Friday, October 12, 2012

वाघाड प्रकल्प - सहभागी सिंचन व्यवस्थापनातील आदर्श उदाहरण

 वाघाड मध्यम प्रकल्प, हा वाघाड नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वाघाड या गावाजवळ गोदावरी नदीची उपनदी असलेल्या कोळवण नदीवर 1980 साली बांधण्यात आला आहे. धरणाला दोन कालवे असून उजव्या कालव्याची लांबी 45 कि.मी. व डाव्या कालव्याची लांबी 15 कि.मी. आहे. प्रकल्पाचे लागवडीलायक क्षेत्र 9642 हेक्टर असून सिंचनक्षेत्र 6750 हेक्टर इतके आहे. 1980-90 सालापर्यंत 30 टक्के क्षेत्राला फक्त सिंचनाचा लाभ मिळत होता. सन 1991 साली वाघाड कालव्याच्या पुच्छ भागात समाज परिवर्तन केंद्र ओझरच्या सहाय्याने 3 पाणी वापर संस्था स्थापन करण्यात आल्या, 3 पाणी वापर संस्थाच्या माध्यमातून पुच्छ भागाला पाणी मिळण्यातील अडचणी दुर झाल्यात त्यांना खात्रीशिर पाणी मिळू लागले. सिंचन क्षेत्रात तर वाढ झाली त्या सोबत पुच्छ भागातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटला. या तीन पाणी वापर संस्थांची यशस्वीता पाहून वाघाड प्रकल्पावर टप्या टप्यात 2003 पर्यंत उजव्या कालव्यावर 20 व डाव्या कालव्यावर 4 अशा एकूण 24 पाणी वापर संस्था स्थापन झाल्या आहेत.

या 24 पाणी वापर संस्था त्यांचे कार्यक्षेत्रामधील सिंचन व्यवस्थापन यशस्वीपणे सांभाळीत होत्या. तेवढयावर न थांबता, पाणी वापर संस्था एकत्रित येऊन वाघाड प्रकल्पावर सन-2003 मध्ये प्रकल्पस्तरीय पाणीवापर संस्थाही स्थापन करण्यात आली. प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थानी संपूर्ण प्रकल्पाचे सिंचन व्यवस्थापन प्रकल्प आहे त्या स्थितीत ताब्यात घेण्याची तयारी दर्शेविली. दि.24/11/2005 रोजी तत्कालिन मा. मुख्यमंत्री यांचे उपस्थितीमध्ये प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थेस प्रकल्पाचे सिंचन व्यवस्थापन हस्तांतरण करण्यात आले आहे. प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थेस सिंचन व्यवस्थापन हस्तांतरण करण्यात आलेला हा राज्यातील तसेच देशातील पहिलाच प्रकल्प संपूर्ण सिंचन प्रकल्पाचे सिंचन व्यवस्थापन ताब्यात घेऊन वाघाडच्या शेतक-यानी इतिहास घडविला.

जागतिक बँक सहाय्यित महाराष्ट्र जलक्षेत्र सुधार प्रकल्पामध्ये पुढे वाघाड प्रकल्पाचा अंतर्भाव होऊन प्रकल्पातील कालवा व वितरण व्यवस्थेचे पुनर्स्थापनेचे काम हाती घेण्यात आले. या पुनर्स्थापना कामात सुध्दा वाघाडच्या शेतक-यांनी/ पाणी वापर संस्थांनी रु. 500/- प्रति हेक्टर इतके (रु. 200/- नगद व रु. 300/- कामाच्या/ साहित्य मोबदल्यात) योगदान ( एकूण 50 लक्ष रुपये) दिले. आज वितरण प्रणालीच्या पुनर्स्थापनाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच कालव्याच्या पुनर्स्थापनाचे काम प्रगतीपथावर आहे.

वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थेमार्फत प्रकल्पाचे सिंचन व्यवस्थापन करण्यात येते. प्रकल्पातील पाणी उपलब्धतेप्रमाणे वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थेमार्फत 15 ऑक्टोंबरला हंगाम व रोटेशन यांचे नियोजन करण्यात येते . कालवा मुखाशी प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थेला पाणी मोजून देण्यात येऊन , प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थेमार्फत लघुविरिकास्तरीय पाणी वापर संस्थांना मंजूर पाणी हक्कानुसार राटेशन निहाय पुरविण्यात येते . महाराष्ट जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडून लघुविरिकास्तरीय पाणी वापर संस्थांना प्रकल्पात उपलब्ध असणाया पाण्याच्या आधारे पाणी वापर हक्क प्रदान करण्यात येतात व त्याचे संनिर्येत्रण मजनिप्रा मार्फत करण्यात येते .पाणी वापर संस्थांमार्फत शेतक-यांना क्षेत्रावर किंवा तासावर पाणी पुरवठा करण्यात येतो.

