Thursday, December 27, 2012

बचतगटांकडे वीजबिल वाटप

वीज ही आपणा सर्वांची दैनंदिन गरज आहे. राज्‍यात महाराष्‍ट्र राज्‍य वीज वितरण कंपनी म्‍हणजेच महावितरणकडून वीज पुरवठा केला जातो. वीजेचा योग्‍य वापर करणे आणि नियमितपणे वीज बिल भरणे हे प्रत्‍येक नागरिकाचे कर्तव्‍य असते. तथापि काही वेळा अचानक जादा वीज बिल आल्‍यामुळे अनेकांना त्रास होतो. त्‍यामागे अनेक कारणे असतात. महावितरणने अशा चुका शोधून त्‍या होणार नाही, याची वेळोवेळी दक्षता घेतली आहे. वीजेची योग्‍य रिडींग न घेतल्‍यामुळेही अनेकदा ग्राहकांचा रोष सहन करावा लागतो. यावर उपाय म्‍हणून महावितरणने जिल्‍हयाच्‍या ग्रामीण भागातील ग्राहकांच्‍या विद्युत मीटरची नोंदणी घेऊन वीज बिल वितरणाचे तसेच शहरी भागातील मीटर रिडिंग चेकिंगचे काम स्‍वयंसहायता महिला बचतगटांमार्फत करण्‍याचा निर्णय घेतला आहे. परभणी ग्रामीण विभागात आणि जिंतूर उपविभागात महिला बचतगटांनी हे काम सुरु केले असल्‍याचे परभणी येथील महावितरणचे अधीक्षक अभियंता सुरेश गणेशकर यांनी सांगितले.

परभणी जिल्‍हयात सध्‍या महावितरण कंपनीच्‍या जोडण्‍या घेतलेले एकूण 2 लाख 60 हजार 571 ग्राहक आहेत. यामध्‍ये घरगुती वापर करणारे 1 लाख 62 हजार 945 तर वाणिज्‍यिक कारणांसाठी वापर करणारे 11 हजार 706 ग्राहक आहेत. या सर्वांपर्यंत वेळेवर व योग्‍य आकारणी केलेली वीज बिले पोहोचविण्‍याचे आव्‍हान आहे. बचतगटांच्‍या मदतीने ते यशस्‍वीपणे पेलले जाईल, असा विश्‍वास आहे. महावितरण कंपनीच्‍या जिंतूर उपविभागांतर्गत सप्‍टेंबर महिन्‍यापासून तर परभणी ग्रामीण विभागात ऑक्‍टोबर महिन्‍यापासून महिला बचतगटांनी हे काम सुरु केले आहे. अन्‍य तालुक्‍यांतील बचतगटांना हे काम देण्‍याची कार्यवाही सुरु आहे.ती लवकरच पूर्ण होऊन संपूर्ण परभणी जिल्‍ह्यात वीजबिल वाटपाचे काम महिला बचतगटांकडून होईल.विद्युत मीटरची रिडिंग घेताना होणा-या चुका टाळण्‍यासाठी तसेच वीजबिल वसुलीतून महावितरण कंपनीचा महसूल वाढविण्‍याच्‍या दृष्‍टिकोनातून स्‍वयंसहायता महिला बचत गटांमार्फत वीज मीटर रिडिंग घेऊन, वीजबिले ग्राहकांना वाटप करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला.बचतगटाच्‍या महिला जिल्‍हयाच्‍या ग्रामीण भागातील घरगुती आणि वाणिज्‍यिक वापराच्‍या वीज मीटरची रिडिंग मॅन्‍युअली ( हाताने लिहून) घेणार आहेत. शहरी भागात सेवाभावी संस्‍थांच्‍या कर्मचा-यांनी घेतलेल्‍या वीज मीटरच्‍या फोटो रिडिंग ची तपासणी (चेकिंग) मॅन्‍युअली करणार आहेत. यामुळे योग्‍य मीटर रिडिंग घेतली जाऊन, योग्‍य रकमेची बिले ग्राहकांना वितरित होण्‍यास मदत होईल. महिला बचतगटांना वीजमीटर रिडिंग घेण्‍यासाठी प्रति मीटरमागे दोन रुपये 50 पैसे तर वीजबिल ग्राहकांपर्यत वितरित करण्‍यासाठी प्रति बिल एक रुपया 50 पैसे असे सेवाशुल्‍क दिले जाणार आहे. वीजमीटर रिडिंग घेऊन बिले वितरित करण्‍याचे काम मिळाल्‍यामुळे महिला बचतगटांना उत्‍पन्‍नाचे साधन मिळाले असून यामुळे गटातील महिलांना आर्थिकदृष्‍ट्या स्‍वयंपूर्ण होण्‍यासाठी सहाय्य होणार आहे.

परभणी ग्रामीण विभागांतर्गत प्रभावती महिला बचतगटास तर जिंतूर उपविभागांतर्गत गुरुकृपा महिला बचतगटास हे काम मिळाले आहे. महिला बचतगटांना काम देण्‍यासास्‍ठी महावितरण कंपनीने बचतगटांकडून निविदा मागविल्‍या होत्‍या. अन्‍य तालुक्‍यातील बचतगटांना असे काम देण्‍याची कार्यवाही सुरु आहे. महिलांमध्‍ये बचतगटाच्‍या चळवळीमुळे एक प्रकारचा आत्‍मविश्‍वास निर्माण झालेला असल्‍याने ते वीज मीटरच्‍या योग्‍य नोंदीबाबत आवश्‍यक ती काळजी घेतील. ग्राहकांच्‍या वीजबिलाबाबतच्‍या शंका दूर करुन त्‍यांचे योग्‍य समाधान करतील. योग्‍य रिडींगमुळे वीजबिल वसुलीत वाढ होऊन महावितरणची आणि महिला बचतगटाची आर्थिक स्‍थिती सुधारतील, अशी आशा आहे.

राजेंद्र सरग
जिल्‍हा माहिती अधिकारी, परभणी

No comments:

Post a Comment