Showing posts with label महिला बचतगट उद्योग. Show all posts
Showing posts with label महिला बचतगट उद्योग. Show all posts

Monday, July 22, 2013

स्वावलंबन

‘चूल आणि मूल’ ह्या बंधनातून बाहेर पडलेल्या स्त्री ने आता घर आणि व्यवसाय ह्या दोन्ही बाबी उत्कृष्टपणे सांभाळण्यात यश मिळविले आहे. उद्योग, व्यवसाय शिक्षण या क्षेत्रातील सर्व यशाची शिखरे महिलांनी सर केली आहेत. आता तर शासनही विविध स्तरावर स्त्रियांच्या आर्थिक विकासासाठी विविध योजनांमधून मदत करीत आहे. बचत गटाच्या माध्यमातूनही महिलांना रोजगार उपलब्ध करण्यात येत आहे.

गोंदिया येथील महिला बचत गटाच्या सदस्यांनी गृहोपयोगी वस्तू तयार करुन महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करुन दिला आहे. गोंदिया जिल्हा हा अतिदुर्गम व नक्षलप्रभावित जिल्हा असल्यामुळे शैक्षणिक बाबतीत फारसा विकास येथे झाला नाही. धानाचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण बघता या भागात उद्योग व व्यवसायाला बराच वाव आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता येथील महिला पूढे सरसावल्या व त्यांनी आपली आर्थिक परिस्थिती उंचावण्याचा निर्धार केला. त्याचेच फलित म्हणजे गोंदियातील रेलटोली, लाला लजपतरॉय वॉर्डातील बचतगटाच्या महिलांनी गृहउद्योग उभारुन विविध वस्तूंची निर्मिती केली. बाजारपेठेत भरपूर प्रमाणात मागणी असलेले फिनाईल, हार्पीक, भांडे धुण्याचे लिक्वीड, वॉशिंग पावडर या उत्पादनाची निर्मिती केली. त्यामुळे असंख्य महिलांना रोजगार मिळाला.

या बचतगटातील महिला सदस्यांना लघु उद्योगाकरता प्रशिक्षण देण्यात आले. त्यामुळे असंख्य महिला बचत गटातील महिलांनी स्वबळावर उद्योग सुरु केले आहेत. शासनाच्या वतीने दारिद्ररेषेखालील महिला बचत गटांना विशेष सुविधा दिल्या जात आहे. प्रशासन, नगर परिषद व विविध बँकाच्या माध्यमातून महिला बचत गटांना कर्ज दिले जाते. गृहोउद्योगामध्ये विविध व वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थ बनविणे, कलाकुसरीचे कामे, हस्त कौशल्य, विविध शोभेच्या वस्तू बनविण्याचे त्याचप्रमाणे शिवणकाम, पाककला इत्यादींचे प्रशिक्षणही महिलांना दिले जाते.

जिल्हा ग्रामीण विकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात 7 हजार 896 बचत गट असून यापैकी 5 हजार 321 बचतगट कर्ज व शासनाच्या निधी मिळविण्याकरीता पात्र ठरले आहे. 4930 बचत गटांना कर्जाचे वाटप झाले असून 2 हजार 657 बचतगटाच्या कर्जाचे प्रस्तावदेखील तयार करण्यात आले आहे. 959 बचतगटाच्या कर्जाची प्रकरणे बँकानी मंजूर केली आहे आणि त्या बचत गटाच्या सदस्यांना लघूउद्योगाकरीता प्रशिक्षणही देण्यात येत आहे. प्रशासन व बँकेच्या सहकार्याने बचतगटात सहभागी होणाऱ्या स्त्रीयांचा आत्मविश्वास तर दुणावलाच पण आर्थिक स्तरही उंचावला.

Saturday, March 30, 2013

बचतगटाने साकारला सिएफएल बल्ब निर्मीतीचा उद्योग

बचतगटाच्या महिला उद्योग स्थापनेत मोठ्या प्रमाणावर पुढे येत असून पारंपारीक गृह उद्योगांपलीकडे महिला झेप घेत आहे. पारंपारीक घरगुती खाद्यपदार्थ्यांच्या पुढे जावून पुरुषांच्या बरोबरीने महिला उद्योगांची कास धरीत आहे.

यवतमाळ शहरालगत असलेल्या उमरसरा येथील एका बचतगटाने तर सिएफएल बल्ब निर्मीतीचा उद्योग सुरु केला आहे. या बचतगटाच्या महिला केवळ उद्योग स्थापन करुन थांबल्या नाहीत तर या उद्योगात त्यांनी नेत्रदिपक प्रगती करुन इतर महिलांसाठी आदर्श निर्माण केला आहे.

क्रांतीजोती सावित्रिबाई फुले महिला बचतगट असे गटाचे नाव असून पाच वर्षापूर्वी 10 महिलांनी मिळून या बचतगटाची स्थापना केली. प्रत्येकी 50 रुपये मासिक बचतीतून महिलांनी या उद्योगात भरारी घेतली आहे. पारंपारीक वस्तूंच्या निर्मीतीपलिकडे विचार करुन या महिला आज महिन्याला दोन हजारावर सिएफएल बल्बची निर्मीती करुन त्याची विक्री करतात. बीए शिक्षण झालेल्या सुषमा फुलकर या महिलेच्या संकल्पनेतून हा उद्योग सुरु झाला. श्रीमती फुलकर यांचा मुलगा पुण्याला इंजिनिअरींगचे शिक्षण घेत असतांना तो ज्या इमारतीत राहायचा त्या ठिकाणी महिला सिएफएल बल्ब निर्मीतीचा उद्योग करायच्या. एकदा त्यांच्या मुलाने या उद्योगाबद्दल त्यांना सांगितले. त्यांनी तो उद्योग प्रत्यक्ष पाहिल्यानंतर तसा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. सीएफएल बल्बची कल्पना डोळ्यासमोर ठेवून सुषमा फुलकर यांनी पुणे येथे यशदाच्या प्रशिक्षण केंद्रात बल्ब निर्मीतीचे प्रशिक्षण घेतले. पुणे येथे या बल्बची निर्मीती करीत असलेल्या महिलांकडूनही त्यांनी या उद्योगाबाबत जाणून घेतले. त्यानंतर त्यांनी बचतगटाच्या अन्य महिलांनाही याचे प्रशिक्षण दिले. आज गटातील अन्य महिलांच्या सहकार्याने हा उद्योग यशस्वीपणे उभा राहीला आहे.

बल्बसाठी लागणाऱ्या कच्च्या वस्तू व बल्ब निर्मीतीसाठी लागणारी मजूरी पकडून एकून एका बल्बसाठी 40 रुपये खर्च येतो. बाजारात हा बल्ब 80 रुपयाला विकल्या जातो. उद्योगासाठी बचतगटाने जुलै 2011 मध्ये 1 लाख रुपयाचे कर्ज घेतले होते. काही महिन्यातच गटाने कर्जाची परतफेड केली असून महिन्याकाठी 15 हजार रुपयांचे निव्वळ उत्पन्न गटाला होत असल्याचे सुषमा फुलकर यांनी सांगितले. बचतगटाच्यावतीने उत्पादीत या बल्बची 1 वर्षाची गॅरंटीही दिली जाते. या दरम्यान बल्ब खराब झाल्यास दुरुस्त किंवा बदलुन देण्याचे सोयही करुन देण्यात आल्याने ग्राहकांकडून या बल्बला विशेष मागणी आहे. गटाच्या नावाने यवतमाळ शहराच्या मध्यवस्तीत डा. टि.सी.राठो रूग्णालयाजवळ बल्ब विक्रीचे दुकानही सुरु करण्यात आले आहे. येत्या काळात बल्ब निर्मीतीच्या व्यवसायाला व्यापक स्वरुप दिल्यानंतर लाखो रुपयाची उलाढाल होणार असल्याची प्रतिक्रीयाही श्रीमती फुलकर यांनी व्यक्त केली.

मंगेश वरकड

Monday, January 7, 2013

देवकाबाईला मिळाली उद्योगाची दिशा

गोंदिया तालुक्यातील कवलेवाडा नावाचं गाव. संघटन शक्तीचं महत्व गावातील महिलांना कळलं आणि गावात तब्बल 32 बचतगट स्थापन झाले. महिलांना बचतीचं महत्व पटवून देऊन त्यांना स्वावलंबी करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या महिला आर्थिक विकास महामंडळानं गावात 8 बचतगटाची स्थापना केली.

धम्मगिरी स्वयं सहाय्यता महिला गट हा सुद्धा माविमच्या मार्गदर्शनामुळे 11 महिलांनी एकत्र येऊन स्थापन केला. या धम्मगिरी बचतगटाच्या सदस्य असलेल्या देवकाबाई खोब्रागडे ह्या एक. बचतगटात येण्यापूर्वी देवकाबाई मोलमजुरीचे काम करायच्या. पदरमोड करुन देवकाबाई पैसे बचतगटाच्या सदस्य झाल्यामुळे जमा करु लागल्या.

बचतगटातील महिला नियमीत बचत करु लागल्याने माविमने बचतगट सदस्यांना अंतर्गत कर्ज व्यवहार व बँक लिंकेजचे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणामुळे त्यांच्यामध्ये आपण उद्योग/व्यवसाय उभारु शकतो हा आत्मविश्वास निर्माण झाला. देवकाबाईने चहा नाश्ता व किराणा दुकान थाटण्यासाठी माविम सहयोगिनीच्या मार्गदर्शनातून बचतगटातून 12 हजार रुपये कर्ज घेतले. महिन्याकाठी देवकाबाईला या दुकानातून 1200 रुपये नफा मिळू लागला. घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळीच केली.

धम्मगिरी बचतगटाने बँकेकडून पुन्हा 50 हजार रुपये कर्ज घेतले. त्यापैकी देवकाबाईने 5 हजार रुपये कर्ज घेतले. घेतलेल्या कर्जाचा विनियोग कोंबडी पालनाचा व्यवसाय सुरु करण्यासाठी केला. या व्यवसायातून त्यांना 4 हजार रुपयांचा नफा मिळाला.

देवकाबाईने चहा नाश्ता, किराणा दुकान व कोंबडी पालनाचा सहउद्योग सुरु केल्याने त्यांची आर्थिक स्थिती सुधारली. देवकाबाई अर्थोत्पादनात मदत करु लागली त्यामुळे कुटुंबातील सदस्य सुद्धा देवकाबाईवर खुष होते. कमी गुंतवणूकीत चांगला नफा मिळाल्यामुळे हाच व्यवसाय मोठ्या स्वरुपात सुरु करण्याचे देवकाबाईने ठरविले.

