Thursday, December 27, 2012

जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम - जनजागृती मोहीम

माता व बालक यांची आरोग्य विषयक विशेष काळजी घेवून त्यांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करणे या उद्देशाने जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम ही योजना केंद्र शासनाने सुरु केली असून त्याची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणावर आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यामध्येही महत्वाकांक्षी योजना जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यास सुरुवात केली आहे.

माता व बालक आरोग्य केंद्रामध्ये किंवा रुग्णालयात वेळेवर न पोहोचल्याने गुंतागुंत निर्माण होवून आई व बाळाच्या जीवाला धोका निर्माण होणे यासारखे प्रसंग उद्भवू शकतात. प्रसुतीसाठी दवाखान्यात येऊ इच्छिणाऱ्या गरोदर स्त्रीसाठी वाहनापासून ते तपासण्या, औषधोपचार, आहार संदर्भ सेवा सर्व काही मोफत देण्याची तरतूद या जननी सुरक्षा कार्यक्रमात आहे.

याशिवाय 30 दिवसापर्यंतच्या नवजात बालकासाठीदेखील वाहन व्यवस्था, तपासण्या, औषधोपचार, संदर्भ सेवा मोफत मिळणार आहे. समाजातील कोणत्याही स्तरातील गरोदर स्त्रिया व बालकास याचा लाभ घेता येईल.

दवाखान्यात बाळंतपण - सुरक्षित बाळंतपण
जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम कशासाठी ? माता व बाल मृत्यूच्या अनेक कारणांपैकी प्रसुतीसाठी दवाखान्यात वेळेवर न पोहचणे हे एक महत्वाचे कारण आहे. ग्रामीण व दुर्गम भागात रस्ते चांगले नसल्याने, वेळेवर वाहन उपलब्ध न झाल्याने माता आरोग्य केंद्रामध्ये किंवा रुग्णालयामध्ये वेळेवर पोहचू शकत नाहीत. परिणामी वाटेत प्रसूती होणे, गुंतागुंत निर्माण होणे व प्रसंगी आई व बाळाच्या जीवाला धोका निर्माण होणे असे प्रसंग येऊ शकतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दवाखान्यात प्रसुतीसाठी जाण्यासाठी वाहनभाडे, दवाखान्यातील तपासण्या, औषधोपचार, खाण्यापिण्याची व्यवस्था यासाठी येणारा खर्च लक्षात घेवून बरीचशी गरीब कुटुंबे दवाखान्यात प्रसुतीसाठी जाणे टाळतात. या दोन्ही बाबी लक्षात घेऊन भारत सरकारने जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम हा महत्वाकांक्षी कार्यक्रम सुरु केला आहे. या बाबी लक्षात घेवून योजनेंतर्गत गरोदर मातांना गरोदरपणात, प्रसुतीदरम्यान, प्रसुतीनंतर 42 दिवसांपर्यत पुढील सर्व सेवा आरोग्य संस्थेमध्ये मोफत दिल्या जात आहेत.

गरोदर मातांना सेवा :- संपूर्णपणे मोफत बाळंतपण व गरज पडल्यास सिझेरिया शस्त्रक्रिया, मोफत औषधोपचार, रक्त, लघवी, सोनोग्राफीसारख्या तपासण्या, रक्त पुरवठा (आरोग्य संस्थेच्या दर्जा नुसार जेथे उपलब्ध असतील तेथे) मोफत, सामान्य बाळंतपण झाल्यास 3 दिवसांपर्यंत तर सिझेरिया पध्दतीने बाळंतपण झाल्यास 7 दिवसांपर्यत मातेस मोफत आहार, घरापासून आरोग्य संस्थेपर्यंत आणि घरी परत जाण्यासाठी मोफत वाहन व्यवस्था.

30 दिवसापर्यंतच्या नवजात बालकांना सेवा :- मोफत औषधोपचार, रक्त, लघवी, सोनोग्राफीसारख्या तपासण्या रक्त पुरवठा (आरोग्य संस्थाच्या दर्जानुसार जेथे उपलब्ध असतील तेथे) मोफत, घरापासून आरोग्य संस्थेपर्यंत आणि घरी परत जाण्यासाठी मोफत वाहन व्यवस्था.

राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालये या ठिकाणी मदत केंद्र सुरु केली आहेत. या ठिकाणी 24 तास सेवा उपलब्ध असते. बहुतांशी ठिकाणी 102 हा टोल फ्री दूरध्वनी सेवा उपलब्ध आहे. आपण या क्रमांकावर फोन केल्यास आपल्याला त्वरीत वाहन व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात येईल. उपलब्ध असल्यास शासकीय वाहन अथवा नोंदणीकृत खाजगी वाहन उपलब्ध करुन दिले जाईल.

यासाठी जिल्हा स्तरावर 24 तास सेवा उपलब्ध असून सांगली जिल्ह्यासाठी टोल फ्री क्रमांक 102  या क्रमांकावर संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment