Monday, September 10, 2012

तेजस" चा ठसका मुंबईपर्यंत

आजच्या धावत्या युगात मानवाच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या असून मोठमोठी रेस्टॉरंट, मॉल्समधल्या चटकदार व चटपटीत अशा पदार्थांकडे सर्वांचा ओढा असल्याचे दिसून येते. परंतु या अशा चटपटीत पदार्थांना चटकदार बनवते तो मसाला. या मसाल्यांच्या गुणधर्मामुळे व त्याच्या दर्जामुळे पदार्थांची चव सर्वांच्या जिभेवर रेंगाळत राहते. चवदार मसाले निर्मितीच्या क्षेत्रामध्ये आजघडीला जागतिक स्तरावरील मोठमोठ्या कंपन्यामध्ये स्पर्धा निर्माण झाली असून लोकांच्या मागणी व आवडी, निवडीनुसार या कंपन्या मालाची निर्मिती करुन लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. त्यांच्या मालाची गुणवत्ता व आकर्षक पँकीगमुळे या मालाला बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. या सर्व कंपन्यांच्या स्पर्धेमध्ये ग्रामीण भागातील महिला बचतगट मागे न पडता त्याच तोडीचा व गुणवत्तेचा आणि खवय्यांच्या जिभेला हव्या असलेल्या तसेच गावच्या मसाल्याची आठवण करुन देणाऱ्या उत्पादनांची निर्मिती बीड जिल्ह्यातील 110 बचतगटांच्या महिला "तेजस" या ब्रँडच्या नावाने करत असून या "तेजस"चा ठसका मुंबईपर्यंत पोहोचला आहे.

मागासलेला, ऊसतोड कामगार पुरविणारा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख आहे. अज्ञानामुळे दारिद्रय आणि दारिद्रयामुळे अज्ञान असं दुष्टचक्र पाठीशी कालचक्रासारखं लागलेले. महिलांचे प्रश्न तर अजुनही गंभीर. कोरड्या, ओल्या दुष्काळाला तोंड द्यायचं. एक ना दोन असंख्य समस्यांना तोंड देत कसेबसे जगायचे. सुख, सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा व मान-सन्मान या शब्दांशी दुरान्वये संबंध नसलेल्या महिलाच बहुसंख्य दिसायच्या. अपवाद म्हणून कला-कौशल्यात निपुण, बुद्धीमान स्त्रीया जरी कमी नसल्या तरी सोनं करायला संधी उपलब्ध नसायच्या. काळ बदलत असतो, नव्हे तो बदलला. सबलीकरण, सक्षम, आत्मनिर्भर इत्यादी शब्दांशी महिलांचं नातं जडू लागलं. स्वर्णजयंती ग्रामस्वयंरोजगार योजनेंतर्गत स्वयंसहाय्यता महिला बचतगटाची योजना ही विकासाची गंगा घेऊन दारी आली. या संधीची वाट पाहणाऱ्या महिलांमध्ये मैत्रीपूर्ण हितगुज होऊ लागलं.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यातील 11 तालुक्यात कार्यरत असलेल्या बचतगटापैकी 110 बचतगटांचा समावेश असेले एक तेजस महिला उद्योजकता मंडळ स्थापन करण्यात आले. या मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती तारामती चंद्रसेन लाड या असून याबाबत सांगताना त्या म्हणाल्या की, घरची परिस्थिती जेमतेम व हालाखीची असल्याने कुटुंबाच्या एकूण उत्पन्नावर घर चालविण्यासह मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न नेहमीच भेडसावत होता. त्याचप्रमाणे शिक्षण कमी असल्यामुळे बाहेर नोकरीची संधी नव्हती. कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा यासाठी शिलाई कामातून मिळणाऱ्या मोबदल्यावरही कुटुंबाला मदत होत नव्हती. घरबसल्या काही उद्योग करता येईल का या विंवचनेत असतानाच सुनंदा घोंगडे यांच्याशी माझी भेट झाली आणि तोच दिवस माझ्या आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन आला.

बीड येथील वासनवाडी परिसरातील 10 महिलांना एकत्र करुन जय हनुमान बचतगटाची स्थापन केली. सर्व महिलांनी मिळून दरमहा ठराविक रक्कम बचत म्हणून जमा केली व एक वर्षानंतर आमच्या बचतगटास बँकेकडून 25 हजार रुपयांचे कर्ज प्राप्त झाले. या मिळालेल्या कर्जामधून प्रत्येक महिलेने विविध व्यवसाय यशस्वीपणे सुरु केले. परंतु एवढ्यावर समाधान न मानता मोठा व्यवसाय करण्याच्या शोधात असतानाच मसाला व मिर्ची पावडरची मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून आमच्या गटाला कळविण्यात आले.

मसाला व मिरची पावडर तयार करण्याचे प्रशिक्षण जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये प्रात्यक्षिक करुन दाखविताना कुठल्या प्रकारची मिरची वापरायची, मसाल्यासाठी कोणता घटक किती प्रमाणात घालायचा, तो कोणत्या रंगामध्ये भाजायचा याबाबत सांगण्यात आले. परंतु माल चांगला असून चालत नाही तर त्याला उत्कृष्ट प्रकारची पॅकींगही असणे आवश्यक आहे. यासाठी प्लास्टीक पाऊचच्या पॅकींगची पद्धत, प्लॉस्टीक पाऊचवर बॅच नंबर, मालाची किंमत, माल तयार झालेला दिनांक, बाजारपेठ कशी काबीज करण्याबरोबरच नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर कशा प्रकारे करावा याबाबत सविस्तर माहिती देऊन उत्पादनाच्या गुणवत्तेमध्ये एकसंघता यावर भर देण्यात आला. आमच्या तेजस ब्रँडच्या उत्पादनांची चव देशातील सर्व राज्यामध्ये जावी अशी अपेक्षा अध्यक्षा श्रीमती तारामती लाड यांनी व्यक्त केली.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सहाय्याने तयार करण्यात आलेल्या तेजस या ब्रँडनेमने नोंदणी प्राप्त झाल्यानंतर एकूण 110 महिला बचतगटांनी तयार केलेली मसाला, मिरची पावडर, पापड, शेवया, लोणचे या सारखी उत्पादने दि. 5 जून, 2010 रोजी बाजारामध्ये उपलब्ध करुन देण्यात आली.

तेजस ब्रँडच्या नावाने उत्पादित केलेल्या मालाला स्थानिक बाजारपेठेबरोबर बाहेरील जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. या गटातील महिलांनी उत्पादित केलेला माल औरंगाबाद, लातुर, नांदेडसह मुंबई येथे आयोजित केलेल्या प्रदर्शनामध्ये तेजस ब्रँडची उत्पादने मोठ्या प्रमाणात विक्री झाले. मुंबई येथील प्रदर्शनामध्ये महिलांसह अबालवृद्धांनी या उत्पादनांची चाखलेली चव त्यांच्या जीभेवर कायमस्वरुपी राहिली असून खवय्यांसाठी ही उत्पादने एक पर्वणीच ठरली असल्याची प्रतिक्रिया या प्रदर्शनातून पहावयास मिळाली. मुंबई येथील महिलांनी वर्षातून चार वेळेस तरी तेजस चे उत्पादन प्रर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध करुन द्यावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

स्वयंसहाय्यता महिला बचतगटाच्या योजनेमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासाला जणू प्रगतीचे पंख लाभलेले आहेत. तेजसमुळे जिल्ह्यातील 110 बचतगटातील जवळपास 1100 कुटुंबाच्या उत्पन्नात भर पडली असून त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत झाली आहे. ही बाब निश्चितच वाखाण्याजोगी असून चुल आणि मूल एवढ्या मर्यादित कार्यक्षेत्रात अडकुन पडलेल्या माहिला आता सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे.

या खडतर परंतु प्रेरणादायी प्रवासाची या स्त्रीयांची कथा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. एवढीच या निमित्ताने अपेक्षा

No comments:

Post a Comment