Showing posts with label प्रणाम. Show all posts
Showing posts with label प्रणाम. Show all posts

Tuesday, July 26, 2011

प्रणाम माझा पहिला तुजला मृत्यूंजयवीरा. . .

‘भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी . . .’ गाण्यातील या शब्दांनीच कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या माणसांच्या काळजाला हात घातला. सतत जागता पहारा देऊन सीमांचे रक्षण करणारा सैनिक हा ‘अनामवीर’ ठरू नये, त्याच्यापाठीमागे हा देश, हे राज्य खंबीरपणे ऊभे आहे हे सांगणारा कृतज्ञता भाव काल ‘कारगिल विजय दिना ’ निमित्तानं आयोजित स्मृतिकार्यक्रमात प्रत्येकाच्या चेहर्‍यावर उमटला होता. 

‘उत्तुंग आमुचि उत्तर सीमा इंच इंच लढवू, अभिमान धरू, बलिदान करू, ध्वज ऊंच ऊंच चढवू. परक्यांचा येता हल्ला, प्रत्येक घर बने किल्ला, हे कोटि कोटि भुजदंड होतील इथे ध्वजदंड, छातीची करूनि ढाल या संगिनीस भिडवू. . ’ . वसंत बापटांच्या या कवितेच सार खर्‍या अर्थाने आपल्या जीवनात जर कुणी उतरवला असेल तर तो दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून अखंड दक्ष राहणार्‍या सैनिकांनी. 

ऊन-वादळ-वारा-पाऊस, कडाक्याची थंडी, बर्फाच्या गडद चादरीवर उभं राहून सीमांचे रक्षण करतांना, शत्रुचा भ्याड हल्ला परतवून लावताना ज्या सैनिकांनी आपल्या निधडय़ा छातीवर निर्भयपणे गोळ्या झेलल्या, अटीतटीच्या प्रसंगात जीवाची पर्वा न करता शत्रुला सळो की पळो करून सोडलं, त्या धैर्याला, त्या समर्पणाला आणि त्या त्यागाला सलाम करण्याचा, त्यांची प्रेरणा घेऊन देशसेवेला वाहून घेण्याचा, त्यांचे देशसेवेचे वेड, व्रत म्हणून अंगिकारण्याचा संदेश देणारा हा दिवस म्हणजे ‘कारगिल विजय दिन’. काल मंत्रालयात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा ह्दयस्पर्शी सोहळा संपन्न झाला. 

वीरपत्नी, वीरमाता, वीर पिता होणं ही अभिमानाची गोष्ट असली तरी लहानवयात आलेलं वैधव्य अनुभवतांना, दररोज आपल्या माणसाशिवाय जगण्याचा संघर्ष करतांना त्या वीरपत्नीच्या किंवा म्हतारपणची हाताशी आलेली काठी हरवलेली पाहतांना त्या वीर माता-पित्याच्या मनात काय भावना ऊंचबळत असतील हे वेगळ्यानं सांगायला नको. एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्या आसु घेऊन अनुदानाची रक्कम स्विकारताना भरून आलेले, भांबावलेले मन बरचं काही सांगून गेले. त्यामुळेच त्यांचा आनंद, त्यांचे दु:ख हे केवळ त्यांचेच राहिले नाही. पतीच्या- मुलाच्या मृत्यूचा होणारा सन्मान, गौरव पाहतांना मनाची होणारी घालमेल ही केवळ या वीरपत्नी-वीरमाता-पित्यांचीच राहिली नाही तर अख्खं परिषद सभागृह त्यांच्या या संमिश्र भावनांमध्ये सहभागी झालं. 

‘ऑपरेशन फाल्कन’ मध्ये शहीद झालेले ले.कर्नल मंदार सुहास नेने असोत किंवा ‘ऑपरेशन रक्षक’ मध्ये वीरमरण आलेले गनर दिपक गुलाब चौधरी असोत प्रत्येकाची शहादत त्यांच्या त्या ऑपरेशनमधील विजयाची, त्यांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांची शौर्यगाथाच सांगत होती. 

तुम्ही एकटे नाही, तुमच्या मागे हा देश, हे राज्य अतिशय खंबीरपणे पाठीशी उभं आहे. वीर सैनिकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि वृद्ध वीर माता-पित्यांसाठी हे राज्य आणि प्रत्येक मराठी मनं समर्पित आहे, कटिबद्ध आहे हे जणू या कार्यक्रमातून प्रतीत होत होतं. 

२६ जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने काल सैनिक कल्याण विभागामार्फत एका ह्दयस्पर्शी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध युद्ध प्रसंगात शहीद झालेल्या सैनिकांच्या वीरपत्नी, वीरमाता आणि पित्यांना ५ लाख रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले तर याच परिस्थितीत जखमी झालेल्या, अपंगत्व प्राप्त झालेल्या सैनिकांनाही त्यांच्या अपंगत्वानुसार पुनर्वसनासाठी १ ते ३ लाखांपर्यंतची आर्थिक मदत करण्यात आली.

विविध युद्धात वीरमरण पत्करलेल्या सैनिकांबद्दल देशाला सार्थ अभिमान असल्याचे आणि त्यांचे हे उपकार देश कधीच विसरणार नसल्याचे भावस्पर्शी उद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले तर मृत्यू अटळ आहे. कोणी अमरत्व घेऊन जन्माला आलेलं नाही. पण लाखमोलाचं मरण हे फक्त सैनिकांना येतं ही भावना उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.सैनिकाचं मरण हे सर्वोत्कृष्ट-सन्मानाचं मरण असल्याचे राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी सांगितले. 

सैनिक कल्याण विभागामार्फत शासन आजी-माजी सैनिकांसाठी, शहीद जवानांच्या पत्नी आणि मुलांसाठी, त्यांच्या पुनर्वसनासाठी ज्या योजना राबविते त्यांची माहिती यावेळी देण्यात आली. या सगळ्याचा अर्थ एवढाच होता की, तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्या बरोबर, तुमच्या सुखदु:खात आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तुम्ही आमचे आणि या देशाचे लाडके सुपुत्र आहात म्हणूनच तर तुमच्या जीवावर आम्ही भारतीय भयमुक्त वातावरणात राहू शकतो, जगू शकतो. तुम्ही रात्र रात्र जागून देशाच्या सीमेचे रक्षण करता म्हणून आम्ही शांतपणे झोपू शकतो. तुमचे हे उपकार खरंच आम्ही कधी विसरू शकणार नाही. तुम्ही मृत्यूवर विजय मिळवलेले मृत्यूंजय आहात. तुम्ही अमर आहात तुमच्या शौर्याने, तुमच्या त्यागाने, तुमच्या पराक्रमाने तुम्ही या देशाला नितांत सुंदर गौरव प्राप्त करून दिला आहे.

कुटुंबापासून आपल्या माणसापासून दूर सीमेवर तुम्ही एकटे उभे असलात, लढत असलात तरी सहकार्याचा आमचा एक हात सदैव तुमच्यासाठी ऊंचावलेला तुम्हाला पहायला मिळेल. तुमचं हे न फिटणारं ऋण आमच्या शिरी घेऊन आम्ही जगत आहोत हे ही आम्ही कधी विसरणार नाही. म्हणूनच हे मृत्युंजया, आमचा पहिला सलाम तुझ्यासाठी- तुझ्या - माझ्या देशासाठी ही प्रेरणा घेऊनच कारगिल विजय दिवसाच्या या कार्यक्रमाचा काल समारोप झाला.



  • डॉ. सुरेखा मुळे