Showing posts with label मराठी. Show all posts
Showing posts with label मराठी. Show all posts

Saturday, August 4, 2012

ज्ञानभाषा मराठी सक्षमीकरण


अव्वल इंग्रजीच्या शिक्षणातूनच त्या पिढीतील संशोधकांना मराठीच्या जतनासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत याचं भान आलं. ते भान घेऊन पूर्णत: देशी पद्धतीने ही माणसं काम करत राहिली. मराठीला ज्ञानभाषा म्हणून सक्षम करण्यासाठी जाणीवपूर्वक टाकलेले पाऊल म्हणून ‘महाराष्ट्रीय ज्ञानकोशा’चे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हे तुरळक प्रयत्न वगळता पारतंत्र्यामुळे भारतावर इंग्रजी लादली गेली व देशी भाषा ज्ञानभाषा म्हणून विकसित होण्याची प्रक्रिया थंडावली. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात इंग्रजी हीच आपली आधुनिक जगातील ज्ञानभाषा झाली.

 
संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना होताच ज्या उद्दिष्टांसाठी भाषावार प्रांतरचना करण्यात आली होती, ती साध्य करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राचे पहिले द्रष्टे मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांनी त्वरित पावले उचलण्यास सुरूवात केली. मराठी ही केवळ शासनाच्या कामकाजाची भाषा होणे पुरेसे नाही तर ती व्यवहारभाषा व ज्ञानभाषा झाली पाहिजे, तसेच बदलत्या काळाची आव्हाने पेलण्यास सक्षम झाली पाहिजे यासाठी त्यांनी भाषा संचालनालय स्थापन केले तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, विश्वकोश मंडळ यांसारख्या संस्थांची उभारणी केली. या शिवाय लोकसाहित्य समिती, साहित्य परिषदा, विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळ यासारख्या अनेक संस्था शासनाच्या पुढाकाराने अथवा मदतीने भाषा-संवर्धनासाठी स्थापन झाल्या.

 
मराठी ही ज्ञानभाषा व्हायची असेल तर ती केवळ प्राथमिक शिक्षणाच्या स्तरावर न राहाता उच्च शिक्षणाचे माध्यम म्हणूनही तिचा वापर व्हावयास हवा. आधुनिक शास्त्रे ही प्रामुख्याने पाश्च्यात्य देशात उदयास आली व विकास पावली. त्यामुळे इंग्रजी व तत्सम भाषांत जी परिभाषा त्या-त्या शास्त्राबरोबर सहजगत्या निर्माण झाली व विकास पावली ती कृत्रिमपणे घडवण्याची गरज होती. त्यासाठी आधुनिक शास्त्रांच्या परिभाषा निर्मितीचे काम भाषा संचालनालयाने केले. आज मितीस, वैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी, मानविकी, विज्ञान इत्यादी विद्याशाखांमधील विषयांचे २७ परिभाषा कोश संचालनालयाने प्रकाशित केले आहेत. १९८० च्या दशकात राज्य मराठी विकास संस्थेची स्थापना झाली. राज्य मराठी विकास संस्था स्थापन करण्यापूर्वी जी समिती नेमली होती तिने आपल्या टिप्पणीच्या शेवटी म्हटले आहे, भाषेचा विकास हा अखेर भाषिकांचा विकास असतो. परिभाषा, साक्षरताप्रसार, शुद्धलेखनसुधारणा या किंवा अशा मोजक्या व अतिपरिचित विषयांमध्येच भाषेच्या विकासाचा विचार अडकून पडणे हिताचे नाही. राज्य मराठी विकास संस्थेची उद्दिष्टे ठरवताना याचा निश्चितच विचार केला गेला. कृषी, वैद्यक, उद्योग, व्यापार, विज्ञान, तंत्रज्ञान, प्रसारमाध्यमे इ.व्यवहारक्षेत्रांत मराठी भाषेचा वापर वाढविण्यासाठी आवश्यक साधनसामग्री विकसित करणे तसेच भाषिक वापराची यांत्रिक उपकरणे, संगणकीय आज्ञावली यांच्या वापरात सुसूत्रता व सुबोधता आणण्यासाठी शासनाला मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध करून देणे माहिती तंत्रज्ञानविषयक गरजा लक्षात घेऊन मराठीत अनुरूप आज्ञावली विकसित करणे मराठी भाषेतील माहितीचा पाया विस्तृत करणे ही संस्थेच्या स्थापनेमागील महत्त्वाची उद्दिष्टे होती. याशिवाय मराठी विज्ञान परिषदेसारख्या संस्था गेली अनेक वर्षे मराठीतून विज्ञानप्रसाराचे काम करीत आहेत.

 
या उपक्रमात मोठमोठे शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ सहभागी झाले आहेत. त्यांनी विज्ञान तंत्रज्ञानातील शब्दांना समर्पक मराठी शब्द शोधून त्यांचा वापर करून बरेच लिखाणही केले आहे. मराठी भाषेच्या अभिवृध्दीसाठी एवढ्या शासकीय व व्यावसायिक संस्था कार्यरत असल्यामुळे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा सुवर्ण महोत्सव साजरा होत असता मराठीची ज्ञानभाषा म्हणून भरीव प्रगती होणे अपेक्षित होते. परंतु या उलट मराठी भाषा आज अस्तित्वाचा लढा लढताना दिसून येते. सुरुवातीच्या भरीव कामगिरीनंतर गेल्या पंचवीस वर्षांत शासनाची व त्यामुळेच शासन-स्थापित संस्थांची मराठीबद्दलची आस्था प्रथम कमी होत गेली व जागतिकीकरणाचे वारे वाहू लागताच ती जवळजवळ नष्ट झाली. उद्दिष्ट पूर्तीसाठी काल मर्यादा निश्चित न करणे, ठरवलेल्या उद्दिष्टांचे बदललेल्या परिस्थितीत पुनरावलोकन न करणे, काही वेळा सक्षम नेतृत्त्वाचा अभाव व शासकीय अनास्था यामुळे या संस्था स्थापण्यामागील हेतू साध्य होऊ शकले नाहीत. मराठी ही एक सक्षम ज्ञानभाषा होण्याचा संबंध अनेक शैक्षणिक बाबींशी जोडलेला असतो. महाराष्ट्रातील विद्यापीठांसाठी १९९४ चा महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम हा कायदा आहे. त्या कायद्यातील कलम ५ अन्वये मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्याची जबाबदारी राज्यातील सर्व विद्यापीठांची आहे. परंतु या तरतुदीचा राज्यातील विद्यापीठांनी वापर केलेला नाही. आणि त्यामुळे ५० वर्षात मराठी भाषा उच्च शिक्षणाच्या सर्व शाखांमध्ये ज्ञानभाषा झालेली नाही.

 
ज्या भाषेचा वापर ज्ञानार्जनासाठी, ज्ञानसंवर्धनासाठी व ज्ञान आणि माहितीच्या आदान-प्रदानासाठी होत नाही अशा भाषेची झीज मोठ्या वेगाने होते, आणि भाषेचे भवितव्य फारतर बोली भाषा म्हणून रहाण्याचा धोका असतो. म्हणूनच मराठीला केवळ राजभाषा म्हणून मान्यता मिळून पुरेसे नाही. तिच्या विकासासाठी लोकभाषा आणि ज्ञानभाषा या दोन्ही पातळ्यांवर तिचे महत्त्व प्रस्थापित होणे आवश्यक आहे. प्रशासन, प्रसारमाध्यमे, उद्योगधंदे, विज्ञान-तंत्रज्ञान, विविध व्यवसाय या लोकव्यवहाराच्या सर्वच क्षेत्रात तिचा वापर वाढायला हवा. त्यासाठी सक्ती आणि संधी या दोन्ही मार्गांचा वापर करायला हवा.

 
मराठी ज्ञानभाषा व्हायला पाहिजे असेल तर प्रथम ती ज्ञानभाषा होऊ शकते असा जनतेच्या व शासनाच्या मनात विश्वास पाहिजे. या विश्वासाची खात्री पालकांनी आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी मराठी माध्यमाचा स्वीकार करून व शासनाने मराठी (वा देशी भाषांचे) माध्यम अनिवार्य करून दिली पाहिजे. परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आता शासनच (जिल्हापरिषदा, महानगर पालिका, आदिवासी विकास विभाग) इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करू लागले आहे. मराठी माध्यमाच्या गुणवत्तेविषयी पालकांच्या ढासळत्या आत्मविश्वासामुळे महाराष्ट्रातील केवळ शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातील सुशिक्षित, अर्धशिक्षित वा अशिक्षित जनतेतही मोठ्या प्रमाणावर इंग्रजी माध्यमाविषयी ओढ व मराठी माध्यमाविषयी न्यूनगंड निर्माण झाला आहे. ही ओढ एवढी प्रचंड आहे की भावनिक आवाहन व अस्मितेचा गौरव अशा तकलादू उपायांनी तिला आवर घालणे अशक्य आहे. इंग्रजीकडे झुकलेला हा कल प्रथम थोपवणे व नंतर मराठीकडे वळवणे हे शासनाचे घटनादत्त कर्तव्य आहे. ते पार पाडले नाही तर मराठी माध्यमातील शिक्षणावर विश्वास असणारा पालकवर्ग व मराठीतून शिक्षण घेऊन भविष्याचा पाया रचू पाहाणारे विद्यार्थी यांचा भ्रमनिरास होईल. शिक्षणाचे माध्यमच मराठी नसेल तर वर उल्लेख केलेल्या संस्थांच्या कामाला काहीच अर्थ राहणार नाही आणि तयार केलेले परिभाषा कोश केवळ गोदामातील अडगळ ठरेल.

 
सध्या आपण ज्ञानभाषा निर्मितीच्या प्राथमिक पातळीवर म्हणजे परिभाषा निर्मितीच्या आणि भाषांतराच्या पातळीवर आहोत. या बाबतीतला अनुशेष झपाट्याने वाढत आहे. तो भरून काढून मराठीतून नवीन ज्ञान व्यक्त करता येईल त्या दिवसाची आपण वाट पाहूया. म्हणजे भावी काळातील हिम्मतराव बावीस्करांना विंचू दंशावरील लसीचे संशोधन ‘लॅन्सेट’ मधे प्रसिद्ध करावे लागणार नाही आणि मराठीतील ज्ञानाचा मागोवा घेण्यासाठी परदेशातील विद्यापीठांना मराठीचे अध्यासन निर्माण करण्याची गरज भासेल!

 
  • शरद रामचंद्र गोखले

  • भाषा -- लोकजीवन समृद्ध करण्याचे साधन


    मराठी भाषा राज्यभाषा करण्याचे तत्त्व आपण स्वीकारले आहे. मराठी भाषेवर आता अशी जबाबदारी आली आहे, की तिने लोकशाहीचा कारभार केला पाहिजे, की ज्यामुळे ती लोकांचे जीवन संपन्न करील. सगळ्या अर्थाने संपन्न करील, असा याचा अर्थ नव्हे तर भौतिक अर्थाने जगातले जे जे शास्त्र उंचावते आहे त्या त्या शास्त्रातील ज्ञान आपल्या भाषेत पकडून आणण्याचे सामर्थ्य आपल्या भाषेत उपलब्ध केले पाहिजे. मराठी भाषेचे राज्य यशस्वी करण्यासाठी, मराठी माणसाच्या मनात जो ज्ञानेश्‍वर आहे, जो रामदास आहे, जो तुकाराम आहे आणि त्याच्या मनात जी मराठी माऊली आहे त्या सर्वांना जागे करण्याचा, माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी प्रयत्न करीन. कुणाच्या हातातला तराजू आणि कुणाची तिजोरी माझ्या या कामाच्या आड येईल, अशी भीती बाळगून मी हे काम करीत नाही. भाषेचा विकास हा केवळ त्या भाषेतील ललित साहित्याच्या संदर्भात होतो ही समजूत चुकीची आहे. निरनिराळ्या वैज्ञानिक शास्त्रांचा आविष्कार जेव्हा भाषा करू लागेल तेव्हाच तिचा खरा विकास झाला असे म्हणता येईल. तेव्हा साहित्यिकांबरोबर शास्त्रज्ञ, इतिहासकार, तत्त्ववेत्ते हे सर्व जण मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासास चालना देतील असा मला विश्‍वास वाटतो.

    राज्यभाषेचा दर्जा जेव्हा भाषेला प्राप्त होतो तेव्हा लोकजीवन समृद्ध करण्याचे एक महत्त्वाचे साधन म्हणून आपण त्या भाषेकडे पाहात असतो. वेगवेगळ्या साहित्य प्रकारांनी लोकजीवन समृद्ध होत असते. लोकजीवन समृद्ध करणे हे साहित्याचे अंग आहे, की नाही त्याचा तो उद्देश आहे की नाही, हा अर्थात वादाचा विषय होऊ शकेल; परंतु निदान त्याचा परिणाम तसा घडत असतो असे गृहीत धरून मी या गोष्टीची चर्चा करतो आहे आणि म्हणून मराठी भाषेचे राज्य झाल्यानंतर ज्ञानाच्या सर्व क्षेत्रांतील विचारांची संपदा तिने मराठी जीवनात आणली पाहिजे, ही जिम्मेदारी तिच्यावर आहे. त्याकरिता मराठी भाषा ही अधिक विचारप्रवाही झाली पाहिजे.

