Showing posts with label बचत गट. Show all posts
Showing posts with label बचत गट. Show all posts

Friday, October 12, 2012

सावित्रीबाई फुले बचत गटाची करार शेती


बचत गट चळवळीमुळे महिलांच्या सबलीकरणास चालना मिळाली आहे. बचत गटाच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या वेगवेगळ्या उद्योगांमुळे महिला चांगल्या प्रकारे आर्थिक उत्पन्न मिळवित आहेत. बचत गटातील बहुतांशी उद्योग हे खाद्य पदार्थांशी संबंधित असतात. पण काही बचत गट आता नियमितच्या उद्योगांना फाटा देऊन बचत गटाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या कामांना एक वेगळे स्वरुप प्राप्त करुन देत आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील हसूरवाडी (ता. गडहिंग्लज) येथील सावित्रीबाई फुले बचत गटाने यावर्षीपासून करारस्वरुपात शेती करण्यास सुरुवात केली असून त्यामधून भात पिकाचे उत्पन्न घेण्यात आले आहे. या गटातील 17 महिलांनी खंडाने कसण्यासाठी पाच वर्षांच्या मुदतीसाठी तीन एकर शेती करार स्वरुपात घेतली आहे. अशा प्रकारची शेती करुन हा बचत गट भाजी पाल्याचे उत्पन्न देखील घेण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्नशील राहणार आहे. सार्वजनिक कामात अग्रेसर असणाऱ्या या गटातील महिलांनी शेतीत लक्ष घालून धाडसी तसेच सामूहिक ताकदीचे दर्शन घडविले आहे.

यावर्षी दोन एकरात भाताचे व एका एकरात सोयाबीनचे पीक घेण्यात आले आहे. दरवर्षी खंडापोटी जमीन मालकाला 13 मण भात दिले जाणार आहे. शेतीमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा गटातील महिलांना समान वाटा देण्यात येणार आहे.

चार वर्षापूर्वी या गटाची स्थापना करण्यात आली. गटाच्या अध्यक्षा संगीता लोखंडे, उपाध्यक्षा निर्मला शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा गट कार्यरत आहे. या गटाला रॉकेल वितरणाचा परवाना मिळालेला आहे. याबरोबरच स्वस्त धान्यवाटपाचे दुकानही सुरु करण्याचा या गटाचा प्रयत्न आहे. सण, उत्सव, यात्रा, निर्मलग्राम, स्वच्छता अभियान, ध्वजवंदन अशा गावच्या विविध विधायक उपक्रमात हा गट पुढाकारासाठी सक्रिय असतो. लग्नात होणारा खर्च ही गरीब कुटुंबासाठी चिंतेची बाब असते. त्यात वधूपक्षाचे आर्थिक शोषण होत असल्याने कमी खर्चातील 'यादी पे शादी 'या सारख्या प्रबोधनात्मक विवाह संस्कृतीचा प्रसार करण्याचादेखील या गटाचा नेहमीच प्रयत्न असतो. यासाठी गावातील विविध मान्यवर ग्रामस्थांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असते.

या गटाने केलेली ही करार शेती म्हणजे महालक्ष्मी बचत गटाकडून घेतलेली प्रेरणाच म्हणावी लागेल. कारण यापूर्वी शिप्पूर तर्फ नेसरी या गावातील महालक्ष्मी बचत गटाने गडहिंग्लज तालुक्यात पहिल्यांदा करार शेतीचा प्रयोग हाती घेतला होता. गावातीलच एका शेतकऱ्याकडून पाच एकर शेती या गटाने कसण्यासाठी घेतली होती. भात, भुईमुग या पिकांचे उत्पन्न घेऊन या गटाच्या महिलांनी शेती उद्योगात चांगले यश संपादन केले होते. शेतीमधील भात विक्रीतून मिळविलेल्या रकमेची इतर उद्योगांमध्ये गुंतवणूक केली. या गटाने गिरणी, मिरची कांडप यंत्र, मळणी यंत्र आदी भांडवल तयार केले व आपल्या गटाच्या आर्थिक विकासाच्या वाटा निर्माण केल्या. या गटाच्या कामाची नोंद घेऊन या गटाला शासनाने कृषिभूषण या पुरस्काराने गौरविले आहे.

बचत गटाच्या माध्यमातून होणारे उपक्रम तसेच उद्योग यामुळे महिलांचा सर्वांगिण विकास होत आहे असे निश्चितच जाणवते. बचत गटामुळे महिलांना आर्थिक स्वावलंबनाबरोबरच हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. या व्यासपीठामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढला असून त्या स्वयंपूर्ण होत आहेत.बचत गटांची ही चळवळ दिवसेंदिवस बळकट होत असल्याने महिलाशक्ती निश्चितच समाजामध्ये आपली अनोखी प्रतिमा निर्माण करेल.

वर्षा पाटोळे