Showing posts with label शेतकरी सातबरा. Show all posts
Showing posts with label शेतकरी सातबरा. Show all posts

Friday, May 11, 2012

कष्टाची द्राक्षे युरोपच्या बाजारपेठेत.

जिद्दीला कष्टाची जोड दिली की प्रत्येक गोष्ट साध्य होते. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा येथील तारामती विठ्ठल थोरात यांचही आयुष्य याच सिद्धांतावर सुरू आहे. जवळपास ५० वर्षे काळ्या आईशी ईमान राखून तिची सेवा त्या करत आहेत. त्याचं फळही त्यांना मिळत आहे. दुष्काळी भागात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य असते. तिथे शेतीची काय अवस्था असेल, याची कल्पना मनाला वेदना देणारी असते. पण, याच दुष्काळी भागात तारामती यांनी पिकवलेली रसाळ आणि गोड द्राक्षे आज युरोपच्या बाजारपेठेत विराजमान झाली आहेत.

तारामती यांचा त्यांच्या बालपणीच विवाह झाला. पती विठ्ठल थोरात यांच्याकडे वडिलोपार्जित १-२ एकर शेती होती. विटा येथून काही अंतरावर असणाऱ्या भांबर्डे या खेड्यामध्ये ही शेती होती. ही शेती कसायचा निर्धार त्यांनी केला. त्यावेळी शेतात जाण्यासाठी पुरेशी साधनेही नव्हती. बऱ्याचदा खूप अंतर चालून जावे लागत असे. पण, परिस्थितीशी झुंजत तारामती यांचे हात धरणी आईची सेवा करण्यासाठी राबायला लागले. धरणीमातेनेही त्यांच्या पदरात चांगल्या पिकाचं दान दिलं. ऊस, ज्वारी, लसूण, कांदा अशी अनेक पिके त्या त्यांची मुले, सुनील आणि चंद्रसेन यांच्या साथीने घेतात. पण, त्यांना आर्थिक यशाचा मार्ग दिला द्राक्षांच्या पिकाने.

सहा वर्षांपूर्वी तारामती यांनी तासेगणेश नावाच्या जातीच्या द्राक्षांची लागवड केली. त्याला शेणखत आणि इतर खते वेळच्या वेळी दिली. तसेच, पिकाला कीड लागू नये म्हणून वेळच्या वेळी रोगप्रतिबंधक औषधांची फवारणीही केली. त्यांच्या या मेहनतीची कल्पना द्राक्षवेलीला लगडलेल्या टपोऱ्या द्राक्षघडांकडे पाहिल्यावर येते. म्हणूनच त्यांच्या या पिकाला युरोपच्या बाजारात चांगली मागणी आहे. गेली चार वर्षे थोरात कुटुंबिय युरोपला द्राक्षमाल निर्यात करत आहे. यावर्षी आतापर्यंत नऊ टन द्राक्ष निर्यात झाल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. शिवाय, अजूनही जवळपास पाच टन उत्पादन अपेक्षित आहे. महाग्रेप्स कंपनीचे दलाल येऊन द्राक्षांची छाटणी, पॅकिंग आणि इतर सर्व जबाबदारी घेतात.

सुरुवातीला एक-दोन एकर इतकी मर्यादित असणारी थोरात कुटुंबियाची शेती आज जवळपास ११ एकर इतकी वाढली आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून विविध प्राणीही थोरात कुटुंबिय पाळतात. यामध्ये म्हशी आणि कुक्कुटपालन यांचा समावेश आहे. शेतीवर आणि या प्राणीमात्रांवर तारामती किती जीवापाड प्रेम करतात, हे त्यांच्या शेतातून फिरताना जाणवते. पती आणि मुलांच्या सहकार्यामुळेच हा पसारा वाढविणे शक्य झाल्याचे तारामती यांनी यावेळी सांगितले.

जिद्द, चिकाटी आणि प्राप्त प्रतिकूल परिस्थितीतून नंदनवन फुलविण्याचे कौशल्य तारामती थोरात यांच्याकडे उपजतच आहे. अत्यंत साधी राहणी, कडक शिस्त, स्वावलंबन, काबाडकष्टाची तयारी, बोलका स्वभाव, समोरच्या माणसाबद्दल असणारी आस्था, त्यातून निर्माण होणारी आत्मीयता यांच्याकडे पुरेपुर आहे. पती विठ्ठल थोरात यांच्या साथीने तारामती यांनी स्वतःच्या जीवनाचा मळा फुलविला आहे. म्हणूनच त्यांच्या गोड आणि रसाळ द्राक्षांच्या रूपाने त्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळाले आहे, असे म्हणायला हरकत नाही.

  • संप्रदा बीडकर, माहिती अधिकारी, उपमाहिती कार्यालय, डहाणू
  • प्रक्रिया उद्योगातून वाढविली शेतीची प्रतिष्ठा

    योग्य नियोजन आणि सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून देखील कधीकधी शेती उत्पादनाला बाजारपेठ व योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्साह कमी होतो. मात्र, त्यावर तोडगा काढून उत्पादनावर प्रक्रिया केल्यास शेतीतून मोठा फायदा होऊ शकतो, हे सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील खवणी येथील प्रवीण भोसले या तरूण शेतकऱ्याने सिद्ध करून दाखविले आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नवी दिशा मिळाली आहे.

    कला शाखेची पदवी घेत असतानाच वयाच्या विसाव्या वर्षी प्रवीण यांनी वडिलोपार्जित शेती व्यवसायात लक्ष द्यायला सुरुवात केली. योग्य नियोजन करून शेती केली तर ती फायद्याची ठरू शकते, हे लक्षात आल्यामुळे नोकरी-उद्योगाच्या मागे न लागता त्यांनी वडील विलास भोसले यांच्यासमवेत शेतीत लक्ष द्यायला सुरूवात केली. त्यांनी आंबा, आवळा, चिकू, लिंबू, डाळींब, सीताफळ अशा फळझाडांची लागवड केली. त्यानंतर जांभूळ, पेरू, मोसंबी व अंजीर या फळांचीही प्रत्येकी एक एकर याप्रमाणे लागवड केली.

    आवळ्याचे उत्पादन सुरू झाले. मात्र बाजारपेठेची हमी नसल्यामुळे पुढे प्रश्न आला. तेव्हा कृषीभूषण वि.ग.राऊळ यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन त्यांनी आवळा लोणचे, आवळा कॅन्डी, आवळा पावडर हे फळप्रक्रिया उद्योग सुरू केले. शिवाय सारे उत्पादन पूर्णपणे सेंद्रीय पद्धतीने करण्यावर भर दिला. २००५ मध्ये पुणे येथे भरलेल्या सेंद्रीय कृषीमाल प्रदर्शनास भेट देऊन तत्कालीन कृषीमंत्री गोविंदराव आदिक यांनी कौतुक केले. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील हे देखील भोसले यांच्या शेतीला आवर्जून भेट देतात.

    उत्पादित झालेल्या आवळ्यापैकी पाच टन आवळे बाजारात विक्रीसाठी पाठविले जातात. तर पाच टन आवळ्यावर प्रक्रिया केली जाते. १५ वर्षाच्या आवळ्याच्या झाडापासून प्रत्येकी १८० ते २०० किलो, केशर आंब्यापासून ५०० ते ७५० फळे मिळतात. तर, १० वर्षाच्या लिंबूच्या झाडापासून वर्षभर प्रत्येक झाडापासून तीन क्विंटल लिंबू मिळतात. तण व कीड नियंत्रणासाठी ते एकात्मिक कीड व्यवस्थापन व नियंत्रणाचा वापर करतात. तर खते व गोमूत्र हे ठिबकद्वारे पिकांना देतात. येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला पूर्ण मार्गदर्शन करण्याचेही काम प्रवीण करतात.

    एकीकडे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत असतानाच, प्रवीण भोसले या तरूण शेतकऱ्याने आपल्या कृतीतून युवकांना शेतीकडे वळण्याचा सल्ला दिला आहे.

    Thursday, May 10, 2012

    कष्टाची द्राक्षे युरोपच्या बाजारपेठेत.

    जिद्दीला कष्टाची जोड दिली की प्रत्येक गोष्ट साध्य होते. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा येथील तारामती विठ्ठल थोरात यांचही आयुष्य याच सिद्धांतावर सुरू आहे. जवळपास ५० वर्षे काळ्या आईशी ईमान राखून तिची सेवा त्या करत आहेत. त्याचं फळही त्यांना मिळत आहे. दुष्काळी भागात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य असते. तिथे शेतीची काय अवस्था असेल, याची कल्पना मनाला वेदना देणारी असते. पण, याच दुष्काळी भागात तारामती यांनी पिकवलेली रसाळ आणि गोड द्राक्षे आज युरोपच्या बाजारपेठेत विराजमान झाली आहेत.

    तारामती यांचा त्यांच्या बालपणीच विवाह झाला. पती विठ्ठल थोरात यांच्याकडे वडिलोपार्जित १-२ एकर शेती होती. विटा येथून काही अंतरावर असणाऱ्या भांबर्डे या खेड्यामध्ये ही शेती होती. ही शेती कसायचा निर्धार त्यांनी केला. त्यावेळी शेतात जाण्यासाठी पुरेशी साधनेही नव्हती. बऱ्याचदा खूप अंतर चालून जावे लागत असे. पण, परिस्थितीशी झुंजत तारामती यांचे हात धरणी आईची सेवा करण्यासाठी राबायला लागले. धरणीमातेनेही त्यांच्या पदरात चांगल्या पिकाचं दान दिलं. ऊस, ज्वारी, लसूण, कांदा अशी अनेक पिके त्या त्यांची मुले, सुनील आणि चंद्रसेन यांच्या साथीने घेतात. पण, त्यांना आर्थिक यशाचा मार्ग दिला द्राक्षांच्या पिकाने.

    सहा वर्षांपूर्वी तारामती यांनी तासेगणेश नावाच्या जातीच्या द्राक्षांची लागवड केली. त्याला शेणखत आणि इतर खते वेळच्या वेळी दिली. तसेच, पिकाला कीड लागू नये म्हणून वेळच्या वेळी रोगप्रतिबंधक औषधांची फवारणीही केली. त्यांच्या या मेहनतीची कल्पना द्राक्षवेलीला लगडलेल्या टपोऱ्या द्राक्षघडांकडे पाहिल्यावर येते. म्हणूनच त्यांच्या या पिकाला युरोपच्या बाजारात चांगली मागणी आहे. गेली चार वर्षे थोरात कुटुंबिय युरोपला द्राक्षमाल निर्यात करत आहे. यावर्षी आतापर्यंत नऊ टन द्राक्ष निर्यात झाल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. शिवाय, अजूनही जवळपास पाच टन उत्पादन अपेक्षित आहे. महाग्रेप्स कंपनीचे दलाल येऊन द्राक्षांची छाटणी, पॅकिंग आणि इतर सर्व जबाबदारी घेतात.

    सुरुवातीला एक-दोन एकर इतकी मर्यादित असणारी थोरात कुटुंबियाची शेती आज जवळपास ११ एकर इतकी वाढली आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून विविध प्राणीही थोरात कुटुंबिय पाळतात. यामध्ये म्हशी आणि कुक्कुटपालन यांचा समावेश आहे. शेतीवर आणि या प्राणीमात्रांवर तारामती किती जीवापाड प्रेम करतात, हे त्यांच्या शेतातून फिरताना जाणवते. पती आणि मुलांच्या सहकार्यामुळेच हा पसारा वाढविणे शक्य झाल्याचे तारामती यांनी यावेळी सांगितले.

    जिद्द, चिकाटी आणि प्राप्त प्रतिकूल परिस्थितीतून नंदनवन फुलविण्याचे कौशल्य तारामती थोरात यांच्याकडे उपजतच आहे. अत्यंत साधी राहणी, कडक शिस्त, स्वावलंबन, काबाडकष्टाची तयारी, बोलका स्वभाव, समोरच्या माणसाबद्दल असणारी आस्था, त्यातून निर्माण होणारी आत्मीयता यांच्याकडे पुरेपुर आहे. पती विठ्ठल थोरात यांच्या साथीने तारामती यांनी स्वतःच्या जीवनाचा मळा फुलविला आहे. म्हणूनच त्यांच्या गोड आणि रसाळ द्राक्षांच्या रूपाने त्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळाले आहे, असे म्हणायला हरकत नाही.

  • संप्रदा बीडकर, माहिती अधिकारी, उपमाहिती कार्यालय, डहाणू
  • Tuesday, April 24, 2012

    'अळू'ने दाखविला शेती उत्पन्नाचा मार्ग

    घराबाहेर किंवा परसबागेत थोडा अळू घरगुती भाजीकरिता लावला जातो. परंतु या अळूची शेतात लागवड करुन शेती उत्पन्नाचा मार्ग शोधून, सासवडचे बाळासाहेब चौखंडे व त्यांच्या पत्नी शंकुतला यांनी यश संपादिले आहे.

    शेतीमध्ये नवे नवे प्रयोग करणारे प्रयोगशील शेतकरी इतरांना मार्गदर्शक ठरतात. असेच पुणे जिल्ह्यातील सासवडचे शेतकरी बाळासाहेब चौखंडे हे आहेत. इतरांना मार्गदर्शन करण्यासाठीही ते नेहमीच तयार असतात. अळूच्या शेतीबाबतही त्यांनी माहिती दिली.

    सासवड शहराच्या कऱ्हा नदीच्या काठाला असलेल्या माझ्या जमिनीत गावाच्या पाण्याचा निचरा होत असल्याने मला केवळ ११ गुंठेच शेती राहिली. या जमिनीत टप्याटप्प्याने अळूची लागवड केली. काही वर्षांपूर्वी खाण्यासाठी अळूच्या पानाची लागवड करावी या उद्देशाने ४० कोंबांची लागवड दोन वाफ्यात केली होती. घरी खाण्यासाठी राहून शिल्लक राहिलेली अळूची पाने सासवडच्या बाजारात विकत असे. पानाचा दर्जा चांगला असल्यामुळे गिऱ्हाईकांची मागणी वाढत गेली. याचा अंदाज घेऊन हळूहळू सर्वच ११ गुंठ्यावर अळूची लागवड करण्याचा मी निर्णय घेतला. मी स्वत: अपंग आहे. त्यामुळे माझी आई दगडाबाई व पत्नी शंकुतला यांच्या मदतीने अळूची लागवड केली.

    साताराहून आणलेल्या अळूची वैशिष्ट्ये अशी की ती चवदार आहे. त्याचबरोबर ती घशात खाजत नाही. अळूच्या वड्यासाठी तेल व पीठ कमी लागते. पानांचा दांडा हिरवा नव्हे तर जांभळा असून पानाचा आकार बदामी आहे. या कारणामुळे या अळूला बाजारात मागणी आहे.

    अळू लावण्यापूर्वी नांगरट करुन रान तापू दिले. शेणखत, कंपोस्ट खत टाकले. बाकी औषध व फवारण्या टाळल्या कारण या अळूला रोग-कीड नाही. अकरा गुंठ्याच्या शेताचे तीन भाग केले. त्यातील एका भागातील अळूच्या पिकाची फेरपालट करतो. म्हणजे मशागत करुन रान तापू देऊन पावसाळ्याच्या तोंडावर पुन्हा पीक लावले जाते. त्यामुळे ते पीक जोमदार येते.

    थंडीच्या पडत्या काळात रोज दीडशे ते दोनशे गड्ड्या सापडतात. एका गड्‌ड्यात पाच पाने असतात तर पावसाळा हा सर्वात अधिक उत्पादन देणारा असतो. या काळात सातशे ते हजार गड्ड्या सापडतात. उन्हाळ्यात २५० ते ३०० गड्डी सापडते. साधारणपणे वर्षभरात ९०,००० गड्डी सापडते. अळू विक्रीतून खर्च वगळता साधारणपणे महिन्याला १० ते १२ हजारापर्यंत उत्पन्न मिळते. आता अळूची शेती हा आमचा आधार बनला आहे, बाळासाहेब अभिमानाने सांगतात.

    शासनाच्या कृषी विभागाकडे अनुदानासाठी प्रस्ताव पाठविला आहे. शेडनेटसाठी सावसवडच्या स्टेट बँकेने १ लाख ३० हजारांचे कर्ज दिले. याचाही उपयोग शेती यशस्वी होण्यासाठी झाला आहे.

