Monday, March 4, 2013

शेती उपयुक्त मधमाशा पालन

आजही देशात पारंपरिक पध्दतीने शेती केली जाते. अनेक कारणांमुळे शेती उत्पन्न म्हणावे तसे मिळत नाही. यासाठी पूरक उद्योग गरजेचे ठरतात. शेतीबरोबरच डोंगराळ भागातील जनतेने उत्पनाचे अन्य साधन म्हणून मधमाशापालनसारखे व्यवसाय करणे आवश्यक आहे. या व्यवसायाकरिता राज्य व केंद्र शासनामार्फत विविध सवलती शेतकऱ्यांकरिता दिल्या जातात. ‘मधमाशापालन’ हा उद्योग सुरु करणाऱ्या लाभार्थीसाठी तांत्रिक मार्गदर्शन, आर्थिक सहाय्य व बाजारपेठ उपलब्धता महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाकडून केली जाते.

मधमाशा फुलातून मकरंद गोळा करुन व शरीरातील पाचक रस त्यात मिसळून व मकरंदातील पाण्याचे प्रमाण कमी करुन शुध्द मध पोळ्यात साठवितात. मध हा शरीराला अत्यंत उपयुकत घ्टक असून यात प्रामुख्याने 20 ते 25 % पाणी, 30 ते 35 द्राक्षशर्करा, 35 ते 40 % फलशर्करा व 5 % पर्यंत केन शुगर, 0.2 % आम्ल, 0.25% प्रथिने आणि ॲमिनो आम्ले, 0.5 % खनिज द्रव्य असतात. 1 किलो मधापासून 3000 कॅलरीज मिळतात व एक चमचा मधापासून 100 कॅलरीज मिळते. हे मध शक्तीदायक व पौष्टिक अन्न व औषध आहे. तसेच औषधी गुणधर्म म्हणूनही मधाकडे पाहिले जाते.

मधमाशापासून मेण मिळते. कामकरी माशांच्या पोटावर असणाऱ्या मेण ग्रंथीच्या चार जोड्यातून कामकरी माशा मेण स्त्रवतात. मेण हे पांढरे-पिवळसर रंगाचे असते. मेणाचा उपयोग सौंदर्य प्रसाधने, औषधे, चर्च मधील मेणबत्या तयार करण्यासाठी, मधमाशा पालनासाठी आवश्यक असलेला मेणपत्रा तयार करण्यासाठी, दारुगोळा उत्पादने करणेसाठी, शाई, चिकटविण्याची टेप तयार करण्यासाठी, वंगण, छपाई कामात, बुट पॉलिशमध्ये, मॉडेल व प्लास्टिक कामात, रंग व्हर्निश इ.सुमारे 200 उत्पादनात मेणाचा उपयोग होतो. म्हणूनच मधा सोबतच मेणाचाही आर्थिक लाभ म्हणून शेतकरी उपयोग करतात.

मधमाशांच्या नांगीतील विषाचा उपयोग, संधीवातावरील औषध, रक्तदाब कमी करण्याच्या औषधामध्ये, डोळ्यांच्या व त्वचेच्या काही आजारात, रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या औषधात केला जातो.
मधमाशा समुहाने राहतात. एका समुहामध्ये 10 ते 30 हजार माशा असतात. त्यामध्ये एक राणी माशी, कामकरी, नरमाशा व त्यांचा पिलावा असतो. या सर्वांना वसाहत म्हणतात. मधमाशा पाळण्यास खालील बाबी लक्षात घ्याव्या लागतात.

• सदाहरित जंगल असावे, जंगलात मकरंद व पराग भरपूर असलेल्या वनस्पती असाव्यात, शेती –पिके असतील तर तेल बिया, फळझाडे व इतर मधमाशांना उपयुक्त पिके असावीत.

• जवळपास स्वच्छ वाहते पाणी असावे, मधूबन एकदम उंच ठिकाणी नसावे. मशमाधा पालन करण्याकरिता मधपेटी व मधयंत्र आवश्यक असते. सातेरी वसाहतीसाठी आय.एस.आय.आठ फ्रेमी व मेलीफेरा वसाहतीसाठी दहा फ्रेमी लँकस्ट्राँथ मधपेटी वापरतात. रॅडियल व टँजन्शीअल हे मधयंत्राचे दोन प्रकार असून मध काढण्यासाठी याचा उपयोग होतो.

मधमाशा पालन उद्योग फावल्या वेळेत करता येण्यासारखा जोड धंदा आहे. एक कुटुंब सहजासहजी 50 ते 100 मधपेट्यांची व्यवस्था पाहू शकते. त्यासाठी आठवड्यातून फक्त दोन तास लागतात.

नॅशनल हॅर्टीकल्चर मिशन (NHM) तर्फे मधमाशांच्या वसाहती न्यूक्लियस स्टॉक निर्माण करण्यासाठी रु. 10.00 लाखापर्यंत 10 % अनुदान पूरविण्यात येते. (शासकीय संशोधन संस्था करिता), बी ब्रीडर्स यांचे मार्फत मधमाशांच्या वसाहती निर्माण करण्यासाठी रु.600 लाख इतक्या मर्यादेपर्यंत 50 % अनुदान पूरविण्यात येते.(2000 वसाहती प्रती वर्षी), 50 % अनुदानीत दराने जास्तीत जास्त 20 पर्यंत वसाहती खरेदीसाठी मदत, मधपेट्या खरेदीसाठी 50 % अनुदान (20 मधपेट्‌याचे मर्यादेपर्यंत), मधयंत्र, मध साठविणेसाठी भांडी इ.रु.14000/- इतक्या किंमतीच्या 50 % अनुदान दिले जाते.

निवडलेल्या व्यक्तीस / संस्थेच्या कर्मचाऱ्यास संचालनालयामार्फत महाबळेश्वर येथील संशोधन प्रशिक्षण व विकास केंद्रामध्ये 25 दिवसांचे मोफत प्रशिक्षण देण्यात येते. मधमाशा पालन करु इच्छिणाऱ्या पात्र लाभार्थींना आवश्यक ते प्रशिक्षण मंडळाकडून मोफत देण्यात येते. प्रशिक्षणाचा कालावधी मधपाळ व केंद्र चालक यांच्यासाठी वेगवेगळा राहील. या योजनेंतर्गत देण्यात येणारे अर्थसहाय्य हे मध उद्योगासाठी लागणारी हत्यारे, अवजारे व साहित्य या स्वरुपात असेल. साहित्यापोटी देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यापैकी 20 टक्के कर्ज रक्कमेची परतफेड 5 वर्षामध्ये करावयाची आहे. पहिल्या वर्षाचा कालावधी विलंबावधी (मॉरॅटोरीयम) असेल व कर्जावर दरसाल दर शेकडा 4 टक्के दराने व्याज आकारणी करण्यात येईल. लाभार्थ्यांनी सदर कर्जाची परतफेड चार (4) समान हप्त्यात करणे बंधनकारक आहे.

या योजनांच्या व मध उद्योग माहितीसाठी संचालक, मध संचालनालय, महाराष्ट्र राज्य खादी
ग्रामोद्योग मंडळ सरकारी बंगला क्र.5, महाबळेश्वर, जिल्हा – सातारा किंवा आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

भारती वाघ

No comments:

Post a Comment