Thursday, December 27, 2012

बचतगटांकडे वीजबिल वाटप

वीज ही आपणा सर्वांची दैनंदिन गरज आहे. राज्‍यात महाराष्‍ट्र राज्‍य वीज वितरण कंपनी म्‍हणजेच महावितरणकडून वीज पुरवठा केला जातो. वीजेचा योग्‍य वापर करणे आणि नियमितपणे वीज बिल भरणे हे प्रत्‍येक नागरिकाचे कर्तव्‍य असते. तथापि काही वेळा अचानक जादा वीज बिल आल्‍यामुळे अनेकांना त्रास होतो. त्‍यामागे अनेक कारणे असतात. महावितरणने अशा चुका शोधून त्‍या होणार नाही, याची वेळोवेळी दक्षता घेतली आहे. वीजेची योग्‍य रिडींग न घेतल्‍यामुळेही अनेकदा ग्राहकांचा रोष सहन करावा लागतो. यावर उपाय म्‍हणून महावितरणने जिल्‍हयाच्‍या ग्रामीण भागातील ग्राहकांच्‍या विद्युत मीटरची नोंदणी घेऊन वीज बिल वितरणाचे तसेच शहरी भागातील मीटर रिडिंग चेकिंगचे काम स्‍वयंसहायता महिला बचतगटांमार्फत करण्‍याचा निर्णय घेतला आहे. परभणी ग्रामीण विभागात आणि जिंतूर उपविभागात महिला बचतगटांनी हे काम सुरु केले असल्‍याचे परभणी येथील महावितरणचे अधीक्षक अभियंता सुरेश गणेशकर यांनी सांगितले.

परभणी जिल्‍हयात सध्‍या महावितरण कंपनीच्‍या जोडण्‍या घेतलेले एकूण 2 लाख 60 हजार 571 ग्राहक आहेत. यामध्‍ये घरगुती वापर करणारे 1 लाख 62 हजार 945 तर वाणिज्‍यिक कारणांसाठी वापर करणारे 11 हजार 706 ग्राहक आहेत. या सर्वांपर्यंत वेळेवर व योग्‍य आकारणी केलेली वीज बिले पोहोचविण्‍याचे आव्‍हान आहे. बचतगटांच्‍या मदतीने ते यशस्‍वीपणे पेलले जाईल, असा विश्‍वास आहे. महावितरण कंपनीच्‍या जिंतूर उपविभागांतर्गत सप्‍टेंबर महिन्‍यापासून तर परभणी ग्रामीण विभागात ऑक्‍टोबर महिन्‍यापासून महिला बचतगटांनी हे काम सुरु केले आहे. अन्‍य तालुक्‍यांतील बचतगटांना हे काम देण्‍याची कार्यवाही सुरु आहे.ती लवकरच पूर्ण होऊन संपूर्ण परभणी जिल्‍ह्यात वीजबिल वाटपाचे काम महिला बचतगटांकडून होईल.विद्युत मीटरची रिडिंग घेताना होणा-या चुका टाळण्‍यासाठी तसेच वीजबिल वसुलीतून महावितरण कंपनीचा महसूल वाढविण्‍याच्‍या दृष्‍टिकोनातून स्‍वयंसहायता महिला बचत गटांमार्फत वीज मीटर रिडिंग घेऊन, वीजबिले ग्राहकांना वाटप करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला.बचतगटाच्‍या महिला जिल्‍हयाच्‍या ग्रामीण भागातील घरगुती आणि वाणिज्‍यिक वापराच्‍या वीज मीटरची रिडिंग मॅन्‍युअली ( हाताने लिहून) घेणार आहेत. शहरी भागात सेवाभावी संस्‍थांच्‍या कर्मचा-यांनी घेतलेल्‍या वीज मीटरच्‍या फोटो रिडिंग ची तपासणी (चेकिंग) मॅन्‍युअली करणार आहेत. यामुळे योग्‍य मीटर रिडिंग घेतली जाऊन, योग्‍य रकमेची बिले ग्राहकांना वितरित होण्‍यास मदत होईल. महिला बचतगटांना वीजमीटर रिडिंग घेण्‍यासाठी प्रति मीटरमागे दोन रुपये 50 पैसे तर वीजबिल ग्राहकांपर्यत वितरित करण्‍यासाठी प्रति बिल एक रुपया 50 पैसे असे सेवाशुल्‍क दिले जाणार आहे. वीजमीटर रिडिंग घेऊन बिले वितरित करण्‍याचे काम मिळाल्‍यामुळे महिला बचतगटांना उत्‍पन्‍नाचे साधन मिळाले असून यामुळे गटातील महिलांना आर्थिकदृष्‍ट्या स्‍वयंपूर्ण होण्‍यासाठी सहाय्य होणार आहे.

परभणी ग्रामीण विभागांतर्गत प्रभावती महिला बचतगटास तर जिंतूर उपविभागांतर्गत गुरुकृपा महिला बचतगटास हे काम मिळाले आहे. महिला बचतगटांना काम देण्‍यासास्‍ठी महावितरण कंपनीने बचतगटांकडून निविदा मागविल्‍या होत्‍या. अन्‍य तालुक्‍यातील बचतगटांना असे काम देण्‍याची कार्यवाही सुरु आहे. महिलांमध्‍ये बचतगटाच्‍या चळवळीमुळे एक प्रकारचा आत्‍मविश्‍वास निर्माण झालेला असल्‍याने ते वीज मीटरच्‍या योग्‍य नोंदीबाबत आवश्‍यक ती काळजी घेतील. ग्राहकांच्‍या वीजबिलाबाबतच्‍या शंका दूर करुन त्‍यांचे योग्‍य समाधान करतील. योग्‍य रिडींगमुळे वीजबिल वसुलीत वाढ होऊन महावितरणची आणि महिला बचतगटाची आर्थिक स्‍थिती सुधारतील, अशी आशा आहे.

राजेंद्र सरग
जिल्‍हा माहिती अधिकारी, परभणी

Monday, September 10, 2012

तेजस" चा ठसका मुंबईपर्यंत

आजच्या धावत्या युगात मानवाच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या असून मोठमोठी रेस्टॉरंट, मॉल्समधल्या चटकदार व चटपटीत अशा पदार्थांकडे सर्वांचा ओढा असल्याचे दिसून येते. परंतु या अशा चटपटीत पदार्थांना चटकदार बनवते तो मसाला. या मसाल्यांच्या गुणधर्मामुळे व त्याच्या दर्जामुळे पदार्थांची चव सर्वांच्या जिभेवर रेंगाळत राहते. चवदार मसाले निर्मितीच्या क्षेत्रामध्ये आजघडीला जागतिक स्तरावरील मोठमोठ्या कंपन्यामध्ये स्पर्धा निर्माण झाली असून लोकांच्या मागणी व आवडी, निवडीनुसार या कंपन्या मालाची निर्मिती करुन लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. त्यांच्या मालाची गुणवत्ता व आकर्षक पँकीगमुळे या मालाला बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. या सर्व कंपन्यांच्या स्पर्धेमध्ये ग्रामीण भागातील महिला बचतगट मागे न पडता त्याच तोडीचा व गुणवत्तेचा आणि खवय्यांच्या जिभेला हव्या असलेल्या तसेच गावच्या मसाल्याची आठवण करुन देणाऱ्या उत्पादनांची निर्मिती बीड जिल्ह्यातील 110 बचतगटांच्या महिला "तेजस" या ब्रँडच्या नावाने करत असून या "तेजस"चा ठसका मुंबईपर्यंत पोहोचला आहे.

मागासलेला, ऊसतोड कामगार पुरविणारा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख आहे. अज्ञानामुळे दारिद्रय आणि दारिद्रयामुळे अज्ञान असं दुष्टचक्र पाठीशी कालचक्रासारखं लागलेले. महिलांचे प्रश्न तर अजुनही गंभीर. कोरड्या, ओल्या दुष्काळाला तोंड द्यायचं. एक ना दोन असंख्य समस्यांना तोंड देत कसेबसे जगायचे. सुख, सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा व मान-सन्मान या शब्दांशी दुरान्वये संबंध नसलेल्या महिलाच बहुसंख्य दिसायच्या. अपवाद म्हणून कला-कौशल्यात निपुण, बुद्धीमान स्त्रीया जरी कमी नसल्या तरी सोनं करायला संधी उपलब्ध नसायच्या. काळ बदलत असतो, नव्हे तो बदलला. सबलीकरण, सक्षम, आत्मनिर्भर इत्यादी शब्दांशी महिलांचं नातं जडू लागलं. स्वर्णजयंती ग्रामस्वयंरोजगार योजनेंतर्गत स्वयंसहाय्यता महिला बचतगटाची योजना ही विकासाची गंगा घेऊन दारी आली. या संधीची वाट पाहणाऱ्या महिलांमध्ये मैत्रीपूर्ण हितगुज होऊ लागलं.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यातील 11 तालुक्यात कार्यरत असलेल्या बचतगटापैकी 110 बचतगटांचा समावेश असेले एक तेजस महिला उद्योजकता मंडळ स्थापन करण्यात आले. या मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती तारामती चंद्रसेन लाड या असून याबाबत सांगताना त्या म्हणाल्या की, घरची परिस्थिती जेमतेम व हालाखीची असल्याने कुटुंबाच्या एकूण उत्पन्नावर घर चालविण्यासह मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न नेहमीच भेडसावत होता. त्याचप्रमाणे शिक्षण कमी असल्यामुळे बाहेर नोकरीची संधी नव्हती. कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा यासाठी शिलाई कामातून मिळणाऱ्या मोबदल्यावरही कुटुंबाला मदत होत नव्हती. घरबसल्या काही उद्योग करता येईल का या विंवचनेत असतानाच सुनंदा घोंगडे यांच्याशी माझी भेट झाली आणि तोच दिवस माझ्या आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन आला.

बीड येथील वासनवाडी परिसरातील 10 महिलांना एकत्र करुन जय हनुमान बचतगटाची स्थापन केली. सर्व महिलांनी मिळून दरमहा ठराविक रक्कम बचत म्हणून जमा केली व एक वर्षानंतर आमच्या बचतगटास बँकेकडून 25 हजार रुपयांचे कर्ज प्राप्त झाले. या मिळालेल्या कर्जामधून प्रत्येक महिलेने विविध व्यवसाय यशस्वीपणे सुरु केले. परंतु एवढ्यावर समाधान न मानता मोठा व्यवसाय करण्याच्या शोधात असतानाच मसाला व मिर्ची पावडरची मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून आमच्या गटाला कळविण्यात आले.