    कमी पाणी, कमी शेती असली तरी कल्पकतेने शेती केल्यास यश मिळतेच. फक्त कठोर परिश्रम आणि प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

    Wednesday, April 18, 2012

    मेळघाटमध्ये सेंद्रीय शेतीतून भरघोस उत्पादन

    चिखलदरा तालुक्‍यातील सोमवारखेडा, वस्तापूर, कुलंगणा (खुर्द) कुलंगणा बुजरूक या चार गावातील अनेक शेतकरी सेंद्रीय पद्धतीचा अवलंब करून शेती करीत आहेत. शेतीत लागणारे बी-बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके यांच्यामुळे होणारी हानी आणि महागाईमुळे येणारा कर्जबाजारीपणा या बाबी लक्षात आल्यावर सेंद्रीय पद्धतीने शेती केल्याशिवाय विकास साध्य होणार नाही हे शेतकऱ्यांना कळून चुकले आहे. जीवन विकास संस्था यासाठी त्यांना मार्गदर्शन करीत आहे.

    शेतकऱ्यांनी खरीप हंगामात सोयाबीन, मूग, उडीद, मिरची, ज्‍वारी, भुईमूग यांचे सेंद्रीय पद्धतीने चांगले उत्पादन घेतले आहे. त्याचप्रमाणे रब्बी हंगामात सुद्धा गहू व चना यांचेही भरघोस उत्पादन मिळण्याची त्यांना अपेक्षा आहे. हे पीक घेत असताना शेतकरी बियाण्यांचा उपयोग म्हणून शक्यतो स्वत: जवळील बियाणे वापरतात. तसेच सेंद्रीय खत व औषधी म्हणून दशपर्णी अर्क, जीवामृत, निंबोळी अर्क, शेणखत, गांडूळ खत याचा वापर करतात. कोणत्याही पद्धतीचे रासायनिक खत वा कीटकनाशकांचा वापर होत नाही. त्यामुळे सेंद्रीय शेतीतून अतिशय कमी खर्चात चांगल्या पद्धतीने पीक घेतले जात असल्याचे दिसून येत आहे.

    लोकांना विषमुक्त अन्न देणे हे उदिष्ट शेतकऱ्यांनी समोर ठेवले आहे. विषमुक्‍त अन्नासोबतच फळे आणि पालेभाज्यांची लागवडसुद्धा सुरू केलेली आहे. इतरांनी देखील या पद्धतीने पिकांची, फळझाडांची, पालेभाज्यांची लागवड करावी, यासाठी मार्गदर्शन करण्याचे कार्य सुद्धा हे शेतकरी आता करीत आहेत.

    सेंद्रीय पद्धतीने कमी खर्चात चांगले उत्पादन होत असताना पाहून त्या परिसरामधील अनेक शेतकऱ्यांनी पुढील वर्षी सेंद्रीय पद्धतीने शेती करण्याचे ठरविले आहे. विषारी खत व औषधाचा वापर न करता ते शेती करणार आहेत. शेतकऱ्‍यांना सेंद्रीय पद्धतीने शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता जीवन विकास संस्थेचे कार्यकारी संचालक फादर जॉली, सहाय्यक कार्यकारी संचालक फादर बेंजामिन, सागर कन्हेरे, ओमप्रकाश सुखदेवे, अतुल गवई, साधुराम खडके आदी प्रयत्न करीत आहे.

    आंतरपिकाने फुलविला शेतमळा

    ‘शेतीला लळा लावल्याशिवाय मळा पिकत नाही’, असे म्हणतात. ही बाब सत्यात उतरवून दाखविली आहे यवतमाळ जिल्ह्यातील मुळावा येथील प्रयोगशील शेतकरी अमोल विजय डुब्बेवार यांनी. जिद्द आणि चिकाटीला श्रमाची जोड देऊन डुब्बेवार यांनी उसात बटाट्याचे आंतरपिक घेऊन तीन महिन्यात एकरी ६२ हजार रुपयांचा नफा मिळविला आहे.

    डुब्बेवार यांच्याकडे फक्त ११ एकर जमीन आहे. माळरानाजवळ असलेली त्यांची जमीन प्रथम त्यांनी सपाटीकरण केली व त्यानंतर पाण्याची व्यवस्था करुन घेतली. या शेतीमध्ये ते दरवर्षी वेगवेगळी पिके घेतात.

    यावर्षी त्यांनी एक एकर शेतात उसाची लागवड केली. तीन फुटाचा सरा पाडून ऊस लागवड केल्यानंतर दुसऱ्या महिन्यात उसात आंतरपिक म्हणून बटाट्याची लागवड केली. या भागात कुणी बटाट्याचे पीक घेत नाही. परंतू त्यांनी पुणे जिल्ह्यातील मंचर येथून पाच क्विंटल बटाट्याचे बियाणे आणले. वरंब्यावर ४ ते ६ इंच अंतरावर लागवड केली. लागवडीपूर्वी सुपर फॉस्फेट पाच पोते, म्यूरेट ऑफ पोटॅश दोन पोते व डीएपी दोन पोते खत दिले. त्याचप्रमाणे शॅनाकार या तणनाशकाची फवारणी केली. लागवड करताना अविष्कार (टॉनिक) व बावीस्टीनच्या द्रावणात बूडवून बीज प्रक्रिया केली. या पिकावर थ्रिप्स व तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होता. त्यामुळे ॲसीशमाप्रीड, लम्डा, सायक्लेत्रीन या कीटकनाशकासोबत रोको, एम ४५, अविष्कार याच्या आलटून पालटून फवारण्या केल्या.

