Thursday, February 21, 2013

गावात झाली कुऱ्हाडबंदी उभी राहिली झाडांची तटबंदी

तलावांचा जिल्हा म्हणून भंडारा जिल्ह्याकडे पाहिलं जातं. जिल्ह्यातील सात तालुक्यांपैकी लाखणी तालुक्यातलं शिवनी हे 252 कुटुंबसंख्या असलेलं अंदाजे 1200 लोकवस्तीचं गावं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या चरणस्पर्शाने पावन झालेलं.

एकेकाळी अस्वच्छता त्यामुळे येणारे अनारोग्य यामुळे ग्रासलेलं आणि सरपणासाठी केलेल्या वृक्षतोडीनं उजाड झालेलं गाव आज हिरवंगार आणि आरोग्यदायी झालं आहे. गावानं 2004 पासून ग्रामसुधारणेची कास हाती घरली आणि गावाचा चेहरामोहराच बदलून गेला.

ग्रामसुधारणेचे कोणतेही पाऊल असो, गावाने त्यात निश्चियाने सहभागी होऊन अनेक पुरस्कार मिळवले. मग ते संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान असो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा किंवा असो तंटामुक्त ग्राम अभियान. ग्रामविकासाची धुन गावभर पसरली आणि एका ध्येयाने सगळं गाव एकत्र आलं.

गावकऱ्यांना सोबत घेऊन ग्रामविकासाच्या कार्याला गती दिल्याने शिवनी ग्रामपंचायतीने यशवंत पंचायतराज अभियानात 2009-10 मध्ये राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार पटकावला. त्यापूर्वी 2007-08 मध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात राज्यस्तरावरील दुसरा पुरस्कारही ग्रामपंचायतीला मिळाला असून राष्ट्रीय स्तरावरचा निर्मल ग्राम पुरस्काराने आणि महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम पुरस्कारानेही शिवनी ग्रामपंचायत सन्मानित झाली आहे.

ग्रामविकासाच्या कामाची ही दिंडी पुढे नेतांना गावानं इतर योजनांप्रमाणेच "पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजने" त सहभागी होण्याचा निर्णय घेतला. निर्णय होताच सगळं गाव एकदिलाने कामाला लागलं. गावात 100 टक्के कुऱ्हाडबंदीचा निर्णय झाला आणि गावची लोकसंख्या 1200 च्या आसपास असतांना गावात 4500 झाडं लागली. गावकऱ्यांनी नुसतीच झाडं लावली नाही तर ती जगविण्याची हमी घेतली. गावाच्या विकास कामात पुरुषांच्या बरोबरीने महिला सहभागी झाल्या. प्लॅस्टिकच्या पिशव्याचा वापर न करता कागदी तसेच कापडी पिशव्यांचा वापर करण्याचा निर्धार गावाने अंमलात आणला. गावातील 252 पैकी 132 कुटुंबाकडे बायोगॅस आला आणि इतरांकडे सौर आणि निर्धूर चुली.

वीजबचतीसाठी गावातील सर्व पथदिव्यांमध्ये सी एफ.एल आणि एल इ डीच्या बल्बचा वापर सुरु झाला. शासकीय पडीक जमीनीवर आणि घरांच्या परसदारात फळबागाची आणि भाजीपाल्याची लागवड झाली. गावातील सांडपाणी परसबागांना आणि फळबागांना मिळेल अशी व्यवस्था केल्याने पाणीबचतीचा संदेश घराघरात गेला.

ग्रामपंचायतीने गावातील घनकचऱ्याचे "नॅडप" पद्धतीने व्यवस्थापन करून खत निर्मितीला प्राधान्य दिले. यातून ग्रामपंचायतीची आर्थिक सक्षमता तर वाढलीच पण शेतीला, परसबागांना आणि फळबागांना लागणारे उत्तम खत गावातच तयार होऊ लागले. गाव सेंद्रीय शेतीकडे वळाला. परसबागेत लावलेल्या भाजीपाल्याच्या तसेच फळबागातून मिळणाऱ्या फळांच्या विक्रीतून गावकऱ्यांना उत्पन्नाचे आणखी एक साधन उपलब्ध झाले.

पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना राबवितांना फारशा अडचणी आल्या नाहीत असे सांगतांना सरपंच पदमाकर बावनकर यांनी फक्त बायोगॅस प्रकल्पाच्या वेळी मनात साशंकता आल्याची भावना बोलून दाखवली. बायोगॅस प्रकल्पाची अंमलबजावणी करतांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि तांत्रिक बाबी समजून घेतल्याने ही गोष्ट ही सोपी आणि यशस्वी झाली. त्याचाच परिणाम म्हणून 252 पैकी 132 कुटूंबाने बायोगॅस प्रकल्प यशस्वीपणे राबविला गेला. येत्या काही दिवसात गावातील सर्व कुटुंबाकडे हा प्रकल्प राबविण्याचा त्यांचा मानस आहे.

ग्रामपंचायतीने पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेत केवळ सहभाग घेतला नाही तर योजनेतील तीन ही वर्षाचे निकष पहिल्याच वर्षी पुर्ण करून गावाला "पर्यावरण विकासरत्न" पुरस्कार मिळवून दिला. पुरस्कार मिळाले, चला आता संपल सगळं अशी भावना मनात न ठेवता गावाने यात सातत्य कसं राहिल याकडे नेटाने लक्ष दिलं असून भविष्यातील कामाचेही नियोजनही केले आहे.

एक व्यक्ती दहा झाडं याप्रमाणे वृक्षलागवड करणे, लावलेली झाडं जगवणे, गावातील संपूर्ण कुटुंबाकडे बायोगॅस प्रकल्पाची अंमलबजावणी करणे, लोप पावत चाललेल्या दुर्मिळ वृक्षांची लागवड करून त्यांना संरक्षण देणे, घर आणि गावाचा परिसर स्वच्छ राखतांना इतर गावांनाही या कामासाठी कशी मदत करता येईल हे पाहणे, यासारख्या गोष्टीना त्यात प्राधान्य देण्यात आले आहे.

जयंत गडपायले या गावचे ग्रामसेवक असून त्यांनी आणि सरपंच पदमाकर बावनकर यांनी ग्रामविकासाच्या कार्यात घेतलेल्या पुढाकाराने एकेकाळी सरपणासाठी उजाड झालेल्या गावाभोवती आता वृक्षलागवडीतून हिरवाई निर्माण होत असल्याचे आणि त्यामाध्यमातून आरोग्य आणि पर्यावरण रक्षणाची तटबंदी उभी राहत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

 डॉ. सुरेखा मुळे

No comments:

Post a Comment