मसाला व मिरची पावडर तयार करण्याचे प्रशिक्षण जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये प्रात्यक्षिक करुन दाखविताना कुठल्या प्रकारची मिरची वापरायची, मसाल्यासाठी कोणता घटक किती प्रमाणात घालायचा, तो कोणत्या रंगामध्ये भाजायचा याबाबत सांगण्यात आले. परंतु माल चांगला असून चालत नाही तर त्याला उत्कृष्ट प्रकारची पॅकींगही असणे आवश्यक आहे. यासाठी प्लास्टीक पाऊचच्या पॅकींगची पद्धत, प्लॉस्टीक पाऊचवर बॅच नंबर, मालाची किंमत, माल तयार झालेला दिनांक, बाजारपेठ कशी काबीज करण्याबरोबरच नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर कशा प्रकारे करावा याबाबत सविस्तर माहिती देऊन उत्पादनाच्या गुणवत्तेमध्ये एकसंघता यावर भर देण्यात आला. आमच्या तेजस ब्रँडच्या उत्पादनांची चव देशातील सर्व राज्यामध्ये जावी अशी अपेक्षा अध्यक्षा श्रीमती तारामती लाड यांनी व्यक्त केली.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सहाय्याने तयार करण्यात आलेल्या तेजस या ब्रँडनेमने नोंदणी प्राप्त झाल्यानंतर एकूण 110 महिला बचतगटांनी तयार केलेली मसाला, मिरची पावडर, पापड, शेवया, लोणचे या सारखी उत्पादने दि. 5 जून, 2010 रोजी बाजारामध्ये उपलब्ध करुन देण्यात आली.

तेजस ब्रँडच्या नावाने उत्पादित केलेल्या मालाला स्थानिक बाजारपेठेबरोबर बाहेरील जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. या गटातील महिलांनी उत्पादित केलेला माल औरंगाबाद, लातुर, नांदेडसह मुंबई येथे आयोजित केलेल्या प्रदर्शनामध्ये तेजस ब्रँडची उत्पादने मोठ्या प्रमाणात विक्री झाले. मुंबई येथील प्रदर्शनामध्ये महिलांसह अबालवृद्धांनी या उत्पादनांची चाखलेली चव त्यांच्या जीभेवर कायमस्वरुपी राहिली असून खवय्यांसाठी ही उत्पादने एक पर्वणीच ठरली असल्याची प्रतिक्रिया या प्रदर्शनातून पहावयास मिळाली. मुंबई येथील महिलांनी वर्षातून चार वेळेस तरी तेजस चे उत्पादन प्रर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध करुन द्यावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

स्वयंसहाय्यता महिला बचतगटाच्या योजनेमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासाला जणू प्रगतीचे पंख लाभलेले आहेत. तेजसमुळे जिल्ह्यातील 110 बचतगटातील जवळपास 1100 कुटुंबाच्या उत्पन्नात भर पडली असून त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत झाली आहे. ही बाब निश्चितच वाखाण्याजोगी असून चुल आणि मूल एवढ्या मर्यादित कार्यक्षेत्रात अडकुन पडलेल्या माहिला आता सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे.

या खडतर परंतु प्रेरणादायी प्रवासाची या स्त्रीयांची कथा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. एवढीच या निमित्ताने अपेक्षा

Wednesday, August 29, 2012

बचत गटाची नवलाई


महिला बचत गट म्हणजे लोणची, पापड बनविणे, यापुढेही जाऊन घाऊक दरात वस्तु घेऊन किरकोळ स्वरुपात विकणे हे चित्र समाजात आजही दिसतय. केवळ टाईमपास म्हणून  या संकल्पनेकडे पाहणाऱ्या महिला आता व्यावसायिक दृष्टीकोनातून पाहू लागल्यात. याचे मुर्तिमंत उदाहरण म्हणजे महाड तालुक्यातील अतिदुर्गम भागातील दारिद्रय रेषेखालील महिलांचा  नवलाई महिला बचत गट.  या महिलांनी दहा लाखांची मिनी बस खरेदी करुन महाड एम.आय.डी.सी. मधील सॅडोझ प्रा. लिमिटेड या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कामगारांना ने-आण करण्याची सेवा देत आहेत. 

महाड मधील नामांकित हिरवळ संस्थेचे प्रकल्प अधिकारी श्री. सिताराम कडू यांनी 25 ऑक्टोबर 2007 रोजी मांघरुण गावातील दारिद्र्य रेषेखालील महिलांची सभा घेऊन त्यांना स्वर्णजंयती ग्राम स्वरोजगार योजनेची माहिती दिली. आणि महत्वाचे म्हणजे त्याच दिवशी गटाची स्थापना झाली. प्रारंभी बचत गटात एकूण अकरा सभासद घेण्यात आले. त्यात आठ दारिद्र्य रेषेखालील सभासद आहेत. खरंतर एकदा महिलांची मनं जुळली तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही, हे नवलाई महिला बचत गटाने सिद्ध करुन दाखवलं. अवघ्या एका वर्षातच या गटाला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अलिबाग व बँक ऑफ महाराष्ट्र बिरवाडी यांचे मार्फत फिरता निधी देण्यात आला. या गटाने नियमितणे कर्जाचा हप्ता भरत केवळ सहा महिन्यात फिरता निधी कर्ज गटाने फेडला.

दरम्यान सॅडोझ प्रा. लिमिटेड कंपनीचे सरव्यवस्थापक श्री. सुरेश भोसले यांनी महिलांच्या बचत गटाने कंपनीच्या कामगारांना ने-आण करण्यासाठी मिनी बस उपलब्ध करुन दिल्यास त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल तसेच कंपनी कडून संपूर्ण सहकार्य मिळेल याची हमी दिल्यानंतर, दहा लाखाची बस घेण्यासाठी संपूर्ण तालुक्यात सक्षम गट कोणता याचे सर्वेक्षण करताना ज्या गटाने आपली क्षमता सिद्ध केली तो गट म्हणजे नवलाई महिला बचत गट मांघरुण.

हिरवळचे अध्यक्ष श्री. किशोर धारिया व सॅडोझ कपंनीचे व्यवस्थापक श्री. सुरेश भोसले यांच्या सहकार्यामुळे महिला हया वाहतूक व्यवसायात सहभागी झाल्या. मिनी बसची किंमत 9.15 लाख असल्याने बँकेला संपूर्ण यशाची खात्री दिल्यानंतरच बँक ऑफ महाराष्ट्र बिरवाडी यांनी या प्रकल्पाला मंजूरी दिली. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अलिबाग यांचेकडून या गटाला तातडीने रु. 80,000/- अनुदान उपलब्ध झाले. गटाचे स्वत:चे भांडवल रु. 20,000/- आणि बँकेचे कर्ज 8,15 लाख रु. असे एकूण 9.15 लाख रु. कर्ज मंजूर झाले आणि बघता बघता बचत गटाच्या कामाला वेग आले.ऑक्टोबर 2010 रोजी महाड-पोलादपूरचे आमदार श्री. भरतशेठ गोगावले, तहसिलदार श्री. नवले व गट विकास अधिकारी श्री. तपकिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बस प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. कंपनीकडून या गटाला दरमहा रु. 69,000/- रक्कम भाडेतत्वावर दिली जाते. प्रत्यक्ष प्रकल्पावर नियंत्रण ठेवण्यासाठी बचत गट व बँकेने हिरवळचे प्रकल्पाधिकारी श्री. सिताराम कडू यांची नेमणूक केली.

अगदी 20,000/- रु. भागभांडवलावर सुरु केलेल्या ह्या प्रकल्पाने आज 20 महिन्यात 12 लाखाची मजल मारली आहे. बसचा हप्ता, ड्रायव्हर, क्लिनर व इतर डिझेल मेंटनंस हा सर्व खर्च जाऊन दरमहा गटाला निव्वळ 35,000/- रु. चा नफा होतोय. फक्त दिड वर्षात गटाने रुपये 5.5 लाखाचे कर्जफेड करुन एखादा दारिद्र्य रेषेखालील बचत गट देखील व्यवहार कुशलता दाखवू शकतो, याचे आदर्श उदाहरण साऱ्या महाराष्ट्रातील बचत गट व बँकांसमोर ठेवले आहे.

नवलाई बचत गटाच्या अध्यक्षा सौ. कलावती शिंदे, उपाध्यक्षा सौ. संगिता शिंदे व सचिव सौ. भारती शिंदे यांच्या सक्षम नेतृत्वामुळेच गेली पाच वर्षे अनेक अडचणी येऊन देखील हा गट यशाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. आणखी या गटाचे वैशिष्ट्य म्हणजे नियमित मासिक सभा, नियमित बचत व सभेत दरमहा जमाखर्चाचा हिशेब मांडणे, सर्वांना विश्वासाने सांभाळणे त्याचप्रमाणे कोणत्याही पुरुषांना गटाच्या व्यवहारात हस्तक्षेप करु न देणे ह्या गुणवैशिष्ट्यामुळे हा गट संपूर्ण जिल्ह्यात आपल्या कर्तृत्वाने आदर्श उदाहरण म्हणून नावारुपास येत आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासात प्रामुख्याने रायगड जिल्ह्यात महिला बचत गटाची बस कंपनीसाठी चालविली जाते, ही घटना ठळकपणे अधोरेखित केली जाईल. श्री. किशोरभाई धारिया यांचा एक मानस होता तो असा की असं काही वेगळं आपण करुन दाखवू ज्यायोगे आपण सामाजिक कार्य करणाऱ्यांना एक उदाहरण देऊ शकू. एक पाऊल खूणा मागे ठेवू शकू. ज्याचं समाज अनुकरण करेल व आपल्या जीवनाचा त्यात मार्ग शोधण्याचा प्रयत्न करेल. पुरुष व भांडवलदारांची मक्तेदारी मोडीत काढून महिलादेखील अशा प्रकारचे उद्योग व्यवसाय करु शकतात. याचं उत्तम उदाहरण आपण समाजसमोर आज ठेवत आहोत. त्यांचे हे कार्य सामाजिक क्रांतीला प्रेरणादायक ठरेल. ह्या महिला आपल्या विभागातील/ समाजातील गरीब असहाय कुटूंबांना आपला व्यवसाय अनंत अडचणीतून कसा उभा केला आणि तुम्ही देखील अशा प्रकारचे उद्योग व्यवसाय करुन आपल्या परिवाराला आर्थिक पाठबळ देऊ  हा विश्वास त्यांना नक्कीच देतील.

आर्थिक सामर्थ्य, कठोर परिश्रम व चिकाटी यामुळे महिला मानसिकदृष्ट्या सुदृढ, स्वाभिमानी व तेजस्वी होतील. यापूर्वी सतत पुरुषांच्या हातात खेळणारा पैसा आता यापुढे बचत गटांच्या प्रभावी माध्यमाद्वारे महिलांच्या हातातून प्रवाहित होईल. महिला आता कोणत्याही क्षेत्रात आघाडीवर राहील याचे हे ज्वलंत उदाहरण आहे.

राजेंद्र मोहिते, जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग.

Saturday, June 30, 2012

महिलांनी स्‍वकर्तृत्‍वातून साधला विकास

राज्‍यामध्‍ये महिला सक्षमीकरणाचे वारे जोरात वाहत आहे. सर्वच क्षेत्रात महिला खंबीरपणे पुढे येऊन पुरुषांच्‍या बरोबरीने काम करु लागल्‍या आहेत. आपल्‍या कर्तृत्‍वाने कामात आगळावेगळा ठसा उमटवू लागल्‍या आहेत. महिलांना हा मान सन्‍मान शासनाच्‍या विविध योजना, निर्णय, उपक्रमांमुळे मिळू लागल्‍याचे चित्र सर्वत्र दिसू लागले आहे. बचत गट हे त्यापैकीच एक माध्यम आहे.

दारिद्र्याच्‍या विळख्‍यात जीवन जगत असताना आपले जीवनमान उंचावण्‍यासाठी कुणीतरी मदत करील काय? या अपेक्षेने समाजाकडे पाहून आपली वाटचाल करणारी अनेक कुटुंबे दिसून येतात. मेहनत, जिद्द व निष्‍ठेने काम करण्‍याची तयारी असणाऱ्‍या महिलांना योग्‍य मागदर्शन व मदतीची गरज असते. महिला बचत गटातून त्‍यांच्‍या उमेदीला समर्थपणे साथ मिळाली तर महिला स्‍वकर्तृत्‍वाने आपल्‍या पायावर उभ्‍या राहू शकतात. अहमदनगर जिल्‍ह्याच्‍या जामखेड येथील सामानामीर बाबा महिला बचत गटातील महिला हे याचेच एक उदाहरण आहे.

जामखेड येथील इंदिरानगर वस्‍तीत राहणाऱ्‍या दारिद्र्य रेषेखालील 15 महिलांनी 15 मे 2009 रोजी सामानामीर बाबा महिला बचत गट स्‍थापन केला. श्रीमती ताराबाई शिवाजी माने यांच्‍या अध्‍यक्षतेखाली स्‍थापन झालेल्‍या या बचत गटाने आपल्या बचतीतून प्रारंभी पारंपरिक पद्धतीने चालणारा काथवट, बेलणे, पोळपाट आदी लाकडी वस्‍तू तयार करण्‍याचा व्‍यवसाय सुरू केला. दररोज काबाडकष्‍ट करुन स्‍वतःचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्‍या या महिलांना स्‍वतःच्‍या पायावर उभे राहण्यास बचत गटाची मोलाची मदत झाली.

या व्‍यवसायाला खेळते भांडवल म्हणून 25 हजार रूपये मिळाल्‍यानंतर व्‍यवसायात वाढ झाली. उत्‍पादनातही वाढ झाली. तयार केलेला माल खेडोपाडी जाऊन विक्री होऊ लागला. परिसरातील गावातील यात्रा-जत्रांमध्‍ये जाऊन मालाची विक्री करण्‍यास त्यांनी सुरुवात केली. त्‍यामुळे गटास चांगले उत्‍पन्‍न मिळू लागले. त्‍यातून त्यांची प्रगतीच्‍या दिशेने वाटचाल सुरू झाली, महिलांमध्ये आत्‍मविश्‍वास निर्माण झाला. उत्‍साहाने त्‍या व्‍यवसायवृद्धीकडे लक्ष देऊ लागल्‍या.

सन 2010 मध्‍ये अहमदनगरच्‍या जिल्‍हास्‍तरीय व नाशिक येथील विभागीय बचत गटाच्‍या प्रदर्शनात तसेच सन 2011 च्‍या व 2012 च्‍या अहमदनगर येथील विभागीय बचत गटाच्‍या प्रदर्शनात या गटाने सहभाग घेऊन मालाची विक्रमी विक्री केली.

या बचत गटाच्‍या कार्याची दखल घेऊन या गटाचे व्दितीय मूल्‍यांकन झाले. गटाने लाकडी व्‍यवसाय, काथवट, पोळपट, रवी, लाकडी खेळणी, बेलणे, चाटू आदी उत्पादन सुरू केले. त्‍यासाठी जामखेड येथील स्‍टेट बँक ऑफ इंडियाकडे कर्ज प्रस्‍ताव सादर केला आहे. दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्‍या या महिलांनी आपल्‍या कर्तृत्‍वावर या व्‍यवसायात बचत गटाच्‍या माध्‍यमातून गरुड झेप घेतली आहे.

महिला आता ग्रामीण व शहरी विकासाच्‍या प्रक्रियेतही सहभागी होत आहेत. चूल आणि मूल एवढ्यापुरत्‍या मर्यादित न राहता महिला पुरुषांच्‍या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रात आघाडी घेत आहेत.


  • दिलीप गवळी, माहिती अधिकारी, अहमदनगर
  • Friday, June 15, 2012

    फाटक्या संसाराला शिवणयंत्राचा आधार

    घरचा कर्ता पुरूष गेल्यानंतर महिलेची अवस्था बिकट असते. संसाराचा गाडा चालवतानाच मुलांच्या भवितव्याची चिंताही तिला करावी लागते. हे साध्य करणे ही तारेवरची कसरतच असते. चंद्रपूर जिल्ह्यातील मंगला गोहणे यांनी आपले दु:ख बाजूला सारून परिस्थितीशी दोन हात केले. या कामी त्यांना महिला बचत गटाची मोठी मदत झाली आहे.

    बेलसनी या गावात महाराष्ट्र विकास मंडळाचे १० बचत गट आहेत. दहा गटांपैकी मंगला अनंता गोहणे या शारदा महिला बचत गटातील सदस्य. त्यांना दोन मुले. मध्यंतरीच्या काळात पतीचे निधन झाले. त्यामुळे घरची संपूर्ण जबाबदारी मंगलावर आली. सुरूवातीला त्यांनी मोलमजुरी करून कुटुंबाची जबाबदारी पेलली. परंतु एवढ्यावर भागत नसल्याने त्या महिला बचत गटात सहभागी झाल्या. काही दिवसानंतर त्या गटाच्या अध्यक्षही झाल्या.

    माविमच्या वतीने आयोजित प्रशिक्षणात मंगला यांनी शिवणक्लासचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी गटामधून चार हजार रुपये कर्ज घेऊन शिवणयंत्र घेतले. काही दिवस त्या फक्त ब्लाऊज आणि सलवार सूट शिवत होत्या. त्यांचा आत्मविश्वास जसजसा वाढत गेला तसतसा आणखी काहीतरी करण्याचा विचार त्यांच्या डोक्यात येऊ लागला. आता पुन्हा त्यांनी गटातून पाच हजार रूपये कर्ज घेऊन पिको फॉल करण्याची मशीन विकत घेतली. त्यातून त्या पिको फॉलही करू लागल्या. या व्यवसायातून त्यांना चांगला आर्थिक लाभ होऊ लागला. कौटुंबिक गरजा भागवून मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करणे आता त्यांना शक्य होऊ लागले.

    मविमच्या मार्गदर्शनामुळे आज मुलांना आपण चांगले शिक्षण देऊ शकतोय, असे त्या मोठ्या अभियानाने सांगतात. त्यांनी गटातून अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. आता त्या व्हीएलसीच्या अध्यक्ष आहेत. व्हीएलसीमधून त्यांनी गावात ग्रामस्वच्छता अभियान कार्यक्रम राबविला. व्हीएलसीमधून दोन महिलांना ग्राम पंचायत निवडणुकीसाठी उभे राहण्यासाठीही त्यांनी सहकार्य केले. त्या दोन्ही महिला माविमच्या गटामध्ये होत्या. त्या महिला आज ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांना काही अडचण आल्यास त्या मिटींग घेऊन त्यांना वेळोवेळी मदत करतात. एकेकाळी कौटुंबिक गरजा पूर्ण करण्यासाठी मजूरी करणाऱ्या मंगला गोहणे आज व्हीएलसी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे चालवू लागल्या आहेत. बचत गटामधून मिळालेल्या आत्मविश्वासाचाच हा परिणाम आहे, असे त्या आवर्जून सांगतात.

  • जिल्हा माहिती अधिकारी, चंद्रपूर
  • शिलाई मशिनच्या प्रशिक्षणाद्वारे अल्पसंख्याक महिला झाल्या स्वावलंबी

    अल्पसंख्याकांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. या योजनांच्या माध्यमातून अनेकांनी व्यवसाय थाटले आहेत. यात महिलांचा देखील समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजातील काही महिला शिलाई मशिनचे प्रशिक्षण घेऊन स्वावलंबी झाल्या आहेत.

    हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत अल्पसंख्याक समाजातील दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी २०१०-११ आणि २०११-१२ या वर्षांत शिलाई मशिन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. २०१०-११ या मध्ये ३६ तर २०११-१२ मध्ये ३२ महिलांनी प्रशिक्षण घेतले.

    जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील हमदर्द विकास मंडळ या सेवाभावी संस्थेवर प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या संस्थेचे अध्यक्ष नजीर अहमद पुसेगावकर यांनी लाभार्थी महिलांच्या निवडीसाठी बैठक घेऊन मान्यतेसाठी गटविकास अधिकारी, हिंगोली, सेनगाव, औंढा नागनाथ यांना कळविले. त्यानंतर संबंधितांनी सर्व बाबींची पडताळणी करुन हिंगोली पंचायत समितीने नर्सी (नामदेव), सेनगाव पंचायत समितीने पुसेगाव व औंढा पंचायत समितीने औंढा व जवळा बाजार गावातील लाभार्थी महिलांची निवड केली. पुसेगाव, जवळा बाजार, नर्सी नामदेव, औंढा नागनाथ येथे प्रशिक्षणाची सोय करण्यात आली होती.

    तीन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी संस्थेने शिलाई मशिनची व्यवस्था केली होती. प्रशिक्षण काळात महिलांना तज्ज्ञ व्यक्तींकडून शिवणकलेचे संपूर्ण ज्ञान देण्यात आले. विशेष म्हणजे ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक बशीर पटेल तसेच श्री.मोडके, श्री.घाडगेपाटील यांनी प्रशिक्षणस्थळाला भेट देऊन प्रशिक्षणाची वेळोवेळी माहिती घेतली तसेच मार्गदर्शन केले.

    प्रशिक्षण काळात लाभार्थी महिलांना ३०० रूपये मानधन तसेच प्रशिक्षण संपल्यानंतर लाभार्थी महिलांना प्रमाणपत्र देण्यात आले. प्रशिक्षण घेतलेल्या महिलांपैकी पन्नास टक्के महिला स्वावलंबी झाल्या आहेत. त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे, यामुळे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

    महाराष्ट्र ग्रामीण बँक, पुसेगाव या शाखेकडून दहा महिलांना २५ हजार रूपये प्रमाणे रेडीमेड गारमेंट व शिवणयंत्रासाठी कर्ज मंजूर करण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून ७,५०० रूपये प्रमाणे प्रति लाभार्थी अनुदान मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे पुसेगाव येथील अल्पसंख्याक समाजातील महिलांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाच्या या उपक्रमामुळे अल्पसंख्याक समाजातील महिला अर्थिकदृष्ट्या सबल होण्यास निश्चितच मदत होत आहे.