    मराठी भाषेवर लोकशाहीचा कारभार करण्याची आता जबाबदारी आलेली असून, तो तिने अशा रीतीने केला पाहिजे, की लोकांचे जीवन संपन्न होण्यास, समृद्ध होण्यास तिचे साहाय्य होईल. त्यासाठी भौतिकदृष्ट्या जगात जे जे शास्त्र उंचावलेले आहे त्या त्या शास्त्रातील ज्ञान आपल्यात उतरविण्याचे सामर्थ्य मराठी भाषेला प्राप्त झाले पाहिजे. साहित्याचा आणि संस्कृतीचा, विचारवंतांचा आणि लेखकांचा जन्म खरोखरी कशासाठी होत असतो? मी तर असे मानतो, की मानवी मनात अनेक मूक आशाआकांक्षा असतात, कल्पना असतात आणि त्या प्रगटीकरणासाठी, व्यक्तिमत्त्वासाठी, एकप्रकारे हाका मारीत असतात. शब्दासाठी त्या भुकेलेल्या असतात. तहानलेल्या असतात. त्यांच्या हाकेला ओ देऊन लेखक, विचारवंत, संशोधक वा शास्त्रज्ञ त्यांना लेखनाद्वारे शब्दरूप देत असतात. मराठी भाषिक जनतेच्याही अशा काही आशाआकांक्षा इच्छा असून, त्या विविध प्रवाही आहेत. त्यांना आपण लेखनद्वारे शब्दरूप दिले पाहिजे.
    यशवंतराव चव्हाण

    (
    यशवंतराव - विचार आणि वारसा ग्रंथातून साभार)

    समाज आणि भाषा


    मराठी भाषेचा सुमारे एक हजार वर्षांचा इतिहास हा काही सरळ वाढीचा व विकासाचा इतिहास नाही. प्रारंभीच्या पर्वात म्हणजे जवळजवळ सोळाव्या शतकापर्यंत संस्कृत विरुद्ध मराठी हा वाद निदान ज्ञानविज्ञानाच्या क्षेत्रात चालू होता. काव्यरचना मराठीत होत गेल्या हे खरे, महानुभव पंथाने मराठी ही अधिकृत धर्मभाषा म्हणून पुरस्कृत केली हेही खरे तथापि तरीही संत एकनाथांना संस्कृत वाणी देवे केले। प्राकृत काय चोरांपासुनी झाली ? असा खडा सवाल समाजाला विचारायलाच लागला. यादवांचे राज्य गेले व मराठीचा राजाश्रय संपुष्टात आला. पुढे मुस्लिम राजवटी सुरु झाल्या व या परतंत्र कालखंडातही फार्सी-अरबी शब्‍द मराठी हा मूक ताण मराठी भाषक सहन करीत होतेच. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज स्थापन केले, राज्यकारभारासाठी 'राज्यव्यवहार कोश' हा पारिभाषिक संज्ञा-संकल्पनांचा ग्रंथ निर्माण केला. याच सुमारास संस्कृत काव्याच्या धर्तीवरचे पण अस्सल मराठी पंडिती काव्य रचले जाऊ लागले. पुढे पेशवाई आली. या कालखंडात मराठी काव्याचा विस्तार झाला व उत्तर पेशवाईच्या काळात शाहिरांनी मराठी काव्याला खूपसे ऐहिक शृंगारिक वळण प्राप्त करुन दिले. थोडक्यात बाराव्या शतकापासून मराठी समाजाची भाषिक क्षमता व विविधांगी अभिव्यक्ती-कौशल्ये वाढविण्याची कामगिरी मराठी भाषेने केली. तीने समाजाला धर्माची व अध्यात्माची परिभाषा व प्रमेये शिकविली, पंडित कवींनी समाजाला संस्कृतातील विदग्ध काव्याची कलात्मकता शिकविली, तर विशाल जनसामान्यांचे नाट्यपूर्ण मनोरंजन करण्याची शाहिरी भाषा शाहिरांनी शिकविली. या प्राधान्याने इहवादी वळणाचा मात्र पुरेसा तर्कसंगत विकास झाला नाही नाहीतर मराठी गद्य हे देखील अठराव्या शतकातच जन्माला आले असते. जे गद्य लेखन झाले, ते बखरींच्या स्वरू पात, पौराणिक वळणाचे ! एकोणिसाव्या शतकात इंग्रजी राजवट आली व शासनभाषा इंग्लिश झाली. तेव्हापासून इंग्लिश विरुद्ध मराठी हा वाद सुरु झाला. हा वाद आजही काहीशा वेगळ्या संदर्भात चालूच आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडात हिंदी (व इंग्लिश) यांनाऑफिशिअल शासनभाषा म्हणून मान्यता मिळाली म्हणजे एक प्रकारे हिंदी - मराठी स्पर्धा कधी उघडपणे तर कधी प्रच्छन्नपणे सुरु झाली. ही भाषिक स्पर्धा आजही चालू आहे व हिंदीचे मराठीवर आक्रमण होत आहे. अशी तक्रार अधूनमधून करण्यातही येते, असे दिसून येईल.

    या भाषिक इतिहासाला राजकीय संदर्भ आहेच व तो मोठ्या महत्त्वाचाही आहे. राजकीय पारतंत्र्य हे दीर्घकाळ महाराष्ट्रात होतेच. पारतंत्र्याने संस्कृतीच्या सगळ्याच अंगांची गळचेपी होत असते व त्यात भाषाही अंतर्भूत आहेच आहे. मुस्लिम राजवटीत फार्सी-अरबी, इंग्रजी अमदानीत इंग्लिश व स्वतंत्र भारतात हिंदी यांना शासनभाषा म्हणून सर्वोच्च स्थान राहिले. मात्र भाषावार प्रांतरचनेमुळे जी जी भाषिक राज्ये निर्माण झाली, त्यात मराठी भाषकांचा महाराष्ट्रही आहे. महाराष्ट्राची अधिकृत शासनभाषा मराठी खरी पण प्रत्यक्ष परिस्थितीच अशी झाली आहे की, केवळ शासनव्यवहारातच नव्हे, तर इतर सर्व प्रकारच्या भाषा व्यवहारात हिंदी, इंग्रजी व मराठी या तीन भाषा मुक्तपणे वापरल्या जातात. याचा अर्थ भाषाव्यवहार हा केवळ राज्यकर्त्या भाषकांच्या भाषेवर अवलंबून नसतो, तो केवळ राजकीय स्वातंत्र्य वा पारतंत्र्य यावर विसंबून नसतो, तो समाजाच्या घटकांवर, समाजाच्या व्यवहारांवरही अवलंबून असतो. त्रैभाषिक सूत्र हे आपल्या भाषिक मराठी जीवनाचे एक लक्षण होय. हे काहीही असले, तरी एके काळी मराठी समाज हा एक प्रभावशाली राज्यकर्ता समाज होता व त्याची मराठी भाषा ही शासनाची भाषा होती. एक मात्र खरे की, महाराष्ट्राबाहेर जी मराठी संस्थाने होती, त्या संस्थानांत तेथील मराठी राज्यकर्त्यांनी मराठीची सक्ती केली नाही. स्थानिक भाषांची मुस्क्टदाबी केली नाही. तसे नसते, तर इंदूर, ग्वाल्हेर इत्यादी संस्थानात मराठी भाषकांची संख्या व व्यवहार वाढला असता. बडोदे संस्थान काहीसे अपवाद म्हणावे लागेल, कारण सयाजीराव गायकवाडांनी मराठी भाषा व वाड्:मय यासाठी खूप प्रयत्न केले. उपक्रम राबवले व मराठी ग्रंथनिर्मिती समृद्ध केली. दक्षिणेत तंजावरला निदान मराठी रचनांना दरबारी आश्रय लाभला.

    इंग्रजी राजवटीत घडलेली मराठी भाषेच्या दृष्टीने अत्यंत क्रतिकारक घटना म्हणजे मराठी गद्याचा उदय. पद्यरचनेत अडकून पडलेली मध्ययुगीन मराठी भाषा खरोखरच या गद्याच्या नव्या अवताराने मूलत: बदलली व तिची वाढ व विकास यांना जोराची चालना मिळाली.

    मराठी भाषा व समाज यांचा सुमारे दहा शतकांचा पूर्वेतिहास गेल्या हजार वर्षांत जितक्या वेगाने बदलत राहिला, त्या वेगाच्या कितीतरी अधिक पट वेगाने त्यांचा इतिहास स्वातंत्र्योत्तर काळातील फक्त साठ वर्षात बदलत गेला व आजही बदलत आहेच. बॉम्बेचे मुंबई करावयाला आपणास तीस-पस्तीस वर्षे लागली, हे आपण जाणतोच. राजकीय दृष्टीने स्वतंत्र समाज व त्याची स्वतंत्र भाषा यांचा अर्थ काय व त्या बाबतीत आपले उत्तरदायित्व काय, यांचा खरे म्हणजे आपल्याला बोधच झाला नाही, असे कधी कधी वाटते. नपेक्षा संयुक्त महाराष्ट्रासाठी एवढे मोठे आंदोलन करण्याची खरोखरच वेळ आली नसती. या आंदोलनाच्या निमित्ताने जे लढाऊ लेखन मराठीत झाले, त्यात मराठीचे सामर्थ्य, परंपरा व ध्येय यांची चांगली माहिती मिळते. खरे तर या आंदोलनामुळेच आपण आपल्या मराठी समाजाची, मराठी भाषेची, आपल्या इतिहास-भुगोलाची आपणास नसलेली ओळख पुनरपि नव्याने करू न घेतली असे म्हणता येईल.

    आपल्या मराठी भाषिक जाणिवेत एक प्रकारचा अहंभाव आहेच आहे आणि अगदी कालपरवापर्यंत इतर भाषांची टिंगल करण्याची वृत्तीही त्यामुळेच मराठी समाजात आढळते. त्यामुळे तोडके-मोडके मराठी बोलू पाहणारा परभाषिक एकदम दचकतो व मग मराठीचा नादच सोडून देतो. ही स्थिती आता उरली नाही हे खरेच, पण ती होती यात शंका नाही.

    संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या संदर्भातील मराठी वाड्:मयाबरोबरच आणखी एक संदर्भ मराठी समाज आणि भाषा यांच्या वाटचालीच्या माहितीसाठी उपलब्ध आहे. तो म्हणजे अखिल भारतीय साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची भाषणे. आतापर्यंत ८४ साहित्य-संमेलने झाली आहेत व ती १८७४ पासून मध्ये काही वर्षे थांबून आजतागायत चालू आहेत. भाषेचा प्रश्न गेली दोनशे-सव्वा दोनशे वर्षे कसकशी वळणे घेत होता, हे त्यावरुन लक्षात येईल. मुंबई विद्यापीठात मराठी भाषेचा प्रवेश होण्यास १९०१ साल यावे लागले व तेही न्यायमूर्ती रानड्यांच्या अथक परिश्रमांनी. १९२५-२६ साली थोर इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी मराठी ही मुमुर्क्षू अवस्थेत आहे, असे निराशेचे उद्गार काढले होते. पण मराठी मृत झाली हे खरे, तिचा विकास होतच राहिला. पण तो पुरेसा नाही.

  • प्रा. रा. ग. जाधव

  • मराठी भाषा आणि आपण


    मराठी भाषेचा मध्ययुगीन इतिहास व विसाव्या शतकाचा उत्तरार्ध म्हणजे स्वातंत्र्योत्तर आधुनिक कालखंड या दोहोत एक महत्त्वाचा व दूरगामी परिणाम करणारा फरक आहे. तो म्हणजे मध्ययुगात व तत्कालीन राजवटींच्या जाचात असूनही अवघा मराठी समाज मराठी भाषेच्या पाठीशी उभा होता. आज ही स्थिती आहे असे कोणीही म्हणणार नाही. जेव्हा समाजच इंग्लिश माध्यमांच्या शाळांकडे वळतो, इंग्रजीचे स्तोम माजवतो व मातृभाषा ही आज उद्याच्या जगातील जीवन स्पर्धेत कितपत टिकेल, याबद्दल साशंक होतो, तेव्हा समाज व त्याची भाषा या दोहोंचे गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होतात. हे प्रश्न नेमके काय आहेत व ते प्रश्न सोडविण्यासाठी नेमके उपाय कोणते इष्ट व व्यवहार्य आहेत, याविषयी मराठी शासन, समाज, व्यक्ती व सांस्कृतिक - वाड्:मयीन संस्था गंभीर आहेत, असे जाणवत नाही. या प्रश्नाची सोडवणूक काळावर सोपवून, विशेषत: युवक वर्गावर सोपवून आपण स्वस्थ बसतो. ही अवस्था चिंतनीय तर नक्कीच आहे.

    महाराष्ट्र राज्य शासनाने एक गोष्ट फार चांगली केली. ती म्हणजे साहित्य संस्था, साहित्यिक इत्यादींनी निश्चित केलेली मराठी शुद्धलेखनाची नियमावली झटकन संमत करुन तिला अधिमान्यता दिली.

    दुसरी गोष्ट म्हणजे भाषा संचालनालयाची स्थापना. या संस्थेतर्फे शासकीय पदनाम कोश, शासकीय भाषाव्यवहार यांची पध्दतशीर निर्मिती केली व तिची अंमलबजावणीही केली.

    तिसरी गोष्ट म्हणजे साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना करुन मराठी समाजाचा ज्ञान-वैज्ञानिक विकास करण्यासाठी दूरदृष्टीचे सांस्कृतिक धोरण आखण्याची जबाबदारी मराठी विद्वान मंडळींना सदस्य नेमून त्यांच्यावर सोपविली. दुर्दैवाने ही सारी मंडळी वयस्कर होती, विविध ज्ञान-विज्ञान विषयांत तज्ज्ञ होती, भारतीय ज्ञानविज्ञान व पश्चिमी ज्ञानविज्ञान त्यांना चांगले परिचितही होते. फक्त बदलत्या काळाची दिशा या ज्येष्ठ विद्वानांना समजली नसावी असे वाटते. उदाहरणार्थ मराठी विश्वकोश रचना. १९६२ सालापासून सुरु झालेला हा आधुनिक ज्ञानविज्ञान ज्ञानकोश अजूनही पूर्ण झाला नाही आणि मानवी ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, कला, वाड्:मय इत्यादी विषय शेकडो कोस पुढे निघून गेले. सांस्कृतिक धोरणाचा श्रीगणेशा ज्ञानकोश प्रकल्पाने व्हावा, हीच खरी तर मोठी मार्गच्युती म्हणावी लागेल.

    मराठी विश्वकोशाच्या प्रकल्पाने जगातील सर्व जुन्या-नव्या (म्हणजे १९६० पर्यंतच्या) ज्ञानविज्ञानांची मराठी भाषा, परिभाषा, संज्ञा व संकल्पना निश्चित केल्या व ही गोष्ट अभूतपूर्व महत्त्वाची मानली पाहिजे. मराठी भाषेला कोणताही विषय, कोणतेही विज्ञान वर्ज्य नाही, झेपणार नाही, असे नाही. याची खात्री पटवून देणारा व हमी देणारा हा प्रकल्प आहे.

    प्रश्न असा की, केवळ चांगले कार्य करुन भागत नाही, तर त्या कार्याचा चांगुलपणा, उपयोगिता, मर्यादा हे समाजाला समजावून सांगावे लागते. विश्वकोशाचे कार्य एका कोशातच राहिले, त्यात शिक्षणव्यवस्था, शिक्षणसंस्था, शिक्षक, विद्यार्थी, वृत्तपत्रे, विद्यापिठे, माध्यमे इत्यादिंना कोणत्यातरी टप्प्यावर सामावून घेण्याची आवश्यकता होती, असे वाटते. मराठी भाषेला ज्ञानभाषा म्हणून दर्जा देण्याचे अगदी प्राथमिक कार्य विश्वकोशाने केले.

    तीच गोष्ट साहित्यसंस्कृती मंडळाच्या प्रकाशनांची. त्यात अनुवादित, पुस्तके आहेत तशीच स्वतंत्र. इतर भारतीय भाषाविषयक पुस्तकेही संस्कृती मंडळाने काढली. वास्तव वेगळेच होते. नव्या पिढीला नव्या वातावरणात स्पर्धायुक्त जगण्यासाठी साधणे पुरविणे, दृष्टी देणे हे झाले नाही. विद्वानांनी विद्वानांसाठी चालविलेल्या संस्था असेच काहीसे शासकीय सांस्कृतिक, संस्थांचे काम होते. सर्व समाजविज्ञानांच्या मराठी परिभाषा संबंधित तज्ज्ञ मंडळींनी तयार केल्या. त्या विद्यार्थ्यांप्रत पोहचल्याच नाहीत, शिक्षक-प्राध्यापक यांनीही या संदर्भात उदासीनताच दाखविली.

    मराठी भाषेत ऑक्सफर्डच्या शब्द कोशासारखा प्रत्येक मराठी शब्दाची व्युत्पत्ती व नाममात्र इतिहास देणारा एकही शब्दकोश नाही. १९६० नंतर अनेक जातीजमातींच्या ग्रामीण व दलित लेखकांनी व कवींनी साहित्य निर्माण केले. त्यातील अपरिचित शब्दांचाही कोश नाही. नाही म्हणायला, कै. सरोजिनी वैद्य यांच्या नेतृत्वाखाली राज्य मराठी विकास संस्थेने काही चांगले व उपयुक्त काम केले पण त्यामागेही नव्या वास्तवाची, नव्या मराठी आकाक्षांची चाहूल होती, असे पूर्णत: म्हणता येणार नाही. मराठीचे भयानक शुध्दलेखन अहोरात्र वाचून-ऐकूनही शासनाजवळ काही योजना नाही, शिक्षणसंस्थांजवळ नाही, साहित्य संस्थांजवळ नाही, ही भाषेची हत्या रोज रोज पाहून मराठी जिवंत तरी आहे काय, असे मनांत येते.

    समाजाचा दर्जा भाषेवरू न ठरतो व भाषेचा दर्जा तिच्यातील भाषाशास्त्रीय मूलभूत लेखन व संशोधन, व्याकरणविषयक प्रगतिशील चर्चा, त्यांचा उच्च विद्यापीठियच केवळ नव्हे, तर शालेय शिक्षणक्रमात प्रवेश वेगैरे बाबींवर निर्भर असतो. मराठीत या संदर्भात आता तरी आनंदीआनंदच आहे. ज्ञानभाषा ही एक अखंड प्रक्रिया आहे व तिचा संबंध प्रगमनशील समाजाच्या बदलत्या इच्छा आकांक्षाशीही आहे. तीच गोष्ट मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत. आपण भाषेबद्दल जे कर्तव्य आहे, तेवढे सोडून बाकी सर्व राजकारण करावयाला एका पायावर तयार होतो, तमिळ भाषेला मिळाला, मलयाळम भाषेला मिळू घातलाय, म्हणून मराठीलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. खरे सांगायचे तर भाषेचा दर्जा हा कोणी कोणाला देतही नाही व देताही येत नाही. भाषा अभिजात ठरते ती स्वयंभू गुणवत्तेवर. अभिजात भाषेचे निकष कोणते ? अभिजात साहित्य म्हणजे काय, ते थोडेफार समजते. प्राचीनता किंवा दीर्घकालीनता, ज्ञानविज्ञान निर्मितीची परंपरा, इतर भाषांवरील प्रभाव यासारख्या अभिजात भाषेचे निकष आधी ठरवावे लागतील. आपण आपल्या भाषेला अभिजात म्हटले, तर कोण काय करणार ?

    मराठीत मौलिक ज्ञान -वैज्ञानिक संशोधन झाले पाहिजे, त्या संशोधनाची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली पाहिजे, मराठीत मुलभूत ज्ञान-विज्ञान ग्रंथ लिहावा असे प्रज्ञावतांना मुळातच वाटले पाहिजे. बरे झाले, लोकमान्य टिळकांनी 'गीतारहस्य' मराठीत लिहिले ते मूलभूत समीक्षा किंवा गीताभाष्य मानले जाते म्हणून जगभरचे गीताभ्यासक मराठी शिकतात व लोकमान्य टिळकांचे भाष्य समजून घेण्याचा प्रयत्न करतात. 'सृष्टिज्ञान' सारखे शतायुषी मासिकही मराठीत आहेच.

    आपण समाज म्हणून व आपली मराठी भाषा दोन्हीही अजून एक वासाहतिक पूर्वग्रहाचे बळी आहोत. तो पूर्वग्रह म्हणजे इंग्रजीशिवाय तरणोपाय नाही. हे खोटे नाही. पण मराठी समाजाला मराठीशिवायही तरणोपाय नाही, हे आपण स्वत:च्या मनावर व इतरांच्या मानसिकतेवर बिंबवले पाहिजे.

    समाजाला भाषा असतेच, पण भाषा हे समाजाचे सेंद्रिय घटक नव्हे. भाषा मरतात हा इतिहास आहे. त्या मृत भाषांचा समाज नष्ट होतो. मात्र त्यातील संचित टिकून राहते. ग्रीकांचे ज्ञानविज्ञान अरबांनी जपले म्हणून टिकले. मराठीत टिकण्यासारखे आहेच आहे पण त्यासाठी उद्या अरबांची मदत घेण्याची वेळ येऊ नये एवढेच!

  • प्रा. रा. ग. जाधव

  • मराठीच्या अभ्यासक्रमातील समन्वय


    आपल्या शिक्षणव्यवस्थेचे आपण पुढील स्तर मानतो : १) प्राथमिक २) माध्यमिक ३) उच्च माध्यमिक ४) महाविद्यालयीन ५) विद्यापीठीय या विविध स्तरांवरील मराठीच्या अभ्यासक्रमात समन्वय (coordination) असणं फार आवश्यक आहे. यातील प्रत्येक स्तराची वेगवेगळी मंडळं आहेत त्यांनी आपापले मराठी भाषेचे अभ्यासक्रम तयार केले आहेत. त्या सर्वांत एक प्रकारची श्रेणीबद्धता असणं आवश्यक आहे. ती नसल्यानं परस्परांमध्ये कोणताच अनुबंध राहत नाही मग वरील स्तरावरील अध्यापक खालील स्तरांच्या मराठीच्या अध्यापकांना दोष देतात व त्याचा काहीच उपयोग होत नाही.

