Showing posts with label आरोग्य. Show all posts
Showing posts with label आरोग्य. Show all posts

Thursday, June 26, 2014

जीवन अमृत सेवा

प्रत्येकाच्या जीवनामध्ये रक्त हा अमृता एवढा महत्वाचा घटक आहे. अडचणीच्यावेळी वेळेत रक्त पुरवठा झाला नाही तर जीवन संपुष्टात येऊ शकते. गरजूंना तातडीने रक्त पुरवठा करण्यासाठी राज्य शासनाने 'जीवन अमृत सेवा' (ब्लड ऑन कॉल) ही अभिनव योजना सुरु केली आहे. या नवीन योजनेची ही माहिती... राज्यातील शासकीय व खाजगी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णास आवश्यक असणाऱ्या रक्तासाठी रुग्णाच्या नातेवाईकांस धावपळ करावी लागू नये तसेच शासनाने निश्चित केलेल्या प्रक्रिया शुल्कावर सुरक्षित रक्त पुरवठा व्हावा या दृष्टीकोनातून शासनामार्फत राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या माध्यमातून 'जीवन अमृत सेवा' (ब्लड ऑन कॉल) ही अभिनव योजना मुंबईसह राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. प्रगत तंत्रज्ञानाने वैद्यकीय क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. मात्र अजूनही रक्त असा एक घटक आहे जो कृत्रिमरित्या तयार करण्यात यश मिळाले नाही. मानवी जीवनातील रक्ताचे महत्त्व लक्षात घेऊन राज्य शासनाने 'जीवन अमृत सेवा' (ब्लड ऑन कॉल) ही लोकाभिमुख योजना राज्यभरात सुरु केली आहे. त्यामुळे गरजू रुग्णांना एका फोन कॉलवर हाकेच्या अंतरावरच रक्त मिळणार आहे. गरजू रुग्णांना वेळेवर आणि शासकीय शुल्कात रक्त उपलब्ध करून देणाऱ्या आरोग्य विभागाच्या जीवन अमृत सेवा (ब्लड ऑन कॉल) या योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाला. जे.जे. महानगर रक्तपेढीमध्ये समारंभाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार होते तर आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी, राज्यमंत्री फौजिया खान आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या योजनेच्या माध्यमातून टोल फ्री नं. 104 वर कॉल केल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयापासून मोटारसायकलरुन साधारणतः एक तासाच्या अंतरावरील रुणालये व नर्सिंग होम यांना शीतसाखळीद्वारे, वाहतुकीसाठी संबंधित जिल्ह्यामध्ये नेमण्यात आलेल्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांमार्फत रक्त किंवा रक्त घटक यांचा पुरवठा करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार सर्व जिल्ह्यांमध्ये तसेच मुंबईमध्ये रक्त साठवणूक केंद्रे उभारण्यात आली आहेत. रक्त पिशवीचे प्रक्रिया शुल्क प्रत्येकी रु. 450 तसेच रक्त वाहतुकीसाठी अतिरिक्त खर्च दहा किलोमीटरसाठी रु. 50 आणि 11 ते 40 किलोमीटरसाठी रु. 100 याप्रमाणे दर आकारण्यात येतो. शासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना वैद्यकीय उपचार करण्यास मान्यता दिलेल्या खाजगी रुग्णालयांनी शासनामार्फत कार्यान्वित केलेल्या कार्यक्रमात, मोहिमेत सक्रीय सहभाग घेणे बंधनकारक आहे. शासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांनी वैद्यकीय उपचार करण्यास शासनमान्य खाजगी रुग्णालयांनी तसेच राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत सहभागी खाजगी रुग्णालयांचा राज्य शासनामार्फत राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या 'जीवन अमृत सेवा' या योजनेचा सहभाग असतो. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी रुग्णालयांची जिल्हा रक्तपेढीकडे नोंदणी केली जाते. या योजनेंतर्गत रक्त अथवा रक्त घटकाच्या मागणीकरीता 104 हा टोल फ्री क्रमांकाचा वापर करण्यात येतो. रुग्णालयात या अभिनव योजनेचा फलक रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावण्यात येत आहे. शासन मान्यता दिलेली सर्व रुग्णालये संबंधीत जिल्हा रक्तपेढीच्या संपर्कात राहून रक्त, रक्त घटक शासकीय दरानुसार आकारण्यात येतो. राष्ट्रीय रक्त धोरण राज्यात सन 2002 पासून अवलंबिण्यात आले आहे. सदर धोरणानुसार गरजेच्या वेळी रुग्णास रक्त उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित रुग्णालयाची आहे. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक अथवा मित्रमंडळी यांना रक्त शोधण्यासाठी तगादा लावणे अथवा रुग्णालयस्थित रक्तपेढीकडून बदली रक्तदाता उपलब्ध करुन देण्यासाठी तगादा लावणे ही बाब राष्ट्रीय रक्त धोरणाचे उल्लंघन करणारी होती. तसेच रक्ताची खरेदी-विक्री या बाबीवर देखील राष्ट्रीय रक्त धोरणानुसार प्रतिबंध घालण्यात आला आहे. राष्ट्रीय रक्त धोरणानुसार निश्चित केलेले प्रक्रिया शुल्क आकारुनच रक्ताचा पुरवठा करणे आवश्यक आहे. शासनमान्य खाजगी रुग्णालयांकडून तसेच शासकीय रुग्णालयांकडून 'जीवन अमृत सेवा' या योजनेचा लाभ घेऊन राष्ट्रीय रक्त धोरणाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. -अनिल आलुरकर

Tuesday, April 9, 2013

आरोग्यम धनसंपदा!

शारिरीक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ अशी आपल्याला आरोग्याची नवीन व्याख्या करावी लागेल. आरोग्य म्हणजे केवळ रोग मुक्त असणे असे नव्हे. आजच्या धकाधकीच्या जीवनात स्वत:च्या आरोग्याबाबत जागरुक असणे प्रत्येकालाच आवश्यक आहे. आजची युवा पिढी ही जंक फुडच्या आहारी गेली आहे. उद्याची पिढी ही सृदृढ असणे आवश्यक आहे. त्यांच्यावर देशाचे भविष्य अवलंबून आहे.

7 एप्रिल हा जागतिक आरोग्य संघटनेचा स्थापना दिवस आहे. जगात उद्‌भवणा-या विविध प्रकारच्या आरोग्यविषयक समस्या विषयी जागतिक पातळीवर जनजागरण करण्यासाठी दरवर्षी 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेकडील आकडेवारी नुसार 2020 सालापर्यंत जगातील विविध रोगांच्या प्रादुर्भावापैकी 70 टक्के रोग हे असांसर्गिक स्वरुपाचे उच्च् रक्तदाब, ह्दयविकार, कर्करोग असे असतील. अशा रोगामुळे जगात दरवर्षी 20,000 लोकांचा मृत्यू होतो.

सध्या यांत्रिकी उपकरणामुळे शारिरीक कष्ट् कमी होत चालले आहेत. कपडे धुणे, भांडी घासणे, पिठ मळणे, दळणे, कुटणे ही कामे यंत्रच करीत आहेत. त्यामुळे स्त्रियांमध्ये लठ्ठपणाची समस्या निर्माण होत आहे. त्यातून अनेक रोगांना निमंत्रण मिळत आहे. विज्ञानाने भौतिक सुख माणसाला दिले आहे. पण त्यामुळे शारिरीक आणि मानसिक आरोग्य हरवले आहे.युवा पिढी व्यसनाधीन होत चालली आहे. युवक धुम्रपान, गुटखा, तंबाखू यांच्या आहारी गेली आहेत. त्यामुळे शरीरातील अवयवांना अपाय होवून कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आजच्या व्यसना या रोगापासून आपली सुटका केली पाहिजे जेणेकरुन भावी आयुष्यात ते निरोगी जीवन जगू शकतील.

आज प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे. मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाल्यामुळे कार्बन वायू शोषून घेण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे ग्लोबल वार्मिग सारखी समस्या निर्माण झाली आहे. सी एफ सी सारख्या क्लोरीनयुक्त वायुमूळे वातावरणातील ओझोनच्या थराला छिद्रे पडले असून, येणा-या अतिनील किरणामुळे होणा-या कॅन्सरसारख्या विकारांचे प्रमाण वाढत आहे. पर्यावरणातील आवाजाची प्रचंड वाढलेली पातळी यंत्रे, कारखाने यातूनच निर्माण होत असून त्यामुळे बहिरेपणाची समस्या वाढली आहे. जलप्रदूषणामुळे डेंग्यू, मलेरिया असे रोग माणसावर अतिक्रमण करीत आहे. दूषित पाण्यामुळे कॉलरा, पोटाचे आजार यांचे प्रमाण वाढत आहे.

सध्या व्यायाम, योगासने करण्याकडे लोक टाळाटाळ करतात. त्यासाठी मुहूर्त ठरवितात. मुहूर्त ठरवून सुरु केलेला उपक्रम हा आठवडाभर चालतो. नंतर जैसे थे परिस्थती येते. मग वेळ मिळत नाही हे कारण सर्वांच्या तोंडून ऐकायला मिळते. आजारी पडल्यानंतर डॉक्टरांनी व्यायाम करायला सांगितल्यावर मग त्याचे महत्व कळते आणि मग सुरुवात होते. परंतु त्याला उशीर झालेला असतो. जर आपण पहिल्यापासून व्यायाम, योगासने नित्यनियमाने केली तर डॉकटरांकडे जाण्याचा प्रश्नच उद्‌भवणार नाही.

आपण आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी म्हणजेच स्वत:साठी थोडासा वेळ काढला पाहिजे. आपण सर्वांनी संकल्प करु या तो नुसता संकल्प न ठेवता प्रत्यक्षात अंमलात आणू या. आरोग्य हे धन आहे आणि प्रत्येकाने शारिरीक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ चांगले राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

शैलजा देशमुख
विभागीय माहिती कार्यालय,
कोंकण विभाग, नवी मुंबई

Friday, March 22, 2013

उणिवांवर केली मात गावकऱ्यांची विकासाला साथ


असं म्हणतात की आपल्यातील उणिवा ज्यांना समजतात आणि त्या दूर करून जी माणसं पुढे जाण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या वाट्याला अपयश कधी जात नाही. निरंतर प्रयत्नातून शिकत राहणं आणि कामात सातत्य राखणं हा त्यांचा स्थायीभाव असतो. बीड जिल्ह्याच्या अंबोजोगाई तालुक्यातील सनगाव हे असंच गाव.

अंबाजोगाईच्या पश्चिमेस 8 कि.मी अंतरावर वसलेल्या या गावाच्या उत्तरेला डोंगरमाथा तर दक्षिणेकडे मोठा तलाव. तलावामुळे गावातलं सिंचनही चांगलं. जमीन सुपिक, बहुतांश लोकांचा व्यवसाय शेती. बागायती परिसर असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थितीही उत्तम. गावातला दुग्धव्यवसाय ही चांगला. उस लागवडीबरोबर सोयाबीन, कापूस आणि भाजीपाला ही शेतकऱ्यांची पूरक पिकं. भाजीपाल्यामुळे कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न मिळते हे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी गावात गटशेतीचा अभिनव प्रयोग यशस्वीरित्या राबवला.

आताचे उपसरपंच आणि तत्कालीन सरपंच शंकर उबाळे हे सिव्हिल इंजिनिअरिंग मधील पदविकाधारक. ते एका प्रशिक्षणासाठी यशदा येथे गेले. तेथून परततांना त्यांनी हिवरेबाजार आणि राळेगनसिद्धी या दोन आदर्श गावांना भेटी दिल्या. पोपटराव पवार यांच्याबरोबर अनेक विषयांवर चर्चा केली. गावातील इतर सदस्यांना श्री. पवार यांच्या मार्गदर्शनाचा लाभ व्हावा म्हणून तालुकास्तरीय मेळाव्याचे गावात आयोजन केले.

आदर्श गावाच्या ध्येयाने झपाटलेले श्री. उबाळे इथेच थांबले नाहीत. त्यांनी आपल्या गावातील काही तरूणांसाठी हिवरेबाजार आणि राळेगनसिद्धीचा अभ्यासदौरा आयोजित केला. या गावांचा विकास पाहून हरखून गेलेली ही तरूणाई आपल्या गावाचा “अस्साच” विकास करायचा हा निर्धार मनाशी करूनच परतली. त्यांच्या 245 कुटुंबांच्या गावात सुरुवातीला फक्त 4 कुटुंबाकडे शौचालये होती. आज गावात शंभरटक्के कुटुंबाकडे शौचालय आहे. “आपला विकास- अपुल्या हाती, ग्रामविकासाचे होऊ या साथी” असं म्हणत गाव सर्वांगीण विकासाच्या एका ध्येयाने प्रेरित झालं. स्वच्छतेतून समृद्धीकडे नेणाऱ्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात गावानं 2008-09 साली सहभाग घेतला. लोक एकजूटीने कामाला लागले. श्रमदान करू लागले. गावातील रस्त्यांचे रुंदीकरण झाले, गावात वृक्ष लागवड झाली. शोषखड्डे, घर तिथे शौचालय, गांडूळ खत निर्मिती, गप्पी माशांची पैदास, सेंद्रीय खत प्रकल्प यासारखे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गावाने राबविले.

गावातील महिला आणि युवक मंडळे, बचतगट, ज्येष्ठ नागरिक, भजनी मंडळे, शाळेतील स्वच्छता दूत, सर्व ग्रामस्थ यांनी एकमेकांच्या हातात हात घालून ग्रामविकासाची ही दिंडी जोमाने पुढे नेली. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांना यश मिळालं आणि गावाला संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात जिल्ह्यात आणि नंतर विभागात दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. पुरस्कार मिळाला की हुश्श्श्. . . संपली बाबा आपुली जबाबदारी असं न म्हणता गावानं कामात सातत्य ठेवलं आणि त्याचं फळ म्हणून गावानं 2009-10 मध्ये याच अभियानात जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळवला.

असा पुरस्कार मिळवणारी सनगाव ही अंबाजोगाई तालुक्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली. याचवर्षी ग्रामपंचायतीला विभागीयस्तरावर तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. गावकऱ्यांचे कामातील सातत्य त्यांना यश देऊ लागले आणि पुरस्काराची मालिका सुरु राहिली. त्यामुळे गावकऱ्यांचा उत्साह आणखी वाढला. आता विभागात “पहिलं यायचंच “ या ध्येयाने गावकरी कामाला लागले. यासाठी गावाच्या कामातील उणिवांचा शोध घेण्यात आला, त्याची कारणं जाणून घेण्यात आली आणि त्यावर उपाय शोधण्यात आले.

गावकऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांना आणि निर्धाराला यातून घवघवीत यश मिळाले, ग्रामपंचायत 2010-11 च्या अभियानात तालुका, जिल्हा आणि विभागस्तरावर पहिली आली. याचकाळात ग्रामपंचायतीला स्व. वसंतराव नाईक पाणी व्यवस्थापन पुरस्कार आणि सामाजिक एकतेसाठीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष पुरस्काराने राज्यस्तरावर सन्मानित करण्यात आले.

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातील कामाने गावाला राष्ट्रीयस्तरावरचा” निर्मलग्राम” पुरस्कार देखील मिळवून दिला. ग्रामपंचायतीने या पुरस्कारातही सातत्य राखले आहे.गाव आज पूर्ण हागणदारीमुक्त आहे. एकही व्यक्ती उघड्यावर शौचास जात नाही. विकासाच्या ध्येयाने झपाटलेल्या गावाने पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेत सहभाग नोंदवला. एक व्यक्ती एक झाड, गावातील प्लॅस्टिक बंदी, करवसुली, यासारख्या सर्व निकषांवर खुप चांगलं काम केलं. एक व्यक्ती एक झाड योजनेत जेवढी झाडं लावली तेवढी जगवण्यात गावाला यश मिळालं. झाडं लावण्याच्या आणि जगवण्याच्या कामात शिस्त राहावी म्हणून प्रत्येक झाडाला नंबरिंग करण्यात आले.

केवळ विकास कामं करून थांबायचं नाही तर प्रगत विचारांची पेरणी करण्याचे कामही गावानं केलं. मागील 10 वर्षांपासून गावात “एक गाव एक गणपती” हा उपक्रम राबविला जात आहे. प्रदुषणाला आळा घालण्यासाठी गावातील ही एक गणेश मूर्ती माती पासून तयार करण्याचा एक सुंदर निर्णय गावाने घेतला आणि अंमलात आणला.

गावातील पथदिवे हे सीएफएल आणि एलईडी चे आहेत. चौकात सौरदिवे आहेत. प्रत्येक घरातील कचरा गोळा करून तो वाहून नेण्यासाठी घंटागाडीची व्यवस्था करण्यात आली आहे. गोळा झालेला कचरा एकाठिकाणी साठवून त्यापासून खत निर्मिती केली जाते. त्याचा वापर परसबागा, शाळेतील बागा, शेती यासाठी केला जातो. गावात बंदिस्त गटारे आहेत. बंदिस्त गटारे, परसबागा आणि शोषखड्ड्यांच्या माध्यमातून सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यात आले आहे. इको व्हिलेजमधील गावाची करवसुली 100 टक्के आहे. यामुळे ग्रामपंचायत आर्थिकदृष्टया सक्षम होण्यास मदत झाली असून गावानं पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेतील तीनही वर्षांचे निकष पहिल्याच वर्षी पूर्ण केल्याने ग्रामपंचायतीचा तत्कालीन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्याहस्ते “पर्यावरण विकासरत्न” पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.

चांगले काम झाले, गावाचे नाव ही झाले. ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी मुद्दाम या गावाला भेट देऊन येथील विकासकामांची पाहणी केली. 10 लाख रुपयांचा निधी विकास कामांसाठी मंजूर केला. त्यातून गावात बंदिस्त नाल्यांचे काम करण्यात आले. यशवंतराव चव्हाण गौरव ग्रामसभा पुरस्कार 2010-11 साठी ग्रामपंचायतीला जिल्ह्यातून प्रथम पुरस्कार मिळाला. यातही गावाने सातत्य राखलं आणि सन 2011-12 च्या यशवंतराव चव्हाण गौरव ग्रामसभा पुरस्काराने नुकताच सरपंच श्रीमती रेखा दिपक कांबळे, उपसरपंच शंकर उबाळे आणि ग्रामसेवक एन.व्ही पवार यांचा गौरव करण्यात आला. आज गावाचा चेहरामोहरा पूर्ण बदललेला आहे. सनगावाला भेट देऊन इथल्या विकास कामांची पाहणी करण्यासाठी आता आजूबाजूच्या जिल्ह्यातून, विभागातून लोक येऊ लागले आहेत.

आज गावाचा कारभार श्रीमती रेखा कांबळे या कार्यक्षम महिला सरपंचाच्या हाती आहे. अतिशय संवेदनशीलपणे गावचे प्रश्न समजून घेतांना त्यांनी गावाची ही विकास घोडदौड अशीच नेटाने पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. जिल्हा परिषदेचे अधिकारी-कर्मचारी यांचे मार्गदर्शन, गावकऱ्यांचा सहभाग, गाव पातळीवर काम करणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या सहकार्य आणि योगदानातून आम्ही यशस्वीपणे पुढे जात आहोत, अशी प्रामाणिक भावना विस्तार अधिकारी विठ्ठल नागरगोजे यांनी व्यक्त केली आहे.

डॉ. सुरेखा मुळे

Thursday, February 21, 2013

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम सन 2013-2014 अंतर्गत दिनांक 24 फेब्रुवारी 2013 या दिवशी 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ लसीची एक-एक मात्रा दिली जाणार आहे.
लाभार्थीना 2 कि.मी. पेक्षा जास्त अंतर चालत जावे लागणार नाही याची दक्षता घेऊन बुथची स्थापना करण्यात आली आहे.लसीकरणाच्या दिवशी सर्व बालकांना लस मिळावी यासाठी जिल्ह्याच्या सर्व सीमा, नाके, एस.टी. स्टॅन्ड, रेल्वे स्थानके, विमानतळ, टोलनाके इत्यादी ठिकाणी ट्रान्सिट टीम कार्यरत राहणार आहे. बांधकामाची ठिकाणे, रस्त्याची कामे, खाणकामगार, ऊसतोड कामगार, वीटभट्टया, मंदिरे, बगीचे, फुटपाथवरील लाभार्थी, तात्पुरत्या व फिरत्या वसाहती, फिरते प्रसूतीगृह व खाजगे दवाखाने, तुरळक वाड्या वस्त्या इ. ठिकाणच्या बालकांच्या लसीकरणासाठी मोबाईल टीम स्थापन करण्यात आल्या आहेत.

दि. 19 जानेवारी 2008 नंतर जन्मलेल्या सर्व बालकांची नोंदणी आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी इ. व्दारा लाभार्थीची नोंदणी करण्यात येत आहे. नोंदणी केलेल्या बालकांना बुथवर येणे सोयीचे व्हावे यासाठी बुथचे ठिकाण व लसीकरणाचा दिनांक असलेली स्लिप वाटण्यात आली आहे. 100 पर्यंत लाभार्थी असलेल्या केंद्रावर दोन व 100ते 250 लाभार्थी असलेल्या केंद्रावर तीन याप्रमाणे प्रत्येक बुथवर लसपाजक, लेखनिक व केंद्रप्रमुख अशा स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे.
जिल्हास्तरीय अधिकारी, प्रभारी वैद्यकीय अधिकारी व जिल्हास्तरीय पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण दि. 13 डिसेंबर 2012 रोजी पूर्ण करण्यात आले आहे.जिल्हा, तालुका व प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरीय पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण दि. 7 जानेवारी 2013 रोजी घेण्यात आले आहे. बुथ कर्मचारी व पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण 29 ते 31 डिसेंबर 2012 या कालावधीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर पूर्ण करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकारी व जिल्हास्तरीय पर्यवेक्षक यांचे पुन:प्रशिक्षण दिनांक 14 व 15 जानेवारी 2013 रोजी पूर्ण करण्यात आले आहे.

प्रत्येक बुथच्या कार्यक्षेत्रामध्ये पोलिओ विषयक म्हणी लिहिण्यात आल्या आहेत. प्रा.आ.केंद्र, उपकेंद्र, लसीकरण केंद्र, मोक्याच्या ठिकाणी बुथचे ठिकाण व दिनांक असलेले बॅनर, पोस्टर्स लावण्यात आले आहेत. लसीकरणाची तारीख, ठिकाण व महत्व इत्यादी विषयी लाऊड स्पीकरव्दारे प्रसिध्दी लसीकरणाच्या अगोदर 3 दिवस करण्यात येत आहे. स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायत, शाळा इत्यादीच्या वार्ताफलकांवर लसीकरणाच्या तारखा व ठिकाण लिहून आवाहन करण्यात येत आहे. जिल्हास्तरावर व गावस्तरावर प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

सन 1995-96 पासून सर्व विभागांच्या सहकार्याने सांगली जिल्ह्यामध्ये 100 टक्के पोलिओ लसीकरण झाले आहे. देवी या रोगाचे उच्चाटन केलेले आहेच. पोलिओ या रोगाचे निर्मूलनही सर्वांच्या सहकार्याने निश्चित होईल. त्या दिशेने जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद आरोग्य विभागाची यशस्वी वाटचाल सुरु आहे.

Friday, January 25, 2013

उद्दिष्‍ट : पोलियो निर्मूलनाचे

‘दो बुंद जिंदगी के’ या चार अक्षरी अमिताभ बच्‍चनच्‍या आवाहनाला भारतीय नागरिकांनी प्रतिसाद दिला आणि भारत पोलिओ निर्मूलनाच्‍या वाटेवर चालू लागला. मुलं ही देवाघरची फुलं आहे, असे म्‍हटल्‍या जाते. या फुलांना टवटवीत आणि निरोगी ठेवणं केवळ पालकांचीच नाही तर शासन आणि समाजाचीसुध्‍दा जबाबदारी आहे. त्‍यामुळे शासनाने पोलिओ निर्मूलनाचा ध्‍यास घेतला असून गेल्‍या दहा वर्षातील नागरिकांचा या मोहिमेला प्रतिसाद पाहता भारतातून पोलिओ हद्दपार होण्‍याच्‍या मार्गावर आहे.

सुरुवातीच्‍या काळात नागरिकांना किंवा बालकाला कोणत्‍याही असाध्‍य रोगाची लागण झाली की, हा देवाचा कोप आहे, असे मानले जात होते. कोणतेही उपचार न करता केवळ स्‍वत:च्‍या नशिबाला दोष देणे, यापलिकडे काहीही करण्‍याची माणसाची प्रवृत्‍ती नव्‍हती. मात्र काळ बदलला. नागरिकही सजग झाले आणि विज्ञानाच्‍या प्रगतीमुळे या असाध्‍य रोगांवर मात करणा-या औषधी निर्माण झाल्‍या. त्‍यामुळे रोगांचे निदान होऊन त्‍यावर उपाययोजना होऊ लागल्‍या. भारतात पोलिओचे उच्‍चाटन करण्‍यासाठी 1995 पासून पोलिओ लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. सुरुवातीला या मोहिमेला नागरिकांचा प्रतिसाद संथ होता, मात्र शासनाच्‍या प्रयत्‍नामुळे नागरिकांमध्‍ये या मोहिमेची जनजागृती झाली आणि पालक बालकांना पोलिओ डोजसाठी बूथवर नेऊ लागले. परिमाणी भारतात पोलिओचे उच्‍चाटन होण्‍यास सुरूवात झाली. एवढेच नव्‍हे तर 15 जानेवारी 2011 नंतर भारतात पोलिओचा एकही रुग्‍ण आढळला नाही. याची दखल जागतिक आरोग्‍य संघटनेनेसुध्‍दा घेतली आणि शासनाने केलेल्‍या प्रयत्‍नांचे कौतुक केले.

1995 मध्‍ये जेव्‍हा पोलिओ लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली तेव्‍हा परभणी शहरात 40 बूथ लावण्‍यात आले होते. आरोग्‍य कर्मचा-यांचा तुटवडा, नागरिकांत पाहिजे त्‍या प्रमाणात जनजागृती नसल्‍यामुळे सुरुवातीला ही मोहीम संथगतीने सुरू होती, मात्र आज प्रत्‍यक्ष नागरिक यात सहभागी होत असल्‍यामुळे आणि आरोग्‍याच्‍या बाबतीत शासन कटीबध्‍द असल्‍यामुळे प्रशासनातर्फे पोलिओ लसीकरणाची मोहीम प्राधान्‍याने राबविण्‍यात येत आहे. जिल्‍ह्यात 20 जानेवारी आणि 24 फेब्रुवारी 2013 रोजी पोलिओ लसीकरण आहे. 

आरोग्‍य विभागातर्फे जिल्‍ह्यातील 2 लक्ष 28 हजार 214 बालकांना पोलिओ डोज देण्‍याचे उद्दिष्‍ट ठेवण्‍यात आले असून यात ग्रामीण भागातील 1 लक्ष 41 हजार 700 तर शहरी भागातील 86 हजार 514 बालकांचा समावेश आहे. त्‍यासाठी परभणी जिल्‍ह्यात 1 हजार 395 बुथची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. यात ग्रामीण भागात 1 हजार 110 तर शहरी भागात 285 बुथ लावण्‍यात येणार आहे. यातूनही काही बालके सुटली तर लसीकरणानंतर तीन दिवस ग्रामीण भागात आणि पाच दिवस शहरी भागात घरोघरी जाऊन लसीकरण करण्‍यात येणार आहे. जिल्‍ह्यातील एकूण 3 लक्ष 27 हजार 113 घरी पोहचून लसीकरण करण्‍याचे आरोग्‍य विभागाचे उद्दिष्‍ट असून यात ग्रामीण भागातील 2 लक्ष 24 हजार 867 तर शहरी भागातील 1 लक्ष 2 हजार 246 घरांचा समावेश आहे. आरोग्‍य विभागाने यासाठी ग्रामीण भागात 685 टीम आणि शहरी भागात 210 टीम अशा एकूण 895 टीम तयार ठेवल्‍या आहेत. प्रवास करणारे कोणतेही बालक पोलिओ डोजपासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासन प्रयत्‍नशील आहे. रेल्‍वेस्‍टेशन, बसस्‍थानक आणि चेक पोस्‍टवर एकूण 100 टीमची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. यात ग्रामीण भागात 58 तर शहरी भागात 42 टीमचा समावेश आहे. याशिवाय वीटभट्ट्या, जिनिंग, आखाडे तसेच अस्‍थाई लोकांसाठी ग्रामीण भागात 63 टीम आणि शहरी भागात 132 अशा एकूण 195 मोबाईल टीम जिल्‍ह्यात कार्यरत राहणार आहेत.

गत अनेक वर्षांपासून परभणीत पोलिओचा रुग्‍ण आढळला नाही, ही नक्‍कीच आनंदाची बाब आहे. तसाच तो पुढेही आढळू नये, यासाठी आरोग्‍य विभाग, जिल्‍हा प्रशासन नेहमीच तत्‍पर असते. या लसीकरण मोहिमेत पाल्‍यांनी पाच वर्षांपर्यंतच्‍या मुलांना आणून त्‍यांना पोलियो डोज द्यावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी डॉ. शालीग्राम वानखेडे, जिल्‍हा प्रशासन आणि आरोग्‍य विभागाने केले आहे.