    Saturday, June 9, 2012

    महिला बचतगटांनी उचलला ग्रामविकासाचा भार

    स्त्री ही अबला व व्यवहारशून्य असते अशी मानसिकता मोडीत काढून ग्रामीण भागातील महिला बचतगटांच्या सदस्यांनी या मानसिकतेला जबरदस्त तडाखा देत नवऱ्याचे सर्व व्यवहार सांभाळल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. पेरणीसाठी सावकाराचे उंबरठे झिजवणारा शेतकरी आता बचतगटाच्या पैशांवर आपली नड भागवू लागला आहे. बचतगटाच्या माध्यमातून कौटुंबिक अडचणींवर मात करण्याबरोबरच ग्राम विकासातही महिला बचतगटांनी भाग घेण्यास सुरुवात केल्याने भावी काळात महिला बचतगट हा ग्रामीण विकासाचा प्रमुख मार्ग ठरणार आहे.

    मागील काही वर्षांपासून राज्यामध्ये महिला सक्षमीकरणाचे वारे जोरात वाहत असून महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून गावागावात महिला बचतगट तयार झाले आहेत. मुख्य म्हणजे हे महिला बचतगट सुरुवातीला तुटपुंज्या रोजगारावर मोलमजुरी करणाऱ्या महिलांनीच स्थापन केले होते. या महिलांनी तुटपुंज्या मिळकतीतून दरमहा ५० ते १०० रुपये जमा करुन ते बँकेत टाकले. पै, पै साठवून जमा केलेली रक्कम वर्षभरात मोठी झाल्याने इतरही महिलांना याचे महत्व कळून आज ग्रामीण भागात महिला बचतगटांचे जाळे निर्माण झाले आहे.

    प्रत्येक गावातील ५० टक्के महिला, बचतगटाशी जोडल्या गेलेल्या आहेत. महिलांचे पती देखील या उपक्रमात त्यांच्या पाठीशी उभे राहत आहेत. या महिला बचतगटांच्या भरवशावर अनेक जण व्यवहाराची आखणी करू लागले आहेत. ग्रामीण भागामध्ये दरवर्षी पेरणीचे दिवस आल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये खते व बी-बियाण्याची जुळवाजुळव करण्याकरिता धांदल उडते. कोणाकडून उसनवारी करुन प्रसंगी दामदुप्पट व्याजाने सावकाराकडून पैसे घेऊन पेरणीची नड भागविली जात होती. परंतु आता गेल्या पाच वर्षापासून महिला बचत गटाच्या माध्यमातून साठवलेला पैसा ऐन निकडीच्यावेळी मिळत असल्याने गावात सावकाराकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या रोडावली आहे. महिला बचतगटाच्या पैशावर नाममात्र व्याज आकारले जात असल्याने शेतकऱ्यांचे सावकारांच्या घशात जाणारे पैसे वाचत आहेत. हा पैसा ते आता इतर कामासाठी वापरत असल्याने महिला बचतगट ग्रामीण भागात विकासाची कामधेनू ठरत आहे.

    शासनाने महिला बचतगटाला विविध योजनांच्या माध्यमातून मदत करण्याचे धोरण अवलंबिले आहे. गावागावात अंगणवाडीतील पोषण आहार, स्वस्त धान्य दुकानातील धान्य वाटप, केरोसीन वाटप याचे परवाने आता महिला बचत गटांना मिळू लागले आहेत. महिला बचत गटांच्या महिला ही सर्व कामे हे एक आव्हान म्हणून करीत असून घराचा उबंराही न ओलांडलेली महिला आज जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन बँकेचा व्यवहार मोठ्या हिमतीने सांभाळत आहे. महिला सक्षमीकरणाला खऱ्या अर्थाने बळकट करावयाचे असल्यास व ग्राम विकास साधावयाच्या असल्यास महिला बचत गटांना आणखी प्रभावी करणे आवश्यक आहे.

    पूजा सावंत यांची सेंद्रिय शेती

    रासायनिक खतांच्या अतिरेकामुळे जमिनीवर होणारे दुष्परिणाम त्यामुळे जमिनीचा कमी होणारा कस आदी बाबी लक्षात घेऊन तसेच सेंद्रीय शेतीचे महत्व पटल्यामुळे मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील पूजा पांडुरंग सावंत यांनी सेंद्रीय व औषधी शेतीचा अभिनव प्रयोग करून आपल्या पूर्वजांचा सेंद्रीय व औषधी शेतीचा वारसा जतन केला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्य शासनाने त्यांना दोन वर्षापूर्वी जिजामाता कृषी भूषण पुरस्काराने गौरविले आहे.

    टाकळी सिकंदर येथील कृषीभूषण कै.दिगंबर (अण्णा) सावंत यांच्या स्नुषा पूजाताईंचे माहेर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र शिर्डी. शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यामुळे विवाहानंतरही त्यांना शेतीची ओढ स्वस्थ बसू देईना. रासायनिक खतांचे दुष्परिणाम माहीत असल्यामुळे त्यांनी सेंद्रीय शेतीचे प्रयोग परस बागेतील झाडांवर सुरू केले.

    सुरुवातीला पाला पाचोळ्याचे खत, गांडूळ खत वापरायला सुरुवात केली. त्यामुळे कुंडीतील फळांचा आकार, रंग, चव व फळ पिकण्याचा कालावधी याचा चांगला अनुभव आला. इतकेच नाही तर त्यांनी कुंडीतील पेरूच्या झाडाला सेंद्रीय खत वापरल्यामुळे ७०० ग्रॅम वजनाचे पेरू मिळाले. सेंद्रीय खतांच्या वापरामुळे झाडांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याचेही लक्षात आले. तर कीड नियंत्रणासाठी गोमूत्र, ताक, कडुनिंब अर्काची फवारणी नियमित केली. परसबागेतील सेंद्रीय खतांचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्यांना हा प्रयोग शेतीत राबविण्याची कल्पना सुचली.

    यासाठी त्यांना त्यांचे पती पांडुरंग सावंत यांची मोलाची मदत झाली. त्यांनी टाकळी सिकंदर येथील त्यांच्या शेतीमध्ये सहा एकर आंबा, दोन एकर चिकू, एक एकर आवळा, एक एकर कोकण लिंबू तर बांधावर वनझाडे आणि नारळाची लागवड केली.

    एवढ्यावरच न थांबता आयुर्वेदिक औषधांचे अनन्यसाधारण महत्व लक्षात घेऊन त्यांनी शेतात अजरुन, नोनी, गुंज, गुडमार, रिठा, निर्गुडी, बेहडा, सर्पगंधा, अश्वगंधा, तुळशी, डिकमल, कडुनिंब, चंदनाची लागवड केली. लागवड करताना एकेरी पीक पद्धतीचा अवलंब न करता एकत्रित पिकांचा अंतर्भावही शेतात केला. एकेरी फळ पीक पद्धत अवलंबिली असता मोठ्या प्रमाणावर कीड व रोग यांचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे त्याला पर्याय म्हणून बहुपीक पद्धतीचा अवलंब करण्यात आला. त्यामुळे रोग व किडीचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे लक्षात आले. याबाबत शेतकर्यांणमध्ये जागृती करण्यासाठी त्यांनी शेतकरी मेळाव्याचे आयोजनही केले होते.

    गत दोन वर्षापूर्वी कोल्हापूर महापालिकेने आयोजिलेल्या स्पर्धेत त्यांनी मुक्त रचना, बोन्साय, औषधी वनस्पती, परस बागेतील शोभेची झाडे यामध्ये प्रथम क्रमांक पटकविला आहे. पारंपरिक शेतीमध्ये थोडा बदल करून सेंद्रीय शेतीचा अवलंब करून बहुपीक पद्धतीने लागवड केल्यास उत्पादन वाढून शाश्वत उत्पन्न मिळू शकते, हे पूजाताईंनी त्यांच्या प्रयोगातून सिद्ध केले आहे. त्यांच्या शेतीतील कामाची दखल घेऊन राज्य सरकारने त्यांना जिजामाता कृषीभूषण पुरस्काराने गौरविले आहे. केवळ 'चूल आणि मूल' या मध्ये न रमता भोवतालच्या स्त्रियांनी काळ्या मातीतही थोडे रमावे, असे सांगण्यास त्या विसरत नाहीत.

  • फारुक बागवान, माहिती सहाय्यक, उप माहिती कार्यालय, पंढरपूर
  • Wednesday, June 6, 2012

    किराणा दुकानाने सावरला संसार

    पतीच्या निधनानंतर शकुंतलाबाई खचल्या. मात्र बचतगटाच्यामार्फत त्यांनी किराणा दुकान थाटले. त्यातून त्यांनी आपला संसार सुरळीत केला. बँकेचे कर्ज फेडले. आज त्या स्वबळावर कुटुंब चालवीत आहेत. यात त्या यशस्वीही झाल्या आहेत.

    चंद्रपूर जिल्ह्यातील कान्पा या गावातील माई महिला स्वयंसहायक बचतगटामध्ये शकुंतलाबाईंना अध्यक्ष म्हणून नेमलेले होते. दोन मुली व एक मुलगा असा त्यांचा परिवार आहे. त्यांच्या पतींच्या मृत्युला दहा वर्षे झाली. पती गेल्यानंतर त्यांना जबर धक्का बसला. त्या धक्क्यातून सावरणे सहजसाध्य नव्हते. परंतु समोर मुलांचे पूर्ण आयुष्य उभे होते. मुलांचे शिक्षण आणि इतर जबाबदाऱ्या हे सगळे करता असताना त्यांची तारेवरची कसरत होत असे.

    संसाराचे ओझे वाहत असताना त्या कधी कधी निराश व्हायच्या. असेच एकदा बचतगटाची बैठक होती. या बैठकीमध्ये वेगवेगळ्या योजना किंवा उदरनिर्वाहाकरिता काय करावे याबाबत चर्चा आणि मार्गदर्शन होत होते. यातून शकुंतलाबाईंनी आपणास काही करता येणे शक्य आहे का, याची चाचपणी सुरू केली. काही तरी करायचेच अशी मनात गाठ बांधून त्यांनी निर्धार केला, आता आपल्याला जगायचे असेल व समाजात ताठ मानेने वावरायचे असेल तर काही तरी धडपड केल्याशिवाय शक्य नाही.

    आपल्या परिसरात कुठला व्यवसाय चालू शकेल याचा त्यांनी अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी किराणा दुकान या व्यवसायाकडे वळावे, असे ठरविले. पण किराणा दुकान म्हटले की पैसा हवा असतो. त्यासाठी त्यांना पैशाची चणचण भासायला लागली. या अडचणीमध्ये काय करावे सुचत नसताना आणखी एकदा बचतगटाच्या बैठकीत सहभागी व्हायची संधी मिळाली. त्या बैठकीत त्यांनी आपली समस्या मांडली. गटातील इतर महिलांनी ती समस्या सोडविण्यासाठी चर्चा करून त्यांना किराणा दुकानाकरिता बँकेकडून कर्ज घेण्याचा पर्याय सुचविला. तसा प्रस्ताव बचत गटामार्फत बँकेस सादर करण्यात आला.

