Friday, December 28, 2012

वेश्या वस्तीतली अनोखी पाळणाघरं

जर एखादया पाळणाघराची वेळ संध्याकाळी ६ ते सकाळी ९.३० असेल तर? काय चमकलात ना. हो ही वेळ आहे पुण्यातल्या बुधवार पेठेतल्या उत्कर्ष आणि मोहर या पाळणाघरांची. पुण्यातली बुधवार पेठ म्हटली की, सगळ्यांच्याच भुवया उंचवतात. मग इथं आणि पाळणाघर असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. लैगिंक अत्याचाराला बळी पडलेल्या आणि पर्यायाने वेश्या व्यवसायात उतरलेल्या अनेक महिलांच्या मुलांचे ही पाळणाघरं म्हणजे मोठा आधारवडच आहे. रेड लाईट भागातल्या लहान मुलांची संध्याकाळ ही अनेक जखमांनी भरलेली असते. प्रत्येक रात्री बळी पडणाऱ्या त्यांच्या मातांच्या माथ्यावरचे छप्परही तिच्या मालकीचे नसते. अशा परिस्थितीत रात्रीच्या वेळी व्यवसायात बाधा आणाऱ्या लहान मुलांना अफू देऊन गुंगवणे हा इथं सर्रास चालणारा प्रकार. म्हणुनच या भीषण परिस्थितीतून या मुलांना बाहेर काढण्यासाठी, त्यांच्यावर योग्य संस्कार करण्यासाठी उत्कर्ष आणि मोहर ही दोन्ही पाळणाघर शब्दश: अहोरात्र झटत आहे.
चैतन्य महिला मंडळाच्या माध्यमातून गेली आठ वर्ष याच वस्तीत उत्कर्ष पाळणाघर चालू आहे. दोन वेळचा नाष्टा, दूध आणि रात्रीचे जेवण या मूलांना इथं दिलं जातं. पौष्टिक अन्नाबरोबर चांगले संस्कार आणि शिक्षणाचे धडे इथं ही मुलं गिरवतात. उत्कर्षाच्या अध्यक्षा ज्योती पठानिया यांना आलेले अनुभव अतिशय बोलके आहेत. सुरवातीला स्थानिकांचा रोष पत्कारून कमी जागेतही त्यांनी आपलं कार्य चालूच ठेवलं. ज्योती ताई सांगतात की, संवेदना हरवलेली ही मुलं फार हट्टी आणि शिवीगाळ करणारी असतात. पण पाळणाघरात आल्यानंतर त्यांच्यात फारच सकारात्मक बदल होतो. ७ वर्षांची खातून ने अद्याप शाळेचं तोंड ही पाहेलेलं नाही पण उत्कर्ष पाळणा घरात येऊ लागल्यानंतर खातून मराठी, इंग्रजी कविता आत्मविश्वासाने म्हणते. आठ वर्षांनंतर पाळणा घरातील मुलं त्यांच्या मातांच्या संमतीने वसतिगृहात हलवली जातात. शिवाय ख्रिश्चन मिशनरीज या मुलांना नेण्यासाठी तयार असतात. अशावेळी या मातांचं मतापरिवर्तन करून त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचं काम ही ज्योती ताई करतात. गणपती, दसरा, दिवाळी, सुट्ट्यांमध्ये धंद्याच्या मौसमात इथं येणाऱ्या मुलांचं प्रमाण वाढतं अशावेळी त्यांना अपुऱ्या जागेचं आवाहन ही पेलावं लागतं. रात्री पाळणाघर आणि दिवसभर शाळा अशा दिनचर्येच्या माध्यमातून मुलांना शक्य तितके या वातावरणापासून दूर ठेवलं जातं.
गेली १५ वर्ष याच वस्तीत या चिमूकल्यांचं आयुष्य सावरण्याचं काम करणाऱ्या स्वधार संस्थेच्या मोहर पाळणा घराचं कार्य ही उत्तुंग आहे. हे २४ तास चालणारे हे पाळणाघर कितीतरी राहुल, सुहाना,चंदा, आशा, सानियासाठी मोठा आधार बनला आहे. बंगाली, कन्नडी, बांग्लादेशी, नेपाळी अशी कितीतरी मुलं आहेत ज्यांना मराठी भाषा, हिंदी भाषा ही कळत नाही. अशा मुलांना सकस अन्न देऊन त्यांच्यात संस्कारांचं बीज इथं रुजवलं जातं. त्यांना आवश्यक वैद्यकीय सेवा ही पुरवली जाते. मोहर मध्ये गेली १५ वर्ष काम करणाऱ्या लता देवळे ह्या मुलांच्या अम्मी, आई, मम्मी झाल्यात आहेत. लता ताई सांगतात की, १५ वर्षांच्या प्रवासात असंख्य अडचणी आल्या. आजही रोज या वस्त्यांमधून त्या स्वत: फिरतात आणि मुलं गोळा करतात. पण कधी कधी या मुलांच्या माताच मोठ आव्हान बनतात. या मुलांच्या माता दारू पिऊन मध्यरात्री मुलांना घेऊन जाण्यासाठी जेव्हा धिंगाणा करतात तेव्हा त्यांना आवर घालण्यासाठी त्यांना आजूबाजूच्या दादा, भाऊंची मदत घ्यावी लागते.
पटांगणी खेळ, सहल, सण, उत्सव, वाढदिवस साजरे करून मुलांना आंनदी ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. मुलं बदलली जाणं हे तर नेहमीचेच आहे. दर दोन तीन वर्षांनी या मुलांच्या मातांना इतरत्र हलवले जाते त्यावेळी स्वभाविकच मुलं ही जातात. पण मोहर आणि उत्कर्ष चं कार्य मात्र अखंड आणि निस्वार्थी पणे चालू आहे.
या मुलांच्या वेदना बघितल्या नंतर अनिल कांबळेची कविता प्रकर्षाने आठवते..
त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी
पैशात भावनेचा व्यापार पाहिला मी
अंधार वेदनांनी आक्रंदतो तरीही
नजरेत वासनेचा श्रृंगार पाहिला मी
उत्कर्ष आणि मोहर पाळणाघराची छायाचित्रे

1 comment: