Wednesday, November 9, 2011

युवा शेतकऱ्याने पिकविली पपई बाग

उमरखेड पासून ६ किलोमिटर अंतरावर बेलखेड नावाचे गाव आहे. या गावातील युवा शेतकऱ्यांनी नवनवीन कृषी तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी एक गट तयार केला आहे. गटातील हे शेतकरी नवनवीन प्रयोग आपल्या शेतावर राबवित असतात. या युवा शेतकऱ्यांपैकी सुदर्शन नारायण कदम या शेतकऱ्याने परंपरागत शेती व पिक पध्दतीला फाटा देत नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पपईची उत्कृष्ठ बाग फुलविली आहे. अवघ्या साडेसात महिन्याच्या कालावधीत या युवा शेतकऱ्याच्या पपईला चांगली बाजारपेठ देखील मिळू लागली आहे. त्यांची बहरलेली पपईची शेती पाहता अन्य शेतकऱ्यांची मार्गदर्शसाठी त्यांच्याकडे गर्दी दिसते.

सुदर्शन कदम यांनी मागील वर्षी १२ डिसेंबर २०१० रोजी आपल्या शेतामध्ये ७२ गुंठ्यामध्ये पपई पिकाची लागवड केली. पपईच्या दोन झाडांतील अंतर त्यांनी १० X ४.५० एवढे ठेवले. आधुनिक ड्रीप तंत्रज्ञानाचा वापर करुन या झाडांच्या सिंचनाची सुविधाही त्यांनी करून घेतली. अवघ्या सोडसात महिन्यात त्यांच्या पपईच्या फळ बागेला बहर आला आहे. एका झाडाला खालून वरपर्यंत लदबद पपईची फळं लगडली असून आजच्या स्थितीत एका झाडाला एक क्विंटलच्यावर पपई आहेत.

मागील वर्षी डिसेंबर व जानेवारी महिन्यात असलेल्या थंडीमुळे पपईची रोपे लागवडीनंतर पिवळी पडली होती. त्याचवेळी तज्ञांचा सल्ला घेऊन डिसेंबर व जानेवारी महिन्यात प्रत्येकी एक फवारणी केली. त्यानंतर कुठल्याही प्रकारची फवारणी अथवा इतर खर्च या बागेवर आपण केला नसल्याचे सुदर्शन कदम यांनी सांगितले.

७२ गुंठ्यामध्ये १ लाख ४० हजार रुपये एवढा उत्पादन खर्च झाला असून आजच्या बाजार भावाप्रमाणे १८०० रुपये प्रति क्विंटल असलेले पपईचे भाव पाहता येत्या वर्षभरात या बागेतून ९ लाख रुपयांचे उत्पन्न होईल, ते म्हणाले. पाटील बायोटेकच्या माध्यमातून बेलखेड मधील ४ ते ५ युवा प्रगतशिल शेतकऱ्यांचे एक ग्रुप तयार झाला असून या शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे. यापुढे डाळींब व हळद लागवडीचा प्रयोगही बेलखेडच्या शिवारात राबविणार असल्याचे सुदर्शन कदम यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment