Wednesday, October 17, 2012

परंपरेचे धनी


चटकदार मासे चवीने खातांना चर्चा होते त्याच्या प्रकाराची किंवा फारतर किंमतीची. मात्र हे मासे पकडण्यासाठी मच्छिमार बांधवाचे श्रम, त्यांच्याकडील जाळे आणि इतर संबंधीत बाबींकडे आपले लक्ष जात नाही. नव्हेत तर तो आपला विषयच नसतो. म्हणूनच रत्नागिरी जिल्ह्यातील तेऱ्ये गावच्या गोपाळवाडीतील गोपाळ समाजबांधवांचे श्रम समोर येत नाही. मासेमारीसाठी उपयोगात येणाऱ्या जाळ्यांना लावण्यासाठी उपयुक्त असलेल्या गुळ्या बनविण्याचा परंपरागत व्यवसाय या वाडीने अनेक अडचणी असतांनाही पुढे नेला आहे.

संगमेश्वर तालुक्यातील तेऱ्ये गावच्या गोपाळवाडीत एकूण 20 कुटुंबे आहेत. एक-दोन सोडली तर इतर सर्व कुटुंबात हा गुळ्या बनविण्याचा व्यवसाय केला जातो. महिलावर्ग घरकाम सांभाळून हा व्यवसाय करतात. या व्यवसायात परिश्रमासोबतच हाताची नाजूक कलाही अवगत असावी लागते. पूर्वी गावातच तयार होणाऱ्या जाळ्या उपयोगात आणल्या जात असत. या जाळ्यादेखील गोपाळवाडीत तयार होत असत. आता मशिनवर तयार जाळ्यांना गुळ्या बसविल्या जातात.

गुळे बनविण्यासाठी गुहागर तालुक्यातील मार्गताम्हाणे येथून विशिष्ट प्रकारची माती आणली जाते. साधारण पोत्याला 100 रुपये दराने मिळणाऱ्या या मातीला कुटून वस्त्रगाळ करण्यात येते. बारीक माती पाण्यात भिजवून गवताच्या काडीवर नाजूक हातांनी ती एकेक करून वेळली जाते. वेळल्यावर अलगतपणे गवताची काडी बाजूला सारली जाते. अशा पद्धतीने तयार झालेले गुळे शेणाच्या गोवऱ्यांवर भाजले जातात. भाजतांना विस्तव कमी पडू नये म्हणून सातत्याने सुपाने वारा घातला जातो. विस्तव जेवढा लालबुंद राहील तेवढे गुळे मजबूत होतात आणि काळी पडत नाही, असे लिला चव्हाण यांनी सांगितले.

एक महिला घरातील काम सांभाळून दिवसाला साधारण 200 ते 300 गुळ्या तयार करू शकते. बाजारात 20 रुपये शेकड्यांनी यांची विक्री होते. परिश्रमाच्या तुलनेत मिळणारी रक्कम अगदी कमी असली तरी एक परंपरा म्हणून या गोपाळवाडीने ही कला जोपासली आहे. बाजार मिळाल्यास उत्पन्न वाढेल अशी अपेक्षा, येथील नागरीक व्यक्त करतात.

गुळ्या पाण्यात विरघळत नाही आणि तेवढ्याच मजबूत असतात. जाळ्याच्या किनाऱ्याला नक्षीकामाच्या रुपात असणाऱ्या या गुळ्यामुळे पाण्यात टाकलेल्या जाळीला आधार मिळतो आणि ती जड होऊन पाण्यात जाते. जाळी खोल पाण्यात गेल्याने मासेमारी चांगली होते. म्हणूनच तांबड्या मातीच्या या गुळ्या मच्छिमार बांधवांसाठी उपयुक्त ठरतात. गोपाळवाडीतील महिलांचे हस्तकौशल्य गुळ्यांना जवळून निरखून पाहिल्यावर लक्षात येते. एक कला म्हणून पाहतांना चवदार मासोळी येवढीच कलेची ही परंपराही जाणून घ्यावीशी वाटते. तीची जोपासना होण्यासाठी काम करणाऱ्या गोपाळवाडीतील हातांची नोंदही आपण घ्यायलाच हवी.

-डॉ.किरण मोघे

No comments:

Post a Comment