लसीकरण मोहिमेला सुरुवात झाल्‍यानंतर जागतिक पातळीवर पोलिओ रुग्‍णांच्‍या संख्‍येत कमालीची म्‍हणजे तिपटीने घट झाली आहे. जागतिक पातळीवरचे प्रतिबिंब भारतातही उमटले असून आपल्‍या देशातून पोलिओचे रुग्‍ण जवळपास हद्दपार झाले आहेत. 2011 मध्‍ये भारतात शेवटचा पोलिओ रुग्‍ण पश्‍चिम बंगालमध्‍ये आढळला होता. जानेवारी 2011 नंतर भारतात पोलिओचा एकही रुग्‍ण न आढळल्‍यामुळे जागतिक आरोग्‍य संघटनेने भारताची पाठ थोपटली आहे. 

राजेश येसनकर,
माहिती अधिकारी, परभणी

Wednesday, December 5, 2012

शून्य गाठायचा आहे.....!

एड्स या भयानक रोगावर अजूनही खात्रीशीर इलाज उपलब्ध झाला नसल्यामुळे अत्यंत कमी कालावधीत भीषण परिणाम या रोगाने दाखवून दिले आहेत. जवळपास एक कोटी लोक आशिया खंडात या रोगाने बाधित आहेत. भारतात एड्सचे रुग्ण प्रामुख्याने महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तामिळनाडू या राज्यात आढळून आले आहेत. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर या शहरात एच. आय. व्ही. बाधित संशयित व्यक्ती आढळून येतात. शासनाच्या आरोग्य विभागाने विविध उपाययोजना केल्यामुळे सांगली जिल्ह्यातील एच.आय.व्ही. बांधितांची संख्या कमी होत असल्याचे चित्र असून समाजाचा दृष्टीकोनही आता बदलू लागल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे. जागतिक एड्स निर्मूलन दिनाच्या निमित्ताने एड्स रोगाविषयी...

शासनाच्या वतीने व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने गेल्या काही वर्षात एड्स या रोगाबाबत समाजात मोठ्या प्रमाणावर जनजागृतीचा कार्यक्रम व प्रचार केल्यामुळे या रोगाला काहीशा प्रमाणात आळा बसत असल्याचे आढळून येत आहे. अलिकडे केलेल्या सर्व्हेक्षणात एड्स रोगाची लागण होण्याच्या प्रमाणात जवळपास 56 टक्क्यांनी घट झाली आहे. ही आकडेवारी निश्चितच समाधानकारक आहे.

एड्स म्हणजे काय ? AIDS (एड्स)- ऍ़क्वायर्ड इम्यूनो डिफिसियन्सी सिंड्रोम. HIV(एच.आय.व्ही.) - ह्यूमन इम्यूनोडिफिसियन्सी व्हायरस. एड्स म्हणजे एक अशी स्थिती असते की, ज्यामध्ये एच.आय. व्ही. मुळे आपल्या प्रतिकार शक्तीमधील टी हेल्पर सेल्स किंवा ज्याला सी. डी. 4 काऊंट म्हणतात, या कमी होतात. त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती कमी होते. रोज होणारे लहान-सहान संसर्गही माणूस सहन करु शकत नाही.

एड्सची लक्षणे - कारणे----
एड्समध्ये प्रमाणापेक्षा जास्त वजन कमी होणे, ताप येणे, डायरीया, रात्रीचा घाम येणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. एड्सग्रस्त व्यक्तीबरोबर शारिरीक संबंध ठेवणाऱ्या अन्य व्यक्तीमध्येही याची लागण होते. असुरक्षित शारिरीक संबंध, दूषित रक्त, मातेच्या दुधात एच.आय.व्ही. व्हायरस असेल तर एच.आय.व्ही. बाधित लागण झालेल्या गर्भवतीकडून तिच्या बाळालाही धोका उद्भवू शकतो.

एच.आय.व्ही. होऊ नये म्हणून विवाहापूर्वी लैंगिक संबंध टाळावेत. विवाहित असाल तर जोडीदाराशी प्रामाणिक राहणे ,इंजेक्शन घेताना निर्जंतूक सुईचा आग्रह धरावा. ज्यावेळेस रक्ताची गरज असेल त्यावेळी दूषित रक्त वापरले जाणार नाही याची खात्री करुन घेणे, लैंगिक संबंधावेळी निरोधचा वापर करणे आदी गोष्टीची दक्षता घेतल्यास एच.आय.व्ही. पासून तुम्ही निश्चित सुरक्षित राहाल.

यावर्षी जागतिक एड्स दिनानिमित्त शून्य गाठायचा आहे हे घोषवाक्य असून यापुढे नवीन एच.आय.व्ही. संसर्ग होऊ द्यायचा नाही. कलंक भेदभाव शून्यावर आणणे, एड्सने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणणे ही उद्दिष्टे ठेवण्यात आली आहेत. सांगली जिल्ह्यात 2004 मध्ये सर्वसाधारणपणे एड्सचे प्रमाण 24.58 टक्के इतके होते तेच प्रमाण 2012 मध्ये 5.62 इतके खाली आले आहे.

सांगली जिल्ह्याचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शाळा, महाविद्यालयातून चर्चासत्रे, मेळावे, व्याख्याने आयोजित करुन तरुण पिढीमध्ये या रोगाबाबत जनजागृती करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याकरिता शाळा, महाविद्यालयातून वत्कृत्व, निबंध, पोस्टर्स आदी स्पर्धा आयोजित करुन त्या माध्यमातूनही समाजात प्रबोधन करण्यात येत आहे. आरोग्य यंत्रणेबरोबरच जिल्ह्यातील खाजगी हॉस्पिटल व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने एड्स या रोगाचा प्रसार थांबविण्यासाठी विविध उपक्रमही हाती घेण्यात आले आहेत.

जिल्हृयातील प्रमुख शहरात व तालुक्याच्या ठिकाणच्या प्रमुख मार्गावरुन प्रभात फेरी व रॅलींचे आयोजन करुनही समाजामध्ये या रोगाच्या परिणामाविषयी जागृती करण्यात येत आहे. तसेच या रॅलीमध्ये पथनाट्याचाही समावेश करण्यात आला आहे. घडीपत्रिका व माहितीपुस्तिका, आकाशवाणी व स्थानिक केबल वाहिन्यांच्या माध्यमातूनही सर्वसामान्यापर्यंत या रोगाबाबत समाजास माहिती देवून त्यांच्यात जागृती करण्यात येत आहे.

जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेबरोबरच आरोग्य विभागाने एड्सचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजना करुन त्या राबविल्यामुळे जिल्ह्याने चांगलीच प्रगती केली असली तरी या वर्षाच्या घोष वाक्याप्रमाणे शून्य प्रमाण आणण्यासाठी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, महापालिकेचे आयुक्त संजय देवगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिव्हिल हॉस्पिटलचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पांडुरंग बुरुटे, एड्स कार्यक्रमाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी विवेक सावंत व स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते जिल्ह्यातून एड्स रोगाचे उच्चाटन करण्यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.

-- दिलीप घाटगे, माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय,सांगली

Sunday, July 8, 2012

ऐन तारुण्यात सामना मुरूमांशी


स्वच्छंदपणे बागडत विश्वाला कवेत घेऊ पाहणारं तारुण्य सर्वांनाच हवं असतं. प्रत्येकजण आयुष्यातील सर्वात सुवर्णकाळ म्हणून तारुण्याकडे पाहात असतो. मात्र याच आत्मविश्वासानं ओसंडून वाहणाऱ्या गुलाबी तारुण्याच्या समुद्राला काही समस्यांचा नावडता किनारा लाभलेला असतो. ऐन तारुण्यात सामना करावा लागणाऱ्या नावडत्या गोष्टींपैकी एक म्हणजे तारुण्यपीटिका…अर्थात मुरूमं. यालाच इंग्रजीमध्ये पिंपल्स असं म्हणतात. कोणत्याही वयातील प्रत्येक व्यक्तीला आपण सुंदर दिसावं अशी इच्छा असते. तारुण्यात तर ही इच्छा प्रबळ होतेच. मात्र याच तारुण्यात नैसर्गिकरित्या मिळालेल्या आत्मविश्वासाला काहीसा धक्का लावण्याचा प्रयत्न तारुण्यपीटिका करतात. मात्र काही पथ्य पाळली, आहारात थोडे बदल केले किंवा चेहऱ्याची योग्य काळजी घेतली तर तारुण्यपीटिकांवर मात करता येऊ शकते.
किशोर वयातून तारुण्यात पदार्पण करताना मुलं आणि मुलींच्या शरीरात महत्त्वाचे बदल होत असतात. मुख्यत: तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना यौनग्रंथी विशेषत्वाने सक्रीय होतात. यौन ग्रंथीतील अंतस्त्राव शरीराच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरतात. मात्र या अंतस्त्रावात अँण्ड्रोजनची पातळी वाढल्यावर मुरूमं येतात. तसेच मासिक पाळी येण्यापूर्वी मुलींच्या शरीरात प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढते त्यामुळे चेहऱ्यावर गालांवर, नाकांवर, कपाळावर तसेच खांदे, पाठीवर किंवा छातीवर मुरूमं येतात. ठराविक वयात शरीरात होणारे बदल आपण टाळू शकत नाही मात्र आपल्या आहार-विहारात काही बदल केल्यास आपण मुरुमांच्या त्रासाची तीव्रता कमी करू शकतो. कित्येकदा अयोग्य आणि अवेळी आहार मुरूमांना आमंत्रण ठरतो. मुरूमांचा त्रास असणाऱ्यांनी शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थ टाळणं गरजेचं असतं. बदाम, आक्रोड तसेच मांसाहारासारखे गरम प्रकृतीचे पदार्थ टाळणंही आवश्यक असतं.
मुरुमांचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना तेलकट आणि हाय कॅलरी असणाऱ्या पदार्थाचं सेवन कमी करावं. बटाटा, पिझ्झा, बर्गर तसेच चॉकलेट, शीतपेयं खाणं शक्यतो टाळावं. शरीरात आयोडीन प्रमाणापेक्षा जास्त झालं तरीही मुरूमं येतात. अतितिखट किंवा अतिगोड, आंबवलेले पदार्थ तसेच कोबी, फ्लॉवर, गवार, ढोबळी मिरची, वांगे, टोमॅटो, चिंच, कैरी, दही, बेसनाचे पदार्थ, अननस वर्ज्य करावे. अर्धवट झोप किंवा मानसिक ताणतणावही मुरुमं वाढवण्यास मदत करतात त्यामुळे पुरेशी झोप घेणं आणि मानसिक तणावातून मुक्ती मिळवणं गरजेचं असतं. धूम्रपान, तंबाखू तसेच तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन आरोग्याला जसं अपायकारक आहे तसच मुरुमं वाढण्यासही कारणीभूत ठरतं. घामामुळं चेहरा तेलकट होऊन त्वचेवरची सूक्ष्म छिद्र बंद होतात आणि त्यामुळे पी अँक्ने नावाचा बॅक्टेरिया वाढून चेहऱ्यावर लाल पुटकुळ्या येतात. डोक्यात कोंडा झाल्यानंही मुरुमं येतात. कित्येकदा अनुवंशिकतेतूनही मुरूमं येऊ शकतात. स्त्रियांच्या मासिक पाळीत अनियमता आल्यास किंवा मासिक पाळीबाबत काही समस्या उद्भवल्यासही मुरूमांचं प्रमाण वाढतं. त्यामुळे अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं क्रमप्राप्त ठरतं. पचनासंदर्भातले गॅस, अँसिडिटीसारख्या पोटाच्या समस्या तसेच मलमूत्र विसर्गाच्या समस्याही मुरुमांना आमंत्रण ठरतात.
मुरुमांचा त्रास असणाऱ्यांनी आहारात फळं, पालेभाज्यांचा समावेश करावा. कपाळावर मुरूमं येत असल्यास केसांना तेल लावणं शक्यतो टाळावं. चेहरा दिवसातून दोन ते तीन वेळा कोमठ पाण्याने धुवून कोरड्या टॉवेलने पुसावा. चेहरा जास्तीत जास्त कोरडा राहील याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे जेवणानंतर भरपूर पाणी प्यावं. रक्तचंदन, कडूलिंबाची पानं, तुळशीची पानं मसूरडाळ यांचे समप्रमाणात मिश्रण वाटून त्याची पेस्ट करावी आणि सकाळी अंघोळीअगोदर चेहऱ्याला लावावी. चेहऱ्यावरील पेस्ट सुकल्यानंतर कोमठ पाण्यानं धुवून काढावी. तसेच डाळींब आणि संत्र्याचा सालीला थोड्या हळदीबरोबर वाटून त्यात पिकलेल्या लिंबाचा रस मिसळून मुरूमांवर लावावा. त्यामुळे् मुरूमं कमी तर होतातच पण फुटलेल्या मुरुमांमुळे चेहऱ्यावर उठलेले काळे डागही कमी होण्यास मदत होते. जायफळ तसेच रक्तचंदन उगळून चेहऱ्यावर लावल्यानेही मुरुमांचं प्रमाण कमी होतं.
मुरुमांचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी पुरेसा व्यायाम करावा. अपचनाचे त्रास होवू नयेत याची काळजी घ्यावी. चेहऱ्यावर आलेल्या मुरुमांना वारंवार हात लावू नयेत तसेच मुरुमं फोडण्याचा प्रयत्नही करू नये. मुरूमं पिकल्यावर आपोआप फुटतात. मुरूमं फुटल्यावर लगेच स्वच्छ पाण्यानं चेहरा धुवावा. त्याचप्रमाणे साबणाचा वापर टाळावा. उन्हात फिरणं शक्यतो टाळावं किंवा उन्हात फिरण्यामुळं तसेच उकाड्यामुळे चेहऱ्यावर आलेला घाम त्वरित पुसून घ्यावा. रासायनिक औषधं किंवा रासायनिक गूण असणारे वेगवेगळे मलम लावण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Tuesday, May 1, 2012

थोडसं...स्वाईन फ्लू बाबत

राज्यात मुंबई,पुणे,नाशिक येथे आढळलेल्या स्वाईन फ्लू चा सोलापूर शहर व जिल्ह्यात अद्याप प्रभाव आढळलेला नाही.या रोगाचा प्रार्दूभाव नाही म्हणून सोलापूर जिल्हा आरोग्य विभाग निश्चिंत आहे अशातला भाग नाही. या रोगाची साथ आलीच तर त्याला तोंड देण्यासाठी आरोग्य विभाग सुसज्ज असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्स्क डॉ. दिनकर रावखंडे यांनी दिली.

स्वाईन फ्ल्यू चा मुकाबला करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (सोलापूर) येथे एकाच वेळी १० पेशंट (रुग्णांची) सोय होईल असे एक स्वतंत्र वार्ड सिव्हील हॉस्पिटल मध्ये उघडण्यात आले आहे.

यामध्ये १ व्हेंटीलेटर, ऑक्सिजन या बाबींची सोय करण्यात आली आहे. स्वाईन फ्लू बाधित रुग्णावर उपचार करण्यासाठी ‍तीन युनिटची निर्मिती करण्यात आली असून त्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ ठेवण्यात आला आहे.

सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या लक्षात घेता टॅमी फ्लू च्या गोळयांचा साठा मोठया प्रमाणात उपलब्ध करण्यात आला असून सिव्हील हॉस्पीटलमध्ये ७५mg च्या १७४००, ४५ mg च्या १८५० व ३० mg च्या ५०० अशा सुमारे १९७५० इतक्या गोळया असून जिल्ह्यातील ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात मागणीनुसार वितरीत करण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील अकलूज, करमाळा व पंढरपूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयातही गोळया उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.पंढरपूरातील उपजिल्हा रुग्णालयामध्ये सुमारे ८५० गोळया उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

या लेखाव्दारे स्वाईन फ्लू म्हणजे काय? याच्याशी कसा लढा द्यायचा, कशी काळजी घ्यावयाची? आजार झाल्यावर नेमके काय करायचे? प्रतिकारशक्ती कशी वाढवायची आदी गोष्टींची आपण माहिती करुन घेऊ या....

स्वाईन फ्लू :-
  • हा रोग संसर्गजन्य रोग असून तो एका माणसापासून दुस-या माणसाला होतो.हा रोग प्रामुख्याने इनफ्ल्यूंझा या विषाणूपासून होणारा आजार आहे.
  • सध्या ह्या आजारावर ' नॅसोव्हॅक आणि व्हॅक्स फ्लू ' या दोन लसी उपलब्ध असून तीन वर्षापुढील कोणतीही व्यक्ती ही लस घेऊ शकते.विशेषत: लहान मुले, गर्भवती ‍महिला आणि अस्थमा रुग्णांनी ही लस काळजीपूर्वक घ्यावी.

    लक्षणे :-
  • श्वास घेण्यास त्रास होणे,घसा दुखणे, खोकला येणे, ताप येणे, अतिसार, अंग दुखणे आदी लक्षणे स्वाईन फ्लू होणा-या रुग्णांना जाणवतात.

    घ्यावयाची काळजी :-
  • खोकताना, शिंकताना रुमाल तोंडावर धरावा.
  • सर्दी,खोकला,ताप असताना कामावर जाऊ नये.
  • प्रवास टाळावा.
  • वारंवार हात साबणाने स्वच्छ धुवावेत.
  • नळाच्या पाण्यात धारेत किमान २० सेकंद हात धुवावेत.
  • सिनेमा, नाट्यगृहे, बाजारपेठ, उद्याने,‍ मॉल आदी गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे.
  • साथीच्या रोगांच्या कालावधीत दर दोन तासांनी कोमट पाण्यांनी हात धुवावेत.
  • सतत खोकणा-यांनी फेसमास्कचा वापर करणे चांगले.
  • हा आजार झाल्यास धुम्रपान टाळावे.(एरवी ते टाळल्यास उत्तमच) साथीच्या रोगांच्या काळात नाक, तोंड, डोळयांना हात लावू नये.
  • या रोगाची प्राथमिक लक्षणे दिसताच भोंदूबाबा,वैद्याकडे न जाता किंवा घरगुती उपचार न करता सरळ जवळच्या वैद्यकीय केंद्रात जाऊन आवश्यक ते उपचार करुन घेणे योग्य ठरते.
  • डी-हायड्रेशन टाळण्यासाठी रुग्णांनी भरपूर पाणी घ्यावे तसेच आरोग्यदायी,समतोल आहार घ्यावा.
  • आहारात लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या यासारख्या सी ‍िव्हटॅमीन असलेल्या पदार्थाचा समावेश जरुर करावा.
  • साथीच्या रुग्णांपासून किमान एक हात दूर राहण्याची दक्षता घ्यावी.
  • एकाच व्यक्तीने वापरलेला मास्क इतरत्र न फेकता त्याची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.
  • या सर्व गोष्टींबरोबरच सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पुरेशी विश्रांती, झोप घ्यावी.

    आपल्यामुळे इतरांना या रोगाचा त्रास न होऊ देणे, प्रतिकारशक्ती वाढविणे, योग्य वैद्यकीय उपचार वेळेत घेणे या त्रिसूत्रीची अंमलबजावणी केल्यास तुम्ही स्वाईन फ्लू वर मात करू शकता.

    हे टाळा :- स्वाईन फ्लू झालेल्या रुग्णांनी काही गोष्टी कटाक्षाने पाळायला हव्यात.
  • शक्यतो एखादी प्रिय व्यक्ती भेटल्यास आलिंगन देणे, हस्तांदोलन करणे, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे अथवा गर्दीत मिसळणे.
  • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधोपचार करणे.
  • विनामास्क फिरणे.
  • विनाकारण एन-९५ मास्कचा आग्रह धरु नका.

    लक्षात ठेवा :-
  • स्वाईन फ्लू हा अतिगंभीर आजार नाही.
  • योग्य उपचाराने आणि आपल्या थोड्याश्या काळजीने हा लवकर आटोक्यात येतो.
  • औषधाने तो नक्की बरा होतो यासाठी राज्य शासनाने (आरोग्य विभागाने) ' टॅमी फ्लू ' च्या गोळया उपलब्ध केल्या आहेत.
  • ऑसेल्टामिव्हिर' हे औषध राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत विनामूल्य उपलब्ध आहे.याचा लाभ सर्व रुग्णांनी घ्यावा.
  • सर्वात महत्वाचे म्हणजे या रोगाची प्राथमिक लक्षणे आढळून आल्यास कसलाही संकोच न बाळगता थेट जवळच्या शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी जा.
  • फारुक बागवान
  • Saturday, February 18, 2012

    राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम

    देशात पोलिओ निर्मूलन कार्यक्रमाचे अंतर्गत सन १९९५ पासून पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. सर्वसाधारणपणे वर्षातून दोन वेळा संपूर्ण देशात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम व पोलिओच्या दृष्टीने जोखीमग्रस्त भागात उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येते. 

    राज्यात अद्यापपर्यंत एकूण ३६ राष्ट्रीय मोहीमा व ५१ उपराष्ट्रीय मोहीमा राबविण्यात आल्या आहेत. सन २०११ या वर्षात जानेवारी व डिसेंबर, २०११ या कालावधीत राज्यात एकूण २ राष्ट्रीय व ६ उपराष्ट्रीय माहिमा राबविण्यात आल्या. यावर्षी देखील १९ फेब्रुवारी व १५ एप्रिल २०१२ या दिवशी सर्वत्र राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेविषयी व एकंदरीतच पोलिओ विषयी माहिती देणारा हा लेख...

    सन २०११ मध्ये देशात फक्त १ पोलिओ रुग्ण पश्चिम बंगाल राज्यात जानेवारी २०११ मध्ये आढळून आला आहे. पोलिओ निर्मुलन कार्यक्रमाची सुरुवात झाल्यापासून ते सन २०११ या वर्षात प्रथमच एवढ्या कमी संख्येने पोलिओचे रुग्ण आढळले आहेत. 