    डुब्बेवार यांनी वेअर हाऊस बांधले आहे. उत्पादन क्षमतेसोबतच योग्य भाव मिळण्यासाठी वेअर हाऊसची गरज असल्याचे ते सांगतात. बटाट्याचे आंतरपिक घेण्यासाठी वसंत बायोटेकचे प्रा.गोविंद फुके यांचे मार्गदर्शन त्यांनी घेतले. १ एकर क्षेत्रातून त्यांना ११० क्विंटल बटाट्याचे उत्पादन मिळाले. साधारणत: ७ रुपये किलो भावाप्रमाणे ७७ हजार रुपयांचे उत्पादन झाले. यासाठी १५ हजार रुपये खर्च झाला. खर्च वजा जाता त्यांना एकूण ६२ हजार रुपये निव्वळ नफा मिळाला आहे. त्यांच्या या प्रयोगाचे व मिळालेल्या नफ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

  • अनिल आलुरकर

  • Saturday, March 3, 2012

    हिरव्या आईची माया..

    'वानरांचा त्रास होतो पर आम्ही मिळून चांगलं पीक काढलं' गुहागर तालुक्यातील वाघजाई महिला बचतगटाच्या कमल ठोंबरे समाधानाने सांगत होत्या. सभोवताली शेतात सर्वत्र महिला काम करताना दिसत होत्या. पुरुष गडी विरहित शेत पाहून थोडे आश्चर्य वाटले. मात्र केवळ याच वर्षी नव्हे तर २००७ पासून या महिलांनी शेत पिकविण्याची करामत केल्याची माहिती मिळाली.

    भुईमुगाच्या शेतीपासून सुरुवात करणाऱ्या खालच्या ठोंबरेवाडीतील या बचतगटाने इतर तीन गटांना सोबत घेतले. सरस्वती, सह्याद्री आणि समृद्धी गटाच्या सहकार्याने महिलांनी शेती करण्यास सुरुवात केली. वासंती गिजे आणि सुमिता माने या दोघींनी महिलांना एकत्रित करण्यात महत्वाची भूमिका अदा केली. ग्रामपंचायतीचे सहकार्य मिळाल्याने महिलांचा उत्साह वाढला. १०० कुटुंबाच्या या वाडीत ६० महिला बचतगटाच्या माध्यमातून शेती करू लागल्या.

    पहिल्या वर्षी ७० ते ८० हजारांचा फायदा झाल्याने गटाने बँकेकडून साडेचार लाखांचे कर्ज मंजूर करून घेतले. त्यापैकी आतापर्यंत केवळ दीड लाखांची उचल केली असून ७० हजारांची परतफेडही केली आहे. गटाने एक एकर क्षेत्रात चवळी आणि तूर तर एक एकर क्षेत्रात कलिंगड लावला आहे. शेतात भातशेती नंतर विविध प्रकारच्या भाज्या पिकवून त्यांची विक्री या महिला स्वत: गावोगाव जाऊन करतात. त्यामुळे चांगला लाभ मिळत असल्याचे या महिलांनी सांगितले.

    शेतीचे प्लॉट दोन वेगवेगळ्या ठिकाणी असूनही कामाचे उत्तम नियोजन या महिला करतात. शिमगोत्सवाच्या वेळी कलिंगडापासून अधिक उत्पन्न मिळेल, असा विश्वासही या महिलांनी व्यक्त केला. महिलांनी शेतीच्या यशात सातत्य ठेवल्याने त्यांना २०१०-११ या वर्षासाठी तालुका स्तरावरील राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरुषांचे वर्चस्व असलेल्या शेतीसारख्या क्षेत्रात महिलांनी मिळविलेले यश कौतुकास्पद असेच आहे. या यशाविषयी प्रतिक्रिया देताना एका सदस्याने 'हिरव्या आईची माया..' एवढे मोजके शब्द उच्चारले. लालसर मातीवर हिरवे स्वप्न फुलविण्यासाठी या महिलांनी घेतलेल्या कष्टाला मिळालेले हे फळ आहे. परिसरातील महिलांना कार्याची प्रेरणा देणारा हा बचतगट यशाच्या दिशेने एकेक पाऊल पुढे जात आहे.

  • डॉ.किरण मोघे
  • Tuesday, January 3, 2012

    शेतात उमलले समृध्‍दीचे फूल !

    लहरी निसर्गावर अवलंबून राहत कापूस आणि सोयाबीन यांची परंपरागत शेती करण्‍यापेक्षा फूलशेतीचा वेगळा पर्याय निवडणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत नाही. ती शेती फायद्याची ठरते, असे यशस्‍वी प्रयोगाअंती वर्धा जिल्‍ह्यामधील सेलू तालुक्‍यातील वाहिदपूर गावच्‍या संजय अवचट यांनी दाखवून दिले आहे. 

    श्री. अवचट हे पॉलिहाऊस उभारुन तेथे जरबेरा या जातीच्या फुलाचे उत्पादन घेत आहेत. त्यांनी सेलूच्या बँक ऑफ इंडियाकडून ९.७५ लक्ष रुपयांचे कर्ज घेतले. त्यामध्ये अनुदान ३.१५ लक्ष रुपये मिळाले. एकूण १३ लक्ष १२ हजार रुपयांमध्ये पॉलिहाऊसची उभारणी करण्यात आली. या पॉलिहाऊसचे आकारमान ३६ × २८ चौ.मी. असून जरबेरा जातीच्या फोर्जा, बॅलेट, प्राईम रोज, गोलीमय, दाना ऐलीन, इन्सरन्स मनीबलू या फुलांचे उत्पादन घेण्यात येते. 

    झाडांची लागवड ऑगस्‍ट २०११ मध्ये करण्यात आली. मात्र फुलांच्या उत्पादनाला २ नोव्हेंबर २०११ पासून सुरुवात झाली. आतापर्यंत २७ हजार १६० उत्पादित फुलांची विक्री करण्यात आली आहे. या विक्रीपासून श्री. अवचट यांना १ लक्ष ५१ हजार ९२ रुपये एवढी रक्कम मिळाली. आतापर्यंत फुलाच्या उत्पादनावर ६२ हजार रुपये खर्च झाला असून निव्वळ नफा ८९ हजार ९२ रुपये झाला आहे. येत्या काळात प्रत्येक महिन्याला सरासरी ३० हजार फुलांचे उत्पादन अपेक्षित असून प्रत्येक फूल ३ रुपये प्रमाणे विकल्यास ९० हजार रुपये प्रत्यक्षात उत्पन्न होऊ शकते.

    एका वर्षाचा ताळमेळ सांगताना अवचट म्हणाले, १० लक्ष ८० हजार रुपये फुलांची विक्री होणार असून ४ लक्ष ५६ हजार रुपये खर्च वजा जाता ६ लक्ष २४ हजार रुपये नफा मिळू शकतो. यावेळी त्यांनी स्वत:चे शेड्यूल, ड्रेनचीग व किटक नाशके व बुरशी नाशक फवारणीची महिती सांगितली.

    या फुलांची हैद्राबाद व बंगलुरू या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ आहे. या बाजारपेठांत फुले पोहचविण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना केल्यास शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळू शकतो. मात्र फुल उत्पादन मोठ्या प्रमाणावर आवश्यक आहे. फुलांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाल्यास वाहतुकीचा खर्च अल्प प्रमाणात येऊ शकेल. कदाचित फुलांचे व्यापारी सुध्दा शेतकऱ्यांच्या शेतात येऊन फुले खरेदी करु शकतील. त्यादृष्टीने आता या भागातील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. 

    नागपूर बाजारपेठेत इव्हेंट, मॉल व सणासुदीच्या दिवसाचे महत्त्व ओळखून फुलांची विक्री केली पाहिजे. शेतकऱ्यांनी परंपरागत शेतीला फाटा देऊन नाविण्यपूर्ण शेती करुन आर्थिक समृध्दी साधावी, अशी वेळ आता आली आहे.

  • मिलिंद आवळे
  • शेतात उमलले समृध्‍दीचे फूल !

  • Thursday, September 8, 2011

    रावडीखुर्दच्या शेतकऱ्याने फुलवली फळबाग

    सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील रावडी खुर्द येथील गोविंद गणपत रायकर या शेतकऱ्याने ओसाड असणाऱ्या नऊ एकर क्षेत्रात अथक कष्ट, जिद्द आणि कृषी विभागाच्या सहाय्याने फळबाग लागवडीचा यशस्वी प्रयोग करुन अन्य शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.

    गोविंद रायकर यांनी रावडी खुर्द येथील त्यांच्या ओसाड शेतील कष्टातून नवनवे प्रयोग करण्याचा संकल्प केला. परंतु थोड्याच दिवसांत त्यांच्या लक्षात आले की, या क्षेत्रात साधे गवतही उगवू शकत नाही, एवढे तेथे चुनखडीचे प्रमाण आहे. माती परीक्षण अहवाल तर हे क्षेत्र पिकविण्यायोग्य नाही असाच होता. त्यानंतर दहा वर्षे हे शेत पडून होते. मात्र, म्हणून हे क्षेत्र पिकविण्याच्या विचारापासून रायकर अजिबात बाजूला गेलेले नव्हते. विविध माध्यमातून या विषयावर संवाद साधत हे क्षेत्र हाताखाली आणण्याची त्यांची धडपड सुरूच होती. त्यातूनच त्यांना ही क्षारपड शेती पिकविण्याची दिशा मिळाली. मात्र हे क्षेत्र हाताखाली आणण्यासाठी त्यांची तीन वर्षे खर्ची पडली. आज अनेक अडचणींवर मात करीत या शेतीत फळपिके उभी केली आहेत व ती चांगल्या स्थितीत आहेत.

    रायकर हे सोलापूर महानगरपालिकेत प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहात आहेत. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या रायकर यांनी पदव्युत्तर शिक्षणानंतर एलएलबी व एमएसडब्लू या पदव्याही प्राप्त केल्या. त्यांच्या कुटुंबात त्या वेळी ते एकटेच शिकलेले होते, तरी सुध्दा त्यांनी शेतीची आवड कायम जपलेली आहे. ते विद्यार्थीदशेत असताना त्यांनी शेतात २०० नारळाची झाडे लावलेली होती. आता त्यांच्या शेतात चिंच पाच एकर, जांभूळ दीड एकर, चिक्कू एक एकर, पेरू तीन एकर (चिंचेत आंतरपीक) आवळा दीड एकर अशा एकूण नऊ एकर क्षेत्रात या फळपिकांची ६२० झाडे उभी आहेत.

    नैसर्गिकरीत्या ही पिके उभी राहणे अशक्य असल्याने त्यांनी काही शास्त्रीय माहितीचा आधार घेत व स्वत: काही धाडसी निर्णय घेत का होईना ही पिके उभी करण्यात यश मिळविले आहे. सात वर्षापूर्वी सुरूवातीला त्यांनी एक एकर क्षेत्रावर चिंच घेण्याचा निर्णय घेतला. त्या पिकाच्या चांगल्या स्थितीच्या अनुभवानंतर एक एक करत त्यांनी इतरही फळपिके उभी केली. त्यासाठी त्यांनी पूर्णत: कलमी रोपे वापरली.

    जमिनीत काढलेल्या खड्ड्यात काही प्रमाणात मुरूम, तर वरच्या बाजूला तलावातून आणलेली माती भरली. शेणखतावर रोगप्रतिबंधक औषधांचा वापर केला व त्यानंतर या रोपाची लागवड केली. सध्या त्यांच्या या क्षेत्रात चिंचेची २००, आवळा १००, जांभूळ ८०, पेरू १२०, चिक्कू ४०, जांभूळ ८० अशी एकूण ६२० फळझाडांची संख्या आहे.

    हे उभे करण्याकरीता त्यांना शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजनेचा फायदा झालेला आहे. त्याचबरोबर तालुका कृषी अधिकारी नितीन फुलसुंदर, मंडल कृषी अधिकारी अनिल दुरगुडे, कृषी पर्यवेक्षक सुनील घनवट, विकास भोसले, कृषी सहायक आर.एम. पालवे, मीनल भंडलकर यांचे सततचे मार्गदर्शन उपयोगी पडत गेले आहे. रायकर नोकरीनिमित्त सतत बाहेर असल्यामुळे त्यांना या कामात त्यांच्या पत्नी सौ. कमल यांचीही मोलाची मदत मिळते. पिकांसाठी त्यांनी ठिबक सिंचनाची सोय केलेली आहे. झाडांच्या पाल्यामुळे आपोआपच कंपोस्ट खत तयार होते. दरवर्षी झाडांभोवती रिंग घेत असताना उकरलेल्या मातीच्या जागी नवीन मातीची भर ते टाकत आहेत. तीन एकर चिंचेमध्ये नुकतीच १२० पेरूच्या रोपांची लागवड केलेली आहे.

    प्रत्येक वर्षी दोन एकर क्षेत्र या फळबागेखाली वाढविण्याचा त्यांचा निर्णय आहे. औषधे व आंतरमशागती व मजुरीचा खर्च नसल्याने सुरुवातीची तीन वर्षे कष्ट घेतले की, पुढच्या पिढीला उत्पन्नाची एक सोय होऊन जाते, अशा भावना श्री. रायकर व्यक्त करतात.

    Tuesday, September 6, 2011

    मत्स्यबीजोत्पादनात सातारा आघाडीवर..

    सातारा जिल्ह्याने मत्स्यबीजोत्पादनात पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये आघाडी घेतली आहे. मार्च अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात ३ कोटी १२ लाख मत्स्यबीजांचे उत्पादन केवळ सातारा जिल्हयात झाले असून, ३०० मे.टन मत्स्योत्पादन करण्यात आले आहे. मत्स्योत्पादनामुळे १९ लाख ६० हजार ६२८ रुपयांचा महसूल जिल्हयाला मिळाला आहे.

    पावसाळ्यात जून-जूलै महिना माशांच्या प्रजोत्पादनाचा (ब्रिडिंग) हंगात आहे. जिल्ह्यातील धोम मत्स्यबीज केंद्रात मत्स्य विभागाच्या वतीने माशांना इंजेक्शन देण्यात येते. त्यानंतर हे मासे अंडी घालतात व त्यापासून तयार होणारी मत्स्यबीजे धरून ती धोम तलावात साठवून त्यापासून बोटुकली व मत्स्योत्पादन घेतले जाते. धोम धरणाजवळील या मत्स्यबीज केंद्रात वर्षभरात ३ कोटी १२ लाख मत्स्यबीजांचे उत्पादन झाले असून, १० लाख ५७ हजार ९३८ रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. सन २००९-१० मध्ये ८ लाख ६६ हजार एवढा महसूल मिळाला होता. जिल्ह्यातील तलावाच्या ठेक्याद्वारे ८ लाख ६२ हजार ७२१ रूपये, मासेमारी परवान्याद्वारे २८०० रूपये व इतर ३६ हजार रूपये असे मिळून एकूण १९ लाख ६० हजार ६२८ इतका महसूल वर्षभरात प्राप्त झाला.

    जिल्ह्यात मत्स्य संवर्धनास योग्य असलेल्या जलक्षेत्रात मत्स्यशेती करून गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादन वाढविण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाकडून जलद वाढणाऱ्या जातीचे मत्स्यबीज धोम केंद्रात स्थानिकरीत्या निर्माण करण्यात येते व ते मत्स्य संवर्धकांना पुरविण्यात येते. या ठिकाणी मत्स्यबीजाबरोबरच कोळंबी बीजही संचयन करण्यात येते. वर्षभरात ३ हजार रुपये खर्च करून ३०० मे.टन मत्स्योत्पादन व १ लाख ४२ हजार मत्स्यबीज संचयन करण्यात आले आहे. खटाव तालुक्यातील राजेवाडी मत्स्यबीज संवर्धन केंद्रामध्ये १० संवर्धन तळी तयार करण्यात आली असून, धोम मत्स्यबीज उत्पादन केंद्रातील प्रमुख कार्य मत्स्यजिरे खरेदी करून त्याचे या ठिकाणी संवर्धन करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे.

    राजेवाडी तलावात सन २००९-१० मध्ये ३० लाख मत्स्यजिरे संवर्धन करून ४ लाख २१ हजार अर्धबोटुकली प्राप्त झाली. त्याद्वारे ८४ हजार ४१० रुपयांचा महसूल मिळाला. ही अर्धबोटुकली ११ पाटबंधारे तलावातील मत्स्योत्पादनासाठी १० मच्छीमार सहकारी संस्थांना वितरित करण्यात आले. सन २०१०-११ मध्ये ३० लाख मत्स्यजिरे धोम व उजनी केंद्र येथून आणून त्याचे संवर्धन करण्यात आले व ९ लाख २० हजार मत्स्यबीज पुरवठा करण्यात आला.