    बँकेने 20 हजार रुपयांचे कर्ज मंजूर केले. त्यानंतर शकुंतलाबाईंनी त्या पैशाद्वारे किराणा दुकान थाटले. त्या दुकानामध्ये नित्योपयोगी सामान लावले. त्याला गावतून प्रतिसादही चांगला मिळाला. आता त्यावर त्या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू लागल्या आहेत. या व्यवसायामधून जमा झालेल्या रकमेतून त्यांच्या मुलीचे लग्न झाले आहे. बँकेचे सर्व कर्ज सुद्धा त्यांनी परत केले आहे. आज त्या समाधानाने जगत आहेत, अर्थातच त्यांच्या आयुष्यात आलेल्या बदलासाठी बचतगटाला धन्यवाद देतच...

  • जिल्हा माहिती अधिकारी, चंद्रपूर.
  • Saturday, June 2, 2012

    बांगड्या व्यवसायातून मिळाली दिशा

    अलंकार परिधान केल्याशिवाय सुहासिनी शोभून दिसत नाही. सुहासिनीच्या हातात बांगड्या नसतील तर हात सुनेसुने वाटतात. मंगळसूत्राप्रमाणेच कपाळावरील कुंकवाची किंमत असलेली हातातील बांगडी पतीवरील प्रेमही व्यक्त करते. पूर्वी या बांगड्या विकण्याचे काम पुरूष करायचे. यात प्रामुख्याने मुस्लिम समाजाची मक्तेदारी होती. ते गावोगावी भटकून आपला व्यवसाय करायचे. कालांतराने मुस्लिम महिलाही या व्यवसायात उतरल्या. आठवडी बाजार, जत्रा आणि विवाह सोहळ्यात त्या जाऊ लागल्या. आता हा व्यवसाय मुस्लिम समाजाबरोबर इतर समाजही करू लागला आहे. याच व्यवसायाला हेरून चंद्रपूर जिल्ह्याच्या खडकी येथील बचतगटातील सदस्यांनी बांगड्या विकण्याचा व्यवसाय सुरू केला आहे.

    नागभीड तालुक्यातील खडकी हे गाव. या गावातील महिला पंचशील महिला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या सदस्य आहेत. त्यातीलच एक निर्मलाताई एकादश मेश्राम यांचे शिक्षण चौथीपर्यंतचे. पती, दोन मुली आणि एक मुलगा असा त्यांचा परिवार. शेतीची कामे संपली की, हात रिकामे असायचे. तेव्हा पोटापाण्याचा प्रश्न तीव्र व्हायचा. कामासाठी अनेक कुटुंब बाहेरगावी जायची. त्याला मेश्राम कुटुंबही अपवाद नव्हते. बाहेरगावात कामासाठी गेल्यावर मुलाबाळांची जबाबदारी दुसऱ्यावर टाकणे हा एकच पर्याय त्यांच्यासमोर असायचा. यात मुलाबाळांची मोठी हेळसांड व्हायची. या त्रासावर विजय मिळवायचा कसा हा विचार निर्मलाबाईंच्या डोक्यात घोळत होता, पण मार्ग दिसत नव्हता.

    शेवटी बचतगटाच्या सभेमध्ये त्यांनी आपली अडचण मांडली. चर्चेनंतर बांगड्या व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या व्यवसायासाठी त्यांनी बचतगटातून कर्ज घेतले. त्यानंतर त्यांचा संघर्ष सुरू झाला. गावोगावी जाऊन त्यांनी बांगड्या विकणे सुरू केले. आता त्यांचा हा व्यवसाय वाढला आहे. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी बचतगटाकडून घेतलेले कर्ज परत केले आहे. आपली मुले शिक्षणात समोर असल्याचे निर्मलाताईंनी ओळखले होते. निर्मलाताईंनी आपल्या मुलीस शिक्षणाकरिता ब्रम्हपूरीला पाठविले. त्यांच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च या व्यवसायातून भागविला जातोय. इतर मुलांचेही शिक्षण त्या करीत आहेत. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात महिला आर्थिक विकास महामंडळाचे प्रदर्शन भरले. त्यातही त्या सहभागी झाल्या.

    महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मदतीने हे सर्व करता आल्याचे निर्मलाताईंनी सांगितले. या कामात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहयोगिनींचे वेळोवेळी सहकार्य आणि मार्गदर्शन मिळाले. जिल्हास्तरावर महामंडळाच्या माध्यमातून दरवर्षी प्रदर्शन भरविले जाते. या प्रदर्शनात मला भाग घ्यायचा आहे, त्यात मला माझ्या बांगड्यांची विक्री करायची आहे, निर्मलाताई आता विश्वासाने बोलू लागल्या आहेत.

  • जिल्हा माहिती अधिकारी, चंद्रपूर
  • Saturday, May 12, 2012

    निर्मिती स्वयंसहाय्यता बचतगटाची आर्थिक भरारी

    बचतगटातील महिलांनी एकत्र येऊन व्यवसाय करणे ही बाब आता नवी राहिलेली नाही. बचतगटाच्या माध्यमातून एकत्र येऊन महिला आपल्या व्यवसायात जम बसवू लागल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांनी देखील हे दाखवून दिले आहे.

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यापासून नेरूर हे गाव १० कि.मी. अंतरावर वसलेले आहे. कोकणातील इतर गावांप्रमाणेच या गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून शेतीमध्ये तांदूळ, भूईमूग, कुळीथ, उडीद, सूर्यफूल, कलिंगड, नाचणी यासारखी पिके घेतली जातात. गावामध्ये दुग्धव्यवसाय व गांडूळ खत निर्मिती व विक्री यासारखे लहान मोठे व्यवसाय देखील केले जातात. ६००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या या गावाचा विस्तारही खूप मोठा आहे.

    गावामध्ये इतर सोयी सुविधा असल्या तरी बचतगट मोठ्या प्रमाणावर कार्यरत नव्हते. त्यामुळे दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या महिलांनी एकत्र येऊन बचतगट स्थापन करण्याचे ठरविले. या स्वयंसहाय्यता गटाला निर्मिती स्वयंसहाय्यता बचतगट असे नाव देण्यात आले. त्यांनतर गटाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून दिनांक २४ मार्च २०१२ रोजी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या नेरूर शाखेत खाते उघडण्यात आले. या गटामध्ये १२ सदस्य आहेत.

    या गटाला सहा महिने पूर्ण झाल्यानंतर गटाचे प्रथम मूल्यांकन करून २० हजार रूपये इतका फिरता निधी देण्यात आला. या फिरत्या निधीचा वापर गटातील सदस्यांनी कुक्कूटपालन, भाजी विक्री, नारळ विक्री यासारख्या छोट्या व्यवसायासाठी तसेच शौचालय व गोबरगॅस बांधकामासाठी केला. या गटाला वेळोवेळी गोमुख संस्था, कुडाळ पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे.

    फिरत्या निधीचा वापर केल्यानंतर या गटातील सदस्यांनी काथ्या व्यवसाय करण्याचा निश्चय केला व त्याचे एक महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले. या गटाचे दुसरे मूल्यांकन होऊन काथ्या व्यवसायासाठी २.५० लाख रूपये मंजूर करण्यात आले. याचा उपयोग गटाने काथ्यापासून दोऱ्या, पायपुसणी, गाद्या या सर्व प्रकारच्या शोभेच्या आणि कलाकुसरीच्या वस्तू तयार करण्यासाठी केला. यासाठी लागणारा चांगल्या प्रतीचा काथा केरळमधून खरेदी करण्यात आला. या काथ्यापासून तयार झालेल्या वस्तुंना स्थानिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे. त्यामुळे गटाला हा व्यवसाय फायदेशीर ठरत आहे. या व्यवसायातून गटाला बँकेचा हप्ता भरून व इतर खर्च वजा करून १७०० ते १९०० रूपये पर्यंत मासिक फायदा होत आहे.

    या गटातील महिला या गावातील ग्रामसभेत स्वच्छता मोहिमेत भाग घेतात, तसेच इतर सामाजिक कार्यक्रमातही सहभागी होतात. अलिकडेच ऑगस्ट २००७-०८ मध्ये दिल्ली येथे प्रादेशिक सरस प्रदर्शनामध्ये हा गट सहभागी झाला होता. निर्मिती स्वयंसहाय्यता गटातील सदस्य स्वतःबरोबरच गावातील इतर महिलांचाही गटाच्या माध्यमातून कसा विकास होईल, याकडेही लक्ष देत आहेत. एकूणच बचतगटांच्या माध्यमातून एकत्र आल्याने क्षमतांचा विकास होऊन महिला आर्थिक भरारी घेऊ लागल्या आहेत, हे निश्चित.

    Thursday, April 26, 2012

    बचतगटाचा बॅग उद्योग

    महिला बचतगटांच्यावतीने वेगवेगळ्या प्रकारचे छोटेमोठे उद्योग स्थापन केले जात आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील अनेक गटांनी तर नवल करावे इतके चांगले उद्योग स्थापन करुन आर्थिक समृद्धी निर्माण केली आहे. बाभुळगाव तालुक्यातील वरुड येथील या फरीदबाबा महिला बचतगटाने बॅग उद्योगासह बकरी पालनाचा उद्योग सुरु करुन गटांसाठी एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

    वरूड या गावातील दहा महिलांनी एकत्र येऊन बचतगटाची स्थापना केली. सुरुवातीस प्रत्येकीने ५० रुपये बचत करुन पैसा जमा केला. गटात जमा झालेल्या पैशातून २००७ साली गटाने बॅग उद्योग सुरु केला. आकर्षक आणि फॅन्सी बॅगांना बाजारात मागणी आहे. त्यामुळे अशा बॅगांची निर्मिती केल्यास त्यातून चांगले उत्पन्न मिळू शकते हा दृष्टीकोन समोर ठेवून गटातील महिलांनी घरीच बॅगा बनविण्याचे काम सुरु केले.

    २०१० मध्ये गटाला खेळते भांडवल मिळाले. तेव्हापासून या उद्योगाला अधिक चालना मिळाली असल्याचे सुलोचना बिसेन यांनी सांगितले. गटात काही महिला स्वत:च मशिनकाम करणाऱ्या असल्याने बॅगांवर शिलाईची कामे करणे सोयीचे झाले. त्यामुळे खर्च कमी झाल्याने उत्पन्नातही वाढ झाली. खेळत्या भांडवलाची परतफेड केल्यानंतर २०१० मध्येच या गटाला एक लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले. आता महिलांचा हा उद्योग उत्तम स्थितीत सुरू असून उद्योगासाठी महिलांनी जागाही किरायाने घेतली आहे. ज्या महिलांना शिवणकाम येते त्या महिल्या आपआपल्या घरीच बॅगा शिलाईचे काम करीत असल्याने त्यांचा वेळही वाचतो.