    यावर्षीच्या पोलिओ मोहिमेअंतर्गत ० ते ५ वर्षे वयोगटातील राज्यातील सुमारे १ कोटी १९ लाख ९७ हजार ६७२ बालकांना पोलिओची अतिरिक्त मात्रा देण्यात येणार आहे. या मोहीमेमध्ये पोलिओ लसीचे दोन थेंब प्रत्येक बालकाला पाजण्यात येणार आहेत. 

    राज्यात पोलिओ निर्मुलनासाठी राज्य शासनाने उपाययोजना मोठ्या प्रमाणावर केली आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, रायगड, नासिक जिल्ह्यातील काही ठराविक ठिकाणी राष्ट्रीय पोलिओ लसीकरणा मोहीमेसोबतच उपराष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीमही हाती घेण्यात येते. मालेगाव, भिवंडी, बीड याठिकाणी शासनाने विशेष लक्ष केंद्रीत करून लसीकरण मोहीमेस चांगला प्रतिसाद मिळावा म्हणून प्रयत्न केले जात आहेत. 

    नियमित लसीकरण कार्यक्रम :- 
    • नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत आरोग्य सेवा सत्रांच्या माध्यमातून पोलिओ व इतर विविध लसी देण्यात येतात या कार्यक्रमामध्ये खाजगी वैद्यकिय व्यावसायीकांचाही सहभाग घेतला जातो. १ वर्षाचे आतील बालकांना ६ आठवडे, १० आठवडे व १४ आठवडे या वयोगटात प्रत्येक वेळी पोलिओचा एक डोस असे ३ डोस असे एकूण ३ डोस देण्यात येतात. पोलिओचा बुस्टर डोस १६ महिने ते २४ महिने या वयोगटात देण्यात येतो. ही लस तोंडावाटे देण्यात येते.

    एएफपी सर्व्हेलन्स :- 
    • १५ वर्षाखालील बालकांमधील अचानक आलेला लुळेपणा हे संशयित पोलिओचे लक्षण असते. त्यामुळे सर्वेक्षण करुन संशयित पोलिओचे रुग्ण शोधून काढण्यात येतात. सर्व शासकिय रुग्णालय, प्रा.आ.केंद्रे, अशासकिय/ खाजगी बालरुग्णालये यांचेकडून अचानक लुळेपणा उद्भवलेल्या रुग्णांची माहिती जिल्हास्तरावर संकलित करण्यात येते व सर्व जिल्ह्यातून प्रत्येक आठवड्यास ही माहिती राज्य कुटुंब कल्याण कार्यालयास प्राप्त होते.
    • अचानक लुळेपणा आलेल्या रुग्णाची माहिती कळताच ४८ तासाचे आत जिल्हा लसीकरण अधिकारी / एसएमओ हे रुग्णाची तपासणी करतात. रुग्णाचे दोन शौच नमुने २४ तासाच्या आंत तसेच रोगाची लक्षणे दिल्यापासून १४ दिवसांचे आत घेवून ते तपासणीसाठी शितसाखळीमध्ये एन्टेरो व्हायरॉलॉजिकल रिसर्च सेंटर परळ मुंबई येथे पाठविण्यात येतात.

    दि. १९ फेब्रुवारी २०१२ रोजी घेण्यात येणाऱ्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची अंमलबजावणी अशा प्रकारे करण्यात येणार आहे. :-
    • मोहिमेच्या पहिल्या दिवशी बुथवर लसीकरण करण्यात येऊन नंतर घरभेटीद्वारा बुथवर लस न दिलेल्या बालकांना पोलिओची लस देण्यात येणार आहे.

    घरभेटीतील काम :-
    • असंरक्षित बालके शोधून काढणेसाठी प्रत्येक घराला भेट देण्याकरिता घरभेटीची पथके तयार करण्यात येवून त्याद्वारे त्यांना पोलिओ लस देण्यात येईल. एकही बालक असंरक्षित राहणार नाही याची कटाक्षाने दक्षता घेण्यात येईल.
    • त्याशिवाय रेल्वे स्टेशन, बस स्टॅण्ड, विमानतळ, मंदिरे, बगिचे, टोल नाके, तसेच इतर महत्वाच्या ठिकाणी ट्रांझिट टिममार्फत पोलिओ लसीकरण करण्यात येईल.
    • गावाबाहेरच्या/ शहराबाहेरच्या तुरळक वस्त्या, वीटभट्या, उसतोड कामगार वस्त्या, बेघर व फुटपाथ वरील लाभार्थी यांचेकरिता फिरत्या पथकांद्वारे लसीकरण करण्यात येईल. 
    • मुंबई व इतर शहरामध्ये रात्रीची पथके कार्यरत राहाणार आहेत. 

    पल्स पोलिओ मोहीमे विषयी... 
    • ५ वर्षाखालील सर्व बालकांना एकाचवेळी पोलिओ लसीचा अतिरिक्त डोस देणे हे पोलिओ निर्मूलनातील महत्वाचे सुत्र होय. पल्स पोलिओ मोहीमेत या सर्व बालकांना एकाच वेळी पोलिओ लसीचा डोस दिला जातो. त्यामुळे वाईल्ड पोलिओच्या विषाणूंचे संक्रमण रोखण्यात मोठी मदत मिळते. तसेच बाळाच्या आतड्यांमध्ये वास्तव करणारे वाईल्ड विषाणूंचे निष्कासन शक्य होऊन त्यांची जागा लसीचे विषाणू घेतात. 
    • पल्स पोलिओ मोहीमेत पोलिओ लसीचे किमान दोन डोस ४ ते ६ आठवड्याच्या अंतराने देणे आवश्यक असते.

    पोलिओचे विषाणू 
    • पोलिओ लसीचे विषाणू तीन प्रकारचे असतात. पी - १, पी - २, पी-३ यापैकी पी - २ चे निर्मूलन १९९९ पासून झालेले आहे.

    पोलिओ लस केव्हा देऊ नये?
    • पोलिओ लस अत्यंत सुरक्षित असल्याने सर्व बालकांना देता येते. केवळ अत्यंत आजारी (Critically ill Child) बालक असेल तरच त्याला पोलिओ लस देवू नये. आजार बरा झाल्यावर पोलिओची लस द्यावी.
    • पाच वर्षाच्या आतील ए‍क जरी मुल पोलिओ डोस घेण्याचे राहिले तरी त्या बाळाबरोबर इतरांना पोलिओची लागण होऊ शकते. म्हणजेच एक मुल जरी डोस शिवाय राहिले तर आपले सर्व प्रयत्न व्यर्थ ठरतील म्हणून आपल्या मुलाला पोलिओ होऊ नये व त्याच्यापासून इतरांना होऊ नये यासाठी या तारखांना प्रत्येक आई वडीलांनी आपल्या पाच वर्षाच्या आतील बाळाला पोलिओचा डोस नव्हे तर दो बुँद जिंदगीके देणे आठवणीने आवश्यक आहे.

    पोलिओ लसीची संरक्षक क्षमता 
    • पोलिओ लसीचे तीन डोस घेतल्यानंतर ६० ते ७० टक्के बालके संरक्षित होतात. मात्र १०० टक्के संरक्षित होण्यासाठी १० डोस देखील लागू शकतात. त्यामुळे नियमित लसीकरणांतर्गत दिल्या जाणाऱ्या पोलिओ लसीबरोबरच पल्स पोलिओ मोहीमेत दिले जाणारे डोसही तेपढेच महत्वाचे आहेत.

  • अजय जाधव