    मराठी भाषेचा व वाङ्मयाचा अभ्यासक्रम व उद्दिष्ट निश्चित करताना या सर्व मंडळाच्या मराठी अभ्यास समित्यांना निन्मस्तरावरील अभ्यासक्रम व उद्दिष्ट लक्षात घेऊनच पुढील स्तरावरील अभ्यासक्रम निश्चित करणं आवश्यक आहे. असे न केल्यास दोन्ही अभ्यासक्रमात दरी निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते. प्रत्येक स्तरावरील उद्दिष्टांच्या बाबतीही हेच धोरण ठेवणं आवश्यक आहे. त्यामुळं त्या उभय अभ्यासक्रमात एकसूत्रता व श्रेणीबद्धता येईल. उणीव व पुनरावृत्ती राहणार नाही. मराठीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीच्या दृष्टीनंही हे आवश्यक आहे. असं मला वाटतं.
    या दृष्टीनं या सर्व स्तरांचं स्वरुप एखाद्या माळेसारखं असतं. तिचा प्रत्येक मणी देखणा असतो व त्या सर्व मण्यांनी मिळून तयार झालेली माळही सुंदर असते.

    मराठी अभ्यास मंडळ
    यासाठी विविध स्तरांवरील मराठी अभ्यास मंडळांनी फार काळजी घ्यायला हवी असं मला वाटतं. निवडून आलेल्या प्रतिनिधीनां या दायित्वाचं भान कस नसेल? ते अन्य तर अनुभवी असतातच पण त्याचबरोबर शिक्षकांना व प्राध्यापकांनाही या मंडळांना स्वानुभवानं काही सूचना अवश्य करता येतील. या सूचनांची प्रत संबंधित स्तराच्या कार्यालयातही पाठवाव्यात व आपल्या संघटानांच्या संमेलनांमध्ये व परिषदा मध्येही त्यावर चर्चा व्हाव्यात. दोष दाखविण्यापेक्षा अधिक सकारात्मक काय करता येईल, याचा विचार मराठी भाषा व साहित्य यांच्या अध्ययन अध्यापनासाठी गुणवत्ता, उपयुक्तता, व्यावहारिकता, उद्दिष्ट्यपूर्ती या सर्वच दृष्टीनं उपायकारक ठरेल. खरं तर ही मराठीच्या प्रत्येक अध्यापकाची जबाबदारी आहे. ती आपण होऊनच आपल्या विषयाच्या आवडीसाठी व सुरक्षेसाठी आपण स्वीकारायला हवी. त्यात मराठीच्या अध्यापकाला आपल्या अध्यापनामुळं अधिक समाधान असेल.

    मराठीची सुरक्षा

    वर `विषयाची सुरक्षा` हा शब्दप्रयोग मी हेतूत: केला आहे. भोवतालचं वातावरण जागतिकीकरणामुळं किती इंग्रजीमय होत चाललं आहे, हे आपण रोजच्या वृत्तपत्रांच्या शीर्षकावरुन देखील पाहात नाही का ? काही महत्त्वाच्या दैनिकांच्या स्तभांची शीर्षकंही इंग्रजीमय होत आहेत यात भाषा शुद्ध -अशुद्ध असण्याचा विचार मी करीत नसून मराठी भाषा सुरक्षित राहण्याचा विचार माझ्या मनात आहे. याचं कारण फार्सीच्या मराठीवरील प्रभावाचा अभ्यास व संशोधन करण्यात मी उभं आयुष्य वेचलं आहे. फार्सी दरबारी भाषा असल्यामुळं बहमनकाळात वाक्यात केवळ क्रियापद तेवढं मराठी व बाकी सारे शब्द अरबी-फार्सी अशी स्थिती निर्माण झाल्यचं एकनाथांनीच `अर्जदास्तां` सारख्या भारुडात दाखवून दिलं होत. नवीन संकल्पना येतात. त्यावेळी त्या दर्शविणारे शब्दही अन्य भाषांतून येतात, त्यामुळं आपली भाषा अधिक समृद्ध होत असते, या भाषावैज्ञानिक सिद्धान्ताचा स्वीकार करण्याची अनिर्णयता कुणालाही पटवून देण्याची आवश्यकता नाही. तथापि ज्या संकल्पना व तद्‌वाचक शब्द आपल्या भाषेतच असतील तर ते आपण वापरायला हवेत, हे शिवरायांनीच `राज्यव्यवहार कोशा` ची निर्मिती करायला सांगून प्रत्यक्ष कार्यवाहीच केली होतीच याचं स्मरण इथं व्हावं. आपल्या शासनानंही `शासनव्यवहारात मराठी` विविध परिभाषा कोशांची निर्मिती भाषा सल्लागार मंडळाच्या माध्यमातून करुन चांगले पायंडे पाडले आहेत. त्यांचा उपयोग व प्रभाव याविषयी मी वेगळं सांगायला नको. `पणन` `अभियंता`, `अभियांत्रिकी महाविद्यालय,` `प्रशाला` संचालनालय `निविदा` `अधिष्ठाता` `अध्यादेश` हे शब्द रुढ झालेच की नाही? असे शब्द आपण निग्रहांन वापरले तर आपली भाषा सुरक्षित राहील व नवीन संज्ञा अन्य भाषांतील उपयुक्त शब्दांनी आपली भाषा आपण समृद्धेसुद्धा करु. मग `कुरीयर` हा शब्द फ्रेंच किंवा `रिक्षा` हा जपानी शब्द म्हणून आपण त्याचा अव्हेर केला आहे का? तो आता आपलाच शब्द झाला.

    आणखी एक नवी समस्या

    आणखी एक नवी समस्या निर्माण झाली. ती आपलेच शब्द इंग्रजी वळणानं वापरण्याची पूर्वी असे `इंग्रजाळलेले` शब्द बदलून मूळ आपले शब्द अन्य देशांनीही घेतले आहेत. `सीलोन`चं `श्रीलंका`, `ब्रम्हदेशाचं` म्यानमार, `ऱ्होडेशिया`चं `झिम्बाब्बे` ही त्या त्या देशांची मूळ रुप देश विदेशातही रुढ झाली. आपणही `किर्की` ऐवजी `खडकी`, `मद्रास` ऐवजी चेन्नई, `बॉम्बे` ऐवजी `मुंबई` ही रुपं वापरू लागलो. पण आता `सूर्य` ऐवजी `सूर्या` (लॉज) `नारायण` (क्लासेस), `अशोक`, ऐवजी `अशोका` (हॉटेल), `राम` ऐवजी `रामा`(हॉटेल) ही नावं आपण का वापरायची ते मला कळतं नाही. रुढ झाली म्हणून ती (अपभ्रष्ट) रुपं आपण वापरायची का? असं म्हणून महाराष्ट्राच्या सांस्कृतीक धोरणांच्या मसुद्यातील परिशिष्टात उपस्थित केलेला प्रश्न वाचून मला नवलं वाटलं. `तज्ज्ञ` शब्द रुढ झाला आहे म्हणून तो वापरावा का, असं म्हणून `च्यायला` ऐवजी `आरेच्या` ही शिवी वापरायची का अशीही सूचना केली आहे. मराठीच्या शिक्षकांनी यातून काय बोध घ्यावा? शिक्षक हस्तपुस्तिकेत आपण शिक्षकांना या संदर्भात नेमकेपणानं काय मार्गदर्शन करणार? विद्यार्थ्यांनी व समिती सदस्य शिक्षकांनी असे किती पर्याय लक्षात ठेवायचे?