वाघाड प्रकल्पाच्या यशानंतर राज्य शासनाने पाणी वापर संस्थेमार्फत सिंचन व्यवस्थापन करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला. पाणी वापर संस्थामुळे शेतक-यास पाण्याची हमी मिळाली. शेतक-यांनी पाणी बचतीच्या तसेच ठिबक/ तुषार सिंचनाच्या सहाय्याने केलेल्या पाण्याच्या बचतीमुळे आठमाही प्रकल्पातून बारमाही सिंचन करणे शक्य होत आहे. प्रकल्पाकरीता पूर्वी हजारो ग्राहक होते परंतु प्रकल्पस्तरीय संस्थेला हस्तांतरण केल्यानंतर फक्त एकच ग्राहकाला पाणी पुरवठा करावा लागत आहे.

 उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध आहे.( दिंडोरी, कोराटे, मोहाडी, ओझर )
संस्थेला राज्यातील तसेच देश-विदेशातील शेतकरी व अधिकारी भेटी देऊन पाणी वापर संस्थाबद्दलची माहिती व प्रेरणा घेतात. आज राज्यामध्ये ज्या हजारो संस्था कार्यरत आहेत त्यांच्या जडचणघडणीमध्ये वाघाड प्रकल्पावरील पाणी वापर संस्थांचा सहभाग आहे. वाघाड प्रकल्प व वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थेला राज्यशासनाचा तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खालील पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आलेले आहे.

1) राष्ट्रीय उत्पादकता परिषद नवी दिल्ली या संस्थेचा व्दितीय सर्वोत्तम उत्पादकता पुरस्कार सन 2001-02 – पालखेड पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत असलेल्या वाघाड प्रकल्पास दि.16 फेब्रुवारी 2004 रोजी श्री.राजनाथ सिंह, माननीय कृषी तथा खाद्य प्रसंस्करण उद्योग मंत्री भारत सरकार यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रदान केला.

2) राष्ट्रीय उत्पादकता परिषद नवी दिल्ली या संस्थेचा व्दितीय सर्वोत्तम उत्पादकता पुरस्कार सन 2006-07 – पालखेड पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत असलेल्या वाघाड प्रकल्पास दि.24 सप्टेंबर 2009 रोजी प्राफेसर के.व्ही.थॉमस माननीय कृषी राज्यमंत्री भारत सरकार यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रदान केला.

3) आयसीआयडी ह्या आंतरराष्ट्रीय संस्थेचा WAT SAVE annual award – 2009 for Innovative water management चा पुरस्कार – चेअरमन, चंद्र ए.मुद्रामुट्ट, आय.सी.आय.डी.यांचेकडुन दिनांक 10.12.2009 रोजी 60 व्या इंटरनॅशनल एक्झुक्यूटीव्ह कॉन्सील, नवी दिल्ली येथे प्रदान केला.

4) सीआयआय (Confedration of Indian Industry) हैद्राबाद या संस्थेचा Excellence in Water Management – 2009 चा पुरस्कार - श्री.एल.एस.गणपती चेअरमन नॅशनल ऍ़वार्ड फॉर एक्सलन्स इन वॉटर मॅनेजमेंट 2009 व श्री.रंगनाथ एन.के.चेअरमन वॉटर मॅनेजमेंट कॉन्सील गोदरेज जी.बी.सी.यांच्या हस्ते दिनांक 10.12.2009 रोजी हैद्राबाद येथे प्रदान केला.

5) पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन पुरसकार- या अंतर्गत या विभागातील वाघाड प्रकल्पावरील वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्था मोहाडी या संस्थेस राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार दिनांक 26.2.2010 रोजी सिंचन दिनाच्या निमित्ताने नांदेड येथे मा.मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. त्यामध्ये रू.7 लक्ष व प्रशस्तीपत्र प्राप्त झाले. तसेच प्रादेशिक स्तरावरील पुरस्कार वाघाड प्रकल्पावरील जय योगेश्वर पाणी वापर संस्था ओझर व महात्मा फुले पाणी वापर संस्था ओझर या दोन संस्थांना अनुक्रमे प्रथम व व्दितीय क्रमांकाचे रू.3 लक्ष व प्रशस्तीपत्र व 2 लक्ष व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.

6) पालखेड पाटबंधारे विभागास उत्कृष्ट कार्याबद्दल मा. मुख्यमंत्री पुरस्कार फेब्रुवारी 2010 साली प्राप्त झाला.

7) राजीव गांधी प्रगती अभियांनामध्ये पाणी वापर संस्था व तत्सम कार्याबाबत राज्य शासनाचा व्दितीय पुरस्कार मार्च 2011 साली प्रदान करण्यात आला.
केवळ पाण्याचे व्यवस्थापन करणे इथपर्यंत न थांबता शेतमालाची विक्री व प्रक्रिया करण्यासाठी वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थेने 11 सप्टंेम्बर 2009 मध्ये वाघाड ऍ़ग्रीकल्चरल प्रोडयुसर कंपनी (वॅप्को) स्थापन केली. त्यामार्फत द्राक्ष व भाजीपाला विक्री करण्यात येत आहे.

रवींद्र ठाकूर, माहिती अधिकारी नाशिक

No comments:

Post a Comment