल्याबद्दल ब्रह्मदेवाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून ही गुढीची पूजा करतो. या दिवशी शोभा यात्राही काढण्यात येतात. गुढीपाडवा म्हणजे देशासाठी, राज्यासाठी, समाजासाठी, समर्पणाचा, त्याग करण्याचा संकल्प करुन निरोगी समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करु. तसा संकल्पच करु !


  • हेमंतकुमार खैरे

  • No comments:

    Post a Comment