Tuesday, January 22, 2013

व्हीटीएस-पुरवठा व्यवस्थेतील पथदर्शी उपक्रम


राज्य शासनाच्या पुरवठा विभागातील एकूणच कामकाज सामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असते. जनतेची मागणी आणि रॉकेल व धान्याचा होणारा पुरवठा याबाबत जनतेत नाराजीचा सूर असतो. ही नाराजी दूर करण्यासाठी आणि जनतेला दिलासा देण्यासाठी कोल्हापूर येथील पुरवठा विभागाने व्ही.टी.एस. सिस्टीम (Vehicle Tracking System) व्दारे आदर्श उपाययोजना केली आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांच्या संकल्पनेतून ही सुविधा निर्माण केली आहे. तंत्रज्ञानाच्या आधारे पुरवठा विभागाच्या वितरण प्रक्रियेत सुसुत्रता आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. राज्यातील पहिलाच अभिनव प्रयोग या ठिकाणी राबवला जातोय. या उपक्रमामुळे रॉकेल आणि धान्य वितरणाची व्यवस्था अधिक पारदर्शी झाली आहे. या अभिनव उपक्रमाची माहिती देण्याचा हा प्रयत्न ...

पूर्वी टँकर अथवा ट्रक धान्य किंवा रॉकेल घेऊन निघाल्यावर त्याचे मार्ग निश्चित करुनही नियंत्रण ठेवता येत नव्हते. त्यामुळे अनेक तक्रारींना प्रशासनाला सामोरे जावे लागत होते. या प्रक्रियेत भेसळीच्या अनेक तक्रारी येत होत्या. परंतु आता फक्त एका एस.एम.एस.वर टँकर रोखता येतो. टँकरमध्ये जीपीआरएस सिस्टीम बसविली असून ती जिल्ह्याच्या मुख्य कार्यालयाशी जोडली आहे. व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीमच्या आधारे टँकरव्दारे होणाऱ्या वितरणावर नियंत्रण ठेवले आहे.

प्रत्येक तालुक्यात टँकरला मार्ग निश्चित करुन दिले आहेत. हे टँकर आपल्याच झोनमध्ये रॉकेलचे वितरण करतात. त्याची माहिती तहसिलदार आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांना क्षणात एस.एम.एस. व्दारे मिळते. टँकरला दिलेला मार्ग सोडून इतर ठिकाणी थांबल्यास किंवा दुसऱ्या मार्गावर गेल्यास लगेच त्याची माहिती एका एस.एम.एस.व्दारे अधिकाऱ्यांना मिळते आणि टँकर आहे त्या ठिकाणी बंद करता येतो.

टँकर ठराविक वेगानेच चालविणे बंधनकारक आहे. शिवाय दिलेल्या ठिकाणा व्यतिरिक्त इतर ठिकाणी टँकर थांबल्यास खुलासा विचारला जातो. एकाच ठिकाणी ठराविक वेळेपेक्षा जास्त वेळ टँकर थांबल्यास चौकशी होते. त्यामुळे टँकर मालकांना नियमातूनच जावे लागते. शिवाय टँकरचा मार्ग, थांबलेले ठिकाण, वेग याची माहिती प्रत्येक क्षणाला मिळत असल्याने गैर प्रकारांना आळा बसला आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी संजय शिंदे यांनी या प्रक्रियेत अधिक बदल करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले.

अशी आहे व्हीटीएस प्रणाली
व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम (VTS) प्रणाली मध्ये केरोसीन वितरकांच्या टँकर मध्ये व्ही.टी.एस यंत्र बसविले असून ऑनलाईन प्रणाली व्दारे जिल्ह्यातील सर्व टँकरची स्थिती संबंधित अधिकाऱ्यांना एकत्र मिळू शकते. ऑनलाईन प्रणालीच्या मुखपृष्ठावर सर्व टँकरची स्थिती समजते.

टँकर कोणत्या ठिकाणी आहे व त्याची सध्याची गती किती आहे हे ऑनलाईन प्रणाली व्दारे समजू शकते. या प्रणालीमध्ये एका पेक्षा जास्त टँकरची माहिती एकाच वेळी पाहता येते. कोणताही टँकर निवडून त्याची माहिती घेता येते. टँकरने दिलेला मार्ग सोडल्यास अलर्ट येतो व आपण एस.एम.एस. व्दारे टँकर थांबवू शकतो. कोणत्याही दिवसाचा आपण टँकरचा अहवाल पाहू शकतो त्यामध्ये टँकरने किती अंतर प्रवास केला आहे याची माहिती मिळते.

एका दिवसामध्ये टँकर किती अंतर फिरला ,किती वेळा थांबला याचा अहवाल पाहता येतो. टँकर वेग मर्यादेच्या बाहेर गेला तर तसा आपल्याला अहवाल मिळतो. टँकरचे दैनंदिन अहवाल आपण पाहू शकतो यामध्ये टँकर कोणत्या तारखेला किती किलोमीटर फिरला ते आपण पाहू शकतो. टँकर वेग मर्यादेच्या बाहेर गेला तर तसा अलर्ट येतो. स्टॉप अलर्टमध्ये वाहन एकाच जागेवर किती वेळ थांबले आहे हे कळू शकते. वाहन चालू स्थितीमध्ये पाहता येते. Google maps वरुन वाहनाचे ठिकाण कळते.

या प्रक्रियेमुळे पुरवठा विभागाची वितरण व्यवस्था सक्षम झाली असून तक्रारींची संख्या कमी झाली आहे. तसेच गैर प्रकारांना आळा बसल्यामुळे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ई-गर्व्हनन्सव्दारे प्रशासन आदर्श कारभार करु शकते. याचे उत्तम उदाहरण म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जाते.

  • सागरकुमार कांबळे, माहिती सहायक, विभागीय माहिती कार्यालय,कोल्हापूर
  • No comments:

    Post a Comment