Tuesday, January 22, 2013

काष्ट शिल्पाचे भारत भ्रमण

घरात काष्ठशिल्पकलेचा कोणताही गंध नसताना जुनोनातील एका शेतक-याच्या मुलाने छंद म्हणून जोपासलेल्या काष्ठशिल्पकेतून कुटूंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटविला आहे. विशेष म्हणजे त्याच्या काष्ठशिल्पाने संपूर्ण देशात भ्रमंती केली असून त्याला या कलेसाठी अनेकदा गौरविण्यातही आले आहे.

जुनोना येथील अशोक शेंडे असे या हरहुन्नरी कलावंताचे नाव आहे. वडिलाची दीड एकर शेती वाटयाला आली. मात्र या दीड एकर शेतीतून कुटूंबाचा उदरनिर्वाह करणे शक्य नव्हते. त्यामुळे शेतीला जोड म्हणून अशोक शेंडे मोलमजूरी करीत. मोलमजूरीसाठीच ते अनेकदा चंद्रपूरात यायचे. यावेळी त्याचा संपर्क चंद्रपूरातील काष्ठशिल्प कलावंत रतन पोहणकर यांच्याशी आला. पोहणकर हे सुध्दा काष्ठशिल्पकलेत निपुण आहेत. पोहणकर यांचे काष्ठशिल्प पाहून अशोक प्रेरित झालेत नव्हे. ते अक्षरश: या कलेच्या प्रेमात पडले. जुनोना तसेही जंगलालगत वसलेले गाव. त्यामुळे जंगलातून वाकडीतिकडी लाकडे, बांबू आणायचे. त्याचा आकार बघायचा आणि काहीतरी कलाकृती त्याच्यातून बाहेर आणायची असा छंद त्यांनी जोपासला. मागील दहा ते बारा वर्षापासून त्याचा हा छंद त्यांच्या कुटूंबीयासाठी पोट भरण्याचे साधन ठरला आहे.

या छंदातूनच आपला व्यवसाय उदयास येईल किंवा कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन होईल असे कधीही त्यांच्या ध्यानात आले नाही. त्यामुळे केवळ छंद म्हणून मिळेल त्या वेळात जंगलात जाणे, वाकडेतिकडे लाकूड, बांबू आणणे आणि त्यावर काहीतरी करीत बसणे असा सुरुवातीचा छंद नंतर कलेकडे वळला. त्यांच्या कल्पनेतून तयार झालेली अनेक काष्ठशिल्पे प्रदर्शनात आली आणि ख-या अर्थाने त्यांच्या कलेकडे नागरिकांचे लक्ष वेधले गेले. यानंतर देशाच्या कानाकोप-यात आयोजित काष्ठशिल्प प्रदर्शनामध्ये त्यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांच्या काष्ठशिल्पाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले.

कलावंताच्या कलेला किंमत नसते. त्यामुळे अनेकांनी हजारो रुपये मोजून त्यांची काष्ठशिल्पे खरेदी केली आहेत. मग देशाची राजधानी दिल्ली असो केरळ असो किंवा भुवनेश्वर, हैदराबाद असो, प्रत्येक ठिकाणी अशोक शेंडे यांच्या काष्ठशिल्पाने कौतुकाची थाप मिळवून घेतली आहे. अनेकजण त्यांच्या जुनोना या गावी जाऊन सुध्दा त्याच्याकडील काष्ठशिल्पे खरेदी करतात. प्रत्येक महिन्याला किमान दोन-तीन काष्ठशिल्पे विक्रीला जात असून चार ते पाच हजारांमध्ये एक काष्ठशिल्प विकले जाते. यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविला जात असल्याचे अशोक शेंडे सांगतात. चंद्रपूर येथील चांदा क्लब ग्राऊंडवर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाच्या वतीने बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे विक्री आणि प्रदर्शन लागली होती. या प्रदर्शनात अशोक शेंडे काष्ठशिल्पासह सहभागी झाले. येथे येणा-या प्रत्येकालाच शेंडे यांचे काष्ठशिल्प आकर्षित करीत होते. या प्रदर्शनातून शेंडे याच्या काष्ठशिल्पाला दादही मिळाली सोबतच आर्थिक लाभही मिळाला. मुंबई येथे होणा-या प्रदर्शनासाठी शासनाकडून त्यांच्या काष्ठशिल्पाची निवड झाली. काष्टशिल्प केलेने अशोकला आर्थिक समृध्दी तर दिलीच सोबतच ओळखही दिली.

No comments:

Post a Comment