Friday, January 25, 2013

उद्दिष्‍ट : पोलियो निर्मूलनाचे

‘दो बुंद जिंदगी के’ या चार अक्षरी अमिताभ बच्‍चनच्‍या आवाहनाला भारतीय नागरिकांनी प्रतिसाद दिला आणि भारत पोलिओ निर्मूलनाच्‍या वाटेवर चालू लागला. मुलं ही देवाघरची फुलं आहे, असे म्‍हटल्‍या जाते. या फुलांना टवटवीत आणि निरोगी ठेवणं केवळ पालकांचीच नाही तर शासन आणि समाजाचीसुध्‍दा जबाबदारी आहे. त्‍यामुळे शासनाने पोलिओ निर्मूलनाचा ध्‍यास घेतला असून गेल्‍या दहा वर्षातील नागरिकांचा या मोहिमेला प्रतिसाद पाहता भारतातून पोलिओ हद्दपार होण्‍याच्‍या मार्गावर आहे.

सुरुवातीच्‍या काळात नागरिकांना किंवा बालकाला कोणत्‍याही असाध्‍य रोगाची लागण झाली की, हा देवाचा कोप आहे, असे मानले जात होते. कोणतेही उपचार न करता केवळ स्‍वत:च्‍या नशिबाला दोष देणे, यापलिकडे काहीही करण्‍याची माणसाची प्रवृत्‍ती नव्‍हती. मात्र काळ बदलला. नागरिकही सजग झाले आणि विज्ञानाच्‍या प्रगतीमुळे या असाध्‍य रोगांवर मात करणा-या औषधी निर्माण झाल्‍या. त्‍यामुळे रोगांचे निदान होऊन त्‍यावर उपाययोजना होऊ लागल्‍या. भारतात पोलिओचे उच्‍चाटन करण्‍यासाठी 1995 पासून पोलिओ लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. सुरुवातीला या मोहिमेला नागरिकांचा प्रतिसाद संथ होता, मात्र शासनाच्‍या प्रयत्‍नामुळे नागरिकांमध्‍ये या मोहिमेची जनजागृती झाली आणि पालक बालकांना पोलिओ डोजसाठी बूथवर नेऊ लागले. परिमाणी भारतात पोलिओचे उच्‍चाटन होण्‍यास सुरूवात झाली. एवढेच नव्‍हे तर 15 जानेवारी 2011 नंतर भारतात पोलिओचा एकही रुग्‍ण आढळला नाही. याची दखल जागतिक आरोग्‍य संघटनेनेसुध्‍दा घेतली आणि शासनाने केलेल्‍या प्रयत्‍नांचे कौतुक केले.

1995 मध्‍ये जेव्‍हा पोलिओ लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली तेव्‍हा परभणी शहरात 40 बूथ लावण्‍यात आले होते. आरोग्‍य कर्मचा-यांचा तुटवडा, नागरिकांत पाहिजे त्‍या प्रमाणात जनजागृती नसल्‍यामुळे सुरुवातीला ही मोहीम संथगतीने सुरू होती, मात्र आज प्रत्‍यक्ष नागरिक यात सहभागी होत असल्‍यामुळे आणि आरोग्‍याच्‍या बाबतीत शासन कटीबध्‍द असल्‍यामुळे प्रशासनातर्फे पोलिओ लसीकरणाची मोहीम प्राधान्‍याने राबविण्‍यात येत आहे. जिल्‍ह्यात 20 जानेवारी आणि 24 फेब्रुवारी 2013 रोजी पोलिओ लसीकरण आहे. 

आरोग्‍य विभागातर्फे जिल्‍ह्यातील 2 लक्ष 28 हजार 214 बालकांना पोलिओ डोज देण्‍याचे उद्दिष्‍ट ठेवण्‍यात आले असून यात ग्रामीण भागातील 1 लक्ष 41 हजार 700 तर शहरी भागातील 86 हजार 514 बालकांचा समावेश आहे. त्‍यासाठी परभणी जिल्‍ह्यात 1 हजार 395 बुथची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. यात ग्रामीण भागात 1 हजार 110 तर शहरी भागात 285 बुथ लावण्‍यात येणार आहे. यातूनही काही बालके सुटली तर लसीकरणानंतर तीन दिवस ग्रामीण भागात आणि पाच दिवस शहरी भागात घरोघरी जाऊन लसीकरण करण्‍यात येणार आहे. जिल्‍ह्यातील एकूण 3 लक्ष 27 हजार 113 घरी पोहचून लसीकरण करण्‍याचे आरोग्‍य विभागाचे उद्दिष्‍ट असून यात ग्रामीण भागातील 2 लक्ष 24 हजार 867 तर शहरी भागातील 1 लक्ष 2 हजार 246 घरांचा समावेश आहे. आरोग्‍य विभागाने यासाठी ग्रामीण भागात 685 टीम आणि शहरी भागात 210 टीम अशा एकूण 895 टीम तयार ठेवल्‍या आहेत. प्रवास करणारे कोणतेही बालक पोलिओ डोजपासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासन प्रयत्‍नशील आहे. रेल्‍वेस्‍टेशन, बसस्‍थानक आणि चेक पोस्‍टवर एकूण 100 टीमची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. यात ग्रामीण भागात 58 तर शहरी भागात 42 टीमचा समावेश आहे. याशिवाय वीटभट्ट्या, जिनिंग, आखाडे तसेच अस्‍थाई लोकांसाठी ग्रामीण भागात 63 टीम आणि शहरी भागात 132 अशा एकूण 195 मोबाईल टीम जिल्‍ह्यात कार्यरत राहणार आहेत.

गत अनेक वर्षांपासून परभणीत पोलिओचा रुग्‍ण आढळला नाही, ही नक्‍कीच आनंदाची बाब आहे. तसाच तो पुढेही आढळू नये, यासाठी आरोग्‍य विभाग, जिल्‍हा प्रशासन नेहमीच तत्‍पर असते. या लसीकरण मोहिमेत पाल्‍यांनी पाच वर्षांपर्यंतच्‍या मुलांना आणून त्‍यांना पोलियो डोज द्यावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी डॉ. शालीग्राम वानखेडे, जिल्‍हा प्रशासन आणि आरोग्‍य विभागाने केले आहे.

लसीकरण मोहिमेला सुरुवात झाल्‍यानंतर जागतिक पातळीवर पोलिओ रुग्‍णांच्‍या संख्‍येत कमालीची म्‍हणजे तिपटीने घट झाली आहे. जागतिक पातळीवरचे प्रतिबिंब भारतातही उमटले असून आपल्‍या देशातून पोलिओचे रुग्‍ण जवळपास हद्दपार झाले आहेत. 2011 मध्‍ये भारतात शेवटचा पोलिओ रुग्‍ण पश्‍चिम बंगालमध्‍ये आढळला होता. जानेवारी 2011 नंतर भारतात पोलिओचा एकही रुग्‍ण न आढळल्‍यामुळे जागतिक आरोग्‍य संघटनेने भारताची पाठ थोपटली आहे. 

राजेश येसनकर,
माहिती अधिकारी, परभणी

No comments:

Post a Comment