    गटातील सुलोचना बिसेन व अरुणा मिलमिले या महिलांनी रेल्वे सिंधी येथे बॅग बनविण्याचे प्रशिक्षण घेतले असून गटातील इतर महिलांना त्यांनी प्रशिक्षित केले आहे. बॅगांसोबतच लोकरी स्टूल आसन, टेबल आसन, कापडी बसायचे आसन, लोकरी व कापडी बटवे, पिशव्या, लेदरच्या बॅगाही गटातील महिला उत्कृष्टपणे तयार करतात. वेलवेटच्या कापडाचा कच्चा माल नागपूरवरुन मागविला जातो. महिलांचा हा व्यवसाय चांगला नफ्यात चालल्याने केवळ एकाच वर्षात गटाने एक लाख रुपयांच्या कर्जाची परतफेड केली आहे.

    बॅग उद्योगासोबतच बकरी पालनाचाही व्यवसाय गटाच्यावतीने केला जात आहे. यासाठीही गटाला खेळत्या भांडवलातून एक लाख रुपयांच्या बकऱ्या मिळाल्या आहेत. गटातील प्रत्येक महिलेला पाच बकऱ्या देण्यात आल्या असून या व्यवसायातूनही गटाला मासिक पाच हजार रुपये इतका नफा मिळतो. गटातील प्रत्येक महिला बॅग उद्योग व बकरी पालनाचा व्यवसाय स्वत:चा असल्याचे समजून काम करीत असल्याने गट नफ्यात असल्याचे सुलोचना बिसेन यांनी सांगितले. गटाच्यावतीने उत्पादीत बॅगांचा दर्जा, त्यातील आकर्षकपणा व ग्राहकांना अपेक्षित असलेल्या बॅगांचीच निर्मिती आम्ही करीत असल्याने बॅगांना चांगली मागणी असल्याचे त्या सांगतात. जिल्हा व विभागीय स्तरावर आयोजित बचतगटांच्या विक्री व प्रदर्शनीमध्ये बॅगा हातोहात विकल्या जातात, असे त्या म्हणाल्या.

  • मंगेश वरकड
  • Sunday, April 22, 2012

    शेळी पालनासोबत मूर्तीकलेच्या जोडधंद्याने बचतगटाला दिले बळ

    शेळी पालन हा व्यवसाय फायदेशीर असल्याचा प्रत्यय अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ येथील आझाद महिला बचतगटाच्या महिलांना आला आहे. थेंबे-थेंबे तळे साचे असे पै नि पै गोळा करुन या महिलांनी शेळी पालन व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या कुटुबांची प्रगतीकडे वाटचाल सुरू केली. यासोबतच सुरू केलेल्या मूर्तीकलेच्या जोडधंद्याने बचतगटाला बळ दिले आहे.

    कुटुंबाला हातभार लागावा, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत व्हावी हा नेमका उद्देश डोळ्यासमोर ठेवून अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ येथे सन २००७ मध्ये आझाद महिला बचतगट स्थापन झाला. या गटामध्ये १३ महिला असून दारिद्र्य रेषेखाली १० सदस्य तर ३ सदस्य दारिद्र्य रेषेवरील आहेत. सौ.छाया राजू पोहणकर आझाद महिला बचतगटाच्या अध्यक्ष तर सौ.शालिनी मधुकरराव पेढेकर सचिव होत्या.

    अमरावती पंचायत समितीतर्फे सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेअंतर्गत या गटाला शेळी पालन व्यवसायासाठी २५ हजार रूपयांचे फिरते भांडवल मिळाले. या कर्जाच्या रकमेतून त्यांनी शेळ्या खरेदी केल्या. शेळ्यांचे देखभाल व त्यांचे संगोपन करुन एकाच वर्षात आझाद बचतगटाने कर्जाची परतफेड केली.

    बचतगटातील महिला एवढ्यावरच न थांबता एक पाऊल पुढे टाकण्याचा निर्धार करुन शेळी पालन व्यवसायासोबतच जोड धंदा म्हणून त्यांनी मूर्तीकला उद्योग निवडला आणि थेट जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (डी.आर.डी.ए.) कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मूर्तीकला व्यवसायासाठी त्यांनी कर्जाची मागणी केली. त्यासाठी रितसर अर्ज भरुन कार्यालयात सादर केले. प्रकल्प संचालकांनी या महिलांची व्यवसाय करण्याची जिद्द पाहून २ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज प्रकरण शिफारस करुन बँकेकडे मंजूरीसाठी पाठविले. बँकेने आझाद महिला बचतगटाला २ लाख ५० हजार रुपये कर्ज मंजूर केले.

    प्रथम टप्प्यात बँकेने १ लाख २५ हजार रुपयांचा हप्ता दिला. मंजूर झालेली रक्कम घेऊन बचतगटातील १३ महिलांनी देवी देवतांच्या मूर्ती स्वत: बनविण्याचे काम सुरू केले. स्वत: काम केल्याने त्यांचा मजूरीचा खर्च वाचला. यामुळे पैशाची मोठी बचत झाली. मूर्तीकला व्यवसायातून दर महिन्याकाठी मूर्ती विक्री खर्च वजा जाता १५ हजार रुपये शिल्लक राहू लागले. यातून कर्जाची नियमित परतफेड करण्यास फार मोठी मदत झाली आणि काही दिवसांतच बँकेच्या १ लाख २५ हजार रूपयांच्या कर्जाची परतफेड झाली. बाहेरून व्यापारी येतात व ठोक भावाने मूर्ती विकत घेतात. यामुळे ठोक नगदी रक्कम हातात मिळते.

    अमरावती येथे २४ फेब्रुवारी ते १ मार्च २०१२ पर्यंत विभागीय प्रदर्शन व विक्रीमध्ये मूर्तींची जवळपास ४० हजार रुपयांची विक्री झाली असल्याचे पोहणकर यांनी सांगितले. यातून सर्व महिलांना आपला रोजगार मिळत आहे. संसाराला लागणारी रक्कम ठेवून त्या बाकी रक्कम बँकेत जमा ठेवतात. यामुळे महिलांच्या घरात सुख शांती नांदत असल्याचे त्या सांगतात.

    सामूहिक जोड व्यवसायाला शासन सातत्याने प्रोत्साहन देत आले आहे. आझाद महिला बचतगटाच्या महिलांनी शेळी पालन व्यवसायासोबत सुरू केलेला मूर्तीकलेचा जोडधंदा आणि त्याला मिळालेले प्रोत्साहन हे शासनाच्या प्रयत्नांना अधोरेखित करणारेच आहे.

  • शामलाल कास्देकर
  • Wednesday, April 18, 2012

    बचतगटामुळे उद्योग क्षमता विकसित झाली

    बचतगटामध्ये सहभागी झाल्याने महिलांमधील सुप्त गुणांना वाव मिळून त्या अनुषंगाने काम करण्याची संधी प्राप्त होते. रमाबाई महिला बचतगटालाही यामुळेच उद्योगक्षमता विकसित करण्याची संधी प्राप्त झाली, असे गोरवोद्गार आहेत वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील पांगरीकुटे येथील रमाबाई महिला बचतगटांच्या सदस्यांचेच. बचतीतून उद्योग व्यवसाय सुरु करण्यापर्यंतची त्यांची ही यशोगाथा.

    लोकसंचालित साधन केंद्र मालेगाव-२ अंतर्गत येत असलेल्या पांगरीकुटे गावामध्ये १० बचतगटांची स्थापना करण्यात आलेली आहे. २००२ पासूनच या गावातील बचतगट महिला आर्थिक विकास महामंडळ वाशिम यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहेत. माविमचे जिल्हा समन्वयक प्रकाश गणवीर यांनी या गावातील महिलांना बचतगट स्थापन करुन आर्थिक प्रगती साधण्याबाबत तसेच सामाजिक एकोपा जपण्याबाबत मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाचाच परिणाम म्हणून या गावामध्ये बचतगटाची स्थापना व्हायला सुरूवात झाली.

    सन २००२ मध्ये वंदना गायकवाड, सौ.बेबी गायकवाड यांनी पुढाकार घेऊन रमाबाई स्वयंसहाय्यता बचतगट स्थापन केला. नियमाप्रमाणे नियमित बचत भरणे सुरु झाले. माविमतर्फे प्रशिक्षण मिळत गेले. महिला बँकेत, पंचायत समिती मध्ये स्वत: जाऊन स्वत:चे काम करु लागल्या. काम करता करता त्यांच्यामध्ये धाडस निर्माण झाले. रमाबाई गटामध्ये एकूण ११ महिला सहभागी झाल्या. यातील ८ महिला जेमतेत शिक्षित होत्या. ३ मात्र अक्षरशून्य होत्या. निरक्षर असल्याने त्यांना व्यवहाराच्या अडचणी यायच्या. या तीन महिलांना साक्षर करण्याची जबाबदारी इतर शिक्षित सदस्यांनी घेतली आणि काही काळानंतर निरक्षर महिलाही साक्षर झाल्या.

    बचतगटामार्फत बचत केलेल्या रुपयांतून अंतर्गत कर्ज व्यवहार सुरू झाले. केवळ अंतर्गत कर्जावर या महिलांनी समाधान मानले नाही तर आपण काहीतरी उद्योग केला पाहिजे, असा विचार पुढे आला. सर्वप्रथम त्यांनी माविमतर्फे उद्योग कसे करावेत, याची माहिती प्रशिक्षणाद्वारे जाणून घेतली. त्यानंतर सन २००६ मध्ये आपला स्वत:चा कापड उद्योग गावातच सुरु केला. त्यासाठी त्यांनी बँकेतर्फे स्वर्णजयंती योजनेतून कर्ज घेतले महिलांनी सुरू केलेल्या कापड व्यवसायाला सुरूवातीला गावातील महिलांनी कापड खरेदी करुन प्रतिसाद दिला. नंतर हळूहळू गावातील पुरूष मंडळीही कापड खरेदी करू लागले. ‘केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे’ या उक्तीचा प्रत्यय महिलांना आला. त्यांची आर्थिक प्रगती साधली गेली.

    या दुकानातून बालविकास प्रकल्प अधिकारी, माविमचे अधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी कापड खरेदी करतात. त्यामुळे उद्योग करण्यास बळ मिळते, असे या गटातील महिलांचे म्हणणे आहे. या गटातील महिलांनी कापड उद्योगाबरोबरच सहयोगिनी कु.विमल भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली मसाला, कुरडया, पापड, परसबागेचाही उपक्रम सुरु केला आहे. सावित्रीची लेक म्हणून त्यांनी आपले नाव सार्थ केल्याचे त्यांच्या कामातून दाखवून दिले आहे. बचतगटामुळेच महिलांमधील उद्योग क्षमता विकसित झाली असल्याचा गटातील महिलांचा विश्वास आहे.