    त्याद्वारे १ लाख ४० हजार ४०० रुपयांचा महसूल जमा झाला आहे. भणंग येथील कृत्रिम तळ्यात शासनामार्फत भंडारा जिल्ह्यातील शिवणी बांध केंद्रातून २० लाख सायप्रिनस मत्स्यजिरे आयात करून संवर्धन करून विक्रीद्वारे १ लाख ५८ हजार ६८० रुपंयांचे उत्पन्न मिळाले.मच्छीमारांना किफायतशीर मासेमारी व्यवसायासाठी चांगली जाळी तयार करण्यासाठी २ हजार ७०३ किलो नायलॉन सूत खरेदीसाठी सर्वसाधारण योजना व विशेष घटक योजनांद्वारे ४ लाखांचा अर्थपुरवठा करण्यात आला आहे. जिल्ह्यात ६६ सहकारी मच्छीमार संस्था व एक मच्छीमार सहकारी संघ कार्यरत आहे. त्यांच्या बळकटीकरणास शासनाने प्राधान्य दिले आहे.

    Wednesday, August 31, 2011

    बचतीचा आधार

    रत्नागिरी जिल्ह्यात लांजा तालुक्यातील वेरळ गावातील बहुतेक महिला बचत गटाच्या माध्यमातून संघटीत झाल्या आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बचत गट चळवळ या भागात चांगली रूजली आहे. अल्पशा बचतीतून आपल्या बचत गटाची उभारणी करणाऱ्या महिलांनी आता मोठ्या व्यवसायाकडे झेप घेण्यास सुरूवात केली आहे.

    मुंबई-गोवा महामार्गावरील वेरळ गावात बौद्धवाडीतील महिलांना २००६ पूर्वी व्यवसाय किंवा बँक व्यवहाराची माहिती देखील नव्हती. किबहुना आपण असं काही करू शकू असेही त्यांना वाटत नव्हते. मात्र माविमच्या सहयोगिनी समृद्धी विचारे यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे या महिला एकत्र आल्या आणि गावात एकाच वेळी सहा-सात बचत गट सुरू झाले. त्यापैकी सावित्रीबाई आणि शिल बचत गटांनी एकत्रितपणे व्यवहार करण्यास सुरूवात केली.

    बौद्धवाडीतील सुवर्णा जाधव या महिलेने गावातील इतर महिलांना एकत्रित येण्याचे महत्व सांगितले. या दोन्ही बचत गटात प्रत्येकी १३ सदस्य आहेत. बचत गटातील सदस्यांनी मासिक वीस रुपयांनी बचतीला सुरूवात केली. 'दुसऱ्याकडून १० टक्क्यांनी कर्ज घेण्यापेक्षा स्वत:च्या गटातील २ टक्क्यांनी हक्काचे कर्ज भेटतयं' सुवर्णाताईंनी गटाच्या स्थापनेमागची कल्पना स्पष्ट करताना सांगितले. गटाला सुरुवातीला वैनगंगा सहकारी बँकेकडून १३ हजार रुपयाचे कर्ज मिळाले.

    गटातील महिलांना व्यवसायाच्या व्यवस्थापनाचे आणि उत्पादनाचे प्रशिक्षण माविमतर्फे देण्यात आले. त्याचा फायदा या महिलांना झाला. अंतर्गत कर्जासाठी गटाचे व्यवहार चालविण्यापेक्षा व्यवसाय केल्यास दोन पैसे अधिक मिळतील या विचाराने या महिलांनी घरच्या घरी उदबत्ती, फिनाईल, मेणबत्ती आदी वस्तू तयार करून जवळच्या बाजारात विकण्यास सुरूवात केली. सुरुवातीला सरळ बाजारात जाणे या महिलांना अवघड वाटायचे. बैठकीच्या निमित्ताने पंचायत समिती, ग्रामपंचायत आदी ठिकाणी ग्राहक मिळविण्यास सुरूवात झाली.आत्मविश्वास वाढल्यावर विक्री वाढविण्यासाठी बाजाराच्या ठिकाणीदेखील गेल्याचे शर्मिला जाधव यांनी सांगितले.

    गणपतीपुळे येथील प्रदर्शनात चांगली विक्री झाल्याने महिलांचा विश्वास दुणावला. सहयोगिनींच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि मार्गदर्शन सुरूच होते. गतवर्षी गटाला ५० हजाराचे कर्ज मिळाले. त्यातून महिलांनी कुक्कुट पालन व्यवसाय सुरू केला. काही महिलांनी घरच्या घरी तर काहिंनी एकत्रितपणे शेड बांधून व्यवसायाला सुरूवात केली. कोंबडी पालनाचे सर्व तंत्र या महिलांना अवगत झाले आहे. कर्ज फेडत असताना घरखर्चाला दोन पैसे हाती पडत असल्याने हा व्यवसाय पुढे नेण्यासाठी या महिला गांभिर्याने लक्ष घालत आहेत. फारशी चांगली आर्थिक पार्श्वभूमी नसल्याने व्यवसायात रिस्क न घेता आहे ते कर्ज फेडून व्यवसाय मोठा करण्याचा निश्चय या महिलांनी केला आहे.

    गावातील इतर बचत गटांना मार्गदर्शन करतानाच गावातील सामाजिक कार्यातही या महिलांचा सहभाग वाढला आहे. बचत गटामुळे बाहेर पडता आलं अन् आत्मविश्वासही मिळाल्याचे या महिला सांगतात. पारंपरिक पद्धतीने कष्ट करून जीवन जगण्यापेक्षा नवे आव्हान स्विकारून स्वत:च्या व्यवसायासाठी प्रयत्न करण्याच्या विचाराने या दोन्ही गटांची परस्पर सहकार्याने यशस्वी वाटचाल सुरू आहे.