Thursday, January 17, 2013

शेतरस्त्यांची चळवळ

शेतीचा बांध आणि रस्ता या कारणावरुन शेतकऱ्याला तहसिल कार्यालय, न्यायालयात आपला वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणात खर्च करणे भाग पडते. मात्र बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तहसिल कार्यालयात सहा महिन्यापूर्वी रुजू झालेले तहसिलदार सुरेश बगळे यांनी लोकसहभाग व लोकवर्गाणीतून शेतरस्ते तयार करण्याचा कार्यक्रम सुरु केला. महिन्याभराच्या कालावधीत तालुक्यातील दहा गावांमध्ये सुमारे दिडशे किलोमीटर अंतराच्या 63 रस्त्याची निर्मिती यातून झाली आहे. त्यामुळे विविध दीर्घकाळाच्या समस्यांमधून शेतकऱ्यांची सुटका होऊन शेतीचे नियोजन अधिक चांगले करणे त्यांना शक्य होऊ लागले आहे.

चिखली तालुक्यामध्ये शेतरस्त्यांच्या वादाबाबत असलेल्या खटल्याचा अभ्यास केल्यानंतर अस्तित्वात असलेल्या रस्त्यांवरही अतिक्रमणे झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर महसूल प्रशासनाकडून संपूर्ण माहिती घेऊन हा उपक्रम राबविण्यासाठी शेतकऱ्यांचे सहकार्य गरजेचे असल्याची जाणीव झाली. लोकसहभाग आणि लोकवर्गणीतून जर शेतरस्त्याचे काम करण्याची योजना पूर्णत्वास आली तर शेतकऱ्यांना त्याचे महत्व पटेल हे हेरुनच शेतकरीच या योजनेचा केंद्रबिंदू ठरविला. त्यांच्याच पुढाकाराने या योजनेला सुरवात केली. आज तालुकाभरात या योजनेची फळे दिसत आहेत. या योजनेच्या यशाचा खरा हकदार हा शेतकरीच आहे, आम्ही केवळ मार्गदर्शक आणि निमित्तमात्र आहोत. असे त्यांनी भेटी प्रसंगी सांगितले.

शेतामध्ये रस्ता नसल्याने प्रसंगी ये-जा करण्यासाठी काही किलोमीटर अंतरापर्यंत शेतकऱ्यांना पावसाळ्यात चिखल तुडवीत जावे लागते. जनावरांची वाहतूक तसेच त्यांच्यासाठी चारा आणणे अशी लहान-मोठी कामे करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. कित्येक शेतकरी ज्यांच्यासाठी शेतरस्ते नाहीत अशांना खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामांतील पिकांच्या काढणीचे नियोजन योग्य प्रकारे करता येत नाही.शेतकऱ्यांच्या समस्यांचे दशावतार संपविण्यासाठी तहसिलदार सुरेश बगळे यांनी लातूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी एकनाथ डवले, जिल्हाधिकारी बी.जी.वाघ यांचा आदर्श डोळयासमोर ठेवून तालुक्यातील शेतरस्त्यांना मोकळा श्वास देण्याचे ध्यासपर्व आरंभले.

तालुक्यातील शेलूद शिक्षक कॉलनीपासून शिंदी हराळी-खंडाळा मकरध्वज या गावाकडे जाणाऱ्या या उपक्रमाचा श्रीगणेशा झाला. या रस्त्यावरील लाभार्थी शेतकरी नारायण येवले, गणेश आवटी अशा अनेकांनी या उपक्रमाला वाहून घेतले. लोकसहभागातून म्हणजे शेतकऱ्यांच्याच वर्गणीमधून सुमारे दीड दिवसांत सहा किलोमीटर रस्ता पूर्ण करण्यात आला. यासाठी खंडाळा मकरध्वज शिवारातील शेतकऱ्यांचेही मोठे सहकार्य मिळाले. पहिला रस्ता पूर्ण झाल्याचे पाहून खंडाळा मकरध्वज ते चिखली एमआयडीसी हा दोन किलोमीटर लांबीचा रस्ताही गावकऱ्यांनी तातडीने वर्गणी जमा करुन पूर्ण केला. हळूहळू या उपक्रमाला माध्यमातूनही प्रसिध्दी मिळू लागली. तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये कुतूहलाने वातावरण निर्माण होऊन गावागावातील शेतकरी तहसिल कार्यालयाशी संपर्क करुन आपापल्या गावातील शेतरस्ते पूर्ण करण्यासाठी आग्रह धरु लागले पाहता पाहता एक महिन्याच्या कालावधीत सुमारे पाच ते सहा शेतरस्त्यांचे काम पूर्ण झाले. यामुळे दळणवळासाठींचे अतंर या रस्त्यामुळे कमी झाल्याचे अनुभव ग्रामस्थांना मिळाले आहेत.

एक महिन्याच्या कालावधीत जवळपास दीडशे किलोमीटर अंतराचे 63 रस्ते पूर्णावस्थेकडे पोचले आहेत. अजून शेकडो रस्ते प्रस्तावित असून तालुकाभरात शेतरस्त्याची एकही तक्रार तहसिल कार्यालयामध्ये प्रलंबित न ठेवण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

प्रशासनाविषयी शेतकऱ्याच्या मनामध्ये निर्माण झालेला सकारात्मक दृष्टिकोनाचा हा अनुभव प्रेरणादायी असल्याचे मत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. या योजनेत त्यांना सहकाऱ्यांनी तसेच असंख्य शेतकऱ्यांनी मौलिक सहकार्य केले.


- प्रशांत दैठणकर

No comments:

Post a Comment