Wednesday, September 26, 2012

कथा आधुनिक बळीराजाची

प्रत्येक शेतक-याने आधुनिक शेतीतंत्र आणि कृषी विभागाच्या योजनांच्या मदतीने आधुनिक शेती करावयाचे ठरविले तर नक्कीच पुन्हा एकदा हरितक्रांती होण्यास वेळ लागणार नाही. हो याचे जीवंत उदाहरण म्हणजे माळशिरस तालूक्यातील सोपान शंकर घुले हे आहेत. या आधुनिक बळीराजाने फळपिक योजनांचा फायदा घेत आणि अद्ययावत तंत्रांची मदत घेत प्लॉस्टिक पेपरचे अच्छादन करुन कलिंगडाची लागवड केली आणि एकरी 35 टनापेक्षा जास्त उत्पादन घेतले आहे.

सोपान शंकर घुले हे प्रयोगशील शेतकरी म्हणून पंचक्रोशीत ओळखले जातात. त्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक दिनकर जाधव यांच्या मार्गदर्शनाने फळपिक योजनेतंर्गत अनुदान घेतले. आपल्या शेतातील डाळिंब काढून त्या शेतात 20 ऑक्टोंबर रोजी कलिंगडाची लागवड केली. कृषी विज्ञान केंद्राच्या रोपवाटिकेमधून त्यांनी कलिंगडाची रोपे घेतली. जमिनीवर पूर्व-पश्चिम दिशेने मातीचे बेड तयार करुन दोन फूट अंतरावर एक रोप याप्रमाणे प्लास्टीक पेपर अंथरुन एकरात 10 हजार रोपे लावली. प्रत्येक रोपावर व्यवस्थित लक्ष ठेवण्याची तसदी सोपान घुले यांनी घेतली. याकामी त्यांना कृषी विज्ञान केंद्राचे संशोधक बापूराव खरात व अयाज शेख यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.

ऑक्टोंबर-नोव्हेंबर हा हवामान संक्रमणाचा काळ असल्याने विशेष लक्ष देत ठिंबक सिंचन यंत्रणेद्वारे पाणी दिले. त्यामुळे सध्या त्यांच्या शेतात तीन किलोपासून 8 किलोपर्यतची कलिंगडे तयार झाली आहेत. प्रति वेलास 2 ते 3 कलिंगडे आहेत. कलिंगड अगदी आठ किलोपर्यत वाढल्याने आढळले आहे.. त्यांना एकरी सुमारे 35 मे.टन कलिंगडाचे उत्पादन मिळत आहे. या वाणाच्या कलिंगडासाठी सध्या प्रतिटनास 7 ते 8 हजार रुपये असा दर आहे. या दराप्रमाणे ही कलिंगडे विकल्याने केवळ तीन महिन्यात सुमारे दोन ते सव्वादोन लाखाचे उत्पन्न मिळाले असल्याचे घुले यांनी सांगितले. या आधुनिक बळीराजाच्या कष्ट आणि प्रयत्नांच्या जोरावर प्लॉस्टीक पेपरवर कलिंगड लागवडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे.

No comments:

Post a Comment