    बचतगटाने महिलांना केले रोजंदारीतून मुक्त

    ‘अठरा विश्व दारिद्र्य’ असल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी रोजमजूरीशिवाय पर्याय नव्हता, सतत मजूरीची कामे मिळतील ही आशा नव्हती, त्यामुळे कुटुंबातील समस्यांना तोंड द्यावे लागत असे. मात्र मागील सहा महिन्यापासून आमच्या महिला बचतगटाने दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री सुरु केल्यामुळे आम्हा महिलांजवळ दररोज पैशाची चांगली आवक होत आहे. यामुळेच आमची रोजंदारीतून मुक्तता झाली असल्याची भावना संत रोहिदास महिला बचतगटाच्या उपाध्यक्षा श्रीमती लक्ष्मीबाई सुखदेवराव झोटे यांनी बचतगटाच्या उपक्रमाची माहिती देताना व्यक्त केली.

    बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेड राजा तालुक्यातील वाघजई हे सुमारे ८५० लोकवस्तीचे गाव. गावात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांची संख्या अधिक. आता गावागावात बचतगटाची चळवळ गतिमान होत आहे. त्यामुळे या गावातही दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील महिलांना विस्तार अधिकारी जी.एम.पोफळे यांनी मागदर्शन करुन बचतगट स्थापन करण्यास प्रोत्साहीत केले. संत रोहिदास महिला बचतगट हा त्यापैकीच एक आहे.

    या गटाची स्थापना १० मे २००९ रोजी झाली. दरमहा प्रत्येक सदस्याने १०० रुपये प्रमाणे बचतीला सुरुवात केली. पदरमोड करुन पै-पै जमविणाऱ्या या १० महिला सदस्यांच्या बचतीच्या सवयीमुळे किन्हीराजा येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेने सन २०१० मध्ये त्यांना २० हजार रुपये कर्ज दिले. या रकमेतून या महिलांनी खवा विक्रीला सुरुवात केली. विशेष म्हणजे या परिसरातीलच गावांमध्ये रोज एका सदस्याने खवा विक्रीसाठी नेण्याचा उपक्रम सुरु केला. सर्वांच्या प्रामाणिकपणामुळे हा व्यवसाय त्यांनी २० हजारांवरुन ३५ हजारांपर्यंत वाढविला.

    संत रोहिदास महिला बचतगटातील सदस्यांच्या जिद्द व चिकाटीची दखल घेत बँकेने ऑगस्ट २०११ मध्ये १ लाख २५ हजार रुपयांच्या कर्जाचा पहिला हप्ता मंजूर केला. या मोठ्या रकमेमुळे बचतगटाला आर्थिक विकासाची दिशा गवसली. जाफराबादी, मुऱ्हा, गावरान अशा प्रकारच्या सात दुधाळ म्हशीची खरेदी महिलांनी केली. ग्रामीण भागातील या महिला व्यवहारात कुठे फसू नयेत, त्यांच्या बचतगटाला तोटा सहन करण्याची वेळ येऊ नये यासाठी या गावातील सामाजिक कार्यकर्ते सुखदेवराव झोटे आणि बाबूराव सानप निस्वार्थपणे मागदर्शन करीत असल्याचे बचतगटाच्या सचिव तथा गावच्या उपसरपंच शकुंतला भास्कर बोराडे यांनी सांगितले.

    या बचतगटाने खरेदी केलेल्या सात म्हशीपासून दररोज ७० लिटर दूध मिळू लागले आणि प्रत्येक म्हशीच्या दुधापासून दोन ते अडीच किलो या प्रमाणे सुमारे १५ किलोचे खव्याचे दररोज उत्पादन होऊ लागले. २०११ च्या दिवाळीमध्ये खव्याची मागणी वाढली. साधारणत: दोनशे पन्नास रुपये किलो दराने खवा विक्री सुरु झाली. दूध आणि खवा विक्रीमुळे आमच्या बचतगटावर लक्ष्मी प्रसन्न झाल्याचे दिसून आल्याचे गटातील सदस्यांचे म्हणणे आहे.

    म्हशीची निगा कशी राखावी, दुधामधे वाढ करण्यासाठी म्हशींना काय आहार द्यावा याबाबत पशूधन अधिकारी डॉ.उदार यांचे मार्गदर्शन मिळत असल्याचे सदस्य सांगतात. त्यानुसार प्रत्येक म्हशीला दररोज पाच किलो सरकी ढेप, १५ किलो हिरवा चारा, ७ ते ८ किलो कडबा कुटार असा आहार दिला. त्यामुळे प्रत्येक म्हशीपासून १४ ते १५ लिटर दूध मिळू लागले. दररोज सुमारे १०० लिटर दुधाच्या उत्पादनामुळे दर आठवड्याला १० हजार रुपयांची आवक सुरु झाली. या दुग्धोत्पादनामुळे खवा, पेढा, तूप, दही असे विविध दुग्धजन्य पदार्थ गावानजिक दुसरबीड शहरातील स्वीटमार्ट व हॉटेलमध्ये पाठविले जाऊ लागले. उत्पन्न वाढल्याने बँकेच्या कर्जाची परतफेड करण्यात आली.

    बचतगटाची कर्ज परतफेडीची वृत्ती बँकेने स्वागतार्ह मानली व लगेच १ लाख २५ हजार रुपयांचा कर्जाचा दुसरा हप्ता मंजूर केला. त्यामुळे या महिला बचतगटांच्या सदस्यांचा उत्साह अजून वाढला. दुग्ध व्यवसायामुळे सर्व महिला सदस्यांजवळ पैसा खेळू लागला आणि त्यांची रोजमजूरीतून मुक्तता झाली. आमचे कुटुंब दारिद्र्यरेषेच्या वर येण्यास ही बचतगटाची चळवळच प्रेरणादायी ठरत आहे, असेही या बचतगटांच्या महिला अभिमानाने सांगतात.

    हा महिला बचतगट आर्थिक विकास तर साधतच आहे मात्र सामाजिक समस्यांची जाणीवही या महिलांना आहे. या बचतगटाच्या सचिव तथा उपसरपंच असलेल्या शकुंतला बोराडे व महिला सदस्या ग्रामस्वच्छता अभियानात, तंटामुक्ती अभियानात, राष्ट्रीय उत्सवात हिरिरीने सहभागी होतात. लेक वाचवा या अभियानाच्या माध्यमातूनही जनजागृतीचे मोठे कार्य ह्या महिला करीत आहेत. या महिला बचतगटांचा बुलढाणा येथे जिल्हास्तरावर मॉ जिजाऊ या प्रथम पुरस्काराने गौरव करण्यात आला इतकेच नव्हे तर अमरावती येथे सायंस्कोर मैदानावर नुकत्याच संपन्न झालेल्या विकास गंगोत्री या विभागस्तरीय प्रदर्शनीत तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.


  • अशोक खडसे

  • Tuesday, April 10, 2012

    सावित्रीबाई फुले गटाचे उद्योगामध्ये पुढचे पाऊल

    बचतगटांच्या माध्यमातून मागील काही वर्षांमध्ये राज्यात प्रचंड क्रांती घडून आली आहे. नव्हत्याचे होते करणाऱ्या या उपक्रमामुळे वाशिम जिल्ह्यातील सावळीच्या सावित्रीबाई फुले बचतगटाच्या महिलांनी बकरी पालनाच्या माध्यमातून स्वत:ला सिद्ध करून दाखविले आहे.

    सावळी हे वाशिम पासून सुमारे ३० कि.मी. अंतरावरचं गाव. एकूण ८ बचतगट असलेल्या या गावातील महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे स्थापित सावित्रीबाई फुले स्वयंसहायता महिला बचतगटाची स्थापना सुमारे सहा वर्षांपूर्वी झाली. सुरुवातीला या महिलांना बचतीचे महत्व पटवून दिल्यानंतर ११ महिलांनी एकत्र येऊन प्रति महिना ५० रुपये प्रमाणे बचत करण्यास सुरूवात केली आणि बघता बघता त्यांनी एकत्र कधीच न पाहिलेली रक्कम गटाकडे जमा व्हायला सुरूवात झाली.

    काही महिन्यांनंतर या महिलांनी अंतर्गत व्यवहार करुन आपल्या छोट्या छोट्या अडीअडचणी दूर करण्यास सुरूवात केली. त्यांनी बचतीमध्ये मात्र खंड पडू दिला नाही. सुरळीत बचत आणि अंतर्गत व्यवहाराची व्याजासह परतफेड पाहून लवकरच त्यांच्या गटाचे पंचायत समितीद्वारे प्रथम ग्रेडेशन करण्यात आले व त्यांना २५ हजार रुपयांचा फिरता निधी मंजूर झाला. आयुष्यात आपण कधी व्यवसाय करू शकू असे स्वप्नातही न पाहिलेल्या महिलांसाठी ही आर्थिक मदत म्हणजे एखादा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठी संधीच होती. या कर्जाची त्यांनी अल्पावधीतच परतफेड केली आणि बँकेचा विश्वास संपादन केला.

    फेब्रुवारी २००८ मध्ये सावित्रीबाई फुले स्वयंसहायता महिला बचतगटाचा कर्जासाठीचा दुसरा प्रस्ताव मंजूर झाला आणि त्यांनी बकरी पालनाचा व्यवसाय निवडला. त्यांना ४० बकऱ्या मिळाल्या. यामधून या गटातील महिला जोड व्यवसाय करु लागल्या. बकऱ्यांपासून पिल्ले तयार झाली आणि पाहता पाहता सावित्रीबाई बचतगटाची आर्थिक परिस्थिती सुधारली. त्यातूनच बँकेच्या कर्जाची परतफेड व्याजासह होऊ लागली. या परिस्थितीतही नियमित बचत सुरूच ठेवल्याने आज त्यांची बचत २५ हजार रुपये झाली आहे.

    ज्या महिला मजुरी करुन पोट भरत होत्या त्या आज बँक बॅलन्स ठेवायला लागल्या ही या गटाची जमेची बाजू आहे. आर्थिक परिस्थिती सुधारली यामुळे साहजिकच त्यांच्या राहणीमानात बदल झाला. वैचारिक पातळीही सकारात्मक झाली. अनसिंग लोकसंचालित साधन केंद्राद्वारे वेळोवेळी देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणातून व बँक व्यवहारातून बौद्धिक वाढ झाली. त्यांच्यात सक्षमीकरणाची, बळकटीकरणाची ताकद आली त्यामुळे आज गटातील प्रत्येक महिलेला बँक व्यवहार व व्यवसाय म्हणजे काय ते कळते. आज महिला अबला नसून सबला झाली आहे. लहान मुलांसाठी बकरीचे दूध उपयुक्त ठरल्याने लहान मुलांचे स्वास्थ सुद्धा चांगले राहत आहे हा यातील आणखी एक फायदाच म्हणता येईल.

    सर्वच बाजूंनी विचार करता सावित्रीबाई फुले स्वयंसहायता महिला बचतगटाच्या महिलांना खऱ्या अर्थाने बचतगटाचा अर्थ समजला आणि त्या यशस्वी ठरल्या असे म्हणता येईल.