    ढासळती विद्यार्थ्यांची संख्या व गुणवत्ता

    ढासळती विद्यार्थ्यांच्या व गुणवत्ता इंग्रजीच्या वाढत्या प्रभावाची अपेक्षा करणं जागतिकीकरणामुळं अस्वाभाविक नव्हतं पण विषय व मातृभाषा म्हणून ती शाळा-महाविद्यालयं विद्यापीठं यात टिकणं आवश्यक आहे. मध्यप्रदेशात एकेकाळी जबलपूरात व इंदूरला माध्यमिक शाळांत तसंच महाविद्यालयात विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती. माध्यमिक अभ्यासक्रमात या विषयाचा अंतर्भाव न केल्यानं आज तिथं मराठी विषय घेणाऱ्या महाविद्यालयीन /विद्यापीठातील विद्यार्थ्यांची वानवा आहे, हे मी अनुभवान्ती सांगत आहे. उस्मानिया विद्यापीठात मराठी विभागात एकेकाळी मराठी विषय घेणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी होती ती कमी कमी होत गेली, हे बृहन्महाराष्ट्रातलं चित्र तर महाराष्ट्रातलं काही विद्यापीठांच्या मराठी विभागात दहा-पंधरा विद्यार्थी मिळणंही दुष्कर झालं आहे, या विद्यापीठाना मी नामनिर्देशित करु इच्छितं नाही. नागपूरसारख्या विद्यापीठात २००९-१० या वर्षी मराठी विभागात केवळ एक प्राध्यापक व एक आधिव्याख्याता अशी स्थिती का निर्माण होते ? मुक्त विद्यापीठाच्या एम.फील. (मराठी) चीच नव्हे तर इतर विषयांचीही मान्यता रद्द होऊ लागली आहे. अन्य विद्यापीठांतील काही एम.फील. व पीएच.डी चे विषय हा चिंतेचा विषय होऊ शकेल. डॉ. व.वि. कुलकर्णी यांनी आता पीएच्.डी (मराठी) ची सूची (दूसरी आवृत्ती) प्रसिद्ध केल्यानं मराठी संशोधनावर नवा प्रकाश पडेल व कदाचित तो अंतर्मुखही करील, हे सर्व लिहितांना मनाला फार वेदना होतात. त्यामुळ मौलिक मराठी संशोधन करणाऱ्यांची उपेक्षा व्हायला नको.

    अन्य विषय व मराठी

    मराठीच्या अभ्यासक्रमाबरोबर जे अन्य विषय मराठीतून शिकविले जातात व ज्यांची पाठ्यपुस्तकं मराठीत आहेत, त्या समित्यातही मराठी भाषा तज्ज्ञ म्हणून किमान एका सदस्याचा अन्तर्भाव होणं आवश्यक आहे कारण त्या भाषिक त्रुटी या विषयांच्या पाठ्यपुस्तकांतही राहण्याची शक्यता आहे. याचा अनुभव मला महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या मराठी भाषा समितीचा एक दीड दशक अध्यक्ष असताना तसंच या मंडळाच्या विद्रावस्थेचा सदस्य असताना आला आहे.प्रसारमाध्यमांमध्ये नियतकालिकातील मराठी प्रमाणेच दूरदर्शवरील मराठी भाषा हाही हळूहळू मराठी भाषेच्या भवितव्याच्या दृष्टीनं चिंतेचा विषय व्हायला फारसा विलंब लागेलसे वाटत नाही. याचा प्रभाव व परिणाम लगोलग व तातडीनं होऊ लागला आहे व नवी पिढी तशा प्रकारची मराठी भाषा बोलू लागली आहे.
    याउलट लोकसेवा आयोगानी प्रज्ञाशोध परीक्षांत मात्र मराठी माध्यमातून उत्तर लिहिणारी मुलं आघाडीवर असल्याचं सुखद चित्रही आपण पाहतो, तेव्हा निराशेचे मळभ दूर होऊ लागतं.

    डी.एड, बी.एड, व एम्. फील्

    मराठी भाषेविषयी बी.एड. व डी.एड. चे अभ्यासक्रम किती आस्था बाळगतात, हेही या आव्हानांपैकी एक आव्हान आहे. मराठीच्या एम.फील् च्या अभ्यासक्रमाचे १) संशोधन पद्धती व २) मराठी अध्यापन पद्धती असे दोन समान महत्त्वाचे भाग आहेत. मात्र दुसऱ्या भागाकडे फार दूर्लक्ष होत असल्याचं मला सातत्याने जाणवंत आहे. बी.एड. च्या मराठी विषय- ज्ञानाला फार कमी महत्त्व बहुधा ऐंशी गुणाइतकेच दिलं जात. या प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी जे अध्यापक/प्राध्यापक नियुक्त केले जातात. त्यासंबंधीशी काटेकोरपणा फार आवश्यक आहे. बी.एड् च्या काही विद्यापीठांच्या मराठीच्या प्रश्नपत्रिका आपल्या मराठीच्या अध्यापन प्रशिक्षणाचा दर्जा अधिक चांगल्या प्रकारे समाजावून सांगतील. बी. एड् /एम. एड् चे मराठी विषयासंबंधीचे संशोधन प्रकल्प या विषयाच्या अभ्यासक्रमाची /आध्यापनाची गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीनं उपयोगी पडतात, हेही एकदा तपासून पहायला हवं

  • डॉ. यु.म. पठाण

  • मराठी भाषेची उत्पत्ती


    कोणत्याही भाषेच्या निर्मितीचा विचार करताना आपल्याला (१) ती भाषा केव्हा निर्माण झाली, (२) ती कोणत्या भाषेपासून निर्माण झाली (३) तिच्या उत्पत्तीची कारणे काय असावीत (४) आणि हे सर्व ठरवण्यासाठी कोणत्या साधनांचा आधार घेता येईल या चार गोष्टींचा शोध घ्यावा लागेल. मराठी भाषेच्या उत्पत्तीचा काळ ठरवण्यासाठी आपल्याला (१) त्या भाषेतील लिखित वाङ्मय (२) त्या भाषेतील लोकवाङ्मयाची परंपरा (३) त्या भाषेसंबंधी इतर भाषांमधील उल्लेख आणि त्या भाषेत लिहिले गेलेले कोरीव लेख म्हणजे शिलालेख आणि ताम्रपट या साधनांचा आधार घ्यावा लागेल.

