Thursday, September 6, 2012

केशर महाराष्टात व्हाया काश्मिर

केशर इतकं महाग का असतं याचा विचार आपण नेहमी करतो.एक ग्रॅम केशरसाठी पाचशे रूपये मोजतांना नेहमीच प्रत्येकाला हा प्रश्न पडतो. या प्रश्नाचे उत्तर अगदी अचानक मिळाले. मॅग्नम फाऊंडेशनच्या महासचिव ॲड. .पुष्पा शिंदे यांच्याशी चर्चा करतांना केशरची सर्व माहिती मिळाली.

मॅग्नम फाऊंडेशन ही राष्ट्रीय पातळीवरची आणि निवडक मान्यवरांचा आधार असणारी ख्यातनाम स्वयंसेवी संस्था. राज्याबाहेर जाऊन काम करणारी देशातील एकमेव संस्था. संत गोगले महाराजांनी १९३५ साली सुरू केली. ऍड.सुरेश ढोले यांच्या नेतृत्वाखाली समर्थपणे काम करत आहे. जमिनीचा कस वाढविणे, शेतकरीवर्गाचे हित आणि पर्यावरणाचे रक्षण यासाठी काम करणारी ही संस्था केवळ महाराष्ट्राच्या शेतकरी वर्गापर्यतच मर्यादित नाही.तर महाराष्ट्राबाहेर ही संस्था यशस्वी ठरली आहे. या संस्थेच्या महासचिव ऍड पुष्पा शिंदे दिल्ली येथे एका परिषदेच्या निमित्ताने गेल्या होत्या त्यावेळी त्यांची काही काश्मिरी शेतक-यांशी भेट झाली. त्यावेळी त्यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून या शेतक-यांच्या पिकाला हक्काची बाजारपेठ मिळवून देण्याचे नक्की केले.

जगात केशराचे उत्पादन फक्त तीन ठिकाणी होते. स्पेन, इराण आणि काश्मीर. केशराच्या पिकासाठी भुसभुशीत जमीन आणि बर्फाचा पाऊस अत्यावश्यक असतो. तो केवळ या ठिकाणीच होत असल्यामुळे त्या पलिकडे अन्य कोठेही हे पीक घेता येत नाही.

काश्मिरातही श्रीनगर हायवे जवळ असणा-या पामपूर लगत ५० ते ६० किलोमीटर परिसरातच हे पीक घेतले जाते. या भागात प्रारंभी त्यांनी एक सर्व्हे केला. यावेळी त्यांच्याकडे 800 केशर उत्पादक शेतक-यांनी नोंदणी केली. या पैकी 300 शेतक-यांना सोबत घेउून त्यांनी केशरला हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. 2006 पासून सुरू झालेला हा उपक्रम महाराष्ट्रात चांगलाच जम बसवू लागला आहे. त्यामुळे काश्मिरातील केशर आता दरवर्षी शुद्ध स्वरूपात महाराष्ट्रात मिळते आहे.

केशराचे कंद जमिनीचे वाफे तयार करून त्यात लावले जातात. वर्षातून एकदा म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये फुले उमलतात. ती घरी नेऊन त्यातून अतिशय कौशल्याने हाताने केशर काढण्याचे काम शेतकरी करतात. हे केशराचे पुष्प १८ ते ३० सेमी. उंचीचे बहुवर्षायू क्षुप. पर्ण मूलीय, रेखाकर, द्विकोष्ठीय पुष्पध्वजाने वेढलेले व मुडपलेल्या कडा असलेले मोठे वांगी रंगाचे व सुगंधी असते. प्रत्येक फुलात तीन तांबूस पिवळे केशर असतात. नरसाळ्याच्या आकाराच्या परिपुष्पाच्या फांद्या बाहेरील बाजुस पसरलेल्या व नारंगी रंगाच्या टोकाशी अखंड किंवा खंडित असतात. कुक्षी सामान्यत: तीनच्या संख्येत, २.५ सेमी लांब, सुत्राकार व तांबूस रंगाची असते. त्यालाच केशर असे म्हणतात.

अशा प्रकारे एक फुलात तीन केशरतंतू असतात. फळ - आयताकार, गर्भाशय त्रिकोष्ठीय, त्यात गोलाकार बीज. केशराचे कंद लावल्यास १०-१५ वर्षे वनस्पती टिकून राहते. प्रत्येकवर्षी जुन्या कंदाचे जागी एक नवा कंद येतो हा क्रम चालू राहतो. शरद ऋतूत पानांबरोबर फुलेही येतात. मूळ दक्षिण युरोपातून आलेले. स्पेन, फ्रान्स, इटली, ग्रीस, तुर्कस्तान व पर्शिया, भारत व चीनमध्ये याची लागवड होते. भारतात केशराची काश्मीरातील पांपूर भागात व जम्मूमध्ये किश्तवार भागात लागवड करतात. केशर मिळविण्यासाठी फुलातील कुक्षीची टोके अगदी सकाळी खुडतात व ती उष्णतेने किवा उन्हात वाळवितात. सुमारे ४०,००० फुलांपासून अर्धा कि.ग्रॅ. केशर मिळते. यामुळे ते महाग असते. केशराचा दर्जा ठरविण्यासाठी ते पाण्यात टाकतात. तळाशी बसलेले केशर चांगल्या प्रतीचे, तर पाण्यावर तरंगणारे केशर हलक्या प्रतीचे मानतात. तरगंणारे केशर वाळवून झोडतात आणि त्याचा दर्जा ठरविण्यासाठी ते पुन्हा पाण्यात टाकतात. या सर्व प्रक्रियेनंतर तयार होते ते विक्रीसाठीचे केशर. या केशराच्या एक ग्रॅम वजनाच्या छोटय़ा डब्या तयार करण्यात येतात. शुध्द एक ग्राम केशराची किंमत असते ५०० रूपये. हे सर्व केशर महाराष्ट्रात वेगवेगळया ठिकाणी विक्रीसाठी पाठविले जाते.

केशराचे हेक्टरी उत्पन्न एक किलो आहे. मात्र याला मागणी प्रचंड आहे. काश्मिरी केशराला तर उभ्या जगात मागणी आहे.. याचे प्रमुख कारण आहे त्याच्यातील औषधी गुणधर्म. यामुळेच त्याचे मोल सोन्याहूनही अधिक आहे.. चरक आणि सुश्रुत संहितेमध्ये केशरावर आणि त्याच्या औषधी गुणधर्मांवर विशेष प्रकरणे आहेत. आपण केशर वापरतो ते श्रीखंडात, बासुंदीत, खिरीत.यामध्ये केशराची एक काडी जरी टाकली तरी त्याचा सोनेरी रंग आणि अनोखा स्वाद आपले खाद्यविश्व प्रमोदित करतो. गरोदर स्त्रियांसाठी आणि लहान मुलांच्या गुटीमध्ये केशराचा वापर आवर्जून केला जातो. कांतीमान त्वचेसाठी आणि मोहक रंगासाठी त्याची मागणी अधिक आहे.. केशर हे उष्ण असल्यामुळे . त्यामुळे बाधक गुणधर्म नाहिसे करण्यासाठी त्याचा वापर अटळ आहे. रोगप्रतिकारक शक्ती देणारं, दृष्टी दोषावर जालीम आणि मेंदूचं टॉनिक म्हणूनही त्याला विशेष मागणी आहे.‍

शेतकरी आणि ग्राहकांची सरळ भागीदारी असणा-या उपक्रमाचा लाभ घेवून आपणही घेवू शकतो काश्मिरी केशराचा आस्वाद.....

संपर्क व माहितीसाठी पत्ता : मॅग्नम फाऊंडेशन, ९०९, नववा माळा, ए विंग, लोकमत भवन, नागपूर. दूरध्वनी- ०७१२-२४२०७८२/ ९४२२१०४७५१.

No comments:

Post a Comment