    मराठीच्या उत्पत्तीकाळातील वाङ्मय : मराठीचे भाग्य असे की तिच्या अगदी प्रारंभीच्या काळीच तिच्यात ज्ञानेश्वरी, लीळाचरित्र यासारखे उत्कृष्ट ग्रंथ निर्माण झाले. यातील लीळाचरित्र हा ग्रंथ १२८४ इ.स. मध्ये निर्माण झाला तर ज्ञानेश्वरी १२९० मध्ये लिहिली गेली. तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात अशा श्रेष्ठ ग्रंथांची निर्मिती झाली याचा अर्थ मराठी भाषा त्या काळात चांगलीच परिपूर्ण सक्षम आणि प्रगल्भावस्थेत होती. ही अवस्था प्राप्त होण्यापूर्वी साहजिकच ३००-४०० वर्षांच्या काळ लोटला पाहिजे. याच काळात महदंबेचे धवळे, गोविंदप्रभू चरित्र यासारख्या अनेक ग्रंथांचीही रचना झाली. मराठीतील आद्य लोकवाङ्मयाचा विचार करताना लीळाचरित्र, दृष्टांतपाठ यासारख्या ग्रंथातील कथांची आठवण होते. त्याहीपूर्वी इ.स.११२९ मध्ये चालुक्य नृप सोमेश्वराने लिहिलेल्या ग्रंथात `मानसोल्लास` अथवा `अभिलषितार्थ चिंतामणी` या ग्रंथात महाराष्ट्रातील स्त्रिया कांडताना ज्या ओव्या म्हणत असत त्या उद्‌धृत केल्या आहेत त्या अशा ...
    `` जेणे रसातल उण मत्स्यरुपें वेद आणियले /
    मनुशिवक वाणियले /
    सो संसार सायर तारण
    मोहंतो रावो नारायण ``
    (अर्थ : ज्याने रसातलातून मत्स्यरुपाने वेद आणले, मनु-शिव वर्णिले, तो संसार सागर तारक मोह (अज्ञान) दूर करणारा राजा नारायण) यावरुन बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात अशा प्रकारचे लोकवाङ्मय निर्माण होऊ लागले होते असा निष्कर्ष निघतो. हे मराठीच्या त्याकाळातील अस्सल पुरावे असले तरी याहूनही दुसऱ्या प्रकारच्या लिखित वाङ्मयाची परंपरा मराठीला आणखी मागच्या काळात नेऊन सोडते. ती म्हणजे कोरीव लेखांची परंपरा. कोरीव लेखांमध्ये शिलालेख आणि ताम्रपट यांचा समावेश होतो. असे बरेच कोरीव लेख उपलब्ध असल्याने स्थलाभावी येथे उद्धृत करता येत नाहीत. फक्त त्यांतील काही महत्त्वाच्या लेखांचा निर्देश करता येईल. पण ते मराठी भाषेतील कोरीव लेख आहेत, हे लक्षात घ्यावे.

    इ.स. १२८९ उनकेश्वरचा शिलालेख (मराठवाडा)
    इ.स. १२८५ पूरच शिलालेख (सासवडजवळ)
    इ.स. १२७३ पंढरपूरचा चौऱ्याऐंशीचा शिलालेख
    इ.स. १२३९ नेवासे येथील शिलालेख (नगर जिल्हा)
    इ.स. १२२८ खोलेश्वराचा शिलालेख (आंबेजोगाई, जि.बीड)
    इ.स. १२०६ पाटण येथील शिलालेख (खानदेश, जळगाव)
    इ.स. ११८७ परळ येथील शिलालेख (मुंबई)
    इ.स. ११६४ सावरगावचा शिलालेख (ता.तुळजापूर, उस्मानाबाद)
    इ.स. ११५७ पळसदेवचा शिलालेख (ता.दौंड, जि.पुणे)
    इ.स. १०६० दिवे आगरचा ताम्रपट (कोकण)
    इ.स. ९८३ श्रवणबेळगोळचा शिलालेख (कर्नाटक)

    शेवटचा श्रवणबेळगोळचा शिलालेख इ. १०९५ असावा असे मत आता प्रस्थापित झाल्यामुळे त्या अगोदचा दिवे आगरचा ताम्रपट हा मराठीतील आद्य कोरीव लेख ठरतो. त्यावरुन ज्ञानेश्वरीच्या पूर्वी जवळजवळ ३०० वर्षे मागे आपल्याला मराठीचे अस्तित्व दिसते.

    याहीपलीकडे मराठीच्या अस्तित्वाचे पुरावे अन्य भाषातील मराठीविषयक निर्देशाचे आहेत. इ.स. ८५९ मध्ये लिहिलेल्या धर्मोपदेशमाला ग्रंथात मराठीचे वर्णन पुढील प्रमाणे केलेले आहे.

    सललियपयसंचारा पयडियमयणा सुवण्णरयणेल्ला मरहठ्ठय भासा कामिणी य अडवीय रेहंती... यात मराठीची तुलना सुंदर स्त्रीशी आणि अरण्य यांच्याशी केली असून श्लिष्ट शब्दांच्या आधारे ती सुंदर शब्द असलेली शृगांररसानुकूल आणि सुंदर नादमय वर्णांनी युक्त आहे असे म्हटले आहे. यापूर्वीचा ग्रंथगत उल्लेख म्हणजे इ.स. ७७८ मध्ये लिहिलेल्या उद्योतनसूरीच्या कुवलयमाला या ग्रंथातील मराठे आणि त्यांची भाषा यांचे वर्णन असलेले सुप्रसिद्ध वाक्य होय.
    ``दढमडह सामलंगे सहिरे अहिमाण कलहसीले य / दिण्णले गहिल्ले उल्लविरे तत्थ मरहट्टे // `` (बळकट, ठेंगण्या, सावळ्या अंगाच्या, काटक अभिमानी, भांडखोर, दिण्णले (दिले), गहिल्ले (घेतले) असे बोलणाऱ्या मराठी लोकांस त्याने पाहिले) आपल्याला ज्ञात असलेले हेच मराठीचे पहिले वाक्य होय. या पुराव्यांच्या आधारे मराठीचा उत्पत्तिकाल इसवी सनाचे आठवे शतक आहे, असे निश्चितपणे म्हणता येते.

    मराठीची उत्पत्ती कोणत्या भाषेपासून झाली याबद्दलचे बरेच मतप्रवाह आहेत. त्यासंदर्भात वैदिक भाषा, संस्कृत भाषा, पाली भाषा, महाराष्ट्री प्राकृत भाषा, महाराष्ट्री अपभ्रंश इ. भाषांचे दावे पुढे करण्यात आले आहेत. मराठीची जनकभाषा तिला कालदृष्ट्या निकटची असली पाहिजे. ती केवळ शब्दसंग्रहापुरती मर्यादित नसून तिच्यात ध्वनिप्रक्रिया उच्चारण प्रक्रिया व्याकरण शब्दसंग्रह इत्यादी बाबी मराठीला जवळच्या असल्या पाहिजेत या निकषांवर महाराष्ट्री अपभ्रंश हीच मराठीची साक्षात जनकभाषा ठरते. वरील भाषांखेरीज तमिळ, कन्नड इ. अन्य प्रान्तीय भाषांशाही मराठीचे नाते सांगण्यात आले आहे. पण हे साम्य काही शब्दांपुरतेच मर्यादित असल्याने त्यांना मराठीच्या जनकत्वाचा मान मिळणे शक्य नाही महाराष्ट्री अपभ्रंश हीच मराठीची साक्षात जननी आहे असे डॉ. शं.गो. तुळपुळे यांनी साधार सिद्ध केले आहे.

  • कल्याण काळे